शिवाजी महाराजांचे हिंदुत्व आणि आताचे हिंदुत्व वेगळे आहे, असं शाहू महाराज छत्रपती यांनी का म्हटलं?

शिवाजी महाराजांचे हिंदुत्व आणि आताचे हिंदुत्व वेगळे आहे, असं शाहू महाराज छत्रपती यांनी का म्हटलं?
    • Author, दीपाली जगताप
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
    • Reporting from, कोल्हापूर

कोल्हापुरात शिवराज्याभिषेक दिनी औरंगजेबाचे स्टेट्स ठेवण्यात आल्याच्या निषेधार्थ कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटना आज (7 जून) रस्त्यावर उतरल्या. या आंदोलनाला हिंसक वळण लागलं.

त्यानंतर गृह विभागाने कोल्हापूर पोलिसांना तातडीने शहरातील परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे निर्देश दिले.

कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्या सहा जणांना अटक करण्यात आल्याची माहिती माध्यमांशी बोलताना दिली.

छत्रपती शाहू महाराजांच्या काळापासूनच कोल्हापूरची प्रतिमा एक पुरोगामी जिल्हा अशीच आहे. जातीय आणि धार्मिक सलोख्याबाबत कोल्हापूरकरांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांच्याकडून वारसा घेतला आहे असं कोल्हापूरकर अभिमानाने तुम्हाला सांगताना दिसतील.

पण गेल्या काही महिन्यात अशा घटना घडल्या की कोल्हापूरकरांची जी सेक्युलर प्रतिमा आहे ती बदलण्याचा प्रयत्न होतोय का अशी चर्चा सुरू झाली.

औरंगजेबाचे स्टेटस ठेवले म्हणून एका मुस्लीम कुटुंबावर बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न झाला तर एका हॉटेल चालकाने 1857 च्या उठावाचे नेतृत्व करणारे बाहदुरशाह जफर यांचे चित्र लावले म्हणून त्यांना धमकवण्याचा प्रकार घडला होता.

कोल्हापुरातील त्यावेळेच्या परिस्थितीचा लेखाजोखा मांडणारा रिपोर्ताज पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.

छत्रपती शाहू महाराजांचे वंशज शाहू महाराज छत्रपती यांनी आपला वेळ देऊन बीबीसी मराठीला मुलाखत दिली आणि धार्मिक सलोखा म्हणजे काय, भविष्याची दिशा कशी राहील याबाबत आपले विचार व्यक्त केले. या सर्व गोष्टी तुम्हाला या रिपोर्ताजमध्ये वाचायला मिळतील.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

“हमे समझाने का मौका भी नहीं मिला. कोई साथ नहीं दे रहा था. कोई फोन नहीं उठा रहा था. मेरे चाचा का गोडाऊन भी जलाया. गाव में सब बोल रहे थे की हमे निकालनेवाले है.”

राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांचा वारसा लाभलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात आम्ही पोहचलो आणि एका गावात आमची भेट एका मुस्लीम तरुणाशी झाली. त्याने त्याच्या मनातील भीती आमच्याजवळ बोलून दाखवली.

हिंदू-मुस्लीम ऐक्याची परंपरा असलेल्या या गावाने पहिल्यांदाच आपल्या गावात धार्मिक तणावाचं वातावरण पाहिलं. ग्रामस्थ दबावाखाली असल्याचंही चित्र होतं.

या गावातील 19 वर्षीय तरुणाने आपल्या व्हॉट्स अॅपवरील स्टेटसवर औंरगजेबाचा एक व्हीडिओ पोस्ट केला. हे स्टेटस अवघ्या काही तासात गावातल्या काही हजारो लोकांपर्यंत पोहचलं. पाहता पाहता गावात 400 ते 500 लोक जमा झाले.

कोल्हापूर शहरापासून 21 किलोमीटर अंतरावर असलेल्या सावर्डे गावात आम्ही पोहचलो त्यावेळी त्याठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडर यांची जयंती साजरी केली जात होती. पण काही दिवसांपूर्वी हेच गाव धार्मिक तणावाखाली होतं. सगळ्या गावकऱ्यांनी दोन दिवस गावात बंद पुकारला होता.

