वॅग्नर ग्रुपचे येवगेनी प्रिगोझिन रशियात सत्तापालटाच्या प्रयत्नात आहेत?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, पॉल किर्बी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
रशियानं 16 महिन्यांपूर्वी युक्रेनविरुद्ध सुरू केलेलं 'विशेष लष्करी ऑपरेशन' आता महत्त्वपूर्ण वळणावर पोहोचलंय. हे युद्ध आता अशा टप्प्यावर पोहोचलंय, जिथून रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या सत्तेलाच आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे.
पुतिन यांनी वॅग्नर ग्रुपचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांच्यावर सशस्त्र बंड करून रशियाचा विश्वासघात केल्याचा आरोप केलाय. प्रिगोझिन यांनी रशियाच्या पाठीत खंजीर खुपसल्याचं पुतीन यांनी म्हटलंय.
येवगेनी प्रिगोझिन हे रशियातील अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तींपैकी एक आहेत. प्रिगोझिन म्हणतात की, “आमचा उद्देश लष्करी बंड नसून, न्यायासाठीचा एक मोर्चा आहे.”
रशियामध्ये नेमकं काय सुरू आहे?
रशियाच्या युक्रेनविरुद्धच्या लष्करी मोहिमेत प्रिगोझिन आणि त्यांच्या खासगी सैन्याने महत्त्वाची भूमिका बजावली. या युद्धादरम्यान त्यांच्या खासगी सैन्याच्या हजारो सैनिकांनी रशियाच्या बाजूने युद्धभूमीवर झालेल्या लढाईत भाग घेतला होता. यातील बहुतेक सैनिक रशियातील तुरुंगातून भरती करण्यात आले होते.
युक्रेन युद्धापूर्वीच प्रिगोझिन यांचं खासगी सैन्य रशियासाठी इतर अनेक ठिकाणी महत्त्वाची भूमिका बजावताना दिसून आलेत.
युक्रेनविरुद्धच्या युद्धादरम्यान संघर्षाचे नेतृत्व करणाऱ्या लष्करप्रमुखांसोबतचा त्यांचा वाद नवा नाही, पण आता हा वाद बंडाचे रूप घेत आहे.
पूर्व युक्रेनच्या सीमेजवळ तैनात असलेल्या वॅग्नर ग्रुपमधील सैनिकांनी सीमा ओलांडून रोस्तोव्ह या दक्षिण रशियन शहरात प्रवेश केलाय. रोस्तोव्हमधील लष्करी तळांचा ताबा घेतल्याचा त्यांचा दावा आहे.
पुतिन यांनी म्हटलंय की, परिस्थिती कठीण असली तरी रशियाच्या संरक्षणासाठी कोणतीही कसर सोडणार नाही.
हा सत्तापालटाचा प्रयत्न आहे का?
या घडामोडीला लष्करी बंड म्हणण्यास प्रिगोझिन यांनी नकार दिलाय आणि या प्रकारचे दावेही त्यांनी फेटाळलेत.
रशियन सैन्य वॅग्नर ग्रुपच्या सैनिकांना आवश्यक तेवढे शस्त्रे आणि दारूगोळा पोहोचवत नसल्यावरून सैन्य आणि प्रिगोझिन यांच्यात वाद झाला. मात्र, आता युक्रेनविरुद्धच्या युद्धात सैन्याचं नेतृत्त्व करणारे संरक्षणमंत्री सर्गेई शोइगु आणि सैन्याचे चीफ ऑफ स्टाप व्हॅलेरी गेरासिमोव्ह यांना वॅग्नर ग्रुपचं बंड म्हणजे थेट आव्हान मानलं जातंय.
अजूनतरी या घडामोडींना ‘सत्तापालट’ म्हणता येणार नाही. कारण अजून तरी सरकारच्या हातून सत्ता हिसकावून घेण्याचा कुठलाच प्रयत्न वॅग्नर ग्रुपकडून झालेला दिसून येत नाहीय.
प्रिगोझिन यांची ही खासगी लष्करी कंपनी औपचारिकरित्या रशियाच्या सैन्याचा भाग नाहीय. मात्र, रशियातील अनेक लोकांचा आपल्याला पाठिंबा मिळत असल्याचा दावा वॅग्नर ग्रुपच्या प्रिगोझिन यांनी केलाय.

फोटो स्रोत, SERGEI ILNITSKY/POOL/AFP VIA GETTY IMAGES
मात्र, या बंडातून रशियाच्या सर्वोच्च लष्करी अधिकाऱ्यांना त्यांच्या खुर्चीवरून हटवण्याचा हा प्रयत्न असून, हे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या सत्तेला थेट आव्हान आहे.
प्रिगोझिन यांच्या सैन्याची उभारणी आणि विस्तार करण्यात पुतिन यांचाच हातभार जास्त आहे. मात्र, हेही खरंय की, प्रिगोझिन यांच्यावर पुतिन यांचं आता फारसं नियंत्रण राहिलं नाहीय.
