नारायण मूर्तींच्या जावयासह ‘या’ 6 जणांची युकेच्या पंतप्रधानपदासाठी चर्चा

फोटो स्रोत, Reuters
युकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आज कॉन्झर्वेटिव्ह पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिली असला तरी ते काळजीवाहू पंतप्रधान म्हणून काम पाहतील.
आता बोरिस जॉन्सन यांनी राजीनामा दिल्यावर कॉन्झर्वेटिव्ह पक्षनेतेपदी कोण येणार आणि पुढचा पंतप्रधान कोण होणार हे ठरवण्यासाठी पक्षांतर्गत निवडणूक होईल.
संभाव्य उमेदवाराला पक्षनेतेपदी बसण्यासाठी कॉन्झर्वेटिव्ह पक्षाच्या खासदारांचा पाठिंबा मिळवावा लागेल. यातील अंतिम दोन उमेदवारांसाठी उर्वरित सदस्य मतदान करतील. पण यातले संभाव्य उमेदवार कोण असतील ?
1.ऋषी सुनक
तर यात पहिल्या नंबरवर आहेत ऋषी सुनक. भविष्यातील कॉन्झर्वेटिव्ह पक्षनेता म्हणून ऋषी सूनक यांच्या नावाची चर्चा होतीच. अनेक ज्येष्ठ नेत्यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. रिचमंड यांच्यापूर्वीचे हुजूर पक्षाचे नेते लॉर्ड हेग यांनी ऋषी सुनक 'असामान्य व्यक्ती' असल्याचं म्हटलं होतं.
पण मागील काही महिन्यांत ऋषी सुनक हे त्यांच्या पत्नीच्या वादग्रस्त कर प्रकरणामुळे चर्चेत आले. त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा कमी झाली. त्यानंतर काही दिवसांतच कोव्हिड काळातील लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना दंड झाला होता.
ब्रिटनमध्ये जन्मलेले ऋषी सुनक गेल्या वर्षी रिचमंडमधून (यॉर्क्स) दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून गेले. ते सरकारमध्ये आधी ज्युनिअर मंत्री होते.

फोटो स्रोत, Reuters
ऋषी सुनक यांचे आई-वडील त्यांच्या आजी-आजोबांसोबत ब्रिटनला गेले होते. त्यानंतर 1980 मध्ये हॅम्पशायरच्या साऊथ हॅम्पटनमध्ये ऋषी सुनक यांचा जन्म झाला. त्यांचे वडील डॉक्टर होते आणि आई फार्मसी चालवायच्या.
त्यांची पत्नी अक्षता इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांची मुलगी आहे. ऋषी सुनक यांना दोन मुली आहेत.
त्यांनी विंचेस्टर कॉलेज या खाजगी शाळेतून शालेय शिक्षण घेतलं.
त्यानंतर ऑक्सफोर्ड विद्यापीठातून तत्त्वज्ञान (फिलॉसॉफी), राजकारण (पॉलिटिक्स) आणि अर्थशास्त्रात (इकॉनॉमिक्स) उच्च शिक्षण घेतलं. त्यांनी स्टँडफोर्ड विद्यापीठातून एमबीएचं शिक्षण घेतलं.
राजकारणात येण्यापूर्वी ऋषी सुनक यांनी इन्वेस्टमेंट बँक असलेल्या गोल्डमॅन सॅकमध्ये काम केलं आहे. त्यानंतर त्यांनी एक गुंतवणूक कंपनीदेखील स्थापन केली होती.
अर्थ मंत्रालय ब्रिटिश सरकारमध्ये दुसरं महत्त्वाचं पद मानलं जातं.
ऋषी सुनक ब्रिटनमध्ये अशा महत्त्वाच्या पदावर पोहोचणारे पहिले भारतीय आहेत.
2.लिझ ट्रस
परराष्ट्र मंत्री असलेल्या लिझ ट्रस या बोरिस जॉन्सन यांच्या निष्ठावंतांमध्ये गणल्या जातात. परराष्ट्र कार्यालयाचे नेतृत्व करणाऱ्या या दुसऱ्या महिला आहेत.
आपल्या कारकिर्दीत लिझ ट्रस यांनी नाझनिन झगारी-रॅटक्लिफची यांची सुटका केली.
त्याचप्रमाणे रशियावर आर्थिक निर्बंध लादण्यात ही लिझ यांनी पुढाकार घेतला होता.

फोटो स्रोत, Reuters
2010 मध्ये पहिल्यांदाच त्या दक्षिण पश्चिम नॉरफोकमधून खासदार म्हणून निवडून आल्या.
अर्थशास्त्र आणि व्यापारावरील आपल्या मुक्तधोरणांमुळे त्या हुजूर पक्षाच्या सदस्यांमध्ये लोकप्रिय आहेत.
3.साजिद जावेद
युकेमध्ये बोरिस जॉन्सन सरकार संकटात सापडल्यानंतर सरकारमधील एकामागून एक अशा तब्बल 27 जणांनी राजीनामे दिले.
जॉन्सन यांच्यानंतर पक्षातले दोन महत्त्वाचे नेते असलेले ऋषी सूनक आणि साजिद जावेद यांनी मंत्रिपदाचे राजीनामे दिले.