‘कुटुंबावर बहिष्कार टाकण्याची मागणी’

“उससे वो गलतीसे हुआ. पर श्यामतक उसपर बहोत कुछ होने लगा, गाववालोने भी हमारा साथ नहीं दिया. सबने निषेध व्यक्त किया. उसकी इतनी उमर नहीं की उसको ये गलती समझे. उसकी दसवी तक पढाई हुई है,” असं एका स्थानिक युवकाने आमच्याशी बोलताना सांगितलं.

ताराराणी

हे प्रकरण केवळ मुस्लीम तरुणाच्या अटकेपर्यंत थांबलं नाही. तर गावात जमा झालेल्या विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या आणि राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी संबंधित मुस्लीम कुटुंबावर गावाने बहिष्कार टाकावा अशी मागणीच सरपंचांकडे केली.

कोल्हापूर

सरपंच अमोल कांबळे यांनी मात्र ही मागणी फेटाळून लावली. बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, “औरंगाबाद शहराचे नामकरण छत्रपती संभाजी नगर झाले यावरून सोशल मीडियावर मुस्लीम समाजातील काही युवकाने स्टेटस ठेवलं होतं. त्यावरून जातीय तेढ निर्माण होणारी परिस्थिती निर्माण झाली होती. परिसरातील मुलांनी पाहिलं आणि त्यानंतर ते व्हायरल होत गेलं.

त्याला वेगळच स्वरुप येऊ लागलं. पोलीस गावात आले. मुलाला अटक केली, गावात 400-500 लोक जमले. गाव बंद झालं. असं सगळं घडत गेलं. यात बऱ्याच हिंदुत्ववादी संघटना आणि राजकीय पक्षांचा सहभाग होता.”

संपूर्ण गावातील सर्व धर्मियांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला. परंतु या संघटनांची मागणी होती की कुटुंबावर गावाने बहिष्कार टाकावा. ही मागणी घटनाबाह्य असल्याने आम्ही ती मान्य केली नाही, असंही अमोल कांबळे म्हणाले.

सावर्डे गावात सुमारे 8 हजार लोक राहतात. यात जवळपास 500 मुस्लीम कुटुंब राहतात. एवढ्या वर्षांत अशी जातीय तेढ कधीही निर्माण झाला नव्हती असंही ते सांगतात.

या प्रकरणी वडगाव पोलीस स्टेशनमध्ये धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी संबंधित तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने आमच्याशी बोलताना सांगितलं, “गुन्हा दाखल करण्याची मागणी आमच्याकडे करण्यात आली. कायद्यानुसार आम्ही कारवाई केली. आता मुलगा जामिनावर बाहेर आहे. पोलीस स्टेशनसमोरही आंदोलनं करण्यात आलं. मुलाच्या कुटुंबाला मात्र आम्ही संरक्षण दिलं होतं.”

ही एकमेव घटना नाही. याच परिसरातील आणखी दोन गावांमध्ये अशाचप्रकारे व्हॉट्स अप स्टेटस ठेवल्यावरून वाद निर्माण झाले. एका गावात तर संबंधित तरुणाच्या घरातलं सामान काही आंदोलनकर्त्यांनी बाहेर फेकून दिलं. यानंतर पोलिसांनी सुरक्षा वाढवली असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

तो फोटो औरंगजेबाचा नव्हता, पण तरीही

कोल्हापूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातच नव्हे तर कोल्हापूर शहरातही अशा घटनेची पुनरावृत्ती झाली. काही महिन्यांपूर्वी कोल्हापूर शहरात एका हॉटेल चालकाने औरंगजेबाचा फोटो हॉटेलमध्ये लावल्याची अफवा पसरली.

यावरून काही संघटनांचे कार्यकर्ते हॉटेलवर पोहचले आणि त्यांनी हॉटेलमध्ये घुसून पोस्टर फाडलं. याचा व्हीडिओही व्हायरल झाला.

या प्रकरणातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हा फोटो औरंगजेबाचा नव्हता, तर 1857 च्या स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजांविरोधात झालेल्या उठावाचे नेतृत्व करणा-या बहादूरशहा जफरचा होता. परंतु तोडफोड झाल्यानंतर हे हॉटेल आता बंद आहे.

या प्रकारानंतरही औरंगजेबाचा वंशज म्हणून या कृतीचं समर्थन काहींनी केलं. औरंगजेबाचं उदात्तीकरण होत असल्याचं सांगत काही संतप्त तरुणांनी हॉटेलमध्ये घुसून ही तोडफोड केली.

