'वंचित' आणि महाविकास आघाडी एकत्र येणार का? पृथ्वीराज चव्हाण म्हणाले...

प्रकाश आंबेडकर

फोटो स्रोत, Getty Images

काँग्रेसची महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे. अनेक जागांवरचे उमेदवार जाहीर झालेले असले तरी पहिल्या टप्प्यामध्ये मतदान होत असलेल्या विदर्भातील उमेदवार मात्र जाहीर झालेले नाहीयेत.

काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांची प्रचार समिती प्रमुख म्हणून नियुक्ती झालेली आहे.

त्यांनी बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी प्राची कुलकर्णी यांच्याशी बोलताना काँग्रेसच्या प्रचाराची दिशा काय असेल याबाबत सविस्तर चर्चा केली आहे.

प्रश्न : तुमची प्रचार प्रमुख म्हणून नियुक्ती झालेली आहे. निवडणुकीच्या दृष्टिकोनातून प्रचाराची रणनीती काय असणार आहे?

पृथ्वीराज चव्हाण : प्रचाराची रणनीती काय असणार आहे याबाबत कालच घोषणा झालेली आहे. त्यासाठी मला समिती करावी लागेल, ती समिती मान्य झाल्यानंतर आम्ही बैठका घेऊ. पाच टप्प्यांमध्ये ही निवडणूक होणार आहे. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या टप्प्यात निवडणूक आहे तिथली यादी बनवावी लागेल. त्यानंतर उमेदवारांना विचारून स्टार प्रचारक यांची यादी जाहीर होईल.

मघाशी मी बोलल्याप्रमाणे भाजप ज्याप्रकारे आमच्या प्रचारामध्ये अडथळा आणत आहे ते पाहता लोकशाही वाचवायची असेल तर जनतेलाच ही निवडणूक हातात घ्यावी लागेल आणि हाच आमचा मुख्य मेसेज असणार आहे.

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

प्रश्न : हा मेसेज जरी असला तरी जनतेपर्यंत पोहोचणं खूप महत्त्वाचं आहे आणि पहिल्या टप्प्यात जिथे निवडणूक होत आहे तिथल्या म्हणजे विदर्भातील एकच जागा जाहीर केली आहे. अशात प्रचाराला कमी कालावधी मिळतोय. जरी पाच टप्प्यांमध्ये निवडणुका असल्या तरी सुद्धा जितक्या लवकर नावं जाहीर होतील तितका प्रचारासाठी कालावधी जास्त मिळेल असं एक गणित असतं. मात्र विदर्भातली नावं जाहीर होत नाहीत, बाकीच्या ठिकाणची नावं जाहीर होतात हे असं का?

चर्चा अशीही आहे की नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांच्या वादामुळे विदर्भातल्या जागा जाहीर होत नाहीयेत.

पृथ्वीराज चव्हाण : आमचा प्रयत्न आहे की प्रत्येक ठिकाणी सर्वोत्कृष्ट उमेदवार उभा केला जावा. पण जर आमच्याकडे चांगला चॉईस असेल तर त्या चांगल्या चॉईस मधला कोण हे शोधायला थोडा वेळ लागेल आणि जेष्ठ नेते ते गरज पडली तर निवडणूक लढतील ही.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

प्रश्न : मग हे दोन नेते लोकसभेला लढण्याची शक्यता आहे का?

निवड समिती हे ठरवेल. आता याच्यावर बोलणं संयुक्तिक ठरणार नाही आणि येत्या दोन-तीन दिवसात नाव कळतीलच.

प्रश्न : जागा वाटपाचं गणित ठरलेलं आहे का ? कारण गेल्या अनेक दिवसापासून चर्चेच्या फैरी झडत आहेत, वेगवेगळ्या बैठका होत आहेत पण अजूनही एकमत होत नाही. आणि वंचितने तर थेट जाहीर करून टाकलं होतं की जागा वाटपात महाविकास आघाडी मधल्या तिन्ही पक्षांमध्ये मतभेद आहे, मग गणित नेमकं कुठे अडलंय?

पृथ्वीराज चव्हाण : एक टाईम ऑनर्ड फॉर्म्युला असतो. दोन पक्षांमध्ये मागच्या निवडणुकांचा संदर्भ घेतला जातो. पण आता गणित वेगळी झाली आहेत. दोन पक्षांमध्ये उभी फूट पडलेली आहे.

