'अवघे पाऊणशे वयोमान' म्हणत धमाल फॅशन करणाऱ्या आफ्रिकेतील आजीबाईंच्या 'आयकॉन' बनण्याची गोष्ट

    • Author, पेनी डेल
    • Role, पत्रकार

कोण म्हणतं वय झालं, म्हातारपण आलं की सगळं संपतं? आयुष्यात करायला काहीही राहत नाही, या विचारालाच धक्का दिला आहे एका आजीबाईंनी.

झांबिया या आफ्रिका खंडातील देशातील एक आजीबाई चक्क 'फॅशन आयकॉन' बनल्या आहेत. इंटरनेटवरची त्यांची जोरदार चर्चा आहे.

आपल्या फॅशनवेड्या नातीबरोबर फॅशनेबल कपडे परिधान करण्यासाठी आणि एकमेकींच्या कपड्यांची अदलाबदल करण्यासाठी त्या एकदा तयार झाल्या आणि त्यानंतर त्यांच्या फॅशनच्या प्रवासाला सुरुवात झाली. अफलातून फॅशनमुळे आता त्या चर्चेत आल्या आहेत.

त्या आजीबाईंचं नाव आहे मार्गरेट चोला. त्या ऐंशीच्या घरात आहेत. "लिजेंडरी ग्लामा" (Legendary Glamma) या नावानं त्या जगाला परिचित आहेत. इन्स्टाग्रामवर त्यांचे 2,25,000 फॉलोअर्स आहेत. त्यांच्या धमाल, लक्षवेधी, आकर्षक आणि खेळकर फॅशनेबल फोटोंचे हे फॉलोअर्स चाहते आहेत.

"या कपड्यांमध्ये मला वेगळं वाटतं, मला नाविन्याची, नवलाईची जाणीव होते आणि जिवंत असल्यासारखं वाटतं. माझ्या आयुष्यात मला असं कधीच वाटलं नव्हतं. मला वाटतं की, मी अवघं जगच जिंकू शकेन!" असं चोला बीबीसीला सांगतात.

चोला यांची नात डायना कौम्बा यांनी 2023 मध्ये ग्रॅनी सेरीज हे पाक्षिक सुरू केलं होतं. डायना या न्यूयॉर्कमध्ये एक स्टायलिस्ट आहेत.

कशी झाली फॅशनची सुरुवात?

डायना आपल्या वडिलांच्या दुसऱ्या स्मृतीदिनी झांबियाला जात असताना त्यांच्या डोक्यात ही कल्पना आली. त्यांचे वडील नेहमीच टापटिप राहायचे, उत्तम कपडे घालायचे. त्यांच्यामुळेच डायना यांच्यात फॅशनची आवड निर्माण झाली, प्रेरणा मिळाली.

आपल्या या भेटीदरम्यान कौम्बा यांनी त्यांचे खास तयार केलेले सर्व कपडे परिधान केले नव्हते. मग त्यांनी आपल्या मबुयाला विचारलं की. त्यांना हे कपडे घालून पाहायचे आहेत का (बेम्बा भाषेत आजीला "मबुया" म्हणतात).

"मी त्यावेळेस काहीही करत नव्हते. त्यामुळे मी म्हणाले की ठीक आहे. जर तुला तसं वाटत असेल तर तसं करून पाहूया. काही हरकत नाही?" असं चोला म्हणाल्या.

"मी जेव्हा मरेन तेव्हा तुला माझी आठवण येईल आणि निदान या गोष्टीसाठी तरी तुला माझी आठवण राहील."

कौम्बा यांनी मबुया यांचा टॉप आणि "चिटेंगे" परिधान केलं. चिटेंगे हे कमरेभोवती गुंडाळायचं एक विशिष्ट कापड असतं. मबुया यांचा पहिला पोशाख एक चंदेरी रंगाचा पॅंटसूट होता.