याशिवाय, अशा प्रकारच्या अनेक घटना कोल्हापूरमध्ये अलिकडच्या काळात घडत असल्याचं समोर येत आहे. कधी विशाळ गडावरील तोफ उडवल्याचा व्हीडिओ व्हायरल होतो तर कधी दर्ग्यासमोर काही दगडफेक केल्याप्रकरणी तक्रार केली जाते.

कोल्हापूरमधील एका हॉटेलमध्ये बहादूर शहा जफरचे पोस्टर फाडण्यात आले.

फोटो स्रोत, Social Media

फोटो कॅप्शन, कोल्हापूरमधील एका हॉटेलमध्ये बहादूर शहा जफरचे पोस्टर फाडण्यात आले.

कोल्हापूर सकाळचे संपादक श्रीराम पवार यासंदर्भात बोलताना सांगतात, “मला अजूनही असं वाटत नाही की कोल्हापूरची ओळख खूप बदलली आहे किंवा इथे सलोखा संपलाय किंवा पुरोगामी बाज पूर्णपणे बदललाय.

या घटना घडल्यानंतर मुस्लीम समाजाकडून त्याला हिंसक प्रतिसाद मिळाला आहे असं नाही. अशा घटनांना कोल्हापूरमध्ये फारसं महत्त्व दिलं जात नाही.”

कोल्हापूर

यंत्रणा कार्यरत असल्याचा संशय

राजर्षी शाहू महाराजांनी सर्व जाती, धर्मातील मुलांना शिक्षण घेता यावे यासाठी स्वतंत्र वसतिगृह बांधली.

यात मुस्लीम समाजातील मुलांनाही शिक्षण मिळावं यासाठी 1906 मध्ये ‘किंग्ज एडवर्ड मोहामेडन एज्युकेशन सोसायटी’ ज्याला ‘मुस्लीम बोर्डिंग’ असंही म्हटलं जातं या सोसायटीची स्थापना केली.

मुस्लीम समाजातील लोकांनी कुठलीही भीती किंवा संकोच न बाळगता शिक्षणासाठी यावं यासाठी त्यांनी या सोसायटीचं पदसिद्ध अध्यक्षपद आपल्याकडे ठेवलं. आजही प्रथेनुसार मुस्लीम बोर्डिंगचं पदसिद्ध अध्यक्षपद हे शाहू महाराजांकडे आहे.

या मुस्लीम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर यांना आम्ही भेटलो. जातीय तेढ निर्माण करणाऱ्या, धार्मिक तणाव होईल अशा प्रकारच्या घटना कोल्हापूरमध्ये वाढत असल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलं.

कोल्हापूर बाजारपेठ (प्रातिनिधिक फोटो)
फोटो कॅप्शन, कोल्हापूर बाजारपेठ (प्रातिनिधिक फोटो)

ते सांगतात, “अलिकडच्या काळात धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या हेतूने काही यंत्रणा काम करत असल्याची शंका येते. वॉट्सअपमधून येणारे मेसेज आणि व्हायरल करणं हे वाढत आहे. काही मॉब लिंचींगसारखे प्रकारही झाले. गावकऱ्यांनी त्याला विरोध केला.

काही एलिमेंट्स निवडणुकीच्या तोंडावर केले जात आहेत. गेल्या दोन वर्षात हा प्रयोग करण्याचं सुरू आहे. वॉट्सअप मुळे एकामेकांना माहिती पसरवणे, मुस्लीम समाजात गैरसमज निर्माण करणे असे अनेक प्रकार केले जात आहेत. ह्यांची टीम आहे त्याच्या आधारे केले जात आहे.”

सोशल मीडियाचा वापर करून काही पोस्ट, व्हीडिओ, माहिती ही विशिष्ट समाजात पसरवली जात असल्याचं गणी आजरेकर यांच्या निदर्शनास आल्याचं ते सांगतात. यासंदर्भात जिल्ह्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक झाल्याचंही त्यांनी सांगितलं.

कोल्हापूर

सोशल मीडियावर अशा पद्धतीनं काही गोष्टी व्हायरलं होणं आता नवीन राहिलेलं नाही. अशी अनेक उदाहरणं खरं तर आपल्याला देशभरात पहायला मिळतात. परंतु यापूर्वी कोल्हापूरसारख्या धार्मिक सलोखा जपणाऱ्या जिल्ह्यात अशी फारशी प्रकरणं घडत नव्हती. आता याचं प्रमाण वाढत असल्याने अनेकजण आश्चर्य व्यक्त करतात.

