तुर्कीने 1999 साली आलेल्या त्या प्रलंयकारी भूकंपातून काही धडा घेतला नाही?

17 ऑगस्ट 1999. पहाटेचे तीन वाजले होते. सगळी माणसं गाढ झोपली होती. अचानक सगळं गदागदा हलू लागलं. तो भूकंप होता. रिश्टर स्केवर त्याची तीव्रता होती 7.6.

तुर्कीत 8 फेब्रुवारीला झालेल्या भूकंपाच्या मानाने त्या भूकंपाची तीव्रता कमी होती. पण काही दिवसांपर्यंत 24 वर्षांपूर्वी आलेला तो भूकंप सगळ्यात भीषण मानला जात होता. त्या भूकंपाचा केंद्रबिंदू दाटीवाटीच्या लोकसंख्येच्या इजमित इथे होता. त्यामुळे नुकसान जास्त झालं.

त्या भूकंपात 17 हजारहून अधिक माणसांनी जीव गमावला तर 23 अब्ज डॉलरचं नुकसान झालं. प्रचंड प्रमाणावर झालेल्या नुकसानाच्या बरोबरीने 24 वर्षांपूर्वीचा तो भूकंप आणि गेल्या आठवड्यात झालेला भूकंप यात अनेक साधर्म्य आहेत.

तुर्कीच्या नागरिकांनी असा भूकंप पुन्हा होईल याचा विचार कोणी केला नसेल. त्या वेळच्या नुकसानापेक्षा या भूकंपाने केलेलं नुकसान अशक्य म्हणावं असं आहे.

संयुक्त राष्ट्र संघटनेच्या डिझास्टर रिस्क प्रिव्हेंशन ऑफिसने दिलेल्या माहितीनुसार 17 ऑगस्ट 1999 रोजी आलेल्या भूकंपात 12 हजार इमारती उद्धव्सत झाल्या किंवा त्यांचं गंभीर नुकसान झालं. याचं कारण होतं खराब पद्धतीने इमारतीचं बांधकाम आणि इमारतींची पाहणी करण्यात झालेली कसूर.

त्यावेळी चुकीच्या पद्धतीने दुर्घटनेला हाताळल्याप्रकरणी तुर्कीच्या सरकारवर जोरदार टीका झाली होती.

त्यावेळी सध्याचे राष्ट्राध्यक्ष तैय्यप अर्दोआन यांचा पक्ष 'जस्टीस अँड डेव्हलपमेंट पार्टी' तुर्कीतला प्रमुख विरोधी पक्ष होता. सरकारविरोधातल्या जनमताच्या रेट्य़ाचा अर्दोआन आणि त्यांच्या पक्षाने खुबीने उपयोग करुन घेतला. 2002 मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांनी प्रचंड बहुमताने विजय मिळवला.

20 वर्षानंतरही अर्दोआन सत्तेत आहेत. त्या भूकंपाने जी शिकवण दिली होती ती मात्र अर्दोआन विसरले आहेत.

24 वर्षांपूर्वी काय झालं होतं?

17 ऑगस्ट 1999 रोजी 37 सेकंदासाठी जमीन हलली होती. भूकंप तुर्कीच्या उत्तर-पश्चिम भागात आला होता. तुर्कीत याच भागात सर्वाधिक लोकसंख्या आणि औद्योगिक परिसर आहे. या भागाला भूकंपाचा सर्वाधिक फटका बसला.

भूकंपाचं केंद्र कोसायेली परिसरात होतं. त्याची राजधानी इजमित आहे. पण भूकंपाचा परिणाण इस्तंबूल, गोलकुक, डारिका, साकार्या आणि डेरिंस या शहरांपर्यंत जाणवला.

त्या भूकंपाच्या तीन महिन्यानंतर आणखी एक भूकंप झाला. 12 नोव्हेंबरला आलेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू इजमित पासून 100 किलोमीटरवरच्या भागात होता. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता होती 7.2. या भूकंपामुळे 800 लोकांचा मृत्यू झाला.

रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता कमी होती. पण या भूकंपामुळे आधीच्या भूकंपाचा फटका बसलेल्या नागरिकांच्या त्रासात भर पडली.

या फॉल्ट लाईनचा काही भागाचंच नुकसान व्हायचं राहिलं आहे असा इशारा वैज्ञानिक देतात. मरमाराच्या समुद्रानजीकचा हा भाग आहे. याच्या मुखाशी तुर्कीतलं सगळ्यात मोठं शहर इस्तंबूल वसलं आहे. त्याला बोस्फारोस का मोती म्हटलं जातं.

