तालिबान महिलांना सांगतंय की, तुमच्या नोकऱ्या पुरुषांना देऊन टाका

फोटो स्रोत, JACK GARLAND
- Author, लीस डुसेट
- Role, मुख्य आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी, काबूल
अफगाणिस्तानची राजधानी काबूलच्या विमानतळावर पासपोर्टवर मोहोर उमटवणाऱ्या महिला. या महिलेने काळ्या रंगाचा बुरखा, करड्या रंगाचा स्कार्फ परिधान केला आहे. काबूलच्या विमानतळावर तुम्ही पोहोचता तेव्हा हे चित्र तुमचं लक्ष वेधतं.
वर्षभरापूर्वी या विमानतळावर वेगळं चित्र होतं. देश सोडण्यासाठी अगतिक अफगाणी नागरिक, सगळीकडे सावळागोंधळ. कोणाचा पायपोस कुणात नाही अशी परिस्थिती.
वर्षभरानंतर या विमानतळावर आता शांतता आहे. वातावरण निवळलं आहे, परिसर स्वच्छ झाला आहे. काबूलच्या उष्ण टळटळीत संथ दुपारी तालिबानचा पांढरा झेंडा विहरतो आहे.
बिल बोर्ड्सच्या जाहिरातीतील प्रसिद्ध चेहऱ्यांची चमक आता विरुन गेली आहे.
विमानतळ परिसराच्या पल्याड एक परिसर आहे जो तालिबान सत्तेत आल्यानंतर पूर्णत: बदलून गेला आहे.
काबूलमध्ये महिलांना सांगितलं जात आहे की तुमची नोकरी पुरुषांना देऊन टाका. असं बोलणं ऐकायला चक्रावून टाकू शकतं. पण त्याचे परिणाम अधिक गहिरे असू शकतात.
एका महिलेने मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर लिहिलं की, त्यांना असं वाटतं की मी माझी नोकरी भावाला द्यावी.
एका दुसऱ्या महिलेने सांगितलं की, आम्ही आमच्या गुणवत्तेच्या बळावर ही नोकरी मिळवली आहे. आम्ही नोकरी सोडली तर आमच्यावर अन्याय झाल्यासारखंच आहे.
मी अफगाणिस्तानच्या वित्त मंत्रालयाच्या काही जुन्या आणि वरिष्ठ नोकरशहांबरोबर बसून चर्चा केली. त्यांनीही आपल्या भावना मांडल्या. त्या 60हून अधिक महिलांच्या गटाचा भाग आहेत. त्यापैकी काही महिला अफगाणिस्तानच्या महसूल संचालनालयाशी संलग्न आहेत. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये त्यांना कामावरून निघून जाण्याचा आदेश देण्यात आला. त्यानंतर त्या गटाच्या भाग बनल्या.
तालिबानच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं, तुम्ही तुमच्या पुरुष नातेवाईकांना सीव्ही पाठवायला सांगा. ते नोकरीसाठी अर्ज करू शकतात.
'आम्ही आमची ओळख गमावत आहोत'
एका महिलेने सांगितलं की, "ही माझी नोकरी आहे. या गटातल्या बाकी महिलांप्रमाणे ही महिलाही नाव गुप्त राहावं अशी विनंती करतात.
ही नोकरी मिळवण्यासाठी मी 17 वर्ष अनेक अडचणींचा सामना करत काम केलं. मी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. आता सगळं संपलं आहे."
अफगाणिस्तान महसूल संचालनालयाच्या माजी महासंचालक अमीना अहमदी यांनी अफगाणिस्तानच्या बाहेरून आमच्याशी संवाद साधला. त्या अफगाणिस्तान सोडण्यात यशस्वी ठरल्या. पण हे करूनही त्यांच्या अडचणी संपलेल्या नाहीत. आम्ही आमची ओळख गमावत आहोत. आमची ओळख तेव्हाच राहिल जेव्हा आमची मातृभूमी सुरक्षित असेल.
नोकरी ओळखीतल्या पुरुषाला द्या, असं ऐकावं लागणाऱ्या महिलांनी एकत्र येत आपल्या गटाचं नावही ठेवलं- वूमन लीडर्स ऑफ अफगाणिस्तान. हे नाव त्यांना मजबूत करतं. या महिलांना स्वत:ची नोकरी हवी आहे.
आंतरराष्ट्रीय समुदाय असताना उपस्थिती
दोन दशकं अफगाणिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय समुदायाची उपस्थिती असताना या महिलांनी गुणवत्तेच्या बळावर स्वत:चं स्थान पटकावलं. शिक्षण घेतलं, नोकरी मिळवली. पण तालिबान पुन्हा सत्तेत आल्यानंतर तो काळ इतिहासाचा भाग बनून राहिला आहे.
महिला अजूनही काम करत असल्याचं तालिबानने म्हटलं आहे. पण ज्या महिला काम करत आहेत त्या प्रामुख्याने मेडिकल स्टाफ, शिक्षक, विमानतळावर सुरक्षा यंत्रणांमध्ये काम करत आहेत. अशा ठिकाणी महिलांचं येणं जाणं जास्त असतं.