गणी आजरेकर सांगतात, “प्रॉब्लेम हा आहे की तरुण पिढी वाचत नाही. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांचे विचार वाचत नाही. वाचलं असतं तर त्यांच्या लक्षात आलं असतं की खरं काय आणि खोटं काय. यंत्रणा तर तयार आहे. त्यात काही मुस्लीम, बहुजन, हिंदू असतील. मोठी राजकीय यंत्रणा कोल्हापूरमध्ये दंगली घडवावे आणि राजकीय फायदा मिळवावा यासाठी प्रयत्न करत आहे.”

यासंदर्भात आम्ही कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आणि जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना सातत्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.

कोल्हापूर
फोटो कॅप्शन, कोल्हापूर

ग्रामीण भागातही विविध ठिकाणी तरुण अगदी किरकोळ घटनांवरूनही आक्रमक होत असल्याचं दिसून येतं. तर सर्वच समाजामध्ये अशा पद्धतीने कोणत्याही घटनेला प्रतिसाद देण्याचं प्रमाण वाढलं आहे असंही स्थानिक सांगतात.

याविषयी बोलताना श्रीराम पवार म्हणाले, “या प्रकारचा बदल अगदीच नाही म्हणता येणार नाही. ग्रामीण भागात संघटन करण्याचे प्रयत्न होतात. ज्यांच्याविषयी समाजात प्रचंड आदर आहे अशा प्रतिकांचा वापर करून हिंदुत्ववादाचं नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होतो. उदा. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज या प्रतिकांचा वापर करून यांचा संघर्ष हा मुस्लीम विरोधी होता हे सांगायचा प्रयत्न होतो. याला मग प्रतिवाद सुद्धा होतो. असं नसून मुस्लीम सुद्धा सोबत होते हे सांगायचा प्रयत्न होतो.”

हिंदुत्ववादी मोर्चांना मोठा प्रतिसाद

अस्पृश्यता मिटवण्यासाठी, शिक्षणाचा प्रसार होण्याकरता, सर्वांना समान वागणूक मिळावी याकरता शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये व्यापक काम केलं. आरक्षण, शिक्षण, विधवा पुनर्विवाह असे अनेक ऐतिहासिक निर्णय शाहू महाराजांनी घेतले. शाहू महाराजांच्या याच विचारांचा वारसा पुढे नेण्यात कर्मवीर भाऊराव पाटील, एनडी पाटील, गोविंद पानसरे यांच्यासारख्या समाजसुधारकारंनी आपलं मोठं योगदान दिलं.

इथल्या बाबूजमाल दर्ग्यावर प्रवेशाच्या मध्यस्थानी गणपतीचा फोटो आहे. हा फोटोही इथल्या एकतेची साक्ष देतो. पण हेच कोल्हापूर आता बदलतंय का? पुरोगामी कोल्हापूरची ओळख बदलण्याचा प्रयत्न केला जातोय का? असे प्रश्न उपस्थित केले जातायत.

 कोल्हापूरमध्ये 1 जानेवारी रोजी कोल्हापूरमध्ये हिंदू आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

फोटो स्रोत, Social Media

फोटो कॅप्शन, कोल्हापूरमध्ये 1 जानेवारी रोजी कोल्हापूरमध्ये हिंदू आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

पुरोगामी म्हणवणाऱ्या कोल्हापूरमध्ये जानेवारी महिन्यात जेव्हा हिंदू सकल समाजाचे मोर्चे निघाले, शेकडोच्या संख्येने या मोर्चांमध्ये लोक सहभागी झाले आणि कोल्हापूरची पुरोगामी ओळख बदलत आहे का यावर अधिक चर्चा सुरू झाली.

या मोर्चांमध्ये देशाला हिंदू राष्ट्र करण्याची मागणी झाली. लव्ह-जिहाद विरोधात कायदा आणा, गोहत्याबंदी कायदा आणा अशा अनेक मागण्या करण्यात आल्या.

