दक्षिण आफ्रिकेला हरवून भारतानं जिंकली एकदिवसीय मालिका, यशस्वी जैस्वालनं केला विक्रम

फोटो स्रोत, ANI
भारतानं दक्षिण आफ्रिकेचा तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात पराभव करत एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिकादेखील 2-1 अशी जिंकली आहे.
विशाखापट्टणममध्ये झालेल्या या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघानं दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 47.5 षटकांमध्ये 270 धावांमध्ये ऑलआउट केलं.
भारतीय संघासमोर विजयासाठी 271 धावांचं लक्ष्य होतं. भारतीय संघानं 39.5 षटकांमध्ये 9 गडी राखून हा सामना जिंकला.
भारताकडून सर्वाधिक नाबाद 116 धावा यशस्वी जैस्वालनं केल्या. विशेष म्हणजे यशस्वीचं हे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमधील पहिलं शतकदेखील आहे.
हे शतक लगावून जैस्वालनं एक विक्रमदेखील केला आहे. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक करणारा तो सहावा भारतीय फलंदाज ठरला आहे.
जैस्वालला फलंदाजीत दमदार साथ मिळाली रोहित शर्माची. सलामीवीर रोहित शर्मानं 75 धावा केल्या. तर विराट कोहलीनं नाबाद 65 धावा केल्या.
दक्षिण आफ्रिकेकडून क्विटन डिकॉकनं केलं शतक
नाणेफेक हरल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला. मात्र त्याची सुरूवातच अडखळत झाली. अर्शदीप सिंह पाचव्या चेंडूवरच रेयन रिकल्टनला कॅच आउट केलं.
अर्थात यानंतर सलामीवीर क्विटन डिकॉक आणि कर्णधार टेम्बा बवुमा यांनी फलंदाजी सावरत स्थिर गतीनं धावा केल्या.
डिकॉकनं 80 चेंडूंमध्ये शतक झळकावलं. प्रसिद्ध कृष्णानं डिकॉकला 106 धावांवर क्लीन बोल्ड केलं. तर कर्णधार बवुमानं 48 धावांची खेळी केली.

फोटो स्रोत, ANI
याव्यतिरिक्त दक्षिण आफ्रिकेचा कोणताही फलंदाज खेळपट्टी फार काळ टिकू शकला नाही. त्यामुळे 47.5 षटकांमध्येच 270 धावांवर दक्षिण आफ्रिकेचा संघ ऑल आउट झाला.
भारताच्या गोलदाजांमध्ये प्रसिद्ध कृष्णा आणि कुलदीप यादव यांनी 4-4 गडी बाद केले. तर अर्शदीप सिंह आणि रवींद्र जडेजा यांनी 1-1 गडी बाद केला.
सलीमीवीरांनी घातला विजयाचा पाया
भारताचे सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्मा यांनी संघाला चांगली सुरूवात करून दिली. दोघांनी मिळून 155 धावांची दमदार भागीदारी केली. त्यामुळे 271 धावांचं लक्ष्य भारतीय संघानं सहजपणे गाठलं.
रोहित शर्मानं सहा चौकार आणि एक षटकार लगावत 54 चेंडूंमध्ये 50 धावा केल्या.
रोहित शर्मा 75 धावांवर खेळत असताना, 26 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर केशव महाराजनं रोहितला कॅच आउट केलं.
मात्र त्यानंतर आलेल्या विराट कोहली मैदानात उतरला. विराटनं जैस्वालच्या साथीनं धावा काढत धावसंख्येचं उद्दिष्टं गाठलं.

फोटो स्रोत, ANI
जैस्वालनं या सामन्यात 10 चौकार आणि एक षटकार ठोकत 111 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केलं.
पहिला एकदिवसीय सामना भारतानं 17 धावांनी जिंकला होता. तर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा 4 गडींनी पराभव झाला होता.
तसंच दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेनं भारताचा 2-0 असा पराभव केला होता.
आता 9 डिसेंबरपासून पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना कटकमध्ये खेळला जाणार आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)








