You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
यंदा 5 अब्ज फोन जाणार कचऱ्यात
- Author, व्हिक्टोरिया गिल
- Role, बीबीसी विज्ञान प्रतिनिधी
यंदा 5.3 अब्ज मोबाइल फोन फेकून दिले जातील, असं इंटरनॅशनल वेस्ट इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट (WEEE) संस्थेनं म्हटलं आहे.
जागतिक व्यापाराच्या डेटावर आधारित हा अंदाज असून यामुळे 'ई-कचऱ्या'च्या वाढत्या पर्यावरणीय समस्येवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
रिसायकलिंग करण्याऐवजी अनेक लोक जुने फोन तसेच ठेवतात, असं संस्थेच्या संशोधनात दिसून आलं आहे.
टाकाऊ इलेक्ट्रॉनिक्समधून मौल्यवान खनिजं काढली जात नाहीत, जसं की वायरमधील कॉपर किंवा रिचार्ज करण्यायोग्य बॅटरीमधील कोबाल्ट.
"लोकांना हे समजत नाही की या सर्व क्षुल्लक वस्तूंचं खूप मूल्य आहे आणि जागतिक स्तरावर एकत्रितपणे त्यांचं प्रमाणही मोठं आहे," WEEE चे महासंचालक पास्कल लेरॉय सांगतात.
जगभरात वापरात नसलेले जवळपास 16 अब्ज मोबाइल फोन आहेत. युरोपमध्ये तर जवळजवळ एक तृतीयांश फोन सध्याच्या घडीला वापरात नाहीयेत.
WEEE च्या मते, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक कचऱ्याचा डोंगर आपल्यासमोर असल्याचं या संशोधनातून दिसून येत आहे. यात वॉशिंग मशीन ते टोस्टर आणि टॅब्लेट संगणकापासून ते ग्लोबल पोझिशनिंग सिस्टमच्याउपकरणांपर्यंत सगळ्यांचा समावेश आहे. 2030 पर्यंत दरवर्षी 74 दशलक्ष टनांपर्यंत हा कचरा वाढेल.
या वर्षाच्या सुरुवातीला रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीनं नवीन उत्पादनं तयार करण्यासाठी ई-कचऱ्याच्या खाणकामाला प्रोत्साहन देणारी मोहीम सुरू केलीय.
WEEE च्या मगडॅनेला कॅरीनोवित्झ सांगतात, "या उपकरणांपासून मिळणारी संसाधने विंड टर्बाइन, इलेक्ट्रिक कार बॅटरी किंवा सौर पॅनेलच्या निर्मितीमध्ये वापरली जाऊ शकतात. हे सर्व ग्रीन सोसायटीसाठी महत्त्वाचं आहे."
जगातील फक्त 17% ई-कचरा योग्य पद्धतीनं रिसायकल केला जातो. पण, संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघानं पुढच्या वर्षी हे प्रमाण 30 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे.
ई-वेस्ट म्हणजेच ई-कचऱ्याची समस्या सर्वांत जलद गतीने वाढणारी आणि अत्यंत जटिल असून ती मानवी आरोग्य आणि पर्यावरण दोन्हीवर परिणाम करणारी आहे. कारण ई-कचऱ्यात त्यात हानीकारक घटक असू शकतात, असं संघानं म्हटलं आहे.
मटेरियल फोकस संस्थेचं सर्वेक्षण सांगतं की, यूकेमध्ये 2 कोटींहून अधिक वापरात नसलेल्या पण कार्यरत इलेक्ट्रिकल वस्तू ज्यांची आजची किंमत 5.63 बिलियन पाऊंड इतकी आहे. सध्या या वस्तू यूकेच्या घराघरात आहेत.
यूकेतील कुटुंबे ही नको असलेली उपकरणं विकून सरासरी जवळपास 200 पाऊंड उभारू शकतात, असाही अंदाज या संस्थेनं वर्तवला आहे.
ई-कचऱ्याची रिसायकलिंग केंद्रे कुठे शोधायची यासाठी संस्थेची ऑनलाइन मोहीम मदत करत आहे.
लेरॉय सांगतात की, "अजून बरेच काही करता येईल. सुपरमार्केटमध्ये कलेक्शन बॉक्स ठेवता येतील, नवीन उपकरणाची डिलिव्हरी झाल्यावर लहान तुटलेली उपकरणं उचलता येतील आणि लहान ई-कचरा परत करण्यासाठी पोस्ट-ऑफिस बॉक्स ऑफर करता येतील."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)