फोटो स्रोत, JACK GARLAND
महिला कर्मचाऱ्यांना नियमित पगार दिला जात असल्याचं तालिबानने म्हटलं आहे. भलेही त्यांच्या पगाराचा मामुली हिस्सा का असेना.
एक वेळ होती जेव्हा अफगाणिस्तान सरकारमधल्या सरकारी नोकऱ्यांपैकी एक चर्तुथांश महिला कर्मचारी होत्या. एका माजी सरकारी कर्मचाऱ्याने मला सांगितलं की, तालिबानच्या सुरक्षारक्षकाने त्यांना कसं रोखलं ते सांगितलं.
तालिबानच्या सुरक्षारक्षकाने हिजाबवरून त्यांना रोखलं होतं. त्यांच्यावर टीका केली होती. त्यांचे कपडे संपूर्ण शरीर झाकणारे होते.
महिलेने सुरक्षारक्षकाला उत्तर दिलं. हिजाबव्यतिरिक्त तुमच्याकडे सोडवावे असे अनेक प्रश्न आहेत. इस्लामच्या मर्यादांमध्ये राहून अधिकारासाठी महिलेने आवाज उठवण्याचा हा पहिलाच प्रसंग होता.
गोरच्या ग्रामीण भागात दुष्काळाची भीती
अफगाणिस्तानच्या या दूरच्या भागात निसर्गाची मुक्त उधळण आहे. उन्हाळ्यातल्या गव्हाच्या लोंब्यांचा गंध दरवळतो आहे. हंबरणाऱ्या गाईंचा आवाज आसमंतात ऐकू येत आहे. 18वर्षीय नूर मोहम्मद आणि 25 वर्षीय अहमद दोघेही उरलेल्या गव्हाची कापणी करण्यासाठी हातातील हत्यारांसह सज्ज आहेत.
नूर सांगतो की, दुष्काळामुळे यंदा गव्हाचं उत्पादन कमी झालं आहे. या युवा मंडळींच्या चेहऱ्यावर घाम आणि धूळ दोन्ही आहे. पण माझ्याकडे करण्यासारखं हे एकच काम राहिलं आहे.
आमच्या मागे शेतीच होती जिथलं पिकांची कापणी झाली होती. 160 रुपयांच्या मजुरीसाठी ते जीव तोडून मेहनत करत होते.
नूरने सांगितलं, "मी इलेक्ट्रॉनिक इंजिनियरिंगचा अभ्यास करत होतो. पण कुटुंबाच्या मदतीसाठी मला शिक्षण सोडावं लागलं."

फोटो स्रोत, JACK GARLAND
त्यांची निराशा शब्दातून प्रतीत होत होती. अहमदच्या कहाणीतही तेवढंच दु:ख आहे. त्याने सांगितलं, इराणला जाण्यासाठी मी माझी बाईक विकली. पण मला काम मिळालं नाही.
अफगाणिस्तानल्या मागास भागात राहणाऱ्या मंडळींना इराणमध्ये काम मिळतं. पण सध्या तिथेही परिस्थिती तंग आहे.
नूर यांनी सांगितलं की, आम्ही तालिबानी बंधूंचं स्वागत केलं. आम्हाला असं सरकार हवंय जे नोकऱ्या देईल.
गरिबी, खराब रस्ते, रुग्णालयांची कमतरता
त्यादिवशी सकाळी आम्ही लाकडी टेबलाशी बसलो होतो. त्या टेबलवर गोर प्रांताचे तालिबान गव्हर्नर अहमद शाह दीन दोस्त आणि प्रांतीय कॅबिनेटचे
युद्धकाळात अहमद शाह दीन दोस्त विरोधी पक्षात होते आणि शॅडो डेप्युटी गव्हर्नरच्या भूमिकेत होते. भारीभक्कम आवाजात त्यांनी चिंता व्यक्त केली. गरिबी, खराब रस्ते, रुग्णालयांची कमतरता, शाळा योग्य पद्धतीने कार्यरत नसल्याबद्दल चिंता व्यक्त केली. या सगळ्या अवस्थेमुळे मी निराश झालो आहे.