उदाहरण म्हणून घ्यायचं झालं तर शिवसेनेने मागच्या निवडणुकीमध्ये 18 जागा निवडून आणल्या होत्या. पण आता त्यात शिंदे गटाचे काही खासदार आहेत, भाजपचाही भाग होता.

त्यामुळे उर्वरित उबाठा गटाची किती मतं आहेत त्याचा अंदाज काढावा लागेल तसेच राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यामुळे अजित पवारांबरोबर किती मतदार गेले आणि शरद पवारांबरोबर किती मतदार आहेत याचाही अंदाज काढावा लागेल.

त्यामुळे या सर्व प्रक्रियेला थोडा वेळ लागतो. मागच्या निवडणुकीच्या संदर्भ घेणं फार सोपं नाहीये.

पृथ्वीराज चव्हाण

प्रश्न : मग याचा अर्थ असा घ्यायचा का की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस जेवढ्या जागा मागते, तेवढ्या जागा देण्याची तयारी काँग्रेसची नाही?

पृथ्वीराज चव्हाण : असं म्हणता येणार नाही. दुर्दैवाने गेल्यावेळी काँग्रेसचा एकच खासदार निवडून आला होता. त्यावेळी काँग्रेस बरोबर राष्ट्रवादी होती शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले होते. सकृतदर्शनी एक विरुद्ध 18 असं बघता येणार नाही. नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद या ठिकाणी कोणाची ताकद किती हे मोजायला थोडा वेळ लागतो.

प्रश्न : पण किती वेळ लागणार आणि कधीपर्यंत हे सुरू राहणार?

तसं पाहायला गेलं तर मागच्या लोकसभा निवडणुकांपेक्षा आपल्याकडे यावेळेस अधिक वेळ आहे. थोडे दिवस पुढे मागे झाले तर काही फरक पडत नाही. लोकांना आता कमी वेळांमध्ये निवडणुका लढायची सवय झाली आहे.

प्रश्न : किती जागा जसा हा वाद आहे तसाच कोणत्या जागा हा सुद्धा वाद आहे का? कारण सांगली सारख्या जागेवरून काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये थेट आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. वसंतदादांच्या घराण्यातले विशाल पाटील एकीकडे उमेदवारी मागताना दिसतात तर दुसरीकडे शिवसेनेकडून चंद्रहार पाटील उमेदवार असतील असं दाखवलं जातंय.

पृथ्वीराज चव्हाण : असं आहे की कुठल्या पक्षाने कोणाला उभ करायचं यात वाद नाहीये, त्याबद्दल पूर्ण स्पष्टता आहे कि ती जागा कोणी लढवायची. मात्र शिवसेनेने जागा लढवायची की काँग्रेसने जागा लढवायची याबाबत वाद आहेत.

त्याची चर्चा चालू आहे, मात्र कोण उमेदवार असेल याबाबत बिलकुलच मतभेद नाहीत. त्यामुळे हा वाद मिटेल अशी आम्ही अपेक्षा करतोय.

प्रकाश आंबेडकर
फोटो कॅप्शन, प्रकाश आंबेडकर

प्रश्न : वंचितचा तिढा कसा सोडवणार? कारण तुम्ही एकीकडे तीन पक्षांच्या फॉर्म्युलाबद्दल बोललात पण वंचितकडून प्रत्येक वेळी वेगवेगळी मागणी केली जाते.

पृथ्वीराज चव्हाण : हे बघा आमची प्रामाणिक भावना आहे की या निवडणुकीचे सूत्र काय तर नरेंद्र मोदींच्या विरोधात जी मत पडणार आहेत त्यांचं विभाजन होऊ नये हा आमचा प्रयत्न आहे. म्हणून आम्ही इंडिया आघाडी तयार केली. पण नरेंद्र मोदी किंवा भाजपला पाहिजे की आपल्या विरोधात पडणारी मतं कशी विभागली जातील.

जशी 2014 मध्ये नरेंद्र मोदींना फक्त 31 टक्के मतं पडली, 69 टक्के मतं ही मोदींचा पराभव करण्यासाठी पडली, पण ही मतं 30-40 पक्षांमध्ये विभागली गेली.

