You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
प्रेस रिव्ह्यू: 'राईट बंधूंनी नाही भारतीयाने लावला विमानाचा शोध'
राईट बंधुंच्याही आधी एका भारतीयाने विमानाचा शोध लावला होता हे सांगण्याची आज गरज आहे, असं केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांनी एका कार्यक्रमात म्हटलं.
हिंदुस्तान टाइम्सने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार सत्यपाल सिंह म्हणाले की राईट बंधुंनी विमानाचा शोध लावण्याच्याही आधीच भारतात शिवकर बापूजी तळपदे यांनी विमानाचा शोध लावला होता.
रामायणामध्ये उल्लेखित पुष्पक विमानाबद्दल आयआयटीतील विद्यार्थ्यांना शिकवायला हवं, असंही ते म्हणाले.
त्रिपुरामध्ये पत्रकाराची हत्या
इंडिजिनस पिपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा (आयपीएफटी) या संघटनेनं सुरू केलेल्या आंदोलनाचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकाराची त्रिपुरामध्ये हत्या करण्यात आली.
दिनरात या स्थानिक वाहिनीसाठी काम करणारे पत्रकार शंतनू भौमिक यांचे अपहरण करण्यात आले आणि त्यांची हत्या करण्यात आली, असं पोलीस अधिक्षक अभिजीत सप्तर्षी यांनी सांगितलं.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार आयपीएफटीने रस्ता बंद आंदोलन केले होते. ज्याचे वार्तांकन करण्यासाठी भौमिक गेले होते.
उद्घाटनापूर्वीच कालवा फुटला
मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते उद्घाटन होण्यापूर्वीच बिहारमधील भागलपूर येथे एक कालवा फुटला. भागलपूर जिल्ह्यात 389 कोटी रुपये गुंतवून 11 किमी लांबीचा हा कालवा बांधण्यात आला होता.
हा कालवा पूर्ण होण्यासाठी 40 वर्षं लागली होती, असं वृत्त हिंदुस्तान टाइम्सने दिले आहे. आणि उद्घाटनाच्या एका दिवसापूर्वीच तो फुटला.
काँग्रेस नोकऱ्या निर्माण करण्यात अपयशी
नव्या नोकऱ्या निर्माण करण्यात, युवकांना नोकऱ्या देण्यात काँग्रेसला अपयश आले होते, अशी कबुली पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजुप सरकारचे तर प्रयत्न देखील त्या दिशेला नसून सरकार निष्क्रिय असल्याची टीका त्यांनी अमेरिकेतील प्रिन्सटन विद्यापीठात केली.
राहुल गांधी लवकरच अध्यक्ष?
राहुल गांधी हे 31 ऑक्टोबरपूर्वी काँग्रेसचे अध्यक्ष होतील, असं वृत्त इकॉनॉमिक टाइम्सनं दिलं आहे. काँग्रेसच्या केंद्रीय निवड समितीची 3 ऑक्टोबर रोजी बैठक आहे.
काँग्रेसच्या अंतर्गत निवडणुकीची प्रक्रिया 10 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर त्यांच्या निवडीची घोषणा करण्यात येईल, असं इकॉनॉमिक टाइम्सने म्हटलं आहे.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुकवर लाईक करू शकता.)