या वर्षी 6 फेब्रुवारीला आलेल्या दोन भूकंपाप्रमाणे 1999चे दोन भूकंप फॉल्ट लाईनमधील टक्कर आणि भगदाड पडल्यामुळे झाला होता. त्यामुळेच हे भूकंप आणखी विनाशकारी ठरले.

काही भागांमध्ये भूकंपाची तीव्रता 10च्या वर नोंदली गेली. भूकंपाची तीव्रता मोजणाऱ्या मरकली स्केलवर 1 ते 12 आकडे असतात. यावर 10 तीव्रतेचा भूकंप अतिशय गंभीर मानला जातो.

24 वर्षांपूर्वी आलेल्या भूकंपामुळे मरमारा समुद्रात सुनामी आली होती. त्यावेळी समुद्राच्या लाटा अडीच मीटर उंचीपर्यंत उसळल्या होत्या.

त्यावेळी तेल उत्खनन करणाऱ्या एका कारखान्यात आग लागली होती. ती आग आटोक्यात आणायला पाच दिवस लागले होते. या आगीमुळे त्या भागातल्या लोकांना दूर न्यावं लागलं. ज्या ठिकाणी या लोकांना नेण्यात आलं तिथे भूकंपाचा फटका बसलेल्या परिसरात बचावकार्य सुरू होतं.

त्या भूकंपाने तुर्कीतली राजकीय समीकरणं बदलली एवढंच नाही तर इमारतींच्या उभारणीतही बदल झाला. इमारत बांधणीचे नियम आणखी कठोर झाले. इमारतींची बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी अर्थक्वेक लिडरिटी टॅक्स लागू करण्यात आला.

मग असं काय झालं फेब्रुवारीत आलेल्या भूकंपाने एवढं नुकसान का झालं? एवढं नुकसान आधी झालं नव्हतं.

6 फेब्रुवारीला आलेल्या भूकंपानंतर अनेक प्रश्न विचारले जात आहेत. एवढं मोठं नुकसान टाळता आलं असतं का? अर्दोआन सरकार नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी आणखी काय उपाययोजना करु शकलं असतं?

राष्ट्राध्यक्ष अर्दोआन यांनीही सरकारच्या रिस्पॉन्स मध्ये काही त्रुटी राहिल्याचं सांगितलं.

भूकंपाचा फटका बसलेल्या भागांना त्यांनी भेट दिली. सरकारच्या चुका मान्य करतानाच त्यांनी अशा दुर्घटनेचं खापर त्यांनी नशीबावरही ढकललं.

अर्दोआन म्हणाले, अशा दुर्घटना सातत्याने होत आहेत. नशिबाचाच खेळ आहे.

काही दिवसांपूर्वी आलेल्या भूकंपात आतापर्यंत 42 हजार नागरिकांनी जीव गमावला आहे. अजूनही काही मृतदेह ढिगाऱ्याखाली असण्याची शक्यता बचावयंत्रणांनी व्यक्त केली आहे. भूकंपाचा फटका बसलेल्या अनेक भागांमध्ये बचाव तुकडी दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी पोहोचली आहे.

जगातल्या अन्य देशांच्या तुलनेत तुर्कीकडे भूकंपापासून बचाव करण्यासाठीची यंत्रणा उपलब्ध आहे. तुर्कीतील व्हॉलेंटेरी रेस्क्यू ग्रुपचे संस्थापकांच्या मते यावेळी त्यांच्या कामात राजकारणही आड आलं.

तुर्कीच्या लष्कराची भूमिका

1999मधल्या भूकंपानंतर सुटकेचं आणि बचावाचं कार्य लष्कराने हाती घेतलं आहे. बीबीसीशी बोलताना खोज आणि बचाव कार्य करणाऱ्या AKUTचे संचालक नसुह माहरुकी यांनी सांगितलं की, "संपूर्ण जगात लष्कर सगळ्यात सुसूत्र, शिस्तबद्ध आणि संघटित असतं. त्यांच्याकडे खूप वेगवेगळ्या प्रकारची संसाधनं असतात. संकट काळात त्यांच्याकडे बचाव कार्याची जबाबदारी सोपवली जाते".

पण तुर्कीत काही दिवसांपूर्वी झालेल्या भूकंपानंतर बचावाची जबाबदारी तुर्कीतल्या सिव्हिल डिझास्टर ऑथॅरिटीकडे सोपवण्यात आली आहे. या संघटनेसाठी 10 ते 15 हजार माणसं काम करतात.