कोल्हापूर शहर
फोटो कॅप्शन, कोल्हापूर शहर

या मोर्चाचे आयोजक संभाजी साळुंखे सांगतात, “कोल्हापूरमध्ये सगळे हिंदुत्ववादी विचारधारेचेच लोक आहेत. आणि जे नाहीत त्यांना जिथे जायचं तिथे ते जाऊ शकतात. आम्ही काही कोणावर बळजबरी करत नाही. ज्यांच्या रक्तात हिंदुत्व आहे ते आमच्यासोबत येतील. आणि आता लोक आमच्याकडे यायला लागलेत म्हणूनच मोर्चांमध्ये एवढी गर्दी जमली. त्यांना आता चांगलं-वाईट कळू लागलं आहे. हिंदुत्ववादी लोकच त्यांच्या मदतीला येतात हे सुद्धा लोकांच्या आता लक्षात येत आहे.”

कोल्हापूरात या मोर्चांमध्ये जमलेल्या गर्दीची चर्चा आजही सुरू आहे. काहींचं हे सुद्धा म्हणणं आहे की ही मोर्चात सामील झालेले लोक हे अधिकतर बाहेरचे होते. कोल्हापूरातल्या जनतेले याला फारसं महत्त्व दिलेलं नाही.

याचं विश्लेषण करताना श्रीराम पवार सांगतात, “मोर्चाला गर्दी होती हे खरं आहे. घोषणाही झाल्या. पण यानंतर तणाव झाला नाही. 1990 नंतर देशभरातलं राजकारण बदललं. तसं ते कोल्हापूरातही बदलायला सुरुवात झाली. 'मंडल-कमंडल'चं राजकारण इथेही सुरू झालं. बाबरी पडल्यानंतरही शक्तीप्रदर्शन झालं. कोल्हापुरात ज्यांना अजिबात स्थान नव्हतं त्यांचं बस्तान बसायला सुरूवात झाली हे दिसतं. शिवसेना आणि भाजपचा शिरकाव झाला. हा राजकीय बदल स्पष्ट आहे. याचा प्रतिवाद राजकीयदृष्ट्या करायला हवा. धार्मिकदृष्ट्या करून चालणार नाही असं मला वाटतं.”

‘शिवाजी महाराजांचं हिंदुत्व आणि आताचं हिंदुत्व यात फरक’ – शाहू महाराज छत्रपती

यासंदर्भात आम्ही कोल्हापूर राजघराण्याचे वंशज शाहू महाराज छत्रपती यांचंही मत जाणून घेतलं. बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांचं हिंदुत्व वेगळं होतं आणि आताचं हिंदुत्व वेगळं आहे. आताचं हिंदुत्व समाजात फरक करू लागलं आहे.”

शाहू महाराज छत्रपती

ते म्हणाले, “कुठल्याही चांगल्या बदलाची सुरुवात कोल्हापुरात होते. कोल्हापूरचे विचार तयार होतात त्यातूनच महाराष्ट्राचे आणि देशाचे विचार तयार होऊ शकतात. हिंदुत्व हा शब्द वेगवेगळ्या अर्थाने आपण समजून घेतला पाहिजे. त्यात शिवाजी महाराज, शाहू महाराज यांचं हिंदुत्व काय होतं हे लक्षात घेतलं पाहिजे. शिवाजी महाराज अन्यायी राजवटीविरोधात लढत होते. राजवट कोणत्याही धर्माची असली तरी त्यांचा लढा अन्यायाविरोधात होता.”

धर्मनिरपेक्षता ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आपल्याकडे सुरू आहे याचीही आठवण ते करून देतात.

शाहू महाराज पॅलेस, कोल्हापूर
फोटो कॅप्शन, शाहू महाराज पॅलेस, कोल्हापूर

कोल्हापूरच्या राजकीय समीकरणावर काय परिणाम?

कोल्हापूर हा सुरुवातीला शेतकरी कामगार पक्ष आणि त्यानंतर काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. 2009 च्या मिरज दंगलीनंतर इथलं राजकारण बदलतानाही दिसलं. शिवसेना आणि भाजपही जिल्ह्यात वाढू लागली.

कोल्हापूरमध्ये आताचं पक्षीय बलाबल पाहिलं तर काँग्रेसचे 4 आमदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 आमदार, 2 अपक्ष आमदार तर शिवसेनेचा एक आमदार आहे. तर भाजपला समर्थन दिलेला जनसुराज्य पक्षाचा एक आमदार आहे. तर दोन्ही खासदार हे शिवसेनेचे (शिंदे गट) आहेत.

आता शिवसेनेत फूट पडल्यानंतर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मात्र भाजपकडून स्पेस तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय असं राजकीय विश्लेषक सांगतात.

