महाराणी एलिझाबेथ यांची प्रतिमा असलेल्या नाणी आणि नोटांचं काय होणार?

गेल्या 70 वर्षांमध्ये महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या प्रतिमेनं युनायटेड किंग्डममधील लोकांच्या आयुष्याला व्यापून टाकलं होतं. त्यांची प्रतिमा सर्वत्र दिसून येते.

नाण्यांवर प्रतिमा

ब्रिटनमध्ये राणीची प्रतिमा असलेली 290 कोटी नाणी वापरात आहेत. 2015 साली नाण्याचं नवं डिझाईन प्रसिद्ध करण्यात आलं होतं. तेव्हा महाराणी 88 वर्षांच्या होत्या. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या कार्यकाळात त्यांच्या प्रतिमेची नाणी प्रकाशित होण्याची ही पाचवी वेळ होती.

राजे चार्ल्स यांच्या प्रतिमेची नाणी कधीपासून येणार याबद्दल रॉयल मिंट म्हणजेच शाही टांकसाळीने काहीही स्पष्ट माहिती दिलेली नाही. मात्र नाणी बदलण्याचं काम हळूहळू होईल अशी शक्यता आहे. पुढील काही वर्षांपर्यंत महाराणींची प्रतिमा असलेली नाणी वापरात राहातील.

1971 साली जेव्हा नाणी पाडली गेली तेव्हा अनेक राजांची प्रतिमा असलेली नाणी वापरात होती.

राजे चार्ल्स यांची प्रतिमा असलेली नाणी कशी दिसतील याची माहिती अजून उपलब्ध नाही. अर्थात 2018 साली त्यांच्या 70 व्या वाढदिवशी प्रकाशित करण्यात आलेल्या नाण्यांवर त्याची एक कल्पना येते.

फक्त एक निश्चित आहे ते म्हणजे या नाण्यांवर राजे चार्ल्स दुसऱ्या बाजूला म्हणजे डावीकडे पाहात असतील.

परंपरेनुसार जेव्हा नाणी बदलली जातात तेव्हा त्यांतील प्रतिमेचा चेहरा मागील राजा किंवा राणीच्या दुसऱ्या म्हणजे विरुद्ध बाजूला पाहाणारा असतो.

सरकारने एकदा सहमती दर्शवली की साऊथवेल्स मध्ये असणारी रॉयल मिंट नव्या डिझाईनची नाणी पाडायला सुरुवात करते.

नोटा

1960 पासून बँक ऑफ इंग्लंडच्या प्रत्येक नोटेवर महाराणींचं चित्र असतं. अर्थात स्कॉटिश आणि आयरिश नोटांवर राजा-राणीची प्रतिमा नसते.

इंग्लंडमध्ये जवळपास 450 कोटी नोटा वापरात आहेत. त्यांची किंमत 8 हजार कोटी आहे. नाण्यांप्रमाणे नोटाही हळूहळू बदलल्या जातील.

पहिल्यापासून चलनात असलेल्या नोटांचं लिगल टेंडर सुरू राहील.

स्टँप आणि पोस्टबॉक्स

1967 पासून रॉयल मेलच्या सर्व स्टँप्सवर महाराणी एलिझाबेथ द्वितिय यांची प्रतिमा आहे. आता रॉयल मेलने स्टँप तयार करणं बंद केलं आहे.

मात्र जुने वापरात राहातील. नवे स्टँप्स छापण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल.

नव्या स्टँपचं डिझाईन कसं असेल हे रॉयलमेलने अजून स्पष्ट केलेलं नाही. स्टँपशिवाय पोस्टपेट्यांवरही महाराणींशी संबंधित संकेतांचा वापर केला जातो.

ब्रिटनच्या 1 लाख 15 हजार पोस्ट पेट्यांपैकी 60 टक्के EIIR चिन्ह आहे. यातील E चा अर्थ एलिझाबेथ R चा अर्थ रेगिना म्हणजेच महाराणी असा आहे. स्कॉटलंडमध्ये स्कॉटिश क्राऊनची प्रतिमा असते. स्कॉटलंड वगळून इतरत्र पोस्टपेट्यांवर राजाचे चिन्ह दिसेल.

शाही मुद्रा

टोमॅटो केचअप असो की अत्तराच्या बाटल्या. दिवसभरात लागणाऱ्या अनेक वस्तूंवर एक सिल लावलेलं असतं. त्यावर 'हर मॅजेस्टीने केलेल्या नियुक्तीने' असं लिहिलेलं असतं.

या वस्तूंना रॉयल वॉरंट मिळालेलं असतं. म्हणजे या वस्तूंना बनवणारी कंपनी त्या वस्तू शाही घरांमध्येही पुरवते.

गेल्या शतकापासून मोनार्क किंवा त्यांचे पती,पत्नी रॉयल वॉरंट प्रकाशित करतात. त्यांना ग्रँटर म्हणतात. आता 800 कंपन्यांकडे जवळपास 900 रॉयल वॉरंट आहे.

जेव्हा ग्रँटरचं निधन होतं तेव्हा त्यांचे रॉयल वॉरंटही संपतात. कंपनीला दोन वर्षांमध्ये त्यांच्या चिन्हांचा वापर बंद करावा लागतो. अर्थात क्वीन मदर यांचे वॉरंट पाच वर्षांपर्यंत चालले होते.

प्रिन्स ऑफ वेल्स या पदनामावर असताना चार्ल्स यांनी जे वॉरंट काढले होते ते कायम राहातील. आता ते आपल्या मुलांना वॉरंट देण्याचे अधिकार देऊ शकतात.

पासपोर्टचं काय होणार?

ब्रिटनचे पासपोर्ट 'हर मॅजेस्टींच्या' नावे दिले जातात. या पासपोर्ट्सचा वापर सुरूच राहील. नव्या पासपोर्टच्या पहिल्या पानावर 'हिज मॅजेस्टी' लिहिलं जाईल.

इंग्लंड आणि वेल्सच्या पोलिसांच्या हेल्मेटवरची महाराणींची प्रतिमा बदलली जाईल.

मोनार्कद्वारे नियुक्त केलेल्या वकिलांना 'क्वीन्स कौन्सिल' म्हटलं जाई आता त्यांना लगेचच 'किंग्ज कौन्सिल' म्हटलं जाईल.

राष्ट्रगीतातील सध्याचे 'गॉड सेव्ह द क्वीन हे शब्द चार्ल्स' यांच्या अधिकृत राज्यारोहण समारंभानंतर सेंट जेम्स पॅलेसच्या बाल्कनीमधून 'गॉड सेव्ह द किंग' असे बदलल्याचं जाहीर केलं जाईल.

1952 नंतर पहिल्यांदाच या शब्दांसह राष्ट्रगीत होईल.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)