आता कॅनडाच्या आकाशात दिसली 'संशयास्पद वस्तू', अमेरिका म्हणते...

फोटो स्रोत, Getty Images
- Author, थॉमस मॅकिंटॉश
- Role, बीबीसी प्रतिनिधी
अमेरिकेनंतर आता कॅनडाच्या आकाशातही एक संशयास्पद वस्तू उडताना दिसली. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या आदेशानंतर उत्तर अमेरिकेच्या हवाई क्षेत्रात दिसणारी ही संशयास्पद वस्तू जमिनीवर पाडण्यात आली आहे.
जस्टिन ट्रूडो यांनी सांगितलं की, "या संशयास्पद वस्तूने कॅनडाच्या हवाई क्षेत्राचं उल्लंघन केलं असून ही संशयास्पद वस्तू कॅनडामधील युकोनच्यावर उडत होती."
या वस्तूचा मागोवा घेण्यासाठी अमेरिकेसहित कॅनडाची लढाऊ विमानंदेखील कामाला लागली होती. ट्रूडो यांनी सांगितलं की, अमेरिकेच्या F-22 या लढाऊ विमानाने या संशयास्पद वस्तूवर हल्ला केला आणि ती खाली पाडली.
चिनी फुग्यानंतर सापडल्या संशयास्पद वस्तू
मागच्या आठवड्यात उत्तर अमेरिकेच्या आकाशात एक संशयास्पद वस्तू आढळली होती. अशा वस्तू नष्ट करण्याची ही तिसरी वेळ आहे.
मागच्या आठवड्यातील शनिवारी अमेरिकन सैन्याने दक्षिण कॅरोलिनाच्या अटलांटिक किनार्याजवळ एक चिनी फुगा नष्ट केला होता.
त्यानंतर शुक्रवारी अलास्काजवळ एका छोट्या कारच्या आकाराची अज्ञात वस्तू पाडण्यात आली होती.
या वस्तूच्या अवशेषांचा शोध घेण्यासाठी ब्यूफोर्ट समुद्राच्या गोठलेल्या पाण्याभोवती हेलिकॉप्टर आणि ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट तैनात करण्यात आले होते.

फोटो स्रोत, Reuters
आता या घटनांनंतर कॅनडाने देखील एक अज्ञात वस्तू खाली पडल्याची माहिती दिली आहे. कॅनडाच्या सैन्याकडून या वस्तूच्या अवशेषांचा शोध घेणं सुरू आहे.
कॅनडाने काय सांगितलं?
कॅनडाच्या संरक्षण मंत्री अनिता आनंद यांनी सांगितलं की, आकाशात दिसणारी ही संशयास्पद वस्तू कॅनडामधील युकोनच्यावर 40 हजार फूट उंचीवर उडत होती. शनिवारी स्थानिक वेळेनुसार दुपारी 3 वाजून 41 वाजता ही वस्तू नष्ट करण्यात आली.
त्या पुढे म्हणाल्या की, "सिलेंडरसारख्या दिसणाऱ्या या वस्तूच्या अवशेषांचा शोध सुरू आहे."
अनिता आनंद म्हणाल्या की, "ही अज्ञात वस्तू अमेरिकेच्या सीमेपासून 100 मैल अंतरावर पाडण्यात आली आहे. या वस्तूमुळे प्रवासी विमानांना धोका निर्माण झाला होता."
गेल्या शनिवारी अमेरिकेने दक्षिण कॅरोलिनाच्या किनाऱ्याजवळ जो फुगा नष्ट केला त्यापेक्षा ही वस्तू खूपच लहान असल्याचं संरक्षण मंत्री अनिता आनंद यांनी सांगितलं. हा फुगा जवळपास 60 मीटर उंच होता.
ट्रुडो यांनी शनिवारी सांगितलं की, आकाशात दिसणारी ही अज्ञात वस्तू पाडण्याचे मी आदेश दिले होते. आणि मी यासंदर्भात अमेरिकेचे राष्ट्रपती जो बाडयन यांच्याशी चर्चा केली आहे.
त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, "मी कॅनडाच्या हवाई हद्दीचं उल्लंघन करणाऱ्या एका अज्ञात वस्तूला हटवण्याचे आदेश दिले होते. नॉर्थ अमेरिकन एरोस्पेस डिफेन्स कमांड नोराडने युकोनच्यावरून उडणारी वस्तू पाडली आहे. अमेरिका आणि कॅनडाने यासाठी एकत्रितपणे काम केलं असून अमेरिकेच्या एफ- 22 ने या वस्तूवर हल्ला करून ती नष्ट केली."
दुसर्या एका ट्वीटमध्ये त्यांनी नोराडचे आभार मानले असून त्यांनी लिहिलंय की, "या विषयावर मी राष्ट्राध्यक्ष बाडयन यांच्याशी चर्चा केली आहे. कॅनडाचं सैन्य आता या वस्तूचे अवशेष ताब्यात घेऊन त्यांचं विश्लेषण करणार आहे."

