युकेच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत ऋषी सुनक आघाडीवर, दुसऱ्या फेरीतही पुढे

ऋषी सुनक

फोटो स्रोत, PA Media

बोरिस जॉन्सन यांच्या राजीनाम्यानंतर आता युकेच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांचं नाव आघाडीवर आहे. हुजूर पक्षाच्या अंतर्गत निवडणुकीच्या दुसऱ्या फेरीतही ऋषी सुनक यांनी आघाडी घेतली आहे.

गुरूवारी (14 जुलै) झालेल्या मतदानात अटर्नी जनरल सुएला ब्रेव्हरमन या बाद झाल्यानंतर आता पंतप्रधानपदासाठी पाच उमेदवार उरले आहेत.

सुनक यांना 101 मतं मिळाली आहेत. त्याच्या खालोखाल पेनी मॉरडंट यांना 83 मतं मिळाली आहेत. लिझ ट्रुस 64 मतांसह तिसऱ्या स्थानावर आहेत.

गुरुवारी झालेल्या मतदानानंतर ब्रेव्हरमन यांनी लिझ ट्रुस यांना पाठिंबा जाहीर केला. त्याबरोबरच माजी ब्रेक्झिट मंत्री स्टीव्ह बेकर यांनीही ट्रुस यांनाच पाठिंबा दिली.

ब्रेव्हरमन यांना मतदान करणाऱ्या हुजूर पक्षाचे 27 खासदारही आपलं मत ट्रुस यांच्याच पारड्यात टाकतील, असा बीबीसीचा अंदाज आहे.

केमी बाडनोक यांना 49 आणि टॉम टुगेनडेट यांना 32 मतं मिळाली आहेत.

आता मतदानाची पुढची फेरी ही सोमवारी (18 जुलै) पार पडेल. यामध्ये कमी मतं मिळालेला उमेदवार बाद होईल.

पंतप्रधानपदाच्या शर्यतीत जे पाच उमेदवार आहेत, ते आता टेलिव्हिजनवरील चर्चेत सहभागी होऊन आपापली भूमिका मांडतील.

खासदारांच्या मतदानानंतर हुजूर पक्षाचे सदस्य पंतप्रधानपदाच्या उमेदवारासाठी पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करतील.

5 सप्टेंबरला विजयी उमेदवाराच्या नावाची घोषणा होईल. बोरिस जॉन्सन तेव्हा पदावरून पायउतार होतील.

ऋषी सुनक

फोटो स्रोत, Reuters

खासदारांच्या मतदानाच्या पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये तरी ऋषी सुनक यांनी सर्वाधिक मतं मिळवली आहे. अर्थात, त्यांना अंतिम फेरीत कोण आणि कसं आव्हान देईल यावर पुढची लढत ही रंजक ठरेल.

ऋषी सुनक यांनी गेल्या आठवड्यात अर्थमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यापाठोपाठ इतर मंत्र्यांचं राजीनामा सत्र सुरू झालं. त्यानंतर बोरीस जॉन्सन यांना हुजूर पक्षाच्या नेतेपदावरून पायउतार व्हावं लागलं होतं.

बोरीस जॉन्सन यांच्या समर्थकांनी सुनक हे पंतप्रधानांना पदावरून खाली खेचण्यासाठी कारणीभूत ठरल्याचा आरोप केला होता. ऋषी सुनक यांच्या पत्नीच्या वादग्रस्त कर प्रकरणावरूनही जॉन्सन समर्थकांनी टीका केली होती.

कोण आहेत ऋषी सुनक?

ब्रिटनमध्ये जन्मलेले ऋषी सुनक रिचमंडमधून (यॉर्क्स) दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून गेले.

ते सरकारमध्ये आधी ज्युनिअर मंत्री होते. त्यांना 2018 साली ब्रिटनचे निवास मंत्री करण्यात आलं होतं.

त्यांचे वडील डॉक्टर होते आणि आई फार्मसी चालवायच्या. त्यांची पत्नी अक्षता इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांची मुलगी आहे. ऋषी सुनक यांना दोन मुली आहेत.