फोटो स्रोत, Reuters
आरोग्य मंत्री असलेले साजिद जावेद आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देताना म्हणाले, "बोरिस जॉन्सन राष्ट्रीय हित डोळ्यासमोर ठेवून सरकार चालवण्यास असमर्थ आहे. त्यामुळे ते या सरकारमध्ये राहू इच्छित नाहीत. अनेक खासदारांचा आणि जनतेचा विश्वास जॉन्सन यांच्यावरून उडाला आहे."
जावेद यांचं नाव यापूर्वीही म्हणजे 2019 मध्ये शीर्ष नेतृत्वासाठी चर्चेत आलं होतं.
ब्रिटन सरकारमध्ये महत्वाच्या नेत्यांमध्ये गणले जाणारे साजिद जावेद यांचं कुटुंब 1960 च्या दशकात ब्रिटनमध्ये आलं होतं.
साजिद जावेद 2010 पासून यूकेमध्ये खासदार आहेत.
माजी बँकर आणि ब्रॉम्सग्रोव्हचे खासदार असलेल्या जावेद यांनी व्यवसाय आणि सांस्कृतिक मंत्री म्हणूनही काम केलंय. यापूर्वी त्यांनी तीन वेगवेगळे पोर्टफोलिओ सांभाळले आहेत.
कृष्णवर्णीय, आशियाई आणि अल्पसंख्याक (BAME) समुदायाची पार्श्वभूमी जावेद हे पहिले गृहमंत्री आहेत. त्यांनी कॉम्प्रेसिव्ह स्कूल आणि एक्सेटर विद्यापीठात शिक्षण घेतल.
4.जेरेमी हंट
माजी परराष्ट्र मंत्री असलेल्या जेरेमी हंट यांचा आजही वेस्टमिनिस्टरमध्ये दबदबा आहे. 2019 च्या नेतृत्व स्पर्धेत बोरिस जॉन्सन यांच्या नंतर जेरेमी हंट यांच नाव होतं.
कोव्हिडच्या काळात कॉमन्स हेल्थ कमिटीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी सरकारी धोरणांची छाननी केली.

फोटो स्रोत, Uk Parliament
आज जर ते पुन्हा पक्षनेतेपदासाठी उभे राहिले तर पक्ष सदस्यांचा त्यांच्याविषयीचा दृष्टिकोन वेगळा असेल. तीन वर्षांपूर्वी ब्रेक्झिट सार्वमतामध्ये राहण्यासाठी त्यांच मत अडथळा ठरलं होतं.
2005 पासून दक्षिण पश्चिम सरेचे खासदार असलेले, मिस्टर हंट 2010 मध्ये संस्कृती सचिव म्हणून सरकारमध्ये सामील झाले. त्यांनी ब्रिटन सरकारमध्ये आरोग्य विभागाचं नेतृत्व देखील केलं आहे.
5.मायकेल गोव्ह
पंतप्रधानपदाच्या आणि हुजूर पक्ष नेत्याच्या शर्यतीत दोन वेळा सहभागी झालेले मायकेल गोव्ह आताही चर्चेत आहेत.
2019 मध्ये बोरिस जॉन्सन आणि जेरेमी हंट यांच्यानंतर शर्यतीत तिसऱ्या क्रमांकावर होते मायकेल गोव्ह.

फोटो स्रोत, PA Media
बीबीसीचे माजी पत्रकार आणि टाइम्स वृत्तपत्राचे स्तंभलेखक असलेले
मायकेल गोव्ह मंत्रिमंडळात दीर्घकाळ काम करणाऱ्या मंत्र्यांपैकी एक आहेत. 2010 मध्ये ते शिक्षणमंत्री होते. त्यानंतर त्यांनी हुजूर पक्षाचे मुख्य प्रतोद, न्यायमंत्री, पर्यावरणमंत्री आदी मंत्रिपद सांभाळली.
6.नदीम झाहवाल
ऋषी सुनक यांनी राजीनामा दिल्यानंतर सध्याचे शिक्षण मंत्री नदीम झाहवाल यांच्याकडे अर्थमंत्रीपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.
कोव्हिडच्या काळात वॅक्सिन मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी केलेल्या कामाची दखल युकेमध्ये घेण्यात आली. त्यावेळी ते म्हणाले होते, "आजवरची सर्वात महत्वाची जबाबदारी मी पार पाडली आहे." त्यानंतर त्यांना कॅबिनेटपदाचा दर्जा असलेले शिक्षणमंत्री म्हणून पदोन्नती देण्यात आली.

फोटो स्रोत, Reuters
1967 मध्ये इराकमध्ये जन्मलेल्या झाहवाल आणि त्यांच्या कुटुंबाला सद्दाम हुसेन सत्तेवर आल्यावर इराक सोडावं लागलं.
केमिकल इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर त्यांनी Teletubbies नावाची एक कंपनी सुरू केली. त्यानंतर त्यांनी ऑनलाइन पोलिंग कंपनी YouGov ची स्थापना करून आपलं नशीब आजमावलं.
कॉन्झर्वेटिव्ह पक्षाच्या सर्वात सुरक्षित अशा स्ट्रॅटफोर्ड-अपॉन-एव्हॉनच्या मतदारसंघातून 2010 साली ते खासदार झाले.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