"मला वाटलं, मबुयाला चांगले फॅशनेबल कपडे घालायला दिले आणि मग तिच्या नैसर्गिक घरात तिचे फोटो काढले तर ते योग्य ठरेल," असं कौम्बा यांनी बीबीसीला सांगितलं.

झांबियाची राजधानी असलेल्या लुसाकाच्या उत्तरेला 10 मैलांवर असलेल्या गावातील एक शेत हेच मबुयाचं नैसर्गिक घर आहे.

अनोखं फोटोशूट

बहुतांश वेळा चोला बाहेर मोकळ्या जागेत म्हणजे शेतातच त्यांचे फोटो काढत असतात. त्यांच्या फोटोमध्ये त्या अनेकदा एका सुंदर लाकडी खुर्चीवर किंवा चामड्याच्या सोफ्यावर बसलेल्या दिसतात.

शेतात असलेली लाकडी खुर्ची किंवा सोफा आणि त्यावर अत्यंत फॅशनेबल कपडे घातलेल्या आजीबाई ही कल्पनाच अगदी अद्भूत वाटते. साहजिकच हे फोटो चटकन लक्ष वेधून घेतात.

त्यांच्या फोटोंच्या पार्श्वभूमीवर विटांच्या इमारती, पत्र्याची छपरं, नांगरलेली शेतं, आंब्याची झाडं आणि मक्याचं पीक दिसतं.

"पहिला फोटो जेव्हा मी पोस्ट केला तेव्हा मी खूपच घाबरलेले होते. फोटो पोस्ट केल्यानंतर 10 मिनिटं मी फोन बाजूला ठेवला. त्या फक्त 10 मिनिटांतच माझ्या पोस्टला 1,000 लाईक्स मिळाले होते," असं कौम्बा सांगतात.

"ते पाहून मी आश्चर्यचकितच झाले. कॉमेंट्सचा पाऊस पडत होता आणि लोक मला आणखी फोटो टाकण्यास सांगत होते," असं त्या पुढे सांगतात.

एप्रिल 2024 मध्ये खऱ्या अर्थानं ग्रॅनी सेरिजची सुरूवात झाली. कौम्बा यांनी आपल्या आजीचे लाल अदिदास ड्रेस, सोन्याचा गळ्यातील हार आणि रत्नजडीत चकाकता मुकुटातील विविध फोटो पोस्ट केल्यानंतर ग्रॅनी सेरिजची सुरूवात झाली होती.

"जगभरातील अनेक लोक माझ्यावर प्रेम करतात या गोष्टीचं मला आश्चर्य वाटतं," असं चोला म्हणतात. विशेष म्हणजे या आजीबाईंना त्यांचं वय नेमकं किती वर्षे आहे हे माहिती नाही. कारण त्यांच्याकडे त्यांच्या जन्माचा दाखला नाही.

"या वयात माझा इतका प्रभाव पडेल असं मला वाटलं नव्हतं," असं चोला म्हणतात.

भन्नाट स्टाईल आणि कपडे

भडक रंगांचं, स्टाईलचं आणि शैलीचं मिश्रण असलेले कपडे परिधान करून चोला पोझ देतात.

झांबियाच्या स्वातंत्र्याला 60 वर्षे झाल्यानिमित्त झांबियाच्या झेंड्याच्या रंगाप्रमाणेच असणाऱ्या हिरव्या रंगाची अमेरिकन जर्सी किंवा टी-शर्ट, लाल रंगाचा चमकदार छान स्कर्टसारख्या ड्रेस ते निळ्या, काळ्या आणि हिरव्या रंगाचा टॉप, सोनेरी रंगाचा हार आणि ब्रासलेट अशा विविध पोशाखांमध्ये चोला दिसतात.

यात मबुया यांचा आवडता पोशाख म्हणजे, जीन्स, ग्राफिक टी-शर्ट आणि त्यासोबत एक सोनेरी विग.

