व्हीडिओ गेम्समधून असं काय मिळतं, ज्यामुळे त्याचं व्यसन लागू शकतं?

    • Author, संशोधन - द इन्क्वायरी, बबीसी न्यूज
    • Role, शब्दांकन - गुलशनकुमार वनकर, बीबीसी मराठी

सुमारे 37 दशकांपूर्वी जपानच्या एका कंपनीने मारियो हा गेम लाँच केला आणि त्यामुळे व्हीडिओ गेम विश्वात एक नवीन युग सुरू झालं. तुम्ही आजवर कधी ना कधी हा गेम पाहिला आणि बहुदा खेळलाही असेल. तेव्हापासून आजवर व्हीडिओ गेम्सचं जग प्रचंड मोठं झालंय.

रोडरॅश, अलादिन, नीड फॉर स्पीडसारखे कंप्युटर गेम्स असो वा अँग्री बर्ड्स, कँडी क्रश किंवा पब्जी-कॉल ऑफ ड्युटीसारखे मोबाईल गेम्स, आपापल्या काळात यापैकी प्रत्येकच गेमने आपल्याला वेड लावलंय. इतकं की काही मुलांनी या गेम्सच्या नादात टोकाचं पाऊलही उचललंय. आईने फोन दिला नाही म्हणून कुणी स्वतःचं आयुष्य संपवलंय, तर कुणाला GTAचा गेम खेळूनखेळून प्रत्यक्षात गुन्हेगारी क्षेत्रात उतरायची प्रेरणा मिळालीय.

पण अशा व्हीडिओ गेम्समधून आपल्याला असं काय मिळतं की आपल्याला त्याचं व्यसन जडतं? हे व्हीडिओ गेम्स नुसते टाईमपाससाठी असतात की त्यातून काही चांगल्या गोष्टीसुद्धा साध्य होऊ शकतात?

गेमिंगच्या विश्वात शिरताना

कॅथरीन एसबेस्टोस या सँटाक्रूझस्थित युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामध्ये कॉम्प्युटेशनल मीडियाच्या प्रोफेसर आहेत. त्यांची पहिली नोकरी ही एका प्राणी संग्रहालयात होती. त्या सांगतात की तिथे एका पक्षीगृहाबाहेरून त्या रोज जायच्या, पण कधीही त्या रंगीबेरंगी पक्ष्यांकडे तितक्या उत्साहाने नव्हत्या पाहात.

एके दिवशी त्या प्राणी संग्रहालयात एक इलेक्ट्रानिक गेमिंग कंसोल ठेवण्यात आलं, ज्यावर पक्ष्यांचा एक गेम होता. कॅथरीन सांगतात जरा फावल्या वेळात कॅथरीन यांनी तो गेम खेळला. "मला अशा पक्ष्यांमध्ये फार काही रस नव्हता. पण त्या दिवसानंतर मला त्यांच्याविषयी कुतूहल निर्माण झालं."

कॅथरीन त्या दिवसापासून पक्ष्यांना निरखून पाहू लागल्या, त्यांच्याविषयी विचार करू लागल्या. एका साध्या व्हीडिओ गेममुळे आपल्या मनावर एवढा परिणाम होतोय, असं जाणवल्यावर त्यांनी पुढे याचंच उच्च शिक्षण घ्यायचं ठरवलं.

कंप्युटर गेम्स नेमके काय असतात? सध्या कोण हे गेम खेळतंय?

त्या सांगतात, "व्हीडिओ गेमिंग म्हटलं की आपल्याला वाटतं की काही लहान मुलं एका बंद, अंधारलेल्या खोलीत बसून दिवसभर गेम खेळत असतात. पण आता तसं नाहीय. आज बहुतांश गेम खेळणारी मंडळी तिशीत आहे, आणि मुलांएवढ्याच मुलीसुद्धा गेम खेळताना दिसतात."

आज जगभरात गेम्सची उलाढाल एक अब्ज डॉलर्सपेक्षाही जास्त आहे - म्हणजे हॉलिवुडपेक्षाही जास्त. जवळजवळ 2.2 अब्ज लोक जगभरात गेम खेळतात - कुणी मोबाईलवर, कुणी लॅपटॉप आणि कंप्युटर्सवर, आणि कुणी एक्सबॉक्स, प्लेस्टेशनसारख्या गेमिंग कंसोलवर.

