गौतम अदानी : हिंडनबर्ग रिसर्चचे नेट अँडरसन हिरो की व्हिलन?

    • Author, विनीत खरे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी, दिल्ली

नेट अँडरसनने 2017 साली हिंडेनबर्ग रिसर्चची स्थापना केली होती. तेव्हापासून आतापर्यंत हिंडेनबर्गने बऱ्याच अमेरिकन कंपन्यांना टार्गेट केलंय.

कंपनीचं नाव नाझी जर्मनीच्या एका अयशस्वी स्पेस प्रोजेक्टवरून ठेवण्यात आलंय. हिंडनबर्गने अदानी समूहाचा जो रिपोर्ट प्रसिद्ध केला तो आतापर्यंतचा 19वा रिपोर्ट होता.

हिंडनबर्गने केलेल्या दाव्यानुसार अदानी समूहाने त्यांच्या 88 पैकी 62 प्रश्नांची उत्तरे दिलेली नाहीत.

हिंडनबर्गसारख्या शॉर्ट सेलिंग कंपन्या त्यांच्या रिसर्चच्या माध्यमातून गुंतवणूकदारांचे पैसे बुडण्यापासून वाचवतात, असा दावा स्वतः कंपनी करते. रिसर्चच्या माध्यमातून शेअर बाजाराला धक्का द्यायचा आणि स्वतःचे खिसे भरायचे काम कंपनी करते? असाही प्रश्न उपस्थित होतो.

तसं बघायला गेलं तर अमेरिकेला हा वाद नवा नाहीये. तरीही हिंडनबर्गसारख्या कंपन्या कायदेशीररित्या काम करतच आहेत. या कंपनीचे हितचिंतक तर आहेतच, पण दुसऱ्या बाजूला या कंपनीला शत्रूंची देखील कमतरता नाहीये.

हिंडनबर्गने त्यांच्या रिपोर्टला नाव दिलं होतं, 'कॉर्पोरेट इतिहासातील सर्वात मोठी फसवणूक'. पण अदानी समुहाने हा रिपोर्ट फेटाळून लावला होता.

हिंडनबर्गचे टीकाकार या रिपोर्टवर टीका करताना म्हणतात की, 'वेगाने प्रगती करणाऱ्या भारताला मागे खेचण्याचा हा एक प्रयत्न ' आहे.

सर्वसाधारणपणे शेअरची किंमत वाढली की पैसे कमावता येतात. पण शॉर्ट सेलिंगमध्ये दर पाडून पैसे कमावले जातात. यात एखादा स्पेसिफिक स्टॉक घसरणार असल्याचा अंदाज लावला जातो.

हिंडनबर्ग सारख्या शॉर्ट सेलर कंपन्या काही कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतीत घट होणार असल्याचा अंदाज लावतात. नंतर त्यांचे रिपोर्ट्स तयार करून त्यांना लक्ष्य करतात.

हे रिपोर्ट्स बनवण्यासाठी अशा कंपन्यांची निवड केली जाते ज्यांच्या शेअर्सची किंमत वास्तविक मूल्यापेक्षा खूप जास्त आहे किंवा ती कंपनी आपल्या शेअरधारकांची फसवणूक करते आहे.

अॅक्टिव्हिस्ट शॉर्ट सेलर कोणतं काम करतात?

नेट अँडरसन यांनी 2017 मध्ये हिंडनबर्ग रिसर्चची स्थापना केली होती.

अमेरिकेतील एका शॉर्ट सेलिंग कंपनी स्कॉर्पियन कॅपिटलचे चीफ इन्व्हेस्टमेंट ऑफिसर कीर कॅलन यांच्या मते, हिंडनबर्ग ही एक प्रतिष्ठित संस्था आहे आणि त्यांचे रिसर्च विश्वसनीय मानले जाते.

त्यांच्या रिपोर्ट्समुळे अमेरिकेतील भ्रष्ट कंपन्यांवर अनेकदा कारवाई झाली आहे.

न्यूयॉर्क शहरातील शॉर्ट सेलिंग न्यूज लेटर "द बीयर केव्ह" चे सर्वेसर्वा एडविन डोर्सी सांगतात की, हिंडनबर्ग रिसर्च सारख्या अॅक्टिव्हिस्ट शॉर्ट सेलिंग फर्मने रिपोर्ट पब्लिश करण्यामागे दोन मुख्य कारणं आहेत. यातलं पहिलं म्हणजे चुकीची कामं समोर आणून मोठी कमाई पदरात पाडणे आणि दुसरं म्हणजे न्याय आणि जबाबदारी सुनिश्चित करणे.