2019 मध्ये देखील हेच घडलं. 63% लोकांनी मोदींचा पराभव करण्यासाठी मतदान केलं होतं आज अडतीस पक्षांचे खासदार संसदेत आहेत. त्यामुळे विरोधकांच्या मतांची विभागणी होऊ नये याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. पण ही विभागणी व्हावी हा नरेंद्र मोदींचा प्रयत्न आहे.

आता गेल्यावेळीच्या निवडणुकीमध्ये वंचितच्या भूमिकेमुळे भाजपचे आठ ते नऊ अतिरिक्त खासदार निवडून आले आणि आकडे आपल्या समोर आहेत. पण दलित समाजामध्ये आता एक स्पष्टता निर्माण झालेली आहे.

आज नरेंद्र मोदींचा प्रयत्न जास्तीत जास्त उमेदवार उभे करून मतांची विभागणी करणे असा आहे. त्यामुळे त्याला बळी न पडता राज्यघटना वाचवायची असेल, आंबेडकरांची स्मृती जपायची असेल तर मतांची विभागणी न करता नरेंद्र मोदींचा पराभव करायला हवा.

आता प्रकाश आंबेडकरांच्या डोक्यात काय आहे आम्हाला माहिती नाही. सलग दोन महिने ते आम्हाला घुमवत राहिले. प्रकाश आंबेडकर नेते आहेत त्यामुळे ते योग्य विचार करतील अशी खात्री आहे.

प्रश्न : शेवटपर्यंत वंचित झुलवत ठेवेल अशी कुठे भीती वाटते का तुम्हाला?

पृथ्वीराज चव्हाण : आम्ही त्यांना काही जागा देऊ केल्या आहेत पण त्यांची मागणी अवास्तव असेल तर ती मान्य करता येणार नाही.

प्रश्न : म्हणजे वंचित सोबत नसताना काय फॉर्म्युला असेल याची सुद्धा तुमची तयारी झालेली आहे असं म्हणता येईल का?

पृथ्वीराज चव्हाण : वंचितने काय करायचं हा त्यांचा निर्णय आहे. ते जो निर्णय घेतील त्याच्यावर आमची गणितं ठरतील. लढायला जाताना सर्वच तयारी करावी लागते.

पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले

फोटो स्रोत, ANI

प्रश्न : मराठा आरक्षणावरून आता जरांगे यांनी थेट घोषणा केलेली आहे की ते उमेदवार उभे करतील. 24 तारखेला त्यांनी बैठक बोलावलेली आहे. कदाचित एखाद्या पक्षासोबत किंवा कदाचित स्वतः मराठा उमेदवार फॉर्म भरतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. या विभागणीचं गणित कशा पद्धतीने सोडवलं जाणार? तुमच्या पक्षाशी किंवा इतर कोणत्या पक्षाची त्यांची चर्चा झालेली आहे का? किंवा हे मतांचं ध्रुवीकरण होऊ नये यासाठी काय फॉर्म्युला आहे?

पृथ्वीराज चव्हाण : जरांगे पाटलांशी आमच्या पक्षातून कोण बोलतंय याच्याशी माझा संबंध नाहीये. त्यांनी खूप आग्रही भूमिका घेतलेली आहे आणि सत्तेतल्या काही नेत्यांच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे.

त्यांनी जर सांगितलं की अमुक एका पक्षाला मत देऊ नका तर गोष्ट वेगळी आहे. पण त्यांनी उमेदवार उभे केले तर मात्र ध्रुवीकरण, मतांची विभागणी ही आलीच. त्यामुळे भाजपची रणनीती यशस्वी होते की जरांगे पाटलांची रणनीती यशस्वी होते हे पाहिलं जाईल.

प्रश्न : काल पंढरपुरात प्रणिती शिंदे यांना मराठा समाजाच्या तरुणांच्या रोषाला सामोरं जावं लागलं, त्याबद्दल काय सांगाल?

पृथ्वीराज चव्हाण : मराठा आंदोलकांचे सोंग पांघरून भाजपचे कार्यकर्ते तिथे आले होते आणि त्यांनीच हा विरोध केला.

पण मला खात्री आहे की मराठा समाजाच्या लोकांना लोकशाही नकोय किंवा निवडणुका होऊच नये अशी त्यांची काही भूमिका नाहीये.

शेवटी आरक्षण मिळेल ते या लोकशाही प्रक्रियेतूनच मिळेल. त्यामुळे आपण लोकशाही नष्ट केली तर कुणालाच काही मिळणार नाही.

देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला आरक्षण देतो असं म्हणून काय केलं हे आपण सर्वांनीच पाहिलं आहे.

काही लोकांना उमेदवारी दिली की समाज शांत बसतो हे देवेंद्र फडणवीस यांना चांगलंच माहिती आहे.

प्रश्न : या निवडणुकीमध्ये आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी उफाळून आलेली आहे असं म्हटलं जातंय. त्यामुळे निवडणुकीत अंतर्गत दुफळीमुळे फटका बसू शकतो असं म्हटलं जातंय त्यात तथ्य आहे का?

पृथ्वीराज चव्हाण : हे बघा उमेदवार इच्छुक असतात पण शेवटी सारासार विचार करून त्यातून अंतिम निर्णय होतो. अशाप्रकारे इतर इच्छुक नाराज होणार हे अपेक्षितच असतं. आज फक्त काँग्रेसमध्येच असे वाद आहेत असं नाही, महायुतीमध्ये पण जे काही चालू आहे ते आपण पाहिलं पाहिजे.

काँग्रेस

फोटो स्रोत, ANI

प्रश्न : पाच न्याय हा मुद्दा घेऊन तुम्ही लोकांसमोर जाणार आहात, महाविकास आघाडीचाही हाच अजेंडा असणार आहे का?

पृथ्वीराज चव्हाण : काँग्रेसच्या नेत्यांना प्रचार करता येऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस पक्षाची सर्व बँक खाती गोठवलेली आहेत.

अधिकृतपणे लोकांनी जो निधी दिला आहे तो आम्हाला वापरता येत नाहीये. दुसऱ्या बाजूला हेमंत सोरेन आणि केजरीवाल यांना तुरुंगात टाकलं आहे जेणेकरून त्यांना प्रचार करता येऊ नये. ही रशिया सारख्या हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू आहे.

पुतीन यांना 88 टक्के मतं पडली कारण विरोधात कोणी उमेदवार उभा नव्हता. तीच प्रक्रिया भारतात अमलात आणली जातं आहे. नरेंद्र मोदींनी पुतीन यांना 88% मतं मिळाली म्हणून अभिनंदन केलं. पण ही मतं कशी पडली याचं उत्तर पुतीन यांनी दिलंय.

प्रश्न : निवडणूक रोख्यांचा काँग्रेसलाही फायदा झाल्याचं आकडेवारीवरून दिसतंय, त्याबद्दल काय सांगाल?

पृथ्वीराज चव्हाण : भाजपला 56% पेक्षा जास्त पैसे मिळाले आणि ते खंडणीच्या स्वरूपात वसूल केले गेले. काँग्रेसला त्यामानाने फक्त अकरा टक्के पैसे मिळाले.

मुळात निवडणूक रोख्यांचा जेव्हा कायदा आला तेव्हाच आम्ही याला विरोध केला. पब्लिक फंडिंग हे झालं पाहिजे, कॉर्पोरेट क्षेत्राने पण यात योगदान दिलं पाहिजे. पण हे सगळं पारदर्शक पद्धतीने झालं पाहिजे. पण ही पद्धत पारदर्शी नव्हती त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने त्याला घटनाबाह्य ठरवलं आणि सर्व माहिती प्रकाशित करण्याचा आदेश दिला.

आता ही माहिती उजेडात आल्यावर काय दिसतंय? तर सर्व देशात जुगार खेळणारी कंपनी राजकीय पक्षांना मोठ्या प्रमाणात देणगी देताना दिसते आणि भाजप सुद्धा अशा जुगाराला परवानगी देताना दिसतं.

म्हणजे आपल्या देशात आपल्या युवकांना रोजगार देता येत नाही मात्र नरेंद्र मोदी पालकांना सांगताना दिसतात की, तुमच्या मुलांना जुगार खेळू द्या मग त्यांना पैसे मिळतील. हे पालकांना मान्य आहे का? आणि हेच एक उदाहरण नाही तर बऱ्याच ठिकाणी धाड पडते आणि दोन दिवसात देणगी दिली जाते.

या तारखा सुद्धा उजेडात येऊ लागल्या आहेत. हेच लपवायचा त्यांचा प्रयत्न होता पण आता ते लपलेलं नाहीये. त्यामुळे जगात सर्वात मोठ्या शासकीय मार्गातून खंडणी वसूल करण्याचं हे कारस्थान उघड झालेलं आहे.