वॅग्नर आर्मी मॉस्कोच्या दिशेने; पुतिन यांना प्रत्युत्तर देताना वॅग्नर आर्मीच्या प्रमुखांनी म्हटलं-

व्लादिमीर पुतीन

फोटो स्रोत, Sputnik/Gavriil Grigorov/Kremlin via REUTERS

फोटो कॅप्शन, व्लादिमीर पुतीन

वॅग्नर ग्रुपच्या टेलिग्राम चॅनेलवर ऑडिओ संदेश समोर आला आहे. हा संदेश वॅग्नर ग्रुपचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांचा असल्याचं सांगितलं जात आहे.

यामध्ये प्रिगोझिन यांनी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

या ऑडिओमध्ये एक पुरुषी आवाज आहे, जो प्रिगोझिन यांच्या आवाजाशी मिळताजुळता आहे.

संदेशात म्हटलं आहे की, “देशाबरोबर द्रोह केल्याचं म्हणून राष्ट्रपतींनी चूक केली आहे. आम्ही देशभक्त आहोत. आम्ही लढलो आहोत आणि अजूनही लढत आहोत. आम्हाला आमच्या देशाला भ्रष्टाचार, खोटेपणा आणि नोकरशाहीच्या कचाट्यात अडकलेलं पहायचं नाहीये.”

रशियाच्या दक्षिणेकडील रोस्तोव्ह शहरावर कब्जा केल्याचा दावा वॅग्नर आर्मीने केल्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी देशाला संबोधित केलं आहे.

या भाषणात पुतीन यांनी वॅग्नर आर्मीचा उल्लेख केला नाही. मात्र, "रशियाचं भविष्य आता दावणीला लागलं आहे," असं ते म्हणाले.

"बंडखोरांनी केलेली कृती ही पाठीत खंजीर खुपसण्यासारखी आहे," असं पुतीन यांनी म्हटलं आहे.

रशियाचा 'खाजगी लष्करी गट' वॅग्नर ग्रुपचं बंड

युक्रेनविरुद्ध सुरू असलेल्या युद्धात रशियाच्या बाजूने लढत असलेल्या वॅग्नर ग्रुपने आता रशियाविरुद्धच बंड केल्याची माहिती समोर येत आहे. रशियातील रोस्तोव्ह शहरावर वॅग्नर ग्रुपने कब्जा केल्याचा दावा करण्यात येत आहे.

रॉयटर्स वृत्तसंस्थेने रोस्तोव्ह शहरातील काही फोटो जारी केले असून यामध्ये रस्त्यांवर टँक आणि सैनिक दिसून येत आहेत.

वॅग्नर ग्रुपचे सैनिक

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, वॅग्नर ग्रुपचे सैनिक

वॅग्नर ग्रुपने बंड करण्यामागचं मुख्य कारण हे वॅग्नर ग्रुपचे प्रमुख येव्हगेनी प्रिगोझिन आणि राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात निर्माण झालेलं वितुष्ट आहे, असं सांगितलं जात आहे.

रशियाच्या दक्षिणेस असलेलं रोस्तोव्ह शहर आपल्या नियंत्रणाखाली असल्याचा दावा प्रिगोझिनी यांनीच केल्याने खळबळ माजली आहे.

खासगी लष्करी कंपनी

वॅग्नर ग्रुप हा स्वतःला एक 'खासगी लष्करी कंपनी' असल्याचं म्हणतो. या ग्रुपची ओळख सर्वप्रथम 2014 साली झाली होती. त्यावेळी हा ग्रुप युक्रेनमध्ये रशियासमर्थक फुटीरतावाद्यांना पाठिंबा देऊन त्यांच्या बाजूने लढाईत उतरला होता.

त्यावेळी हा ग्रुप एक गुप्त ग्रुप म्हणून ओळखला जात होता. त्यावेळी तो आफ्रिका आणि मध्य पूर्व आशियामध्ये सक्रिय होता. त्यावेळी या ग्रुपमध्ये पाच हजार सैनिक होते. त्यातही सर्वाधिक रशियाच्या स्पेशल फोर्सचे सैनिक होते.

यानंतर गेल्या वर्षी सुरू झालेल्या युक्रेन-रशिया युद्धातही वॅग्नर ग्रुप रशियाच्या बाजूने मैदानात उतरला होता.

वॅग्नर ग्रुपचे प्रमुख येव्हगेनी प्रिगोझिन

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, वॅग्नर ग्रुपचे प्रमुख येव्हगेनी प्रिगोझिन

सुरुवातीपासूनच रशिया वॅग्नर ग्रुपचे हजारो भाड्याचे सैनिक घेऊन युक्रेनविरुद्ध लढत होता. या सैनिकांच्या मदतीने रशियाने बखमुत शहरात आघाडीही घेतली होती.