एडविन डोर्सी पुढे सांगतात की, "काही लोक शेअरहोल्डर्सची फसवणूक करून त्यांच्या पैशांवर श्रीमंत होताना बघून वाईट वाटतं. अॅक्टिव्हिस्ट शॉर्ट सेलिंगचा हा रिपोर्ट एक प्रकारची शोध पत्रकरिताच म्हणता येईल. पण मग नफ्याचा हेतू थोडा वेगळा आहे. मला नेट आणि हिंडनबर्गचे रिपोर्ट्स खात्रीलायक वाटतात. "

अॅक्टिव्हिस्ट शॉर्ट सेलर रिपोर्ट्स सोबतच सोशल मीडियाचाही मोठ्या प्रमाणावर वापर करतात. पण सामान्य गुंतवणूकदारांना अॅक्टिव्हिस्ट शॉर्ट सेलिंग फर्म्स आवडत नाहीत कारण किंमती घसरल्या की त्यांच्या गुंतवणुकीवर वाईट परिणाम होतो.

त्यामुळे अॅक्टिव्हिस्ट शॉर्ट सेलर बऱ्याच कंपन्यांचा रोष ओढवून घेतात. 2021 मध्ये एलॉन मस्कने शॉर्ट सेलिंगला एकप्रकारचा घोटाळा असल्याचं म्हटलं होतं.

शॉर्ट सेलिंग कंपनी स्कॉर्पियन कॅपिटलचे चीफ इन्वेस्टमेंट ऑफिसर कीर कॅलन यांनी अदानी प्रकरणाला भारतातील 'एन्रॉन मूव्हमेंट' असल्याचं म्हटलंय.

ते म्हणतात, "अदानी आणि एन्रॉन या दोन्ही पायाभूत सुविधा कंपन्या आहेत ज्यांचे राजकीय संबंध देखील तितकेच मजबूत आहेत."

2001 मध्ये एन्रॉन कंपनीला प्रचंड आर्थिक नुकसान सोसावं लागलं होतं, त्यामुळे कंपनी दिवाळखोरीत निघाली होती. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज बुश आणि एन्रॉनचे प्रमुख केन ले यांचे घनिष्ठ संबंध होते.

अदानी यांची आर्थिक स्थिती एनरॉन सारखी झालेली नाही. मात्र केन ले यांच्यावर सरकारच्या अतीजवळ असल्याचे जसे आरोप झाले होते तसेच आरोप अदानी यांच्यावर देखील होत आहेत.

कॅलन सांगतात, "मजबूत आणि चोख व्यवहार असणाऱ्या कंपन्यांना शॉर्ट सेलर्सच्या रिपोर्ट्सने काही फरक पडत नाही. जर एखाद्या शॉर्ट सेलरने गुगल, फेसबुक, मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्यांविषयी लिहिलं तर लोक त्यांना हसतील आणि या कंपन्यांच्या स्टॉकवरही काहीच परिणाम होणार नाही."

हिंडनबर्गचे प्रमुख नेट अँडरसन यांच्याबद्दल ते सांगतात की, "त्याच्याकडे प्रचंड क्रेडेन्शियल्स आहेत. त्यांच्या रिसर्चची एक विश्वासार्हता आहे, त्यांचा मोठा प्रभाव आहे."

अमेरिकेतील कोलंबिया लॉ स्कूलमधील प्रोफेसर जोशुआ मिट्स यांनी मात्र शॉर्ट सेलिंगवर टीका करणारा 'शॉर्ट अँड डिस्टॉर्ट' हा पेपर लिहिलाय.

जोशुआ सांगतात, "वॉल स्ट्रीटवरील बरेच लोक नॅट अँडरसनचा आदर करतात. कारण त्यांना असं वाटतं की, अँडरसन स्वतःबद्दलही उघडपणे बोलतात. पण ते जे काही उघडपणे बोलतात ते खरं असायलाच हवं असं गरजेचं नाही. काही लोकांनी त्यांच्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत, पण त्यांनी अलिकडच्या वर्षांत अमेरिकेतील सर्वात मोठी फसवणूक उघड केली आहे."

अमेरिकेच्या न्याय विभागाला सल्ला देणारे जोशुआ मिट्स पुढे सांगतात, "आम्ही म्हणतो की, कंपन्यांनी आपला कारभार पारदर्शक ठेवला पाहिजे. कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांच्या पैशाचं काय करतात ते त्यांनी सांगायला हवं. अगदी त्याचप्रमाणे शॉर्ट सेलरने देखील पारदर्शक कारभार करायला हवा आणि थेट माहिती द्यायला हवी."

