वॅग्नर ग्रुपने मॉस्को मोहीम थांबवली, प्रिगोझिन म्हणाले, "रक्तपात टाळण्यासाठी माघारी फिरतोय"

फोटो स्रोत, Reuters
रशियाच्या दक्षिणेकडील रोस्तोव्ह शहराचा ताबा मिळवल्यानंतर खासगी लष्करी कंपनी वॅग्नर ग्रुपने काल (24 जून) मॉस्कोच्या दिशेने कूच केली होती. पण एका दिवसातच वॅग्नर ग्रुपने मॉस्को मोहीम थांबवत असल्याची माहिती दिली आहे.
वॅग्नर ग्रुपचे प्रमुख येव्हगेनी प्रिगोझिन यांनी याविषयी सांगताना म्हटलं, "रक्तपात टाळण्यासाठी आम्ही आमच्या सैनिकांना मॉस्कोला जाण्यापासून रोखलं आहे. आता आम्ही आमच्या तळावर माघारी फिरत आहोत."
काही माध्यमांच्या बातम्यांनुसार, वॅग्नर ग्रुपचे सैनिक हे मॉस्कोपासून 200 किलोमीटरपर्यंत पोहोचले होते.
दरम्यान, येव्हगेनी यांनी आपल्या टेलिग्रॅम चॅनेलवर एक ऑडिओ संदेश देऊन म्हटलं की रशियाची राजधानी मॉस्कोच्या दिशेने जात असलेल्या सैनिकांना थांबवण्याबाबत आपलं मत तयार झालं आहे.
रोसिया 24 न्यूज चॅनेलच्या माहितीनुसार, बेलारुसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेंको यांनी येव्हगेनी प्रिगोझिन यांच्याशी चर्चा केली. त्यांच्याशी केलेल्या चर्चेनंतरच प्रिगोझिन यांनी मॉस्को मोहीम थांबवण्याचा निर्णय घेतला. परिस्थिती आणखी बिघडू नये यासाठी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
"लुकाशेंको यांनी प्रिगोझिन यांच्यासमोर ही मोहीम थांबवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. हा प्रस्ताव त्यांनी स्वीकारला. तसंच वॅग्नर ग्रुपच्या सैनिकांच्या सुरक्षेची खात्री आणि परिस्थिती बिघडू न देणं यासंदर्भात तोडगा काढणं शक्य आहे," असं लुकाशेंको यांच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलेलं आहे.
रोसिया 24 न्यूज चॅनेलच्या बातमीनुसार, "व्लादिमीर पुतिन यांनीसुद्धा या करारावर सहमती दर्शवली.

फोटो स्रोत, Getty Images
वॅग्नर आर्मीने काल मॉस्कोच्या दिशेने कूच करणं सुरू केलं होतं. "आमचा उद्देश लष्करी बंड नसून न्याय मिळवण्यासाठीची ही मोहीम आहे," असं प्रिगोझिन यांनी याबाबत माहिती देताना म्हटलं होतं.
युक्रेन युद्धात रशियाच्या बाजूने लढत असलेल्या वॅग्नर ग्रुपची भूमिका महत्त्वाची राहिलेली आहे. विशेषतः युक्रेनच्या पूर्वेकडील बखमुत शहरात त्यांनी केलेली कारवाई लक्षवेधी ठरली होती.
देश पुतिन यांच्या पाठीशी, रशियन परराष्ट्र मंत्रालयाचं वक्तव्य
लष्करी बंड करण्याच्या प्रयत्नांना देशाचे नागरिक नाकारतात, संपूर्ण देश हा राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या पाठीशी आहे, असं वक्तव्य रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने केलं आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने एक प्रसिद्धीपत्रक जारी करून वॅग्नर ग्रुप बंड प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली.

फोटो स्रोत, cremlin
त्यांनी म्हटलं, "षडयंत्रकर्त्यांना देशाला अस्थिर करायचं आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरक्षित होण्याच्या रशियाच्या प्रयत्नांना सुरुंग लावला जात आहे. या बंडाची सूत्रे शत्रूच्या हातात आहेत."
आम्ही पाश्चिमात्य देशांना इशारा देतो की रशियाविरुद्धचे तुमचे मनसुबे पूर्ण करण्यासाठी रशियाच्या देशांतर्गत परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू नका. हे सगळे प्रयत्न अपयशी ठरतील. रशियात किंवा रशियाबाहेर त्यांना कोणतीच मदत मिळू शकणार नाही."
रशिया-युक्रेन युद्धाच्या दिशेने अंगुलनिर्देश करताना त्यांनी म्हटलं की विशेष सैनिक मोहिमेअंतर्गत आम्ही आमचे सर्व उद्देश पूर्ण करू.
मॉस्कोतील सार्वजनिक कार्यक्रम रद्द
रशियाच्या बाजूने युक्रेनविरोधात युद्ध करणारे येव्हगेनी प्रिगोझिन यांनीच बंड करून रशियातील रोस्तोव्ह शहराचा ताबा मिळवला आहे. यानंतर त्याचे पडसाद रशियाभर उमटण्यास सुरुवात झालेली आहे.
या पार्श्वभूमीवर मॉस्कोमधील सर्व सार्वजनिक कार्यक्रम आठवडाभरासाठी रद्द करण्यात आले आहेत.

फोटो स्रोत, Reuters
येत्या 1 जुलैपर्यंतचे सर्व नियोजित सरकारी कार्यक्रम रद्द करून पुढे ढकलण्यात आले आहेत, अशी माहिती येथील अधिकाऱ्यांनी दिली.
तत्पूर्वी, मॉस्कोमध्येही यासंदर्भात खबरदारी घेण्यात आली होती. लोकांनी घराबाहेर पडू नये, असं आवाहन मॉस्कोच्या महापौरांनी केलं होतं.
ब्रिटिश पंतप्रधानांनी व्यक्त केली चिंता
ब्रिटिश पंतप्रधान ऋषि सुनक यांनी रशियातील परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
ते म्हणाले, या प्रकरणातील सर्व पक्षांनी जबाबदारीने काम करणं गरजेचं आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेला दोघांनीही प्रथम प्राधान्य द्यायला हवं.
शनिवारी यासंदर्भात युकेच्या कोबरा इमर्जन्सी कमिटीची एक बैठक झाली. आता सुनक या मुद्द्यावर इतर सहयोगी देशांसोबतही चर्चा करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त