पण आता वॅग्नर ग्रुपने खुद्द व्लादिमीर पुतीन यांच्या विरोधातच बंड केल्याची माहिती समोर येत आहे.

वॅग्नर ग्रुपच्या सैनिकांना किती पैसे मिळतात?

2014 मध्ये हा ग्रुप प्रसिद्धीस आल्यानंतर त्यांच्यातील लढवय्या सैनिकांची संख्या वाढत गेली.

जानेवारी महिन्यात ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, वॅग्नर ग्रुपकडे सध्या 50 हजार लढवय्या सैनिकांचा ताफा आहे. ते रशियाच्या बाजूने लढत आहेत.

वॅग्नर ग्रुपचे प्रमुख येव्हगेनी प्रिगोझिन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, वॅग्नर ग्रुपचे प्रमुख येव्हगेनी प्रिगोझिन

मंत्रालयाच्या माहितीनुसार, “या संघटनेने 2022 मध्ये मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया राबवली. कारण रशियाला आपल्या देशात लष्करामध्ये लोकांची भरती करणं अवघड बनलं होतं.”

तर, अमेरिकेच्या राष्ट्रीय संरक्षण परिषदेच्या म्हणण्यानुसार, युक्रेनमध्ये लढत असलेल्या वॅग्नर ग्रुपमध्ये 80 टक्के सैनिकांची भरती ही तुरुंगातून बाहेर काढून करण्यात आलेली होती.”

वॅग्नर ग्रुपमध्ये माजी सैनिक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीने बीबीसीशी बोलताना सांगितलं, “युक्रेन युद्धापूर्वी व्यक्ती छोट्या गावातून येऊन तरुण या ग्रुपमध्ये भरती व्हायचे.

रोस्तोव्ह शहर

फोटो स्रोत, Reuters

या गावांमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळणं अवघड होतं, त्यामुळे त्यांनी वॅग्नर ग्रुपमध्ये सहभागी होण्याचा पर्याय निवडलेला होता.

वॅग्नर ग्रुपमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीचा पगार सुमारे 1500 डॉलर प्रतिमहिना (1.22 लाख रुपये) असतो. एखादा सैनिक युद्धादरम्यान मैदानात लढण्यासाठी जायचा तेव्हा त्याला 2000 डॉलर मिळतो

खरं तर, रशियामध्ये भाड्याच्या लष्करी सैनिक घेण्यावर बंदी आहे. मात्र वॅग्नर ग्रुपने 2022 मध्ये एका कंपनीच्या स्वरुपात आपली नोंदणी केली होती. तसंच त्यांनी सेंट पीटर्सबर्गमध्ये एक कार्यालयही उघडलं होतं.

वॅग्नर ग्रुपचं पीटर्सबर्गमधील कार्यालय

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, वॅग्नर ग्रुपचं पीटर्सबर्गमधील कार्यालय

रॉयल युनायटेड सर्व्हिसेस इन्स्टीट्यूट नामक एका थिंक टँकमध्ये कार्यरत असलेले डॉ. सॅम्युएल रमानी म्हणतात, “वॅग्नल ग्रुप रशियन शहरांमध्ये मोठमोठे होर्डिंग लावून बिनदिक्कत सैनिकांची भरती करू लागला होता. तर रशियन मीडियामध्येही हे म्हणजे एका देशभक्त संघटनेत भरती म्हणून मांडण्यात येत होतं.

संरक्षण मंत्रालयाकडून कौतुक, आता अंकुश लावण्याचा प्रयत्न

रशियाने युक्रेनच्या पूर्व भागातील बखमुत शहरावर कब्जा केला, त्या कारवाईमध्ये वॅग्नर ग्रुपची मोठी भूमिका होती.

वॅग्नर ग्रुपचा सैनिक

फोटो स्रोत, Reuters

युक्रेनच्या सैनिकांच्या मते, वॅग्नर ग्रुपच्या सैनिकांना मोठ्या संख्येने खुल्या मैदानात लढाई करण्यासाठी पाठवण्यात आलेलं होतं. यामुळे त्यांचे अनेक सैनिक मारले गेले होते.

सुरुवातीला रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने लढाईत वॅग्नर ग्रुप सहभागी असल्याचं फेटाळून लावलं होतं. पण नंतर त्यांनी धाडसी आणि निःस्वार्थी भूमिका बजावल्याबाबत आपल्या भाड्याच्या सैनिकांचं कौतुक केलं होतं.

मात्र आता रशिया या ग्रुपवर अंकुश लावण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळत आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)