हिंडनबर्गचा सर्वात प्रसिद्ध रिपोर्ट...

हिंडनबर्गच्या या रिपोर्टचं टायमिंग किंवा त्यांना झालेला फायदा या सगळ्या गोष्टींवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. आम्ही नेट अँडरसन यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण आम्हाला कोणतंही उत्तर मिळालं नाही.

हिंडनबर्गच्या वेबसाइटनुसार, अदानी समूह धरून आतापर्यंत एकूण 19 रिपोर्ट पब्लिश करण्यात आले आहेत. आणि त्यातला सर्वात प्रसिद्ध रिपोर्ट सप्टेंबर 2020 मध्ये प्रसिद्ध झाला होता. या रिपोर्ट मधून अमेरिकन इलेक्ट्रिक ऑटो कंपनी निकोलाचा गैव्यवहार समोर आणला होता.

30 अब्ज डॉलरचं भागभांडवल असलेल्या आणि 2015 मध्ये स्थापन झालेल्या निकोला कंपनीने जगाला झीरो कार्बन उत्सर्जनाचं स्वप्न दाखवलं होतं. जानेवारी 2018 मध्ये कंपनीने बॅटरीवर चालणाऱ्या 'निकोला वन सेमी-ट्रक'चा व्हिडिओ प्रसिद्ध केला होता.

हिंडेनबर्गने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितलं होतं की, प्रत्यक्षात हा ट्रक डोंगराच्या वरच्या भागात नेण्यात आला होता त्यानंतर त्याला उतारावर हा व्हिडिओ शूट करण्यात आला.

पण निकोला कंपनीने हे आरोप फेटाळले होते. पण नंतरच्या काळात याच रिपोर्टमुळे कंपनीचे प्रमुख ट्रेव्हर मिल्टन यांना राजीनामा द्यावा लागला होता. हिंडनबर्गचा रिपोर्ट पब्लिश होताच कंपनीचे शेअर्स सुमारे 24 टक्क्यांनी घसरले. निकोला कंपनीला 12 कोटी डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला.

2021 मध्ये मिल्टनने फसवणूक केल्याचा आरोप सिद्ध झाला.

आता अदानी समुहाविषयी बोलायचं झाल्यास, समुहाने हिंडेनबर्गचे सर्व आरोप फेटाळले आहेत. यावर हिंडेनबर्गने म्हटलंय की, अदानी समुहाने त्यांच्या 88 पैकी 62 प्रश्नांची उत्तरे अजून दिलेली नाहीत.

ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टनुसार, हिंडनबर्गसह सुमारे 30 शॉर्ट-सेलिंग कंपन्या अमेरिकेच्या न्याय विभागाच्या रडारवर आल्या आहेत. मात्र यातल्या कोणत्याही कंपन्यांवर आरोप लावण्यात आलेले नाहीत.

हिंडनबर्गने अदानी समूहाचीच निवड का केली?

न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर अस्वत दामोदरन यांनी एका ब्लॉगमध्ये म्हटलंय की, "हा रिपोर्ट आल्यानंतर मला थोडं आश्चर्य वाटलं. कारण हिंडनबर्गने आजवर लहान लहान कंपन्यांना टार्गेट केलंय. या कंपन्यांविषयी फारशी माहिती उपलब्ध नव्हती. पण त्यामानाने अदानी ही एक मोठी कंपनी आहे आणि त्यांची चर्चा सुद्धा मोठया प्रमाणावर होते."

हिंडनबर्गचे जुने रिपोर्ट पाहिले तर ते अमेरिकन आणि चिनी कंपन्यांचे आहेत. मग 19 व्या रिपोर्टसाठी त्यांनी अदानींनची निवड का केली?

यावर एडविन डोर्सी सांगतात की, हिंडेनबर्गचं लक्ष अदानी समूहाकडे कसं गेलं माहीत नाही. पण शॉर्ट सेलरना बरेच निनावी ईमेल येत असतात, यातून त्यांना कंपन्यांविषयी टीप मिळत असते.

ते सांगतात, "बर्‍याच वेळा जेव्हा कंपनीचा स्टॉक वेगाने वर जातो, तेव्हा या शॉर्ट सेलरचं लक्ष त्यांच्याकडे जातं."

एप्रिल 2022 मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका मीडिया रिपोर्टनुसार, मागच्या दोन वर्षात कोविडची साथ असून देखील अदानीच्या शेअर्समध्ये 18-20 पट वाढ झाली होती .

