अक्षता मूर्ती आणि ऋषी सुनक यांची पहिली भेट कधी आणि कशी झाली?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, बेकी मॉर्टन
- Role, बीबीसी राजकीय प्रतिनिधी
ऋषी सुनक युकेचे पंतप्रधान होताच भारताची लेक अक्षता मूर्ती यांच्याकडे लक्ष केंद्रित झालं आहे. अक्षता मूर्ती या भारतीय उद्योगपती नारायण मूर्ती यांच्या कन्या.
आयटी क्षेत्रातील अग्रगण्य उद्योगपती असं नारायण मूर्ती यांचं वर्णन होतं. त्यांना भारताचे बिल गेट्स असंही म्हटलं जातं.
नारायण मूर्ती यांच्या कोट्यवधी रुपयांच्या वारशाच्या अक्षता वारसदार आहेत. यंदाच्या वर्षी अक्षता यांच्याकडे युकेचं नागरिकत्व नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर चर्चेला तोंड फुटलं होतं. नॉन डॉमिसाईल स्टेटसमुळे त्यांच्यावर टीकाही झाली होती. कारण युकेच्या नागरिक नसल्यामुळे युकेबाहेरील उद्योगांमधून मिळणाऱ्या पैशावर त्यांना कोणताही कर भरावा लागणार नव्हता. नंतर त्यांनी जगभरातील विविध उत्पन्नासाठी कर भरण्याची कबुली दिली होती.
कुटुंबाकडे संपत्तीची पार्श्वभूमी असूनही अक्षता वैयक्तिक आयुष्यात, कारकीर्दीत साधेपणाने सुरुवात केली होती.
2013 मध्ये नारायण मूर्ती यांनी अक्षता यांना लिहिलेली पत्रं प्रसिद्ध झाली होती. 1980 साली हुबळीत अक्षता यांचा जन्म झाला तेव्हाची गोष्ट नारायण मूर्ती यांनी सांगितली होती. एका सहकाऱ्याकडून त्यांना ही बातमी मिळाली. कारण त्यावेळी मूर्ती कुटुंबीयांकडे टेलिफोन नव्हता.
"तुझी आई आणि मी तरुण होतो. कारकीर्दीत आगेकूच करण्यासाठी धडपडत होतो," असं नारायण मूर्ती यांनी लिहिलं आहे.
अक्षता लहान असताना त्यांना नारायण मूर्तींच्या पालकांकडे पाठवण्यात आलं. कारण नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती त्यावेळी आपापल्या करिअरसाठी मुंबईत होते.
पुढच्याच वर्षी नारायण मूर्ती यांनी इन्फोसिस कंपनीची स्थापना केली. देशातल्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अव्वल कंपनी झालेल्या इन्फोसिसच्या बळावर नारायण मूर्तींनी कोटीच्या कोटी उड्डाणं घेतली.
नारायण आणि सुधा मूर्ती यांनी मुलांच्या शिक्षणावर भर दिला. दोन्ही मुलांना परिश्रमाची सवय लागावी याकडेही त्यांनी लक्ष दिलं. त्यांच्या घरी टीव्ही नव्हता जेणेकरून अभ्यास, वाचन, गप्पा-चर्चा तसंच मित्रमैत्रिणींना भेटण्यासाठी वेळ मिळत असे.
अक्षता यांनी कॅलिफोर्नियातील लिबरल क्लेरमंट मकेना कॉलेजातून अर्थशास्त्र आणि फ्रेंचचं शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी फॅशन कॉलेजातून डिप्लोमाचं शिक्षण घेतलं. डेलॉइट आणि युनिलिव्हर कंपनीत त्यांनी काम केलं. यानंतर स्टॅनफोर्ड विद्यापीठात त्यांनी एमबीएचं शिक्षण घेतलं.
हे शिक्षण घेत असतानाच त्यांची ऋषी सुनक यांच्याशी भेट झाली. 2009 मध्ये ऋषी आणि अक्षता यांचं लग्न झालं. त्यांना दोन मुलं आहेत.