याव्यतिरिक्त स्वयंसेवी संस्था AKUT सारख्या संघटनांची मदत घेण्यात आली. त्यांच्याकडे 3000 स्वंयसेवक आहेत. तेही डिझास्टर ऑथॅरिटीच्या बरोबरीने काम करत आहेत.

माहरुकी सांगतात की, "1999च्या तुलनेत या भूकंपाने झालेलं नुकसानाची व्याप्ती प्रचंड आहे. तरीही लष्कराला बचाव कार्यापासून दूर ठेवण्यात आलं आहे. लष्कर सरकारच्या आदेशाची प्रतीक्षा करत होतं. त्यामुळे अडकलेल्या लोकांचा शोध घेणे आणि त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करणे यासाठी बराच वेळ गेला".

आधीच इशारा देण्यात आला होता

तुर्कीचे वैज्ञानिक अनेक वर्ष मोठ्या भूकंपाचा इशारा देत आहेत. यापैकी काहींनी भूकंप एनाटोलियन फॉल्ट लाईनच्या पूर्व भागात येईल असंही वर्तवलं होतं. आतापर्यंतचे बहुतांश भूकंप फॉल्ट लाईनच्या उत्तरेकडच्या भागात आले आहेत.

असाच एक भूकंप जानेवारी 2020 मध्ये एलाजिग शहरात आला होता. यानंतर इस्तंबूल टेक्निकल युनिव्हर्सिटीतील जिऑलॉजिकल इंजिनिअर नैसी गौरुर यांनी 6 फेब्रुवारीच्या भूकंपाचं अनुमान वर्तवलं होतं.

नैसी यांनी सांगितलं होतं की दुसरा भूकंप उत्तर अदियामान आणि कहरामनराश या शहरांना मोठा फटका बसेल. या दोन भागात फेब्रुवारीत झालेल्या भूकंपामुळे सगळ्यात जास्त नुकसान झालं आहे.

बीबीसी प्रतिनिधीशी बोलताना नैसी यांनी सांगितलं की, "मी स्थानिक सरकार आणि गव्हर्नरांच्या बरोबरीने केंद्र सरकारला यासंदर्भात सूचित केलं होतं. अशी उपाययोजना करायला हवी जेणेकरुन या शहरांचं कमीत कमी नुकसान होईल. भूकंपाला आपण रोखू शकत नाही, पण त्यामुळे होणारं नुकसान आपण टाळू शकतो किंवा कमी करू शकतो".

तुर्कीतले भूकंपाचे प्राध्यापक मुस्तफा एर्दिक यांना वाटतं या भूकंपात हजारो लोकांचा जीव गेला आहे. इमारती बांधताना नियमांकडे केलेला कानाडोळा हे यामागचं कारण आहे. यासाठी त्यांनी बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणाला कारणीभूत धरलं.

प्राध्यापक मुस्तफा यांनी बीबीसीला सांगितलं की, "हे सगळ्यात जास्त नुकसान आहे. पण हे टाळता आलं असतं. इमारतींचे मजले पॅनकेकप्रमाणे एकमेकांवर येऊन आदळले. यामुळेच जास्त लोकांचा जीव गेला. आपण हे रोखू शकलो असतो".

एका निष्कर्षानुसार फक्त तुर्कीतच 40 हजारहून अधिक लोकांचा भूकंपात मृत्यू झाला आहे.

तुर्कीत इमारत बांधणी संदर्भातील नियम 2018 मध्ये आणखी कठोर करण्यात आले. याच्या अंतर्गत उच्च दर्जाचं काँक्रिट आणि स्टीलचे रॉड वापरण्याचे निर्देश देण्यात आले होते. जेणेकरुन इमारतींचे पिलर्स आणि बीम भूकंपाचे धक्के सहन करु शकतील.

प्राध्यापक मुस्तफा यांच्या मते, "इमारती बांधताना या नियमाचं कसोशीने पालन झालं असतं तर परिस्थिती वेगळी दिसली असती. इमारतींचे खांब निखळून नुकसान कमी झालं असतं. घरांचे बीम क्षतिग्रस्त होण्याऐवजी इमारतींचे खांब कोसळून लोकांचे जीव गेले".

