तुपाला पृथ्वीवरील सर्वांत शुद्ध खाण्याचा पदार्थ असं का म्हटलं गेलं?

    • Author, आयेशा इम्तियाझ
    • Role, बीबीसी ट्रॅव्हल

तूप म्हटलं की तुम्हाला काय आठवतं? गरमागरम पूरणपोळ्या किंवा उकडीचे मोदक आणि त्यावर साजूक तूप.

साजूक तूप केवळ महाराष्ट्रियन लोकांसाठीच नाही तर इतर अनेक भारतीयांसाठी जीव की प्राणच आहे पण गेल्या काही वर्षांत तुपाची लोकप्रियता कमी झाली होती पण आता हळुहळू तूप पुन्हा लोकप्रिय होताना दिसत आहे.

काटला मासा आणि भात, किंवा मग फयाना भात किंवा मॅश पोटॅटो डिश, की मग साधी मुगाची खिचडी...या सर्वांना अधिक लज्जत येते ती चांगल्या तुपाच्या जोडीने. तुपाशिवाय बंगाली जेवण अपूर्णच केवळ बंगालीच काय कोणतेही पारंपरिक भारतीय जेवण हे तुपाशिवाय अपूर्णच म्हणावे लागेल.

पण अलीकडच्या काळात तुपाविषयचीचं हे प्रेम कमी झालेलं दिसलं, अशी खंत कल्याण कर्माकर व्यक्त करताना दिसतात. त्याचे कारण म्हणजे तूप हे आरोग्यासाठी चांगलं नसतं असं ऐकतच आमची पिढी मोठी झाली असं कर्माकर सांगतात.

ते पुढे सांगतात की, "आज पृथ्वीवर सर्वांत शुद्ध अन्न कोणतं असेल तर ते तूप आहे."

हजारो वर्षांपासून तूप हा भारतीय उपखंडातील आहाराचा मुख्य भाग आहे. पण गेल्या काही वर्षांत मात्र लोक तूप खाणं टाळत होते. याचं कारण म्हणजे तुपात सॅच्युरेटेड फॅट मोठ्या प्रमाणात असतात आणि त्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते ही भीती. पण आता पुन्हा अनेक जण आपल्या आहारात तुपाचा समावेश करून घेताना दिसत आहेत.

गेल्या काही दिवसांत असं काय घडलं ज्यामुळे भारतीय लोकांमध्ये पुन्हा तूप लोकप्रिय होऊ लागले आहे या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा कर्माकर प्रयत्न करतात.

'जुनं ते सोनं' असं म्हटलं जातं आणि त्याचाच प्रत्यय आता आहाराबाबत होताना दिसत असल्याचं एक चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून लोकांमध्ये आहाराविषयी नवा दृष्टिकोन तयार होत आहे आणि कोरोनाच्या काळात याला एक गती मिळाली.

कोरोनाच्या काळात 'स्लो फूड'ची मागणी वाढली. तूप तर अगदी तसेच आहे आणि महत्त्वाचे म्हणजे भारतीय संस्कृतीचे आणि तुपाचे नाते अतूट आहे.

नितीन आहिर हे गुजरातच्यासूरतमध्ये डेअरी फार्मिंग आणि सेंद्रीय शेतीचा व्यवसाय करतात. व्यावसायिक स्तरावर तूप करण्यासाठी बहुतेक जण संकरित गायींचा वापर करताना दिसतात. पण आहिर हे गीर गायींच्या दुधापासून बनलेल्या तुपाची विक्री करतात. म्हणूनच त्यांच्या संस्थेचे नाव गीर ऑर्गॅनिक असे आहे.

त्यांच्याकडे तयार होणारे तूप हे ए-2 प्रकारचे असून पारंपरिक पद्धतीचा रवी वापरून हे तयार केलं जातं. फक्त फरक इतकाच आहे की रवी हाताने फिरवला जातो या ठिकाणी मोटार वापरली जाते.

कोरोनाच्या साथीनंतर तुपाची मागणी 25-30 टक्क्यांनी वाढल्याचं आहिर सांगतात.

भारतातलं हवामान उष्ण असतं, या ठिकाणी लोणी किती दिवस राहील हे सांगता येणार नाही त्यामुळे मंद आचेवर लोणी वितळवून तूप करण्याची पद्धत भारतात विकसित झाली.

भारतात तूप हा लोकप्रिय प्रकार तर आहेच पण त्याचबरोबर श्रद्धेशीही तुपाची सांगड घातली जाते.

