अँटीबॉडी कॉकटेल : कोरोनावरील या औषधाबद्दल तुमच्या मनातले 10 प्रश्न आणि त्यांची उत्तरं

फोटो स्रोत, ROCHE
- Author, सरोज सिंह
- Role, बीबीसी प्रतिनिधी
दिल्लीजवळील गुरुग्राममधील मेदांता मेडिसिटी हॉस्पिटलमध्ये 84 वर्षीय वृद्ध व्यक्तीला कोरोनावरील उपचारादरम्यान 'अँटीबॉडी कॉकटेल' औषध दिलं गेलं आणि ही व्यक्ती बरीही झाली. त्यानंतर या औषधाबद्दल संपूर्ण भारतात एकप्रकारचं कुतुहल निर्माण झालंय. या कुतुहलासोबत असंख्य प्रश्नही विचारले जातायेत.
भारत सरकारनं कोव्हिड-19 च्या उपचारासाठी 'अँटीबॉडी कॉकटेल' या औषधाच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगीही दिलीय.
सध्या मेदांता हॉस्पिटल आणि अपोलो हॉस्पिटलमध्येच हे औषध कोव्हिड-19 वरील उपचारासाठी वापरले जात आहे. मात्र, हे औषध नेमकं कसं काम करतं, कोण हे औषध घेऊ शकतं, रुग्णांना हे औषध कुठे उपलब्ध होईल इत्यादी प्रश्न अनेकांना पडलेत.
बीबीसीने गुरुग्रामच्या मेदांता मेडिसिटीचे अध्यक्ष डॉ. नरेश त्रेहान यांच्याशी संवाद साधून, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
आपण एक-एक करून सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया.
1) 'अँटीबॉडी कॉकटेल' औषध नेमकं आहे तरी काय?
रॉश या स्वीस कंपनीने हे औषध तयार केलंय. दोन अँटीबॉडीचं मिश्रण करून कृत्रिमरित्या प्रयोगशाळेत हे औषध बनवलं गेलंय.
याला मोनोक्लोनल अँटीबॉडी कॉकटेल म्हणतात. कॅसिरिविमाब (Casirivimab) आणि इम्डेविमाब (Imdevimab) असं हे औषध आहे.
2) औषध काम कसं करतं?
हे औषध शरीरात गेल्यानंतर विषाणूला ब्लॉक करतं. यामुळे कोरोना विषाणूला दुसऱ्या पेशींमध्ये प्रवेश करता येत नाही. कारण या औषधामुळे कोरोना विषाणूला शरीरात पसरण्यासाठी पोषक घटकच मिळत नाहीत.
या दोन्ही अँटीबॉडी मिळून कोरोना विषाणूला शरीरात वाढण्यापासून, पसरण्यापासून रोखतात आणि अशा पद्धतीने विषाणूला न्यूट्रीलाईज (परिणामशून्य) करतात.
3) जगभरात कुठे कुठे हे औषध वापरलं गेलंय?
गेल्यावर्षी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना कोव्हिड-19 वरील उपचारादरम्यान हे औषध देण्यात आले होते, असा दावा करण्यात येतोय. हे औषध घेतल्याच्या दोन ते तीन दिवसातच डोनाल्ड ट्रंप आपल्या नियमित कामासाठी परतले.

फोटो स्रोत, APOLLO
डोनाल्ड ट्रंप यांना कोव्हिड-19 झाल्यानंतर लगेचच अँटीबॉडी कॉकटेल औषध देण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांच्या शरीरातील कोरोना विषाणूला पसरण्यासापासून रोखण्यास यश मिळालं.
कोव्हिड-19 वरील औषध म्हणून याचा अमेरिका आणि युरोपमधील अनेक देशांमध्ये वापर करण्यात आलाय. संसर्ग रोखण्यासाठी हे औषध किती परिणामकारक आहे, यावर अद्यापही संशोधन सुरू आहे. तीन टप्प्यांमधील चाचण्यांचे निष्कर्ष चांगले आलेत. भारतातही आता या औषधाला मंजुरी देण्यात आलीय.
रॉश कंपनीसोबत भारतात सिप्ला कंपनीन करार केलय. भारतातील इतर फार्मा कंपन्यांही या प्रकारचं अँटीबॉडी कॉकटेल बनवण्याच्या तयारीत आहेत.
4) कोव्हिड-19 च्या रुग्णांना हे औषध कधी द्यावं?
डॉ. त्रेहन यांच्या माहितीनुसार, कोव्हिड-19 पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णाला डॉक्टरांच्या सल्ल्यानं 48 ते 72 तासांच्या आत हे औषध दिलं जाऊ शकतं. संसर्गाची माहिती मिळाल्यानंतर तातडीने औषध देणं फायदेशीर असतं.
याचं कारण विषाणू शरीरात शिरल्यानंतर पहिल्या सात दिवासातच विषाणू शरीरात वेगानं पसरतो. जेवढ्या लवकर विषाणू मल्टिप्लाय होण्याच्या वेगाला रोखलं जाऊ शकेल, तितक्या लवकर रुग्ण बरा होईल.
5) प्रत्येक कोरोनाग्रस्त हे औषध घेऊ शकतो का?
हे औषध कोव्हिड-19 च्या माईल्ड ते मॉडरेट रुग्णांसाठी आहे. मात्र, त्यासाठीही डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे.
डायबिटीज, ब्लडप्रेशर, कॅन्सर, किडनी आणि लिव्हर यांच्याशी संबंधित आजारांशी आधीपासूनच लढत असलेले रुग्ण आणि ज्यांचं वय अधिक आहे, त्यांच्यावर हे औषध लवकर वापरावं, असा सल्ला दिला जात आहे. अशा रुग्णांवर हे औषध वापरल्यास त्यांना 70 टक्क्यांपर्यंत हॉस्पिटलमध्ये जाण्यापासून बचाव करण्याची शक्यता आहे.
त्याशिवाय, रिस्क फॅक्टरमुळे ज्या रुग्णांना तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्याची वेळ आली, त्यांच्यातील 70 टक्के रुग्णांचे जीव वाचले, असं संशोधनात आढळून आलंय.
12 वर्षांहून अधिक वयाच्या मुलांनाही हे औषध दिले जाऊ शकतं. मात्र, या मुलांचं वय 40 किलोपेक्षा जास्त असावं.

