प्रेस रिव्ह्यू: धनाढ्यांच्या यादीत पतंजलीचे बालकृष्ण 8 व्या स्थानी

पतंजलीचे आचार्य बालकृष्ण आणि डी-मार्टचे राधाकिशन दमानी यांनी हुरून इंडिया रिच लिस्टमध्ये स्थान मिळवलं आहे. मुकेश अंबानी हे भारतातील सर्वाधिक श्रीमंत उद्योजक आहेत असं या यादीत म्हंटलं गेलं आहे.

गेल्या सहा वर्षांपासून अंबानी हे या यादीत प्रथम क्रमांकावर आहेत. तर रामदेव बाबांचे सहकारी आणि पतंजलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आचार्य बालकृष्ण हे या यादीत 8 व्या क्रमांकावर आहेत.

गेल्या वर्षी ते 25 व्या क्रमांवर होते. त्यांच्या संपत्तीमध्ये 173 टक्क्यांनी वाढ झाली आहे, असं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे.

इराकमध्ये कुर्दिस्तानसाठी जनमत चाचणी

इराकमध्ये कुर्दिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी जनमत संग्रह चाचणी घेण्यात आली. या भागातील तीन राज्यांनी सोमवारी मतदान केलं.

इराक सरकार आणि कुर्द लोक ज्या वादग्रस्त भूमीवर आपला दावा करतात त्या ठिकाणी देखील मतदान घेण्यात आलं. इराकचे पंतप्रधान हैदर अल अबादी यांनी ही जनमत संग्रह चाचणी घटनाबाह्य आहे असं म्हटलं आहे.

72 टक्के लोकांनी या मतदानात सहभाग नोंदवल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. या मतदानाचा निकाल सकारात्मक येईल असा विश्वास कुर्द नेत्यांना आहे, असं वृत्त बीबीसी हिंदीनं दिलं आहे.

सौभाग्य योजनेचं अनावरण

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सोमवारी सौभाग्य योजनेचं अनावरण करण्यात आलं. या योजनेच्या माध्यमातून गरिबांना मोफत वीज जोडणी मिळणार आहे. शहर आणि ग्रामीण भागातील गरीबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

जिथं वीज नाही तिथं सोलर पॅक देणार असल्याचंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केलं आहे. सोलर पॅकमध्ये 5 एलईडी बल्ब, बॅटरी आणि एक पंखा दिला जाणार आहे.

16 हजार कोटी रुपयांची ही योजना आहे.

...तर पुन्हा सर्जिकल स्ट्राइक

वेळ आल्यास पुन्हा सर्जिकल स्ट्राइक करू असा इशारा लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी पाकिस्तानला दिला आहे. जर दहशतवादी भारतात येण्याचा प्रयत्न केला तर त्यांना आम्ही जमिनीत अडीच फूट गाडू असं रावत यांनी म्हटलं आहे.

'इंडियाज मोस्ट फिअरलेस' या पुस्तकाचं प्रकाशन दिल्लीमध्ये झालं त्यावेळी ते बोलत होते. भारतीय काय आहेत हे सर्जिकल स्ट्राइकनंतर त्यांच्या लक्षात आलं असेल असं ते म्हणाले, असं वृत्त फायनांशिएल एक्सप्रेसनं दिलं आहे.

'आधार' नसल्यास शेतकऱ्यांची कर्जमाफी धोक्यात!

कर्जमाफीचे अर्ज दाखल करताना ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्ड जोडलं नाही अशा राज्यातल्या २ लाख ४१ हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी मिळणार की नाही याबाबत संभ्रम आहे.

या सर्वांच्या अर्जाची पुन्हा छाननी होणार आहे. त्यानंतरच त्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला जाणार आहे, असं वृत्त दैनिक प्रहारनं दिलं आहे.

या छाननी प्रक्रियेमुळे प्रत्यक्ष कर्जमाफी मिळण्यासाठी आणखी वेळ लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज्यातील जवळपास ५६ लाख ५९ शेतकऱ्यांनी अर्ज भरले आहेत.

पण, त्यापैकी २ लाख ४१ हजार शेतकऱ्यांचे आधार क्रमांक नसल्यानं त्या सर्व अर्जांची पुन्हा छाननी होणार असल्याचं वृत्तात म्हंटलं आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुकवर लाईक करू शकता.)