पुतिन यांनी वॅग्नर ग्रुपचं हे बंड गांभीर्यानं घेतलं आहे.
‘दहशतवादविरोधी ऑपरेशन’चा भाग म्हणून मॉस्कोच्या संपूर्ण भागाला हाय-अलर्टवर ठेवण्यात आलं असून, सर्व प्रमुख कार्यक्रम रद्द करण्यात आलेत.
युक्रेनच्या ईशान्येकडील रशियन सीमेजवळ असलेल्या वोरोनेझमध्येही असेच निर्बंध लावण्यात आलेत.
प्रिगोझिन यांनी म्हटलंय की, “इथे आम्ही 25 हजार जण आहोत. मात्र, जे कुणी आमच्यासोबत येऊ पाहत आहेत, त्यांचं स्वागत आहे.”
प्रिगोझिन यांच्या दाव्यानुसार, हे बंड रशियन सैन्याच्या नेतृत्त्वाला आव्हान आहे, पण यातून राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना धमकावण्यासारखे काहीही नाहीय.
प्रिगोझिन यांनी आपल्या सैनिकांसह सीमा ओलांडून रोस्तोव्ह शहरात आले आणि लष्कराचे मुख्यालय ताब्यात घेतलं. वॅग्नर ग्रुपच्या दाव्यानुसार, मंत्री आणि चीफ ऑफ स्टाफ तिथून पळून गेले.
जरी प्रिगोझिन म्हणतायेत की, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना काहीही धोका नाही. तरी ते पुतिन यांच्यावर टीका करतानाही दिसतायेत. ते म्हणाले की, पुतिन जे करतायेत, ते ‘चूक’ आहे.
प्रिगोझिन यांचा नेमका उद्देश काय आहे?
प्रिगोझिन म्हणतात की ते ‘न्यासाठी मोर्चा’ काढत आहेत. मात्र, त्यांचा दावा अस्पष्ट वाटतो. हे खरंय की, लष्करी नेतृत्वासोबतचे त्यांचे संबंध इतके ताणले गेलेत की परिस्थिती सुरळीत करण्यासाठी त्यांना नेतृत्व स्वतःच्या हातात घ्यायचे आहे.
रशियन संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु आणि व्हॅलेरी गेरासिमोव्ह यांच्याशी समोरासमोर भेट झाली नाही, तर 1,000 मैलांचा प्रवास करून मॉस्कोला जाईन, असे प्रिगोझिनने एका व्हीडिओत बोलताना दिसतायेत.
प्रिगोझिन म्हणतात की, युक्रेनमध्ये युद्धभूमीवर लढणार्या रशियन सैन्याशी त्यांचं कोणतंही शत्रुत्व नाही, परंतु त्यांचे नेतृत्व करणार्या ‘विदूषकां’शी आहे.
अनेक जनरलनी त्यांना शांत राहण्यास सांगितलंय, मात्र आता त्यास उशीर झाल्याचंही दिसतंय.
पुतिन आणि प्रिगोझिन यांच्यात काय संबंध आहे?
वॅग्नर ग्रुपचे प्रमुख प्रिगोझिन हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांचा उदय पुतिन यांच्या सत्तेनेच झाला असे म्हटले जाते. प्रगोझिन हे पूर्वी एक श्रीमंत व्यापारी होते, नंतर तो खासगी सैन्याचे प्रमुख बनले.
युक्रेनच्या पूर्वेकडील बखमुत काबीज करण्याच्या रक्तरंजित संघर्षात त्यांच्या शेकडो सैनिकांना प्राण गमवावे लागले. अनेक महिने हा संघर्ष चालू राहिला, पण त्यांचं उद्दिष्ट कधीच पूर्ण होऊ शकलं नाही.
प्रिगोझिन यांनी लष्करी नेतृत्वावर शस्त्रांचा पुरवठा कमी केल्याचा आरोप केलाय. त्यांनी सोशल मीडियावर असे व्हीडिओ पोस्ट केले, ज्यात रशियन सैन्याच्या उणिवा आणि अपयशांची तपशीलवार माहिती आहे.
जरी त्यांनी रशियन राष्ट्राध्यक्षांना थेट लक्ष्य केले नसले, तरी त्यांनी त्यांच्या व्हीडिओंमध्ये ‘हॅपी ग्रँडफादर’चा उल्लेख अनेकवेळा केला आहे. असं मानलं जातंय की, त्यांचा इशारा अप्रत्यक्षपणे पुतिन यांच्याकडेच होता.

फोटो स्रोत, Getty Images
गेल्या महिन्यात त्यांनी म्हटलं होतं की, “जर हे कळलं की हे हॅप्पी ग्रँडफादर पूर्णपणे मुर्ख आहेत, तर रशिया युद्ध कसं जिंकू शकणार आहे?”