तुर्कीतल्या भूकंप कराचं रहस्य

तुर्कीतले अनेक लोक विचारत आहेत की 1999 भूकंपानंतर अर्थक्वेक सॉलिडॅरिटी टॅक्सच्या माध्यमातून जी मोठी रक्कम वसूल करण्यात आली त्याचं काय झालं?

त्या कराअंतर्गत सरकारच्या तिजोरीत आतापर्यंत 4.6 अब्ज डॉलर जमा झाले आहेत. या निधीचा वापर भूकंपविरोधक इमारतींच्या उभारणीसाठी करणं अपेक्षित होतं. पण या निधीचा विनियोग कुठे करण्यात आला यासंदर्भात सरकारने काहीही जाहीर केलं नाही.

शहरांच्या विकासात योगदान असलेली मंडळी भूकंपाचा संभाव्य इशारा देण्यात आलेल्या परिसरात इमारती बांधताना नियमांकडे करण्यात आलेलं दुर्लक्ष याला जबाबदार धरतात. 2018 मध्ये नियम कठोर झाला. त्या नियमाचं पालन न करणाऱ्या लोकांना दंड ठोठावून सोडून देण्यात आलं. यामुळेच 60 लाख हून अधिक इमारतींमध्ये त्रुटी असूनही त्यात कोणताही बदल करण्यात आला नाही.

इस्तंबूल युनिव्हर्सिटीचे जाणकार पेलिन पिलार सांगतात, "दंडाच्या माध्यमातून सरकारला कोट्यवधी रुपयांचा निधी मिळाला. या भूकंपात जेवढ्या इमारती कोसळल्या आहेत त्यामध्ये दंड भरून सोडून देण्यात आलेल्या लोकांच्या सर्वाधिक आहेत.

ते पुढे सांगतात, ज्या भागात भूकंपामुळे सर्वाधिक नुकसान झालं आहे तिथून इमारत बांधताना नियमांकडे दुर्लक्ष माफ करण्यासाठी एक लाखाहून जास्त अर्ज आले आहेत. या परिसरात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर बांधकामंही उभी राहिली आहेत".

फूट पाडणारं राजकारण

इमारत बांधणी गेल्या दोन दशकांपासून तुर्कीच्या अर्थव्यवस्थेसाठी इंजिन ठरलं आहे. गेल्या आठवड्यात भूकंपाने पीडित लोकांना राष्ट्राध्यक्ष अर्दोआन यांनी आश्वासन दिलं की वर्षभरात पुनर्निर्माण होईल.

भूकंपाचा फटका बसलेल्या बहुतांश शहरांमध्ये अर्दोआन यांच्या पक्षाचंच सरकार आहे.

राजकीयदृष्ट्या तुर्की हा ध्रुवीकरण असलेला देश आहे. गेल्या दोन दशकांपासून अर्दोआन यांचंच सरकार सत्तेत आहे. ते सुरुवातीला पंतप्रधान होते, मग राष्ट्राध्यक्ष झाले.

तुर्कीत होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मे महिन्यापासून प्रचार सुरू होणार होता. भूकंपामुळे आता तो सुरु होणार नाही. अर्दोआन यांना खात्री होती की लोकांना एकजूट करण्यात ते यशस्वी होतील. पण सद्य परिस्थितीत ते शक्य झालं नाही.

भूकंपानंतर सरकारने सगळ्यात पहिलं काम केलं ते म्हणजे ट्वीटरला हंगामी तत्वावर बंद करण्यात आलं. जर ते सुरु ठेवलं असतं तर बचाव तुकडीला ढिगाऱ्याखाली जिवंत असलेल्या लोकांना शोधून काढण्यात उपयोगी ठरलं असतं.

पण सरकारने ट्वीटर ब्लॉक करण्याचं असं कारण दिलं की लोक चुकीच्या बातम्या, अफवा पसरवण्यासाठी त्याचा वापर करतात. यासंदर्भात पोलिसांनी राजकीय व्यक्तीला अटक केली. या व्यक्तीने भूकंपानंतर सरकारच्या ढिसाळ प्रतिसादासाठी ट्वीटरच्या माध्यमातून टीका केली होती.

जर्मनीत तुर्कीतील निर्वासित पत्रकार डेनिज युसेल यांनी लिहिलं की, "1999नंतर भूकंपानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीने अर्दोआन यांची सत्ता आली. या भूकंपाने झालेल्या नुकसानीचा परिणाम अर्दोआन यांच्या भवितव्यावर होईल. ही भूमिका कशी होईल आणि कोणाच्या पक्षाच्या बाजूने असेल हे सांगता येत नाही".

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)