You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शी जिनपिंग यांच्या समोर चीनच्या माजी राष्ट्राध्यक्ष हू जिंताओ यांना बैकीतून बाहेर काढलं गेलं
चीनचे माजी राष्ट्राध्यक्ष हू जिंताओ यांना कम्युनिस्ट पक्षाच्या बैठकीतून बाहेर काढण्यात आल्याचं फुटेज समोर आलं आहे. गेल्या आठवड्यात बीजिंगमध्ये कम्युनिस्ट पक्षाचं अधिवेशन झालं. या अधिवेशनातलंच हे फुटेज आहे.
पॉलिट ब्यूरोमधून बाहेर पडलेले सदस्य ली जंशु हे जिंताओ यांच्याकडून एक फाइल घेताना आणि त्यांच्याशी बोलताना या व्हीडिओत दिसतात. त्याच व्हीडिओत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग दुसऱ्या एका व्यक्तीला काहीतरी सांगतात आणि त्यानंतर ती व्यक्ती हू यांना बाहेर जायला सांगते.
या अचानक झालेल्या कृतीमुळे अनेक शंका निर्माण झाल्या. हू यांचा काळ आता मागे पडला असल्याचंच जिनपिंग यांना दाखवून द्यायचं असल्याचं काही लोकांचं म्हणणं आहे. काही लोकांच्या मते हू यांच्या नाजूक प्रकृतीमुळे त्यांना बाहेर जायला सांगितलं गेलं, असू शकतं.
सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने नंतर एक ट्वीट करून स्पष्ट केलं-जिंताओ यांना बाहेर नेण्यात आलं कारण त्यांना बरं वाटत नव्हतं.
अर्थात, ही माहिती चीनमध्ये देण्यात आली नाहीये. ट्विटरच्या वापरावर चीनमध्ये बंदी आहे.
हा सर्व प्रसंग जिनपिंग आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या तिसऱ्या कार्यकाळाची घोषणा करण्याच्या एक दिवस आधी घडला होता. त्यामुळेच हे टायमिंग आणि चीनमधील अपारदर्शक व्यवस्था यांमुळे जगभरात या प्रसंगावरून तर्क वितर्क केले जाता आहेत.
राजकीय ड्रामा?
हा एक जाणूनबुजून केलेला राजकीय ड्रामा होता, असं काही लोकांचं म्हणणं आहे.
हू जिंताओ हे 2003 ते 2013 या काळात चीनचे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांच्या काळात बाहेरच्या जगासाठी चीनचे दरवाजे खुले व्हायला लागले होते. पण जिनपिंग यांचा काळ वेगळा आहे.
हू यांना बाहेर काढण्यात आल्याचं नवीन फुटेज हे सिंगापूरचं चॅनेल न्यूज एशियाने प्रसिद्ध केलं आहे. हे फुटेज पाहिल्यावर जिंताओ यांची प्रकृती ठीक नसल्यामध्ये तथ्य नाही असं नाही. पण मग त्यांच्या समोर ठेवण्यात आलेल्या कागदपत्रांचं काय? त्याच्याशी या घटनेचा काय संबंध होता?
फुटेजमध्ये ली जंशु हे जिंताओ यांना हात देण्यासाठी उभे राहताना दिसतात. मात्र त्यानंतर वांग हूनिंग त्यांना त्यांच्या जागेवर पुन्हा बसायला सांगतात. जिंताओ जिनपिंग यांना काहीतरी सांगतात, ज्याकडे शी जिनपिंग अजिबात लक्ष देत नाहीत आणि मग जिंताओ यांना बाहेर नेलं जातं. आजूबाजूला बसलेले लोक त्यांच्याकडे पाहतही नाहीत.
कम्युनिस्ट पक्षाचं वर्तमानपत्र संडे टाइम्सचे माजी संपादक डेंग युवेन सांगतात की, जिंताओ यांना वाचण्याची परवानगी नाही असे कोणतेही कागदपत्र तिथे असतील असं मला तरी वाटत नाही. अशाप्रकारच्या महत्त्वपूर्ण बैठकीत असं काही घडणं शक्यच नाही. कारण सगळीकडे कॅमेऱ्याची नजर असते.
ते सांगतात, "ही विचित्र गोष्ट होती. त्या फाइलमध्ये नेमकं काय होतं आणि तिथे काय चर्चा झाली याचे पुरावे जोपर्यंत समोर येत नाहीत, तोपर्यंत नेमकं काय घडलं हे कोणालाच कळणार नाही."
ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीच्या वेन-सी सुंग सांगतात की, नवीन फुटेजमधून सगळं काही नीट लक्षात येत नाहीये.
त्या म्हणतात, "चीनमध्ये सगळं काही रीतसर होतं. खासकरून जेव्हा असे हाय प्रोफाईल इव्हेंट असतात. जिनपिंग यांच्या शासन काळात सगळं काही कंट्रोलवर अवलंबून असतं."
अफवा की वस्तुस्थिती?
"जिंताओ यांचा कथितरित्या स्वतःवरचा ताबा सुटणं आणि मग त्यांचं अचानक निघून जाणं विचित्र होतं. त्यामुळेच अफवाही समोर येत आहेत. पण अफवा किंवा शंका-कुशंकांना खरं मानणं योग्य नाही."
मात्र डेंग यांचं म्हणणं आहे की, वरिष्ठ अधिकारी, ज्यामध्ये जिंताओ याचे माजी सेकंड इन कमांड वेन जिआबाओ यांचाही समावेश आहे, ते सर्व जिंताओ यांना बाहेर काढलं जात असताना समोर पाहात होते. हे दुसरीकडे इशारा करत आहे.
ते पुढे सांगतात, " तिथे जे होत होतं, त्याचा परिणाम तिथे बसलेल्या अधिकाऱ्यांवरही होऊ शकतो. जिनपिंग यांच्या ताकदीवर याचा काही परिणाम होत नाही, पण याचा अधिकाऱ्यांवर मनोवैज्ञानिक दबाव पडू शकतो."
गेल्या काही दिवसांत जे झालं ते प्लॅन नसेल आणि केवळ जिंताओ यांच्या तब्येतीमुळे असं केलं गेलं असेल तरीही जिनपिंग यांच्या धोरणांनी आता हे दाखवून दिलंय की माजी राष्ट्राध्यक्ष हे बाहेर पडले आहेत. हू जिंताओ यांची धोरणं आता परत येणार नाहीत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)