You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'या' साप आणि बेडकांमुळे जगाचं 16 अब्ज डॉलरचं आर्थिक नुकसान
जगभरात काही आक्रमक प्रजातीच्या कीटकांमुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागतं. पण शास्त्रज्ञांनी दोन अशा प्रजाती शोधून काढल्या आहेत ज्यांनी सर्वात जास्त पर्यावरणीय हानी केली आहे.
यात आहे अमेरिकन बुलफ्रॉग आणि ब्राऊन ट्री स्नेक. या दोन प्रजातींनी जगातील पातळीवर 1986 पासून 16.3 अब्ज अमेरिकन डॉलर्सचं नुकसान केलं आहे.
पर्यावरणीय हानी व्यतिरिक्त या आक्रमक जोडगळीने शेतातील पिकांची नासाडी केली आहे. तसेच वीजपुरवठा खंडित होण्यामागेही यांचा सहभाग आहे.
संशोधकांना अशी आशा आहे की, त्यांच्या या निष्कर्षांमुळे भविष्यात आक्रमक प्रजातींना रोखण्यासाठी प्रयत्न केले जातील.
आपल्या सायंटिफिक रिपोर्ट शास्त्रज्ञ असं नमूद करतात की, ब्राऊन ट्री स्नेक प्रजाती अर्थात तपकिरी रंगाच्या सापाच्या प्रजातीने आजअखेर 1030 कोटी यूएस डॉलरचं नुकसान केलं आहे. पॅसिफिक बेटांवर या सापांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
मागच्या शतकात गुआममध्ये असलेल्या अमेरिकन नौदलाने या प्रजातीतील साप चुकून आणला. या सापांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली.
हे साप विजेच्या तारांवर सरपटतात त्यामुळे वीजपुरवठा सातत्याने खंडित होतो, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं.
लहानशा पॅसिफिक बेटावर 20 लाख ब्राऊन ट्री स्नेक आहेत. एका अंदाजानुसार गुआमच्या जंगलात प्रतीएकर 20 साप आढळतात.
बेटांसारखी इकोसिस्टम आक्रमक प्रजातींच्या वाढीसाठी अधिक असुरक्षित असल्याचं मानलं जातं. त्यांच्यामुळे तेथील मूळ प्राणी आणि जीवजंतूंना धोका निर्माण होतो.
युरोपमध्ये अमेरिकन बुलफ्रॉग्सची संख्या स्फोटक पद्धतीने वाढली आहे. ही संख्या आटोक्यात आणण्यासाठी महत्त्वाकांक्षी आणि खर्चिक व्यवस्थापन कार्यक्रम आवश्यक आहेत.
हे अमेरिकन बुलफ्रॉग्स 30 सेमी (12 इंच) लांब आणि वजनाला अर्धा किलोच्या आसपास असतात. त्यांचा प्रसार रोखण्यासाठी अधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रजनन स्थळांभोवती महागडे फ्रॉग-प्रूफ कुंपण बसविले आहे.
या रिसर्च मध्ये म्हटल्याप्रमाणे, हे बेडूक पळून जाऊ नयेत यासाठी फक्त पाच तलावांवर कुंपण घालण्यासाठी जर्मन अधिकार्यांना 2,70,000 पौंड खर्च करावा लागला.
हे बुलफ्रॉग जातीचे बेडूक इतर प्राण्यांसाहित त्यांच्याच जातीतले बेडूकसुद्धा खातात असं या रिसर्चमध्ये म्हटलं आहे.
आता या दोन प्रजाती सोडून कोकी फ्रॉगमुळे ही आर्थिक नुकसान झालं आहे. हा बेडूक मोठ्या आवाजात ओरडतो जेणेकरून त्याचा पार्टनर मेटिंगसाठी येईल. या बेडकांच्या कर्कश्श आवाजामुळे त्या भागात लोकांचं घर घेण्याचं प्रमाण घटलं आहे. थोडक्यात तेथील मालमत्तेच्या किंमतीत घट झाली आहे.
या निष्कर्षांमुळे भविष्यात कीटक नियंत्रण आणि इतर जैवसुरक्षा उपायांमध्ये अधिक गुंतवणूक होईल, अशी आशा संशोधकांना वाटते.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)