उपासनेसाठी पवित्र, वेदांमध्ये देखील वर्णन

तुपाच्या पावित्र्याबद्दल लेखिका आणि इतिहासकार पृथा सेन सांगतात, "तूप हे दुधाचं शेवटचं आणि शुद्ध स्वरूप आहे. ते पूजेसाठी सर्वात पवित्र मानलं जातं. असं म्हटलं जातं की तुपासोबत पूजा केल्याने तुमची प्रार्थना ईश्वरापर्यंत पोहोचते, अशी मान्यता आहे."

फीस्ट अँड फास्ट्सः अ हिस्ट्री ऑफ फूड इन इंडियाच्या लेखिका तसेच भारतीय खाद्य परंपरेच्या इतिहासकार कॉलीन टेलर सेन सांगतात की, "4000 वर्षांपूर्वीच्या ऋग्वेदातही तुपाची स्तुती करण्यात आली आहे."

"पौराणिक कथांनुसार, वैदिक काळातील देवता प्रजापती दक्ष यांनी आपल्या दोन्ही हात चोळून पहिल्यांदा तुपाची निर्मिती केली. ते तूप अग्नीत टाकून त्यांनी आपल्या मुलांची निर्मिती केली."

तुपाचा भारतीय संस्कृतीशी अतूट संबंध आहे. हिंदू परंपरेनुसार विवाह असो वा अंत्यसंस्कार वा इतर कोणत्याही समारंभ प्रसंगी अग्नीत तूप अर्पण केलं जातं. कारण असं करणं शुभ मानलं जातं.

भारतीय पारंपारिक औषध प्रणाली आयुर्वेदातही तुपाचा रामबाण औषध म्हणून उल्लेख करण्यात आलाय. त्याच्या पौष्टिक गुणधर्मांमुळे पिढ्या दरपिढ्या आपली आजी आपल्या आईने तुपाला आपल्या घरात स्थान दिलंय.

घरगुती तुपावर भर

बॉंग मॉम्स कुकबुकच्या लेखिका आणि अमेरिकन खाद्य संस्कृतीच्या लेखिका संदीपा मुखर्जी दत्ता जेव्हा आपल्या मुलांसाठी स्निग्ध पदार्थ निवडतात तेव्हा ते तूपचं असावं असा त्यांचा आग्रह असतो. त्या म्हणतात, "तुपात असणाऱ्या गुणामुळे हाडांना ताकद मिळते आणि मेंदूला चालना मिळते सोबतच जीवनसत्त्वेही मिळतात."

त्यांची आई तर त्यांच्या ही एक पाऊल पुढं आहे, त्या तर घरी बनवलेल्या तूपाचा आग्रह धरतात.

संदीपा सांगतात, "माझी आई घरात बनवलेलं तूप एका छोट्या डब्यात साठवते. आणि कोणी जर परदेशात येत असेल तर त्यांच्याकरवी ते माझ्या मुलींसाठी पाठवून देते. त्या तुपाची शुद्धता आणि चव अवर्णनीय असते."

त्या सांगतात, "ओट्स सारखा नाश्ता येण्याआधी, प्रत्येक बंगाली कुटुंबात शाळेत जाणाऱ्या मुलांना घी-आलू सिधो-भात (तुपात शिजवलेला आलू भात) खायला लावायचे. मुलांना दिवसभरात पौष्टिक आणि संतुलित आहार मिळावा या उद्देशाने घी-आलू सिधो-भाताचं महत्व तेव्हाच्या मातांनी मानलेलं होतं."

मात्र मागच्या काही दशकांत सॅच्युरेटेड फॅट आरोग्यासाठी हानिकारक असल्याचा दावा करण्यात आला. तेव्हापासून तुपाच्या वापरावर लक्षणीय परिणाम झाला. तुपात 50 ते 70% सॅच्युरेटेड फॅट असतं. त्यामुळे भारतीय घरांमध्ये तुपाचा वापर मोठ्या प्रमाणावर घटला.

"80 च्या दशकात वनस्पती तेलाचा मोठ्या प्रमाणावर प्रचार आणि प्रसार करण्यात आला. साहजिकच जेवणाच्या ताटातून तूप गायब व्हायला लागलं."

"पाश्चात्य आणि शहरी संस्कृतींच्या आगमनाने भारतीय लोक आपल्या पारंपारिक आहाराकडे दुर्लक्ष करू लागले. यथावकाश आपल्या ताटातील सर्वच अन्न वनस्पती तेलात शिजवलं जाऊ लागलं." त्यामुळे तुपाचा वापर कमी होत गेला.

