You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
देजा वू : अलौकिक घटना, पुनर्जन्म की दुसऱ्या विश्वाचा दरवाजा? शास्त्रज्ञ म्हणतात...
आपल्यापैकी काही जणांना आपण प्रथमच अनुभवत किंवा पाहत असलेल्या घटना, जागा किंवा येणारे अनुभव आपण पूर्वीच पाहिल्या किंवा अनुभवल्यासारखे वाटत असतात. त्यालाच देजा वू म्हणतात. हे काहीसं विचित्र असल्यानं याचा संबंध हा अलौकिक किंवा विचित्र घटनांशीही जोडला जातो.
काही लोक तर याला पुनर्जन्मही म्हणतात. देजा वू हा फ्रेंच शब्द असून त्याचा अर्थ 'आधीच पाहिलेले' असा आहे. फ्रेंच तत्वज्ञ एमिल बोइराक यांनी 1870 मध्ये हा शब्द तयार केला.
त्यांनी नाव दिलं असलं, तरी याची व्यवस्थित व्याख्या स्पष्ट केलेली नाही. पुनर्जन्म, अलौकिकपणा अशा अनेक संकल्पना याच्याशी जोडण्यात आल्या. अनेक तमिळ आणि हॉलिवूडपटांमध्ये यावर भाष्य करण्यात आलंय. पण याचं स्पष्टीकरण प्रत्येकानं वैज्ञानिकदृष्ट्या स्वीकारलेलं नाही.
खरी गोष्ट म्हणजे देजा वू या घटना किंवा संकल्पनेबाबत कोणीही 100% वाजवी असं स्पष्टीकरण देऊ शकत नाही.
मात्र, मानसशास्त्राचे संशोधक यासाठी विविध प्रकारच्या शक्यता सुचवतात. मेंदू, मेंदूची स्मृती क्षमता आणि बुद्धिमत्ता यावर गृहित अशा या शक्यता असतात.
कोणतीही विशिष्ट परिस्थिती पूर्णपणे समजून घेण्यापूर्वी आपला मेंदू लगेचच प्राथमिक पातळीवर माहिती ग्रहण करतो. लगेचच काही वेळात आपल्याला ते आधीचं पाहिलं असल्याचा धक्का बसू शकतो. ते याला विभाजित विचार प्रक्रिया (स्प्लिट थॉट प्रोसेस) म्हणतात.
याबाबत आणखी एक गृहितक आहे. आपले विचार मेंदूच्या गोलार्धातून टेम्पोरल लोबकडे प्रवास करतात. काहीवेळा हे विचार काही मिलिसेकंदाच्या फरकानं प्रवास करतात. काही शास्त्रज्ञांच्या मते, या विलंब कालावधीमुळं देजा वू जाणवत असतं.
देजा वू संदर्भात संशोधनातील अडचण म्हणजे, शास्त्रज्ञ ते जाणवेपर्यंत वाट पाहू शकत नाही. संशोधकांच्या दुसऱ्या एका गटाच्या मते, टेम्पोरल लोबला दुखापत झालेल्या लोकांना देजा वू संदर्भात जास्त अनुभव येत असतात.
2012 मध्ये आभासी तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांना 3D जगाची सफर घडवण्यात आली. त्यासाठी रुग्णालयाचे वेटिंग रूम, मुव्ही थिएटर अशा अनेक थीम होत्या. लोकांना यातही देजा वूचा अनुभव आला. त्यामुळं देजा वू हे स्मृतींशी संबंधित आहे, हे आपण समजू शकतो.
2014 मध्ये झालेल्या दुसऱ्या एका संशोधनाचे निष्कर्ष अगदी वेगळे आहेत. लोकांना 'बेड' (Bed), 'पिलो'(Pillow)आणि 'ड्रिम' (Dream) असे शब्द दाखवण्यात आले. पण त्यांना याच्याशी संबंधीत असलेला 'झोप' (Sleep) हा शब्द कधीही दाखवला नाही.
त्यापैकी अनेकांना 'S' पासून सुरू होणाऱ्या शब्दावर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आलं. पण अनेकांना असा शब्दच दिसला नाही, असं सांगितलं. मात्र, काहींनी sleep हा शब्द दिसल्याचं सांगितलं. हे देजा वू अनुभवासारखंच होतं. ही पद्धत वापरताना तज्ज्ञ मेंदूचा अभ्यास करत होते.
त्यांच्या मते, देजा वू ही मेंदूच्या स्मृतीशी संबंधित समस्या नाही, तर मेंदूच्या समोरच्या भागातील म्हणजे फ्रंटल लोबमधील बदलाचा परिणाम आहे. फ्रंटल लोब निर्णय घेण्यासाठी जबाबदार असतं, त्यामुळं देजा वू अनुभवणाऱ्या लोकांची स्मृती प्रचंड चांगली असते, असं शास्त्रज्ञ म्हणतात.
पण कोणीही देजा वू संदर्भात पूर्ण स्पष्टीकरण किंवा माहिती दिली नाही. देजा वू हे हा कदाचित दुसऱ्या समांतर विश्वासाठीचा दरवाजाही असू शकतो किंवा काळाला ब्रेक लावणारं देखील काही असू शकतं. भविष्यातील संधोधनातूनच ते स्पष्ट होऊ शकतं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)