हा पोशाख घातल्यानंतरच्या आपल्या भावना व्यक्त करताना चोला म्हणतात, "मी याआधी कधीही जीन्स घातली नव्हती की विग घातला नव्हता. त्यामुळे साहजिकच मी आनंदात होते आणि नाचत होते."

कौम्बा 2012 पासून स्टायलिस्ट म्हणून कार्यरत आहेत. त्या म्हणतात की त्यांच्या आजीमध्ये संयम, रुबाबदारपणा आहे आणि त्या प्रत्येक लूकमध्ये छान, प्रभावी दिसतात".

चोला यांचे सर्व लूक अत्यंत सुंदर, रुबाबदार दिसतात. यातून यशाचा आनंद, वेगवेगळ्या कपड्यांचा सुंदर मिलाफ, भव्यता आणि बिनधास्तपणा आणि कपड्यांचे परस्परविरोधी पॅटर्न आणि रंगसंगती त्यातून दिसत असते.

या कपड्यांबरोबरच लक्ष वेधून घेणाऱ्या गोष्टी म्हणजे त्यांच्या अंगावरील विविध अलंकार किंवा वस्तू.

मोठ्या आकाराचे, रंगीत गॉगल्स, मोठ्या आकाराच्या हॅट, गळ्यातील हार, ब्रासलेट, पेंडेंट, अंगठ्या, हातमोजे, हँडबॅगा, सोनेरी विग आणि मुकुट यामुळे तर आजीबाईंचा दिमाख आणखीच वाढतो.

कौम्बा यांच्यावर असलेला फॅशनचा हा प्रभाव त्यांच्या आजीकडून आला आहे. त्यांच्या आजींना "नेहमीच मोती आणि बांगड्या प्रचंड आवडत आल्या आहेत".

एका भन्नाट फोटोत चोला एका बकरी बरोबर दिसतात. या फोटोतील गंमत म्हणजे मबुया लाकडी खुर्चीवर बसल्या आहेत तर त्यांच्या शेजारी असलेली बकरी त्यांच्या आवडत्या मोत्यांच्या माळांनी सजली आहे.

या फोटोला गोट (GOAT) म्हणतात. ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम याचं संक्षिप्त रुप गोट होतं आणि बकरीला देखील गोट म्हणतात. अशी दुहेरी गंमत त्यात साधण्यात आली आहे.

इतर अलंकारांमधून, वस्तूंमधून देखील चोला यांचं व्यक्तिमत्वं आणि त्यांची जीवनकहाणी यांचं प्रतिबिंब उमटतं.

काही फोटोंमध्ये मबुया यांनी त्यांचा लाडका रेडिओ हातात धरला आहे. हा रेडिओ दिवसभर त्यांच्याबरोबर असतो. अगदी त्या झोपतानाही त्या सोबत ठेवतात.

एका फोटोत त्या "इबेंडे" हाती धरून आहेत. इबेंडे म्हणजे धान्य किंवा मका कुटण्यासाठी वापरली जाणारी एक लांब जाडजूड लाकडी काठी (आपल्याकडे खलबत्ता असतो तसाच काहीसा प्रकार). ही काठी त्या अनेक वर्षांपासून वापरत आहेत.

त्या पाईपनं धूम्रपान करत आहेत किंवा त्यांच्या हातात चहानं भरलेला एक धातूचा कप आहे. त्यांच्या लाकडी खुर्चीच्या हाताच्या काठावर एक "मबौला" लटकतो आहे.

मबौला म्हणजे एकप्रकारचं चुलीसारखं भांडं ज्यात कोळसा टाकून झांबियाचे लोक त्याचा वापर स्वयंपाकासाठी करतात. विशेषकरून सध्या त्यांच्या देशात विजेचा तुटवडा जाणवत असल्यामुळे ते याचा वापर करतात.

