‘अफगाणिस्तानात गेले आणि मला अन्नाच्या प्रत्येक कणाची किंमत कळली’

- Author, योगिता लिमये
- Role, बीबीसी प्रतिनिधी
2021 या वर्षाने काहींचं सर्वस्व हिरावून घेतलं तर काहींना नवं आयुष्य दिलं. जगभरात कोव्हिडने माजवलेला हाहाःकार, चक्रीवादळं, महापूर, युद्ध... असं सगळं घडत असताना दुसरीकडे मदतीसाठी हातही पुढे येत होते. त्यांतून अनेकांना आत्मभान आलं, अनेकांच्या जगण्याचे आयाम बदलले. बीबीसी मराठीवर पाहूया अशा काही लोकांच्या कहाण्या, ज्यांचं आयुष्यच या वर्षाने बदलून टाकलं.
अफगाणिस्तानात जे झालं ते यावर्षी संपूर्ण जगाने पाहिलं. याआधी मी अनेकदा अशा घटना अनेक देशातून कव्हर केल्या आहेत. मात्र अफगाणिस्तानात जे झालं ते अभूतपूर्व होतं.
तिथले अनेक प्रसंग माझ्या मनावर कायमचे कोरले गेले आणि मी ते कधीही विसरू शकत नाही. तिथे आम्ही लोकांना अन्नाच्या एकेक कणासाठी मरताना पाहिलं. त्यांना अन्न मिळालं नाही तर ते तडफडून मरतील असं वाटण्याचे अनेक प्रसंग तिथे मी अनुभवले.
विशेषत: जगात अनेक संपन्न भूभाग आहेत. तिथे लोकांना खायला द्यायला अन्न आहे अशा परिस्थितीत तिथली वेदना मी अधिक तीव्रतेने अनुभवली. आता या लोकांना खायला मिळालं नाही तर काय होईल या विचाराने मी कितीदा तरी अस्वस्थ झाले.
अफगाणिस्तानातल्या हॉस्पिटलमध्ये आम्ही लहान मुलं पाहिली. त्यांच्या छातीचा पिंजरा बाहेर आला होता. अन्नाचा तुटवडा असलेले अनेक भाग दक्षिण आशियात आहेत. मी अनेक बातम्याही तिथून कव्हर केल्या आहेत. मात्र अफगाणिस्तानात जे पाहिलं ते शब्दात मावणं कठीण.
काबूल कोसळण्यापूर्वीची एक घटना आहे. तिथे होणाऱ्या हिंसाचारामुळे अनेक लोकांना एका छावणीत ठेवण्यात आलं होतं. तिथे कोणीतरी खाद्यपदार्थ वाटायला आला होता.
एका ब्रेडसाठी लोकांच्या अक्षरश: उड्या पडत होत्या. अफगाणिस्तानातले लोक अतिशय सुसंस्कृत आहेत. अगदी एखादा गरीब व्यक्तीसुद्धा जेव्हा अगदी घराबाहेर पडतो तेव्हा तो अगदी नीटनेटका होऊन बाहेर पडतो. त्यामुळे या लोकांना असं पाहणं अतिशय वेदनादायी होतं.
तिथून परत आले आणि अन्नाच्या प्रत्येक कणाची किंमत मला कळली. आता मी एक कणही अन्न वाया घालवत नाही. कधी अशी वेळ आलीच तर मला भूकेने तडफडणारे अफगाणी लोक आठवतात. माझ्या पोटात जाणाऱ्या अन्नाच्या प्रत्येक कणासाठी मी स्वत:ला नशीबवान मानते. हा या वर्षांतला सगळ्यात मोठा धडा मी शिकले.
स्त्री शिक्षण आणि अफगाणिस्तान
सध्या अफगाणिस्तानात मुलींना शिकण्याची परवानगी नाही. काही भागात शाळा चालू आहेत. मात्र माध्यमिक शाळेत जायची मुलींना परवानगी नाही. कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर अगदी जिथे अत्यावश्यक आहे तिथेच बायकांना काम करण्याची परवानगी आहे.
तिथे मी एका 17 वर्षांच्या मुलीला भेटले. ती मला सांगत होती की 11 वर्षं ती वेगवेगळ्या प्रकारचे धोके पत्करून शाळेत गेली. तिचे वडील भाजी विकायचं काम होतं आणि तिला डॉक्टर होण्याची इच्छा होती.
त्यांची परिस्थिती बेताची होती. त्यामुळे डॉक्टर होऊन या सगळ्यातून बाहेर पडण्याची तिची इच्छा होती. एके दिवशी हे सगळं धुळीला मिळालं.
हा सगळा संवाद सुरू असताना ती सतत रडत होती. तेव्हा मी माझा विचार केला. माझ्या कुटुंबीयांना शिक्षणाचं अमाप महत्त्व होतं आणि आहे.
चांगलं शिक्षण घेऊन एखादी चांगली नोकरी मिळवणं यासाठीच आम्ही झगडलो. मात्र अशा पद्धतीने एखाद्याचं विश्व अशा प्रकारे हिरावून नेणं कसं असेल हे मला कळलं.

