बोरिस जॉन्सन-कॅरी सायमंड्स गुपचूप विवाहबद्ध, 30 पाहुण्यांची उपस्थिती

फोटो स्रोत, Social media
यूकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी कॅरी सायमंड्स यांच्यासोबत गुपचूप लग्न केलं आहे. शनिवारी (29 मे) वेस्टमिन्स्टर चर्चमध्ये जॉन्सन आणि कॅरी विवाहबद्ध झाले.
या विवाहसोहळ्याला त्यांचे नातेवाईक आणि अतिशय जवळचे मित्र उपस्थित होते.
पंतप्रधान कार्यालयानं बोरिस जॉन्सन यांच्या विवाहावर कोणतंही भाष्य करायला नकार दिला आहे.
लग्नाच्या बातमीनंतर बोरिस जॉन्सन आणि कॅरी सायमंड्स यांना सोशल मीडियावर अभिनंदनाचे संदेश येत आहेत.
ब्रिटनचे पेन्शन मंत्री टेरिस कोफी यांनी ट्वीट करून म्हटलं, "बोरिस जॉन्सन आणि कॅरी सायमंड्स तुम्हाला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा"
उत्तर आयर्लंडचे मंत्री आर्यलन फॉस्टर यांनी नवविवाहित जोडप्याला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत.
ब्रिटनमधील वृत्तपत्र 'द मेल'ने रविवारी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार अतिशय घाईगडबडीत केलेल्या या लग्नाला केवळ 30 पाहुण्यांना आमंत्रण होतं.
कोव्हिड-19 च्या निर्बंधांनुसार युकेमध्ये लग्नासाठी जास्तीत जास्त 30 पाहुण्यांना बोलावण्याची परवानगी आहे. कॅथलिक रीती-रिवाजांनुसार झालोल्या या लग्नाला चर्चचे काही सदस्य उपस्थित होते आणि फादर डॅनियल हंफ्रीज यांनी हे लग्न लावलं.

फोटो स्रोत, Reuters
ब्रिटनमधील टॅब्लॉइड वृत्तपत्र 'द सन'च्या रिपोर्टनुसार डाउनिंग स्ट्रीटच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही या लग्नाबद्दल माहीत नव्हतं. 'द सन' च्या बातमीनुसार शनिवारी स्थानिक वेळेनुसार 1.30 वाजता चर्चमधील लोकांना चर्च रिकामं करण्याची सूचना देण्यात आली. त्यानंतर अर्ध्या तासानं कॅरी सायमंड्स पांढऱ्या रंगाचा गाऊन घालून पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यासोबत चर्चमध्ये पोहोचल्या.
त्यानंतर गायक आणि कलाकारांना रात्री दहाच्या सुमारास चर्चमधून बाहेर पडताना पाहिलं गेलं.
2019 मध्ये माध्यमांमध्ये बोरिस जॉन्सन आणि कॅरी यांचं नातं जगासमोर आलं होतं. फेब्रुवारी 2020 मध्ये बोरिस यांनी आपण कॅरीससोबत साखरपुडा केला असल्याचं आणि कॅरी गर्भवती असल्याचं जाहीर केलं होतं.
गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात त्यांचा मुलगा विल्फ्रेडचा जन्म झाला होता.
बोरिस जॉन्सन हे 56 वर्षांचे आहेत, तर कॅरी या 33 वर्षांच्या आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