यावर स्कॉर्पियन कॅपिटलचे कीर कॅलॉन सांगतात, "त्यामुळे अदानी टार्गेटवर होते. मागच्या अनेक वर्षात अदानी समुहाने फ्रॉड केल्याचे आरोप झालेत. काही वर्षांपूर्वी आम्ही शॉर्ट सेलर म्हणून यावर स्वतंत्र रिसर्च केला होता. पण नंतर आम्ही तो रिसर्च मध्येच सोडला कारण त्यात सांगण्यासारखा कोणत्याच गोष्टी नव्हत्या. सर्वच गोष्टी जगजाहीर होत्या."

अमेरिकेत शॉर्ट सेलर्सच्या चौकशीत वाढ...

अदानी समूहाने अशा फ्रॉडचे आरोप वेळोवेळी नाकारले आहेत.

कोलंबिया लॉ स्कूलचे प्रोफेसर जोशुआ मिट्स सांगतात की, अमेरिकेतील नियामक संस्थांनी या अॅक्टिव्हिस्ट शॉर्ट सेलर्सच्या चौकशीचे फास आवळले आहेत. त्यामुळे या सेलर्सने विकसित नसलेल्या बाजारपेठांकडे आपलं लक्ष वळवलं आहे.

ते पुढे सांगतात की, "जर मार्केट रेग्युलेटर अमेरिकेपेक्षा पाच किंवा दहा वर्षे मागे असेल किंवा स्थानिक रेग्युलेटर फारसे स्मार्ट नसतील तर शॉर्ट सेलर्सची चांदी असते. मागच्या दशकापासून हे शॉर्ट सेलर मोठ्या प्रमाणावर ग्लोबल व्हायला लागले आहेत."

न्यूयॉर्कमधील "द बीयर केव्ह"चे एडविन डोर्सी सांगतात की, सिट्रॉन रिसर्च ही अमेरिकेतील पहिली मोठी कंपनी होती आणि तिची स्थापना अँड्र्यू लेफ्टने केली होती."

वॉल स्ट्रीट जर्नलच्या एका आकडेवारीनुसार, 2001 ते 2014 पर्यंत सिट्रॉनने 111 शॉर्ट सेलर रिपोर्ट्स पब्लिश केले होते. सिट्रॉनचा रिपोर्ट पब्लिश झाल्यानंतर टार्गेट कंपनीच्या शेअर्सची किंमत सरासरी 42 टक्क्यांनी घसरायची.

2013 मध्ये सिट्रॉनने टेस्लाबद्दल सांगितलं होतं की, या कंपनीच्या शेअर्सची किंमत थोडी जास्तच आहे आणि इलेक्ट्रिक कारची क्रेझ आहे. पण त्यानंतर टेस्लाच्या शेअरची किंमत आणि कारची विक्री अशा दोन्ही गोष्टी वाढल्या.

या शॉर्ट सेलिंगच्या व्यवसायातील आणखी एक मोठं नाव म्हणजे कॉर्सन ब्लॉक. अमेरिकन बाजारांवर नियंत्रण ठेवणाऱ्या एसईसी (SEC) या संस्थेच्या अधिकाऱ्याने कॉर्सन ब्लॉकविषयी सांगितलं होतं की, कॉर्सन ब्लॉकने फसवणुकीच्या घटना शोधून काढल्या होत्या आणि गुंतवणूकदारांचे पैसे वाचवले होते.

शॉर्ट सेलर्स क्लबचे नवे स्टार नेट अँडरसन यांनी काही काळ इस्रायलमध्ये सुध्दा व्यतीत केला आहे. अमेरिकन मीडियाने आता त्यांना 'जायंट किलर' म्हणायला सुरुवात केली आहे.

एडविन डोर्सी यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेत मागच्या 20-25 वर्षांपासून ऍक्टिव्हिस्ट शॉर्ट सेलिंग सुरू आहे. आणि यात काम करणाऱ्या सुमारे 20 मोठ्या कंपन्या आहेत.

अॅक्टिव्हिस्ट शॉर्ट सेलिंगवर आलेल्या एका रिपोर्टनुसार, 2022 मध्ये 113 शॉर्ट सेलिंग कॅम्पेन करण्यात आले. यातलं सर्वात यशस्वी कॅम्पेन हिंडेनबर्गचं होतं.

पण अमेरिकन मीडियाच्या म्हणण्यानुसार, मोठमोठ्या कंपन्यांना ताळ्यावर आणणाऱ्या या शॉर्ट सेलर्स कंपन्यांवर अमेरिकन कायदा नजर ठेवून आहे.