फोटो स्रोत, Website/U.S. Department of Defense
याआधी नोराडने देखील उत्तर कॅनडाच्या आकाशात खूप उंचावर एक अज्ञात वस्तू टिपली होती. यावर नोराड नजर ठेवून होती. अमेरिकेच्या आणि कॅनडाच्या हवाई क्षेत्राच्या संरक्षणाची जबाबदारी नॉर्थ अमेरिकन एरोस्पेस डिफेन्स कमांडवर आहे.
अमेरिकेच्या व्हाईट हाऊसने म्हटलं होतं की, आम्ही ही वस्तू ट्रॅक करत असून मागच्या 24 तासांपासून आम्ही त्यावर बारकाईने लक्ष ठेऊन आहोत
"मात्र सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेत आणि सैन्याच्या सल्ल्यानुसार, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी ही वस्तू खाली पाडण्याचे आदेश दिले. या वस्तूचे अवशेष गोळा करणं महत्त्वाचं आहे, जेणेकरुन ती वस्तू नेमकी काय आहे, कुठून आली आणि त्यामागचा उद्देश काय होता हे समजू शकेल."
अमेरिकेने काय सांगितलं?
या मिशनविषयी माहिती देताना अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितलं की, या वस्तूवर लक्ष ठेवण्यासाठी F-22 जातीच्या दोन लढाऊ विमानांनी अलास्काच्या अँकरेज येथील एलमेन्ड्रोफ-रिचरसन मिलिटरी बेस येथून उड्डाण केलं. यातील एका लढाऊ विमानाने OIM 9X क्षेपणास्त्र डागलं आणि त्यामुळे ही संशयास्पद वस्तू खाली कोसळली.
त्याचवेळी पेंटागॉनचे प्रवक्ते पॅट रायडर यांनी सांगितलं की, या वस्तूचे अवशेष शोधण्याची जबाबदारी कॅनडाच्या अधिकाऱ्यांवर असून त्यांच्यासोबत एफबीआयही काम करेल.
पण ही अज्ञात वस्तू काय होती हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
याआधी अमेरिकेच्या आकाशात एक चिनी फुगा दिसला होता.
हा फुगा अमेरिकेच्या हद्दीपासून थोडा दूर गेल्यावर दक्षिण कॅरोलिनाच्या समुद्रात पाडण्यात आला
चीनने अमेरिकेच्या या कृतीवर टीका करताना म्हटलंय की, हा मानवरहित फुगा हवामानविषयक माहिती गोळा करत होता. पण रस्ता भटकून तो अमेरिकेच्या दिशेने गेला. पण अमेरिकेचं म्हणणं आहे की, या फुग्यामध्ये सर्व्हेलंस करण्याची क्षमता होती
अमेरिका-चीनचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप
शुक्रवारी उत्तर अमेरिकेच्या आकाशातही एक संशयास्पद वस्तू दिसली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या आदेशानंतर ही वस्तू खाली पाडण्यात आली.

फोटो स्रोत, Reuters
अमेरिकेच्या सैन्याने माहिती देताना सांगितलं की, अलास्का नॅशनल गार्डसोबत मिळून सैन्य या वस्तूच्या अवशेषाचा शोध घेत आहे. ही नेमकी कशी आहे आणि तिची क्षमता काय आहे, याबाबत अधिक माहिती उपलब्ध नसल्याचं सैन्याने सांगितलं होतं.
सैन्याने सांगितलं की, "आर्क्टिकवरील हाडं गोठवणारी थंडी, थंड वारे, बर्फ आणि लहान दिवसांमुळे या कामात अडचणी येत आहेत. तसेच या कामात गुंतलेले जवान सर्व प्रकारची सुरक्षितता बाळगून शोधकार्य करत आहेत."
हा चिनी फुगा खाली पडल्यानंतर अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांनी त्यांच्या चिनी समकक्षांशी स्पेशल क्रायसिस लाइनवरून संपर्क साधला. मात्र चीनच्या संरक्षणमंत्र्यांनी त्यांच्याशी बोलण्यास नकार दिल्याचं अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितलं आहे.
अमेरिका या प्रकरणाचं राजकीय भांडवल करत असल्याचा आरोप चिनी अधिकाऱ्यांनी शुक्रवारी केला.
त्याचवेळी जो बायडन यांनी गुरुवारी दिलेल्या एका मुलाखतीत चीनी फुग्याने मोठं उल्लंघन केलं नसल्याचं सांगितलं होतं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