ऋषी सुनक- अक्षता मूर्ती

फोटो स्रोत, FACEBOOK@RISHI SUNAK

अर्थ मंत्रालय ब्रिटिश सरकारमध्ये दुसरं महत्त्वाचं पद मानलं जातं. ऋषी सुनक ब्रिटनमध्ये अशा महत्त्वाच्या पदी पोचणारे पहिले भारतीय आहेत.

ऋषी सुनक यांचे आई-वडील त्यांच्या आजी-आजोबांसोबत ब्रिटनला गेले होते. त्यानंतर 1980 मध्ये हॅम्पशायरच्या साऊथ हॅम्पटनमध्ये ऋषी सुनक यांचा जन्म झाला.

त्यांनी विंचेस्टर कॉलेज या खाजगी शाळेतून शालेय शिक्षण घेतलं. त्यानंतर ऑक्सफोर्ड विद्यापीठातून तत्त्वज्ञान (फिलॉसॉफी), राजकारण (पॉलिटिक्स) आणि अर्थशास्त्रात (इकॉनॉमिक्स) उच्च शिक्षण घेतलं. त्यांनी स्टँडफोर्ड विद्यापीठातून एमबीएचं शिक्षण घेतलं.

राजकारणात येण्यापूर्वी ऋषी सुनक यांनी इन्वेस्टमेंट बँक असलेल्या गोल्डमॅन सॅकमध्ये काम केलं आहे. त्यानंतर त्यांनी एक गुंतवणूक कंपनीदेखील स्थापन केली होती.

ब्रेक्झिटचे समर्थक

ऋषी सुनक यांनी युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याच्या बाजूने प्रचार केला होता. त्यांच्या मतदारसंघातही 55 टक्के लोकांनी ब्रेक्झिटच्या बाजूनेच कौल दिला होता.

ते विद्यमान पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्या सुरुवातीपासूनच्या समर्थकांपैकी एक आहेत.

कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे उदयोन्मुख नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अनेक ज्येष्ठ नेत्यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. रिचमंड यांच्यापूर्वीचे कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते लॉर्ड हेग यांनी ऋषी सुनक 'असामान्य व्यक्ती' असल्याचं म्हटलं होतं.

ऋषी सुनक यांच्या वेबसाईटनुसार फिट राहण्यासोबतच त्यांना क्रिकेट, फुटबॉल आणि सिनेमे बघायला आवडतं.

ते लहान असताना साउथॅम्पटनचे फुटबॉल खेळाडू मॅट ले टिजीअर त्यांचे हिरो होते.

'पहिल्या पिढीतले NRI'

आपली आशियाई ओळख आपल्यासाठी महत्त्वाची असल्याचं ऋषी सुनक यांनी म्हटलेलं आहे.

ते म्हणाले होते, "मी पहिल्या पिढीचा NRI आहे. माझे कुटुंबीय इथे आले होते. त्यामुळे तुम्हाला त्या पिढीचे लोक भेटले आहेत जे इथे जन्मले. त्यांचे कुटुंबीय इथे जन्मलेले नाहीत आणि ते या देशात त्यांचं भवितव्य घडवण्यासाठी आले होते."

"मी दर विकएंडला मंदिरात जातो. मी हिंदू आहे. मात्र, शनिवारी सेंट गेममध्ये जातो."

ऑक्टोबर 2019 ला बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणाले होते, "मी खूप सुदैवी आहे की मला वंशवादाचा फारसा सामना करावा लागलेला नाही. मात्र, एक घटना माझ्या मनातून जात नाही."

ऋषी सुनक

फोटो स्रोत, Getty Images

"मी माझ्या धाकट्या बहीण-भावासोबत बाहेर गेलो होतो. मी तेव्हा लहान होतो. कदाचित 15-17 वर्षांचा असेल आम्ही एका फास्ट फूट रेस्टोरंटमध्ये गेलो आणि मी त्यांना सांभाळत होतो. काही लोक तिथे बसले होते आणि पहिल्यांदाच वाईट शब्दांचा सामना केले. तो एक 'पी' शब्द होता."

मात्र, आजच्या ब्रिटनमध्ये त्याची कल्पनाही करता येत नसल्याचंही ते सांगतात.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)