'वृद्धांना बाजूला सारू नका'

कौम्बा यांना वाटतं की ग्रॅनी सिरिजमधून ही गोष्ट ठळकपणे समोर येईल की, वृद्ध लोक अजूनही बऱ्याच गोष्टी करू शकतात. तरुण पिढीबरोबर एकत्र एन्जॉय करणं, आठवणी निर्माण करणं हा पुढील पिढीसाठी पाऊलखुणा सोडण्याचा एक महत्त्वाचा मार्ग आहे.

कौम्बा सांगतात की, "वृद्धांना बाजूला सारू नका. ते काही करू शकत नाहीत असं वाटून त्यांचं महत्त्व कमी करू नका. आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांच्यावर तसंच प्रेम करत राहा."

"कारण लक्षात ठेवा, एकदिवस आपण देखील त्यांच्यासारखे वृद्ध होणार आहोत. ते आज ज्या परिस्थितीत आहेत त्याच परिस्थितीतून आपल्याला देखील जावं लागणार आहे."

मबुया यांच्या विविध भन्नाट फोटोंमुळे कौम्बा यांना उत्तम संधी मिळाली आहे. त्यांना चार नातींनी अशाच प्रकारचे फोटो काढण्यासाठी नियुक्त केलं आहे. या चार जणींच्या आजी 70 ते 96 वर्षांदरम्यानच्या आहेत.

चोला यांना वाटतं की ग्रॅनी सिरिजमुळे लोकांना शिकायला मिळेल. "लोकांना त्यांचं आयुष्य जगण्याची आणि समाज काय म्हणेल, समाजाला काय वाटेल, समाज काय मतं व्यक्त करेल याची चिंता न करता स्वत:च्या इच्छेनुसार जगण्याची प्रेरणा मिळेल."

चोला लोकांना आवाहन करतात की "तुम्ही आयुष्यात आधी ज्या चुका केल्या असतील त्यासाठी स्वत:ला माफ करा. त्यांचं ओझं मनावर ठेवू नका. कारण तुम्ही तुमचा भूतकाळ कधीही बदलू शकणार नाहीत. मात्र तुम्ही तुमचं भविष्य नक्कीच बदलू शकता."

या फोटोशूटमुळे आजी-नात (चोला आणि कौम्बा) एकमेकांच्या आणखी जवळ आल्या आहेत. या खास नात्यामुळेच कौम्बा यांना या गोष्टीची जाणीव झाली आहे की त्यांच्या आजीचं (मबुया) आयुष्य अनेकदा किती खडतर होतं.

विशेष लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, चोला यांचं संगोपन त्यांच्या आजी-आजोबांनीच केलं होतं. त्या 12 किंवा 13 वर्षांच्या होईपर्यंत शाळेत गेल्या होत्या. मात्र आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे त्यांना तिशीतील माणसाची लग्न करावं लागलं होतं.

त्यांना तीन अपत्य होती. त्यांचे पती खूप दारू प्यायचे त्यामुळं अखेर त्या या नात्यातून बाहेर पडल्या.

हा आघात अजूनही चोला यांना छळतो. त्याची सल अजूनही त्यांच्या मनात आहे. मात्र या फोटोशूटमधून त्यांना अनपेक्षितपणे जगभरात जी लोकप्रियता, ख्याती मिळाली, त्यातून त्यांच्या जीवनाला एक नवा अर्थ दिला आहे.

त्यांच्या जगण्याला एक नवी दिशा दिली आहे. आपल्या खडतर भूतकाळातून त्यांना एक दिलासा मिळाला आहे.

"आता मी सकाळी एका ध्येयानं उठते. कारण मला माहिती आहे की जगभरातील लोकांना मला पाहायला आवडतं. ते माझ्यावर प्रेम करतात," असं चोला म्हणतात.

(पेनी डेल या एक फ्लीलान्स पत्रकार, पॉडकास्ट आणि माहितीपट कार (डॉक्युमेंट्री मेकर) असून त्या लंडनमध्ये राहतात.)

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.