अमेरिकन बाजार नियंत्रित करणाऱ्या एसईसीने 2018 मध्ये एका हेज फंड कंपनीवर कारवाई केली होती. पण नंतर त्यांना नुकसानभरपाई द्यावी लागली होती.

अमेरिकेतील कोलंबिया लॉ स्कूलचे प्रोफेसर जोशुआ मिट्स सांगतात, "जर काहींची चौकशी सुरु आहे तर याचा अर्थ असा नाही की मार्केटमधल्या प्रत्येकाची चौकशी सुरू आहे."

ते सांगतात, "जर भारतीय सिक्युरिटीज रेग्युलेटर्सना याबद्दल चिंता असेल तर अमेरिका नेमकी काय पावलं उचलते आहे हे त्यांनी पाहायला हवं."

हिंडनबर्गने दिलेलं आव्हान...

फायनान्शिअल टाईम्समधील एका वृत्तानुसार, गौतम अदानी यांनी हिंडनबर्गविरुद्धच्या कायदेशीर लढाईसाठी एक मोठी आणि महागडी अमेरिकन लॉ फर्म निवडली आहे.

याआधी एका निवेदनात अदानी कायदेशीर मार्गाचा अवलंब करणार असल्याचं बोलले होते. तर हिंडनबर्गने म्हटलं होतं की, या कायदेशीर प्रक्रियेदरम्यान आम्ही सुद्धा कागदपत्रांची मागणी करू.

तज्ञांच्या मते, शॉर्ट सेलर्स ज्या कंपन्यांना टार्गेट करतात त्या बऱ्याचदा मानहानीचा दावा दाखल करण्यासाठी कोर्टात जातात. पण कोर्टात केस सिद्ध करणं आव्हानात्मक असतं.

यामागचं कारण म्हणजे अमेरिकेत अभिव्यक्ती स्वातंत्र्याला मिळालेलं कायदेशीर संरक्षण.

अमेरिकेतील कोलंबिया लॉ स्कूलचे प्रोफेसर जोशुआ मिट्स यांच्या मते, "अमेरिकन न्यायालयांमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याला महत्व दिलं जातं. आणि खूप साऱ्या शॉर्ट सेलर्सने त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली केसेस जिंकल्या आहेत. भले ही ते त्यांच्या रिपोर्टमध्ये काय लिहितात, काय मत व्यक्त करतात, त्यांचा रिपोर्ट चुकीचा असला तरी ते महत्वाचं न ठरता अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्यांच्यासाठी कवचकुंडलांप्रमाणे काम करतं."

जोशुआ मिट्स पुढे असंही सांगतात की "जर शॉर्ट सेलर्स त्यांच्या कामात पारदर्शक नसतील तर मात्र त्यांच्यासाठी कायद्याचं बर्डन येऊ शकतं."

भारतात शॉर्ट सेलिंगची परिस्थिती काय आहे?

अशोका युनिव्हर्सिटीचे व्हिजिटिंग प्रोफेसर गुरबचन सिंह यांच्या म्हणण्यानुसार, भारतात शॉर्ट सेलिंग केलं जातं पण मोठ्या प्रमाणावर नाही.

सेबीच्या शॉर्ट पेपरमध्ये शॉर्ट सेलिंगच्या संभाव्य फसवणुकीबद्दल माहिती देण्यात आली आहे. सोबतच 1998 आणि 2011 मध्ये यावर कारवाई केल्याचा उल्लेखही करण्यात आलाय.

तज्ञ सांगतात की, ज्या पद्धतीने हिंडनबर्गचा रिपोर्ट लिहिला आहे तसाच रिपोर्ट भारतात लिहिणं आव्हानात्मक आहे.

सेबीमध्ये रजिस्टर्ड असलेले रिसर्च विश्लेषक नितीन मंगल सांगतात, "आमच्यासाठी टीका सहन करणं अवघड आहे. आम्ही टीका सकारात्मकपणे घेत नाही. लोक माझ्या रिसर्चवर खूप टीका करतात, पण मला त्याची पर्वा नाही."

मंगल यांच्या मते, भारतात कायदेशीर कारणांमुळे अशा रिसर्च कंपन्या स्थापन होत नाहीत.

ते सांगतात, "भारतातील कंपन्या तुमच्यावर कायदेशीर कारवाई करू शकतात. तुमच्यावर फौजदारी खटले दाखल करू शकतात. पण हीच प्रक्रिया अमेरिकेत खूप वेगळ्या पद्धतीने होते."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)