यानंतर 23 जून रोजी त्यांनी एक लांबलचक व्हीडिओ जारी करून रशियन नागरिकांना सांगितले की, या युद्धाची संपूर्ण कहाणी खोटी आहे.
‘बदमाशांच्या एका छोट्या गटानं’ स्वत:चा मार्ग तयार करण्यासाठी जनता आणि राष्ट्राध्यक्षांना धोका दिलाय, असंही ते म्हणाल होते.
तेव्हापासून घटना झपाट्याने बदलल्या आहेत.
खासगी लष्करी कंपनी
वॅग्नर ग्रुप हा स्वतःला एक 'खासगी लष्करी कंपनी' असल्याचं म्हणतो. या ग्रुपची ओळख सर्वप्रथम 2014 साली झाली होती. त्यावेळी हा ग्रुप युक्रेनमध्ये रशियासमर्थक फुटीरतावाद्यांना पाठिंबा देऊन त्यांच्या बाजूने लढाईत उतरला होता.
त्यावेळी हा ग्रुप एक गुप्त ग्रुप म्हणून ओळखला जात होता. त्यावेळी तो आफ्रिका आणि मध्य पूर्व आशियामध्ये सक्रिय होता. त्यावेळी या ग्रुपमध्ये पाच हजार सैनिक होते. त्यातही सर्वाधिक रशियाच्या स्पेशल फोर्सचे सैनिक होते.
यानंतर गेल्या वर्षी सुरू झालेल्या युक्रेन-रशिया युद्धातही वॅग्नर ग्रुप रशियाच्या बाजूने मैदानात उतरला होता.
सुरुवातीपासूनच रशिया वॅग्नर ग्रुपचे हजारो भाड्याचे सैनिक घेऊन युक्रेनविरुद्ध लढत होता. या सैनिकांच्या मदतीने रशियाने बखमुत शहरात आघाडीही घेतली होती.
पण आता वॅग्नर ग्रुपने खुद्द व्लादिमीर पुतीन यांच्या विरोधातच बंड केल्याची माहिती समोर येत आहे.

फोटो स्रोत, Reuters
वॅग्नर ग्रुपच्या सैनिकांना किती पैसे मिळतात?
2014 मध्ये हा ग्रुप प्रसिद्धीस आल्यानंतर त्यांच्यातील लढवय्या सैनिकांची संख्या वाढत गेली.
जानेवारी महिन्यात ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, वॅग्नर ग्रुपकडे सध्या 50 हजार लढवय्या सैनिकांचा ताफा आहे. ते रशियाच्या बाजूने लढत आहेत.
मंत्रालयाच्या माहितीनुसार, “या संघटनेने 2022 मध्ये मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया राबवली. कारण रशियाला आपल्या देशात लष्करामध्ये लोकांची भरती करणं अवघड बनलं होतं.”
तर, अमेरिकेच्या राष्ट्रीय संरक्षण परिषदेच्या म्हणण्यानुसार, युक्रेनमध्ये लढत असलेल्या वॅग्नर ग्रुपमध्ये 80 टक्के सैनिकांची भरती ही तुरुंगातून बाहेर काढून करण्यात आलेली होती.”
वॅग्नर ग्रुपमध्ये माजी सैनिक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीने बीबीसीशी बोलताना सांगितलं, “युक्रेन युद्धापूर्वी व्यक्ती छोट्या गावातून येऊन तरुण या ग्रुपमध्ये भरती व्हायचे.
या गावांमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळणं अवघड होतं, त्यामुळे त्यांनी वॅग्नर ग्रुपमध्ये सहभागी होण्याचा पर्याय निवडलेला होता.
वॅग्नर ग्रुपमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीचा पगार सुमारे 1500 डॉलर प्रतिमहिना (1.22 लाख रुपये) असतो. एखादा सैनिक युद्धादरम्यान मैदानात लढण्यासाठी जायचा तेव्हा त्याला 2000 डॉलर मिळतो
खरं तर, रशियामध्ये भाड्याच्या लष्करी सैनिक घेण्यावर बंदी आहे. मात्र वॅग्नर ग्रुपने 2022 मध्ये एका कंपनीच्या स्वरुपात आपली नोंदणी केली होती. तसंच त्यांनी सेंट पीटर्सबर्गमध्ये एक कार्यालयही उघडलं होतं.
रॉयल युनायटेड सर्व्हिसेस इन्स्टीट्यूट नामक एका थिंक टँकमध्ये कार्यरत असलेले डॉ. सॅम्युएल रमानी म्हणतात, “वॅग्नल ग्रुप रशियन शहरांमध्ये मोठमोठे होर्डिंग लावून बिनदिक्कत सैनिकांची भरती करू लागला होता. तर रशियन मीडियामध्येही हे म्हणजे एका देशभक्त संघटनेत भरती म्हणून मांडण्यात येत होतं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