कॅथरीन सांगतात की गेल्या पाच-दहा वर्षांत गेम डेव्हलपमेंटमध्ये मोठी क्रांती आली आहे. दररोज आपल्या वेगवेगळ्या भावनांना साद घालणारे गेम्स तयार केले जात आहेत. एक अख्खं विश्व उभारलं जातंय, ज्यात तुम्ही तासन् तास हरवून जाऊ शकता.

यामुळे कुणाचं मनोरंजन होतंय, तर कुठे प्रत्यक्षात समाजाला धोकाही निर्माण होत असल्याचं बोललं जातंय. एक गेम ज्यावर सातत्याने टीका झाली, तो म्हणजे ग्रँड थेफ्ट ऑटो किंवा GTA. त्यात खूप रिस्की, हिंसक, प्रक्षोभक गोष्टी होत्या, असं कॅथरीन सांगतात.

पण यात काही चांगल्या गोष्टी होत्या का?

कॅथरीन सांगतात की "GTAमध्ये पहिल्यांदाच असं एक अख्खं खुलं, नवीन विश्व आपण पाहत होतो. मी कुठलेही मिशन पूर्ण करण्याच्या भानगडीत न पडता, नुसते त्या शहरात गाडी चालवत सुटायचे. सूर्योदय आणि सूर्यास्त पाहायचे. हा माझ्यासाठी खूप भारी अनुभव होता."

त्या असंही सांगतात की अशा गेम्समधून प्लेयर्स एक वेगळीच भावनिक पातळी गाठतात. आपल्या निर्णयामुळे एका प्लेयरचं आयुष्य कसं बदलतंय, हे लोकांना अशा गेम्समधून अधिक ठळकपणे दिसतंय.

"अशा गेममध्ये तुमच्या निर्णयांचे थेट परिणाम होताना दिसतात. त्यामुळे तुम्हाला लगेच स्वतःचा राग येतो, चूक झाली म्हणून चिडचिड होते. लेव्हल जिंकली की आनंद होतो. हे टीव्ही किंवा पुस्तकासारख्या इतर कुठल्या माध्यमात होत नाही."

गेमिंगमुळे मुलं एकलकोंडी होतात, असंही म्हटलं जातं. पण कॅथरीन सांगतात की आजकाल काही गेम्स मुलामुलींना जोडण्याचंही काम करतायत. ऑनलाईन गेमिंग आता एक वेगळाच सांघिक खेळ बनला आहे.

पण यातून फक्त मनोरंजनच होतंय का? की आणखी काही?

पिक्सल्सच्या चक्रव्यूहात अडकताना

फिलिप झिंबार्डो यांनी केलेलं स्टॅनफोर्ड प्रिझन एक्सपरिमेंट एकेकाळी प्रचंड गाजलं होतं. ते सांगतात की, अनेक वर्षांपूर्वी कॉलेजमध्ये सायकोलॉजीचे प्रोफेसर असताना त्यांचा मुलगा ॲडम गेम्सच्या प्रचंड आहारी गेला होता.

"तो रात्र-रात्रभर गेम्स खेळायचा, आणि तो इतका तरबेज झाला होता की त्याच्यापुढे कुणीच टिकत नव्हतं. त्यामुळे त्याचे मित्र त्याचे शत्रूही बनले होते."

या गेम्सचा ॲडमच्या मानसिक आरोग्यावर भयंकर परिणाम होत होता, असं फिलिप सांगतात. त्यामुळे त्यांनी या क्षेत्रात काम करायचं ठरवलं. पण हे बदल कशाप्रकारचे होते?

"ॲडम आणखी काहीच करत नव्हता. काही नवीन शिकत नव्हता, बनवत नव्हता. ना टीव्ही पाहत होता, ना बातम्या, ना आमच्यासोबत जेवायला बसायचा. तो फक्त व्हीडिओ गेम्सच खेळायचा. म्हणजे पुढे चालून तो फक्त गेम्सच्याच विश्वात रमला असता. त्याला आयुष्यात आणखी काहीच जमलं नसतं. तो एकप्रकारे अडाणीच राहिला असता," असं फिलिप सांगतात.