स्त्रियांचे अधिकार आणि शिक्षण यांच्याबाबतीत जागतिक पातळीवरही किती अनास्था आहे याचा अनुभव मला अनेकदा आला आहे. या अनुभवाने स्त्री शिक्षणाबद्दल असणारी उदासीनता आणखीच अधोरेखित झाली.
आपल्याला जे सहज मिळालंय त्याबद्दल आपण फारसा विचार करत नाही पण त्या मुलीला पाहिलं आणि आपल्या पदरात जे पडलंय त्यासाठी माझ्या आईवडिलांचे मनोमन आभार मानले.
अफगाणिस्तानात बसलेला आणखी एक धक्का म्हणजे दानिश सिद्दीकीचा दुर्देवी मृत्यू. दानिश आणि मी अगदी मित्र नसलो तरी एकमेकांना ओळखत होतो. एकमेकांचं काम बघत होतो.
अफगाणिस्तानचं प्रकरण झालं तेव्हा काबूलला जाताना एकाच विमानात होतो. तिथे आमचं बोलणं झालं होतं. नंतर आम्ही वेगवेगळ्या भागात वार्तांकन करत होतो. दानिशने धैर्य दाखवलं ते मला खरंच दाखवता आलं नसतं हे मी प्रांजळपणे कबूल करते. त्याचं काम अतुलनीय होतं.
अफगाणिस्तानात काय किंवा कोव्हिडच्या काळात त्याने काढलेले फोटो हृदय पिळवटून काढणारे होते. हे सगळं लिहित असतानाही मला ते फोटो आठवताहेत आणि अंगावर काटा येतोय. पण शेवटी आपलं काम चालू ठेवणं जास्त महत्त्वाचं असतं.
मी माझी अफगाणिस्तानची असाईनमेंट आटोपून जेव्हा दिल्लीत परतले तेव्हा विमानात बसताना दानिशची आठवण झाली. आयुष्य किती क्षणभंगूर असू शकतं याचा प्रत्यय मला पुन्हा आला आणि त्याच मनोवस्थेत मी भारतात परतले.
अफगाणिस्तान च्या घटनाक्रमामुळे मी अंतर्बाह्य बदलले. वर उल्लेख केल्याप्रमाणे अन्नाची किंमत तर कळलीच कळली मात्र जगण्याचे अनेक पैलू नव्याने कळले.
कोव्हिड कव्हरेज आणि मी
अफगाणिस्तानात जाण्याच्या आधी मी कोव्हिडच्या दुसऱ्या लाटेचंही वार्तांकन केलं. दिल्लीत मी जे पाहिलं ते अविश्वसनीय होतं. तो काळ खडतर होतां. लोकांना वेदनेत विव्हळताना पाहतानाचा अनुभव बरंच काही शिकवणारा होता. मात्र हे करत असताना माझी टीम माझ्याबरोबर होती.
जेव्हा अशा घटनांचं वार्तांकन करतो तेव्हा आपल्या टीमममधले सदस्य आपल्याबरोबर असतात. अशा परिस्थितीतही स्वत:ला काही काळ आनंदात ठेवण्याचे मार्ग शोधले जातात तसे मीही ते शोधले.
कोव्हिडची दुसरी लाट सुरू असताना माझ्या वैयक्तिक आयुष्यातही सुख दु:खाच्या अनेक लाटा आल्या. माझे वडील खूप आजारी पडले, माझे अनेक जवळचे लोक कोव्हिडने गेले.
अशा परिस्थितीत हे वार्तांकन करणं अतिशय आव्हानात्मक होतं पण मी ते केलं. करण्यावाचून पर्यायही नव्हता.

अशा कठीण प्रसंगातून जेव्हा मी परत येते तेव्हा माझी एक विचित्र मन:स्थिती असते. मी चटकन लोकांशी मोकळेपणी वागू शकत नाही. मला स्वत:चा वेळ हवा असतो. त्यावेळी मला टीव्हीसमोर बसून राहण्याची इच्छा होते.
काहीतरी हलकंफुलकं पाहून माझं मन रमवते, त्यात दु:खद प्रसंगातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करते. हे सगळं माझ्या घरच्यांनाही कळतं. त्यामुळे ते लगेच माझ्या अवतीभोवती येऊन सगळं विचारत बसत नाही. मला माझा वेळ देतात आणि मग मला बाहेर येण्याचं बळ मिळतं.
पुढच्या वर्षांत हे सगळं संपावं आणि पुन्हा अशा प्रकारचं वार्तांकन करायची वेळ येऊ नये अशीच मी प्रार्थना करते.
(शब्दांकन- रोहन नामजोशी)
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