42 वर्षीय अक्षता यांनी कॅलिफोर्नियात फायनान्स क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. काही वर्षातच अक्षता डिझाईन्स नावाने त्यांनी फॅशन लेबल लाँच केलं.
2011 मध्ये त्यांनी स्वत:चं कलेक्शन सादर केलं. भारतातल्या दुर्गम भागातील गावांमधील लोकांनी तयार केलेली डिझाईन्स घेत असल्याचं त्यांनी व्होग मासिकाशी बोलताना सांगितलं होतं. सच्चेपणा, कलाकुसर आणि आणि आपला गौरवशाली वारसा हे सगळं त्यांच्या कामातून प्रतीत होत असे.
हा व्यवसाय तीन वर्षात उतरणीला लागल्याचं गार्डियनने आपल्या बातमीत म्हटलं होतं.
कॅटमरान व्हेंचर्स ही त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. लंडनमध्ये हा उद्योग आहे. ऋषी सुनक आणि अक्षता यांनी 2013 मध्ये या उद्योगात गुंतवणूक केली होती.

फोटो स्रोत, Getty Images
डिगमे फिटनेस या कंपनीच्या त्या संचालक आहेत. यंदा फेब्रुवारीत या कंपनीत प्रशासक नियुक्त करण्यात आला. कोरोना काळात कंपनीचं उत्पन्न घटलं. पैशाचा पुरवठा होऊनही कंपनीची आर्थिक स्थिती ढेपाळली.
अक्षता मूर्ती यांच्या लिंक्डन या सोशल मीडियावरील प्रोफाईलवर न्यू अँड लिंगवूड कंपनीच्या संचालक असल्याचं दाखवण्यात आलं होतं. पुरुषांची किमतीची अंतर्वस्त्रं विकणारी ही कंपनी आहे.
वडिलांच्या इन्फोसिस कंपनीत अक्षता यांचा 0.9 टक्के समभाग आहेत. कंपनीच्या ताज्या वार्षिक अहवालात हे म्हटलं आहे. 700 मिलिअन युरो इतकं या कंपनीचं मूल्य आहे. अक्षता यांचं इन्फोसिसमधील शेअर्स रशिया-युक्रेन युद्धावेळी वादात सापडले होते.
रशियाची राजधानी मॉस्को इथे इन्फोसिसचं कार्यालय आहे. तिथलं कामकाज थांबवावं असं दडपण इन्फोसिस कंपनीवर होतं. एप्रिल महिन्यात इन्फोसिसने मॉस्को कार्यालयातील कामकाज स्थगित केल्याचं बीबीसीला सांगितलं.
ऋषी आणि अक्षता यांच्या प्रचंड संपत्तीवरून काहींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ऋषी यांची सर्वसामान्य जनतेशी नाळ नाही अशी टीकाही केली जाते. कॉस्ट ऑफ लिव्हिंग संकटादरम्यान हे प्रकर्षाने जाणवलं असं काहींनी सांगितलं.
इतिहासात पंतप्रधानांच्या जोडीदारांनी उदाहरणार्थ थेरेसा मे यांचे पती सार्वजनिक जीवनात मर्यादित प्रमाणात दिसत.
टोनी ब्लेअर यांच्या पत्नी चेरी ब्लेअर यांनी पती पंतप्रधान झाल्यावरदेखील मानवाधिकार वकील म्हणून कारकीर्द सुरू ठेवली. त्यावेळी प्रसारमाध्यमांनी त्यांच्या कामाचं सविस्तर वृत्तांकन केलं होतं.
चॅरिटी काम आणि कंत्राटी कामांसाठी सौ. ब्लेअर चर्चेत असते.
तूर्तास तरी अक्षता यांच्यावर प्रसारमाध्यमांचा स्पॉटलाईट नाही. पण गेल्या काही वर्षात त्यांचं नाव वादात अडकलं आहे. आता अक्षता यांचे पती युकेच्या पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत. यामुळे अक्षता फर्स्ट लेडी होतील. त्यामुळे त्यांचं नाव चर्चेत राहील यात शंकाच नाही.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