फोटो स्रोत, ROCHE
जे रुग्ण ऑक्सिजन सपोर्टवर आहेत, हॉस्पिटलमध्ये भर्ती आहेत, ज्यांना सिव्हियर कोव्हिड-19 संसर्ग आहे, ज्यांच्या फुफ्फुसात विषाणू शिरला आहे, त्यांच्यावर या औषधाचा काहीच परिणाम होत नाही. शरीरात विषाणू शिरल्यानतर सात ते दहा दिवसात हे औषध घेतल्यास परिणाम दिसू शकतात.
6) घरातच आयसोलेट होणाऱ्या रुग्णांनी काय करावं?
हे औषध डॉक्टरांच्या देखरेखीतच देण्याची सल्ला देण्यात येतोय. त्यामुळे जर तुम्हाला हे औषध घ्यायचे असेल, तर हॉस्पिटलमध्ये जाऊन ओपीडीमध्येच इंजेक्शन घ्यावं लागेल. लगेचच रिअॅक्शन झाल्यास तातडीने लक्ष देणं शक्य होईल, म्हणून इंजेक्शन टोचल्यानंतर एक तासापर्यंत डॉक्टरांच्या देखरेखीत राहावं लागेल.
सध्या काही निवडक हॉस्पिटलमध्येच या औषधासाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलंय. यामध्ये मेदांता आणि अपोलो हॉस्पिटलचा समावेश आहे. इतर कुठूनही अजूनतरी सर्वसामान्य लोक खरेदी करू शकत नाहीत.
7) एका रुग्णाला या औषधाचे किती डोस लागतील?
या अँटीबॉडी कॉकटेलचा 1200 मिलीग्रॅमचा (कॅसिरिविमाब 600 मिलीग्रॅम आणि इम्डेविमाब 600 मिलीग्रॅम) एक डोस प्रत्येक रुग्णाला दिला पाहिजे. एका डोसची किंमत 59 हजार 750 रुपये आहे. या औषधाच्या एका पॅकेटमधून दोन रुग्णांवर उपचार केले जाऊ शकतात. या औषधाला दोन ते आठ डिग्री तापमानात सर्वसाधारण फ्रिजमध्ये ठेवलं जाऊ शकतं.
अपोलो हॉस्पिटलकडून जारी करण्यात आलेल्या प्रेस रिलीजमध्ये म्हटलंय की, पहिल्या टप्प्यात भारताला या औषधाचे एक लाख पॅकेट्स मिळाले आहेत. म्हणजे, आजच्या घडीला दोन लाख लोकांना हे औषध देणं शक्य आहे.
8) अँटीबॉडी कॉकटेलचे साईड इफेक्ट्स आहेत का?
जगभरात हजारो रुग्णांवर या औषधाचा वापर करण्यात आलाय. अद्याप कुठेच मोठ्या साईड इफेक्ट्सच्या घटना समोर आल्या नाहीत. मायनर साईड इफेक्ट्समध्ये अॅलर्जी किंवा अॅनाफलॅक्सिस यांसारखे रिअॅक्शन दिसून आले.

फोटो स्रोत, APOLLO
भारतात या औषधाला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली असली, तरी प्रशिक्षित डॉक्टर आणि हॉस्पिटलमध्येच हे औषध घेण्याचा सल्ला देण्यात आलाय. जेणेकरून औषध घेतलेल्या रुग्णांचा फॉलोअप घेणं शक्य होईल.
9) कोव्हिड-19 च्या आधी खबरदारी म्हणून हे औषध घेतलं तर चालेल का?
कोव्हिड-19 झालं नसताना, किंवा कोव्हिड-19 होण्याआधीच खबरदारी म्हणून हे औषध घेण्यास डॉक्टर सल्ला देत नाहीत. शरीरात या औषधाचा परिणाम 3 ते 4 आठवड्यांपर्यंत राहतं.
जोपर्यंत आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह येत नाही, तोवर हे औषध घेऊ नये असा सल्ला डॉक्टर देतात.
मात्र, लस घेतल्यानंतर जर तुम्हाला कोरोनाचा संसर्ग झाला असेल, तर अशावेळी तुम्ही हे औषध घेऊ शकता.
10) कोव्हिड-19 च्या व्हेरियंटवर हे औषध परिणामकारक आहे का?
डॉक्टर त्रेहन यांच्या दाव्यानुसार, अँटीबॉडी कृत्रिम पद्धतीने प्रयोगशाळेत बनवली असल्यानं नवीन व्हेरियंट आल्यानंतर या औषधाचा परिणाम होणार नाही.
मात्र, औषधात काही बदलानंतर कोव्हिड-19 चे नवे व्हेरियंटविरोधातही परिणामकारक बनवलं जाऊ शकतं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








