शरीराच्या कोणत्या भागावर टॅटू काढणं सर्वात वेदनादायी असतं?

फोटो स्रोत, Getty Images
ब्रिटिश सायन्स आणि बायोलॉजीच्या प्राध्यापक नताली विल्सर यांनी त्यांच्या हातावर अल्बर्ट आइनस्टाईन यांचा टॅटू काढला आहे. त्यांच्या पायावर, मनगटावर आणि घोट्यावरही वेगवेगळ्या डिझाईन्सचे टॅटू काढलेले आहेत.
विल्सर यांच्यासाठी पायाच्या वरचा भागावर आणि घोट्यावर टॅटू काढणं सर्वांत वेदनादायक होतं.
"वेदना हा स्वतःचं रक्षण करण्याचा एक मार्ग आहे आणि नसांमुळे वेदना जाणवतात," असं त्यांनी बीबीसीच्या पॉडकास्ट 'टीच मी लेसन'मध्ये त्यांनी सांगितलं.
त्यांनी पॉडकास्ट सादरकर्ते बेला मॅकी आणि ग्रेग जेम्स यांना सांगितलं, "शरीराच्या ज्या भागात कमी चरबी असते आणि जास्त नसा असतात त्या भागामध्ये टॅटू काढणे सर्वांत वेदनादायी असतं."
विल्सर सांगतात, "पाय आणि घोट्यांव्यतिरिक्त काखेजवळ, खांदे आणि बरगड्यांजवळचा भाग अत्यंत संवेदनशील असतो. असं असलं तरी एखाद्या व्यक्तीच्या शरीरातील कोणता भाग अधिक संवेदनशील आहे, हे त्याच्या शरीरवैशिष्ट्यावर अवलंबून असतं."
"जेव्हा शरीराच्या एखाद्या भागावर टॅटू काढला जात असतो, म्हणजेच सुईनं त्वचेला छिद्र पाडलं जातं, त्यावेळी आपल्या नसा या मेंदूला त्यासंबंधीचा संदेश पोहोचवतात आणि मग वेदना जाणवायला लागतात."
पण हेही समजून घेणं गरजेचं आहे की, एखाद्या व्यक्तीला टॅटू काढताना जेवढा त्रास होतो, तेवढ्याच वेदना दुसऱ्या व्यक्तीलाही जाणवतील असं अजिबात नाही. वेगवेगळ्या लोकांच्या संवेदनशीलतेवर वेदनांचं प्रमाण अवलंबून असतं.
ते पुढे सांगतात की, एखाद्या व्यक्तीची सहन करण्याची क्षमता ही दुसऱ्या व्यक्तीच्या सहनशीलतेपेक्षा वेगळी असू शकते. अशावेळी वेदनांचं प्रमाणही वेगवेगळं असू शकतं.
पहिला टॅटू
टॅटू काढणं हे शतकानुशतके मानवी सभ्यतेचा एक भाग राहिलं आहे. जगाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावाने टॅटू काढण्याची प्रथा आहे. पण जगातील सर्वांत जुना ज्ञात टॅटू उत्झीच्या शरीरावर सापडला, ज्याला हिमपुरुष (आईसमन) असंही संबोधलं जातं.
इटलीच्या आल्प्स प्रदेशातील दुर्गम भागात 1991 मध्ये ही ममी सापडली होती. ती गेल्या 5,000 वर्षांपासून ते बर्फात गाडली गेली होती.
विल्सर सांगतात की, "उत्झीचा टॅटू फारच लहान होता. काही ठिपके जोडून तो तयार करण्यात आला होता. मानववंशशास्त्रज्ञांचा विश्वास आहे की, ते एखाद्या वैद्यकीय हेतूसाठी केलेल्या अॅक्युपंक्चर उपचाराचे लक्षण देखील असू शकतात."

फोटो स्रोत, Getty Images
ते पुढे म्हणतात, "त्या काळी देखील (म्हणजे अश्मयुग आणि धातूयुग) लोकांना टॅटू कसे वापरायचे हे माहित होते आणि लोक ते अगदी योग्य पद्धतीने वापरत असत, यामुळे आश्चर्य वाटतं. "
यानंतर टॅटू हळूहळू कथा सांगण्याचा एक मार्ग बनला.
विल्सर यांच्या मते, "अशी दंतकथा आहे की, कॅप्टन जेम्स कूक 18 व्या शतकाच्या उत्तरार्धात अनेक लोकांना भेटले. प्रशांत महासागरातील प्रवासादरम्यान ते अनेक लोकांना भेटले ज्यांनी टॅटू गोंदवून घेतले होते. त्यांच्या क्रूमधील 90 टक्के सदस्यांनी आपल्या यात्रेसंबंधीच्या आठवणी जिवंत ठेवण्यासाठी टॅटू गोंदवून घेतले होते."

फोटो स्रोत, SOUTHTYROLARCHAEOLOGYMUSEUM\EURAC\M.SAMAD
"ब्रिटिश नौदलाच्या सैनिकांना ही परंपरा वारशाने मिळाली आणि त्यांनी त्यांच्या प्रवासात टॅटू गोंदवायला सुरुवात केली. टॅटू बनवण्यासाठी त्यांनी लघवी आणि बंदुकीच्या दारूचा वापर केला," विल्सर पुढे सांगतात.
19 व्या शतकाच्या उत्तरार्धात टॅटू गोंदववण्याची मशीन अस्तित्वात आली. ती प्रत्यक्षात थॉमस एडिसनच्या प्रिंटरवर आधारलेली होती.
विल्सर सांगतात, "हे प्रिंटर 1875 मध्ये बनवले गेले होते आणि त्या काळापासून आताचं लेटेस्ट मॉडेल येईपर्यंत त्यात फारसा बदल झालेला नाही. त्यातील सुई मिनिटाला 50 ते 3,000 वेळा त्वचेला टोचली जाते."
शरीराचा सर्वांत मोठा भाग
त्वचा शरीराच्या अंतर्गत भागांसाठी आच्छादन म्हणून काम करते. दर 28 दिवसांनी आपली त्वचा पुनरुज्जीवित होते.
अशास्थितीत प्रश्न पडतो की, जर त्वचा पुनरुज्जीवित होते, तर टॅटूचा रंग तसाच का राहतो?
प्राध्यापक विल्सर यांच्या मते, त्वचेचे तीन मुख्य स्तर असतात. एपिडर्मिस बाहेरील बाजूस, डर्मिस म्हणजे मध्यभागातली त्वचा, जिथे रक्तवाहिन्या आणि नसा असतात. तर सर्वांत आतील थर म्हणजे हायपोडर्मिस थर.

फोटो स्रोत, Getty Images
ते सांगतात, "टॅटूची शाई त्वचेच्या त्या भागात टोचली जाते जिथे नसा असतात. टॅटूचा रंग फिका पडत नाही कारण त्याचे एपिडर्मिस या त्वचेच्या स्तराद्वारे रक्षण केले जाते."
"शाई आत त्वचेत घातली जाते तेव्हा नसा मेंदूला दुखापत होत असल्याचा संदेश देतात. यानंतर मेंदू शरीराच्या त्या भागावर लक्ष केंद्रित करतो आणि त्या ठिकाणाचे संरक्षण करण्यासाठी पांढऱ्या रक्तवाहिन्यांना सूचना करतो," असं विल्सर पुढे सांगतात.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