याचा परिणाम अनेकांच्या आयुष्यावर, भविष्यावर होतोय, असं प्रो. झिंबार्डो सांगतात. हा फक्त टाईमपास नाहीय, प्रो. झिंबार्डो यांच्याकडे यासाठी एक विशिष्ट शब्दसुद्धा आहे - Present Hedonistic, म्हणजे आत्ताच्या घडीपुरता आनंद शोधणारा. याचा अर्थ तुम्ही सतत काहीतरी नवीन शोधत असता, नाहीतर तुम्ही खूप लवकर बोर होता. तुम्हाला प्रत्येक गोष्टीतून सनसनाटी, थ्रिल हवा असतो.

झिंबार्डो विचारतात, "लहानपणी हे ठीक आहे, पण मोठं झाल्यावर यामुळे तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो. तुम्ही भविष्याचा कधी विचारच करणार नाही, मग ते बनवाल कसं?"

पण आपल्या पहिल्या एक्सपर्ट तर म्हणाल्या होत्या की गेमिंगमुळे हे प्लेयर्स एक वेगळीच भावनिक पातळी गाठतायत. प्रो. झिंबार्डो यांना हे पटत नाही. ते म्हणतता, "हा फक्त एक गेम आहे. हे काही खरंखुरं आयुष्य नाही! असले गेम्स खेळल्यामुळे तुम्ही एक पार्टनर, एक बाप, समाजातला एक सुजाण नागरिक होण्यास सक्षम होत नाही. हे गेम्स तुम्हाला तुमच्या खऱ्याखुऱ्या विश्वात जगायला तयार करत नाही."

प्रो. झिंबार्डो आणखी एका समस्येवर बोट ठेवतात - तरुण मुलं गेमिंगमुळे मागे पडतायत. मुली त्यांच्या पुढे चालल्यात. शिवाय शिक्षणाअभावी या मुलांना रोजगारही मिळणं कठीण होणार आहे. ते सांगतात की त्यांचा विरोध सरसकट व्हीडिओ गेम्सला नाही, तर दोन गोष्टींना आहे - त्याच्या अतिरेकाला आणि त्याच्यामुळे पूर्णतः समाजापासून अलिप्त राहण्याला.

ते सांगतात की जपान, कोरिया, युके, ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये याचं प्रमाण जास्त दिसून आलंय. माणसं समाजापासून आणि त्यांच्या स्वतःच्या सुरक्षित भविष्यापासूनही दूर जातायत. पण हे सगळीकडेच लागू होतं का?

गेम खेळणारे न्युरोसायन्टिस्ट

लहानपणापासूनच अनेकांप्रमाणे झोरन पोपोविच हे फ्रॉगर हा गेम वेड्यासारखा खेळायचे. यात एका बेडकाला रहदारीचा रस्ता ओलांडून, मगरींनी भरलेल्या नदीत लाकडांवरून उडी मारून जंगलापर्यंत पोहोचायचं असतं. "जेव्हा एका चुकीच्या पावलामुळे माझा बेडूक मरायचा, तेव्हा माझी खूप चिडचिड व्हायची. तो संपायचाच नाही," ते सांगतात.

लहानपणापासूनच आर्केड गेम्सचं हे खूळ खेळत झोरन पोपोविच यांची पॅशनच बनली. आज ते वॉशिंग्टन विद्यापीठात सेंटर फॉर गेमिंग सायन्स चालवतात. पण इथे ते फक्त गेम्स नाही खेळत. त्यांनी एक लोकोपयोगी गेम बनवलाय - फोल्ड इट.

पोपोविच सांगतात की 'फोल्ड इट' हा आपल्या जगातल्या सर्वांत गूढ प्रश्नांपैकी एकाचं उत्तर शोधायचा प्रयत्न करणारा गेम आहे - आपल्या शरीरात प्रोटीन्स काय करतात?

प्रोटीन्स किंवा प्रथिनांच्या 3D आकारावरून त्यांचं काम ठरत असतं. पण या 3D आकाराच्या अनंत शक्यता आहेत आणि कोणता आकार सर्वोत्तम, हे शोधून काढणं अनेक सुपरकंप्युटर्सनाही थकवणारं काम होतं. अखेर प्रो. पोपोविच यांनी या प्रश्नाचं रूपांतर एका गेममध्ये केलं.