फोटो स्रोत, JACK GARLAND
युद्ध संपल्याचा अर्थ इथे मोठ्या प्रमाणावर मदतयंत्रणा काम करत असणार. या वर्षाच्या सुरुवातीला गोर प्रांतात दुष्काळासारखी परिस्थिती होती.
गव्हर्नर अहमद शाह दीन दोस्त यांच्यासाठी युद्ध अद्याप संपलेलं नाही. अमेरिकेच्या फौजांनी मला अटक केली होती आणि त्रासही दिला.
गरिबी आणि दुष्काळ हेही आव्हान
गव्हर्नर जोर देऊन सांगतात, "आम्हाला आता आणखी त्रास नकोय. आम्हाला पाश्चिमात्य देशांकडून मदत नकोय. पश्चिमेकडील देश आमच्या देशातील प्रकरणांमध्ये हस्तक्षेप का करतात? आम्ही त्यांना विचारतो का ते घरातील महिला किंवा पुरुषांबरोबर कसं वर्तन करतात?"
आम्ही एका शाळेला आणि क्लिनिकला भेट दिली. या क्लिनिकमध्ये कुपोषणाची शिकार ठरलेल्या रुग्णांवर उपचार होतात. गव्हर्नर अहमद शाह दीन दोस्त यांची माणसंही होती.
तालिबानचे आणि सुशिक्षित युवा आरोग्य संचालक अब्दुल सत्तार मफाक सांगतात की, अफगाणिस्तानकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
त्यांचा दृष्टिकोन व्यावहारिक वाटत होता. लोकांचं आयुष्य सुरक्षित करण्याची गरज आहे. यात राजकारण आणण्याची आवश्यकता नाही.
गव्हाच्या शेतात नूर मोहम्मद म्हणाला होता, गरिबी आणि दुष्काळ हेही एक युद्धच आहे आणि बंदुकीने लढलं जाणाऱ्या युद्धापेक्षा त्याची व्याप्ती मोठी आहे.
हेरातच्या सोहैलाची कहाणी
18 वर्षांची सोहैला उत्साहात होती. बेसमेंटच्या दिशेने जाणाऱ्या अंधाऱ्या शिड्यांवरून मी तिच्या मागे मागे जात होते. आम्ही हेरातमधल्या केवळ महिलांसाठीच्या बाजारात जात होतो.
हेरात अफगाणिस्तानच्या पश्चिमेकडील भागात वसलं आहे. हे शहर कधीकाळी खुली संस्कृती, विज्ञान आणि सर्जनशीलतेसाठी ओळखलं जातं. तालिबानने गेल्यावर्षी हे मार्केट बंद केलं.
तेव्हापासून आज पहिल्यांदा हा बाजार खुला झाला होता. सोहैलाच्या कुटुंबाचं दुकान आम्ही पाहिलं. दुकानाच्या सुरुवातीच्या भागात काचेचं आच्छादन होतं. काचेपल्याड शिलाई मशीनं दिसत होती.
हृदयाच्या आकाराचे लाल रंगाचे फुगे टांगलेले होते. सोहैलाने सांगितलं की, दहा वर्षांपूर्वी माझ्या बहिणीने हे दुकान सुरू केलं. तेव्हा मी 18 वर्षांची होते.
त्यांची आई आणि आजी पारंपारिक पद्धतीचे ड्रेस शिवत असत. त्यांच्या बहिणीने एक इंटरनेट क्लब आणि रेस्तराँही सुरू केलं.
केवळ महिलांसाठी असणाऱ्या याठिकाणी महिलांचा राबता असे. काही महिला आपली दुकानं सजवत होत्या. काही एकमेकींशी बोलत होत्या. काही खरेदीत मश्गुल होत्या.
तालिबानने शाळा बंद केल्या आहेत
त्याठिकाणी साफसफाईची अवस्था खराब होती. पण तरी इथे महिलांसाठी आशेचा किरण डोकावतो आहे. त्यांनी प्रदीर्घ काळ घराच्या भिंतीआड घालवला आहे.
सोहैलाकडे सांगण्यासारखी आणखी एक गोष्ट आहे. तिने सांगितलं की तालिबानने शाळा बंद केल्या आहेत. तिच्यासारख्या महत्त्वाकांक्षी मुलीसाठी याचे दूरगामी परिणाम होणार आहेत.

फोटो स्रोत, JACK GARLAND
तालिबानच्या मोठ्या मौलवींच्या आदेशानंतर बहुतांश शाळा बंद करण्यात आल्या आहेत. पण अनेक अफगाणिस्तानांनी ज्यात तालिबानच्या लोकांचाही समावेश आहे, त्यांनी शाळा पुन्हा सुरू करण्याचं आवाहन केलं आहे.
सोहैला सांगते, "मी बारावीत शिकते आहे. मी पास झाले नाही तर विद्यापीठात जाऊ शकत नाही. तुला जे करायचं आहे ते तू अफगाणिस्तानमध्ये शक्य होईल का? असं मी विचारलं. हो असं सौहेलाने सांगितलं. हा माझा देश आहे, मी अन्य कुठे जाऊ इच्छित नाही."
पण शाळेविना गेलेले वर्ष त्या सगळ्याजणींसाठी कठीण आहे. सोहैला सांगते, की हे केवळ माझ्यापुरतं नाहीये. अफगाणिस्तानमधल्या सगळ्या मुलींबरोबर हे घडतं आहे. या आठवणी उदास करणाऱ्या आहेत.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