श्रीराम पवार सांगतात, “शिवसेना, भाजपकडे कल वाढतोय हे दिसून येत आहे. त्या पक्षांकडे जाणाऱ्या लोकांचा कल का वाढतोय. याला दोन कारणं असू शकतात. एक म्हणजे प्रस्थापीतांवर असलेली नाराजी. ही नाराजी अनेक कारणांमुळे असू शकते. कोल्हापूरमध्ये शिवसेना आणि भाजपच्या अनेक जागा निवडून येतात. लोकसभेलाही चांगली मतं मिळतात. याचा अर्थ काय तर या पक्षांकडे कल वाढतोय. आधीच्या सत्ताधारांविरोधात नाराजी असू शकते. भाजप, शिवसेना जे अजेंडा मांडतात त्यात हिंदुत्ववाद स्पष्ट होता. बाळासाहेब ठाकरेंचा हिंदुत्ववाद तर अधिक आक्रमक होता. तरीही कोल्हापूरमध्ये शिवसेनेच्या जागा निवडून येत होत्या.”

शौमिका महाडिक

“भाजपचा उदय जेव्हा निवडणुकीच्या राजकारणात झाला तेव्हा इतर सर्व बाबींसोबत हिंदुत्वाचा फॅक्टरही आला. हिंदू एकता संघटना ही कोल्हापुरात प्रभावी होती. विश्व हिंदू परिषद प्रभावी होती. हे एलिमेंट नव्हते असं नाही आणि त्यांची विचारधारा मांडण्याला पुरोगामी कोल्हापूरनेही विरोध करायचं काही कारण नाही. मुद्दा असा आहे की हिंसक मार्गाने ते दाखवलं जातं का, त्याला बळ दिलं जातं का तर कोल्हापूरात हे होत नाही. हिंदुत्ववाद्याचा देशभरात प्रभाव आहे तसा तो महाराष्ट्र आणि कोल्हापूरातही दिसतो. प्रश्न आहे की हिंसकरीतीने समोर यायला लागले तर तिथे प्रश्न होतो. पण अजूनतरी कोल्हापूरात असं काही झाल्याचं दिसलं नाही,”

तर भाजप ही हिंदुत्वाचं पेटंट घेतल्यासारखी वागते अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी दिली.

ते सांगतात, “कोल्हापूरम्ध्ये आजही ईद, दिवाळी, ख्रिसमस सगळे सण एकत्र साजरी होतात. त्यामुळे याचा परिणाम कोल्हापुरात होणार नाही. हल्ली आम्हाला जाणवतं की जास्त प्रयत्न कोल्हापूरमध्ये सुरू आहे. राजकीय फायद्यासाठी काही गोष्टी होणं अभिप्रेत आहे. 2009,2014 मध्येही असा प्रयत्न केला होता. देशात वेगळी लाट आणि कोल्हापूरमध्ये वेगळी लाट हे अनेकदा घडलं आहे. गर्दी असेल, सभेला जाईल इथला माणूस पण मतदान करताना सेक्यूलर विचारानेच करेल.”

कोल्हापूर

दुसऱ्या बाजूला भाजपने हे आरोप फेटाळले असून हिंदू सकल समाजाचे मोर्चे हे कोणत्याही बॅनरखाली झाले नाहीत असं स्पष्ट केलं.

कोल्हापूर भाजप महिला आघाडीच्या प्रमुख शौमिका महाडीक म्हणाल्या, “विशिष्ट कुठल्या बॅनरखाली हे मोर्चे झाले असं म्हणणं चुकीचं ठरेल किंवा एखादा पक्ष इथे वाढीसाठी हातपाय मारतोय असं म्हणणंही चुकीचं आहे. प्रत्येकाला आपली संस्कृती, धर्म जपण्याचा अधिकार आहे. शाहू महाराजांची शिकवण आहे की स्वधर्माचा अभिमान राखून इतर धर्माचा आदर करा तेच आम्ही करतोय. भाजपचे दोन आमदार होतेच. कोल्हापूरमध्ये गटातटाचं राजकारण चालतं.”

कोल्हापूरमध्ये नव्याने घडणारी ही राजकीय, सामाजिक समीकरणं कोल्हापूरच्या पुरोगामी विचारांच्या वारशासमोर टिकतील का ? हे येणाऱ्या काळात पाहावं लागेल.

हे ही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)