"हे थोडंसं टेट्रिस या गेमसारखं आहे. पण त्याच्यापेक्षा कैक पटींनी मोठं आणि 3D रूपात, म्हणजे हवेत तरंगणारा एक गुंताच म्हणा. यात अनेक छोटेछोटे भाग असतात जे तुम्ही कुठल्याही दिशेने सरकवून, मोडतोड करून हा गुंता सोडवू शकता. हे दिसायला भारी दिसतं, यात म्युझिक आहे, एखादा टास्क पूर्ण केल्यावर मस्स्त ॲनिमेशन होतं. आणि अर्थात यात एक स्कोरिंग सिस्टिमही आहे, जी जगभरात एकसारखीच आहे."

आजवर किमान पाच लाख लोकांनी फोल्डइट खेळला असेल, असा एक अंदाज आहे. आणि त्यांच्या मेहनतीची फळं आज आजारांच्या अभ्यासासाठी तसंच औषध संशोधनासाठी वापरली जात आहेत. कसं?

पोपोविच सांगतात की त्यांचे शास्त्रज्ञ एक प्रोटीनचा गुंता सोडवायचा 13 वर्षांपासून प्रयत्न करत होते. त्यांनी म्हटलं, चला आपण आपल्या फोल्डईट खेळणाऱ्यांपुढे हा प्रोटीन मांडूया. तिथे टाकल्यावर अवघ्या दहा दिवसात कुणीतरी तो सोडवला आणि नंतर प्रयोगशाळेत त्याचे नमुने कन्फर्म करण्यात आले.

हे यश पाहून प्रो. पोपोविच यांच्या टीमने आणखी एक पझल गेम आणलाय - मोझॅक (Mozaic). यात प्लेयर्सना मेंदूच्या पेशींचा आकार शोधून काढावा लागतो. प्रो. पोपोविच सांगतात की आजवर असे शेकडो गेम-बेस्ड न्युरोसायन्टिस्ट आहेत, जे त्यांच्या संशोधनात त्यांना मदत करत आहेत. आणि हे लोक काही वैज्ञानिक नाहीयेत. ते इलेक्ट्रिशियन आहेत, वकील, सेक्रेटरी आहेत... असे लोक ज्यांचं विज्ञानाशी काही देणंघेणं नाहीय, पण ते ऑनलाईन गेमिंगमुळे संशोधनात मदत करत आहेत.

पण यातून या लोकांना रोजगार मिळू शकतो का?

पोपोविच सांगतात की त्यांना आशा आहे की अशा आणखी न्युरोसायन्स लॅब उदयास येतील, ज्या अशा लोकांना त्यांच्या गेमिंगसाठी काहीतरी मानधन देऊ शकतील. ते स्वतः या दिशेने काम करत असल्याचं सांगतात.

पण अशी मोजकी उदाहरणं आहेत, जी समाजाच्या फायद्याची ठरू शकतात. आपण हे विसरायला नको की असले विज्ञानावर आधारित गेम्स हे गेम्स कमी आणि सायन्स जास्त असू शकतात, ज्यात प्रत्येकाला रस असतोच, असं नाही. मग याचा अर्थ काय?

गेमिंग करिअर शक्य आहे का?

जर तुम्हाला अजूनही वाटतंय की व्हीडिओ गेम्स नुसता टाईमपास आहे, तर आपले चौथे तज्ज्ञ टॉम ब्रॉक कदाचित तुम्हाला पटवून देतील की असं नाहीय. ते युकेमधल्या मँचेस्टर मेट्रोपॉलिटन युनिव्हर्सिटीमध्ये सोशियोलॉजीचे प्रोफेसर आहेत आणि एक गेमिंग एक्सपर्टसुद्धा. ते सांगतात की खूप डोकं खपवणारे गेम्स खेळल्याने गेमिंगमधली एक प्रमुख गोष्ट गमावण्याची भीती असते - गेमिंगची मजा.

टॉम ब्रॉक सांगतात की एका तरबेज गेमरचे हात एका मिनटात 800 ॲक्शन्स करत असतात. "तुम्ही युट्यूबवर याचे असंख्य व्हीडिओ पाहू शकता. हे एखाद्या पियानोवादकाच्या हातांसारखेच काम करत असतात."