लोकांना फरक कळू लागला आहे

मास्टरशेफ इंडियाचे जज, सेलिब्रेटी शेफ, लेखक, रेस्टॉरंटचे मालक रणवीर ब्रार सांगतात, "80 च्या दशकानंतर चर्चा व्हायची की, जेवणाच्या ताटातून खलनायक ठरलेल्या सॅच्युरेटेड फॅट्सला बाहेर कसं काढायचं. पण आपलं नशीब बलवत्तर आहे, लोकांना आता फॅट्स आणि कोलेस्ट्रॉलबद्दल फरक कळायला लागला आहे."

आजही तज्ज्ञ सांगतात की उच्च चरबीयुक्त पदार्थ खाऊ नये. मात्र त्यांच्यापैकी काहींनी आता सॅच्युरेटेड फॅट्सविषयीची थोडी नरमाईची भूमिका घेतली आहे.

तसेच, किटोडाएटच्या वाढत्या ट्रेंडमुळे अमेरिकेसारख्या देशांमध्येही तुपाची लोकप्रियता वाढली आहे.

मात्र, पाश्चिमात्य देश तुपाच्या आवडीनिवडी बाबत चुकू शकतात. पण लोण्यापेक्षा जास्त तापमान सहन करण्याच्या क्षमतेबद्दल तुपाचं कौतुक करण्यात हे लोक मागे पडत नाहीत.

ब्रार यांच्या म्हणण्यानुसार, "अन्नपदार्थ तुपात शिजवण्याचा उद्देश तुमच्या अन्नपदार्थांची चव वाढवणे हा आहे."

ते म्हणतात, "असं असूनही भारतात तूप मोठ्या प्रमाणात वापरलं जात नाही. उलट अन्न संतुलित आणि चविष्ट बनवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. हे अन्न खाणाऱ्याच्या तोंडात एक चव रेंगाळते. प्रत्येक घासात त्याची चव मिसळलेली असते."

ब्रार सांगतात, "हिवाळ्याच्या दिवसात तुम्ही जी डाळ करता त्यात किंवा कोरमा नाहीतर सूपमध्ये तुपाचा वापर करून पाहा. तुम्हाला त्याच्या चवीचं एवढं व्यसन लागेल की भविष्यात तूप तुमच्या पदार्थांचा एक अतिशय महत्त्वाचा भाग बनून जाईल."

इंडियन एसेंटचे पाककला संचालक मनीष मल्होत्रा सांगतात की, मागच्या 22 वर्षांपासून तूप त्यांच्या पाककृतीचा अविभाज्य भाग आहे. मल्होत्रांची सिग्नेचर डिश म्हणजे तुपात परतलेली मटण बोटी. ते म्हणतात की ही डिश इथं सर्वाधिक विकली जाणारी डिश आहे.

मुंबईतील एका रेस्टॉरंटच्या शेफ निकिता राव आपली प्रत्येक डिश एका विशिष्ट पद्धतीने शिजवतात. मग ते सॅलड असो वा रेशम पट्टी चिली, तुपाच्या फोडणीमुळे त्याला एक वेगळी चव मिळते असं त्या सांगतात. त्या म्हणतात की, सॅलडमध्ये तुपाचा वापर 10 टक्क्यांपेक्षा कमी असतो. पण लोकांना त्याची फोडणी जास्तच आवडते आणि म्हशीच्या दुधापासून तयार केलेल्या तुपामुळे तर रेसिपी आणखीनच चवदार बनते.

ब्रार शेवटी सांगतात, "तुपाला भारतीय अस्मितेची जोड आहे. हा अन्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सर्वांना एकत्र ठेवतो, सर्वसमावेशक आणि संतुलित असतो. जेव्हा आपल्याला खर्‍या अर्थाने तुपाची समज येईल तेव्हा निश्चितपणे चांगल्या गोष्टी घडतील."

ब्रार यांच्या किचनमध्ये जो स्टोव्ह आहे त्याच्यापासून एक हाताच्या अंतरावर तुपाची बरणी कायम ठेवलेली असते.

त्याबद्दल ते सांगतात, "मी माझ्या आजीच्या पदराला धरून आणि घरभर दरवाळणाऱ्या तुपाच्या सुगंधासोबत मोठा झालोय. त्यामुळे जेव्हा मी माझ्या डिशमध्ये तूप घालतो तेव्हा ते फक्त फॅट नसतं. यासोबतच मी माझ्या बालपणाची आठवण देखील त्यासोबत असते."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)