पियानो वादन आणि गेमिंग - दोन अशा कला ज्या बंद खोलीत, तासन् तास रियाझ करून परफेक्ट केल्या जाऊ शकतात. एक कलेला जगभरात मान आहे, चाहते आहेत. पण दुसऱ्या कलेच्या बाबतीत तसं नाहीय.

पण हे आता बदलतंय, स्पर्धात्मक गेमिंग इंडस्ट्री आता मोठी होताना दिसतेय. याला नावही आहे - ई-स्पोर्ट्स!

आता जगभरात ईस्पोर्टिंग चॅम्पियनशिप होतात, ज्याचं बक्षीस लाखो डॉलर्सच्या घरात जातं. आणि याचा समावेश आता ऑलिम्पिक्समध्येही केला जावा, अशी मागणी होतेय. याकडे लोक आता खरोखर करिअर म्हणून पाहू लागले आहेत.

"संशोधनातून आता असं समोर येतंय की अशा गेम्समुळे तरुणांमध्ये चिकाटी, धीर, स्ट्रेटेजिक प्लानिंग आणि सर्जनशीलता सारखे गुण रुजवले जातात. शिवाय लोक आता टीम्समध्येही खेळू लागलेत, यामुळे प्लेयर्समध्ये नेतृत्व कौशल्य आणि सोशल स्किल्सही विकसित होतात," असं टॉम ब्रॉक सांगतात.

यापैकी काही गोष्टी प्लेयरला वैयक्तिकरीत्या फायद्याच्या ठरू शकतात, तर काही त्याच्या कामाच्या ठिकाणीसुद्धा त्याला मदत करू शकतात. पण यामुळे त्यांना काम मिळेल का, हा एक मोठा प्रश्न उरतोच. कारण गेम्सच्या तुलनेत काम बोरिंग असतं. ते करायला लागणारं कौशल्य शिक्षण आणि अनुभवाशिवाय आणखी कशातून मिळणं कठीण असतं.

मग या तरुणांचं कसं होणार?

टॉम सांगतात की, त्यांचे बाबा एका प्रिंटिंग प्रेसमध्ये काम करायचे आणि हेच काम त्यांनी आयुष्यभर केलं.

"आज लोक सरासरी आपल्या कारकिर्दीत 20-30 कामं आणि नोकऱ्या करतात. यापैकी काही कामांमध्ये त्यांचं मन कधीच लागणार नाही. त्यामुळे किमान अशा गेमिंगमधून त्यांना त्यांच्या आवडीचं काम, जिथे त्यांना मान मिळेल, ओळख मिळेल, असं काम करता येईल. ही त्यांच्यासाठी मोठी प्रेरणा असते."

व्हीडिओ गेम्स - टाईमपास की आणखी काही?

तर मग खरंच व्हीडिओ गेम्स नुसते टाईमपाससाठी असतात की त्यातून काही चांगल्या गोष्टीसुद्धा साध्य होऊ शकतात?

आपल्या पाहिलं की कसे व्हीडिओ गेम्स तरुणांना, लोकांना एका खऱ्या विश्वापासून, समाजापासून दूर नेतात. त्याचा लोकांच्या मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो हेसुद्धा आपण पाहिलं. पण आपल्या काही तज्ज्ञांनी हेसुद्धा सांगितलं की यातून संशोधनासाठी आणि तांत्रिक विकासासाठी मदत होऊ शकते. शिवाय आता इस्पोर्ट्समुळे हे एक करिअर म्हणूनही मोठं होतंय.

आपले चौथे एक्सपर्ट टॉम ब्रॉक आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगतात, "आपण आता अभ्यास किंवा काम चांगलं असतं आणि व्हीडिओ गेम्स वाईट, अशी ब्लॅक अँड व्हाईट मांडणी करणं थांबवायला पाहिजे. आता जग यापलीकडे गेलंय. आपण हे स्वीकारायला हवं कामाचा ताण येतो आणि तो घालवायला का होईना, लोक गेम्स खेळतात, आणि हेसुद्धा कामाएवढंच महत्त्वाचं आहे."

हेही नक्की पाहा -

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)