कोरोना: मृत्यूंच्या आकडेवारीमधली तफावत नेमकी कशामुळे आढळून येते?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, गुलशनकुमार वनकर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
रुग्णालयाबाहेर झालेले पण विविध प्राधिकरणांनी मृत्यू प्रमाणपत्र दिलेले सुमारे 1000 मृत्यू अद्याप कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या अधिकृत आकडेवारीत दाखविण्यात आलेले नाहीत, असा आरोप जी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलं आहे.
'आकडेवारीची अचूकता हाच कोरोनाविरोधातील लढाईसाठी विश्लेषणाचा मुख्य आधार असल्याने याकडे काटेकोरपणे लक्ष द्यावे,' असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईत ज्या रूग्णांचा मृत्यू रुग्णालयाबाहेर झालेला आहे, असे मृत्यू अद्यापही दाखविण्यात आलेले नाहीत. या मृत्यूंच्या बाबतीत वॉर्ड अधिकारी किंवा तत्सम प्राधिकरणांनी मृत्यू प्रमाणपत्र दिलेले आहे, अशांचा आकडा अजूनही जाहीर करण्यात आलेला नाही. माझ्या माहितीप्रमाणे गेल्या तीन-साडेतीन महिन्यात असेही किमान 1000 मृत्यू मुंबईत आहेत, ज्यांना अजूनही रेकॉर्डवर घेण्यात आलेले नाही, असं फडणवीस यांनी पत्रात म्हटलं आहे.
" प्राथमिक संकलनातच आतापर्यंत किमान 450 मृत्यू ओळखण्यात आलेले आहेत. एकूणच मृत्यूच्या संख्येत एकतर त्याचदिवशी किंवा फार तर 72 तासांत तशी नोंद होणे आवश्यक आहे. परंतु तीन महिने लोटले तरी मृत्यू रिपोर्ट न होता आणि ते लक्षात आल्यानंतर सुद्धा एकदम संख्या दिसू नये, या भीतीने रोज थोडे-थोडे करून ते मृत्यूसंख्येत अधिक करणे, ही अतिशय चुकीची रणनीती आहे," असा आरोपही देवेंद्र यांनी केलाय.

- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?

याआधीही कोरोनामुळे मृत्यू होऊनही मुंबईतील 950 जणांची नोंद महाराष्ट्र सरकारने 'कोरोना मृत्यू' म्हणून केली नाही, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे सरकारने राज्यातील मृतांचा आकडा 1328ने वाढवला.
यापैकी 862 मृत्यू मुंबईत तर 466 इतर जिल्ह्यांमध्ये झाले होते, असं सरकारने स्पष्ट केलं. सुरुवातीपासून झालेल्या कोरोना मृत्यूंच्या आकडेवारीचं समायोजन केल्यानंतर ही आकडेवारी वाढल्याचं मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केलं. "यामध्ये संपूर्ण पारदर्शकता राहावी म्हणून या माहितीचे समायोजन नियमितपणे केले जाणार आहे. यापूर्वी देखील दुबार नावे वगळण्याची कार्यवाही झाली होती."
हे समायोजन म्हणजे काय? लोकांच्या मृत्यूंची नोंद ठेवण्यात अशी मोठी गफलत कशी होऊ शकते? हा प्रशासकीय गलथानपणा होता की फडणवीस यांनी आरोप केल्याप्रमाणे मृत्यू लपवण्याचा प्रयत्न?
कोव्हिड-19 मृत्यूंची नोंद कशी होते?
सध्या कोरोना व्हायरसची लागण झालेले किंवा संशयित रुग्णांना दवाखान्यांमध्ये भरती केल्यावर आधी त्यांचे स्वॉब घेतले जातात. जर त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला तर तशी नोंद केली जाते आणि तो रुग्ण मग कोव्हिड-19चा रुग्ण म्हणूनच त्याच्यावर आवश्यक ते उपचार होतात.
उपचारादरम्यान हा अॅक्टिव्ह रुग्ण असतो, आणि जर उपचारानंतर तो रुग्ण बरा झाला तर तशी नोंद होते, किंवा त्याचा मृत्यू झाला तर कोव्हिड-19 मृत्यू म्हणून त्याची नोंद घेतली जाते. मृत्यू मग हृदयविकाराच्या झटक्याने झाला असेल वा इतर कोणत्याही आजाराने, ती व्यक्ती जर कोव्हिड-19 पॉझिटिव्ह आढळली असेल तर त्या मृत्यूची नोंद मग कोरोना मृत्यूंमध्येच व्हायला हवी, असं भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेची (ICMR) मार्गदर्शक तत्त्वे सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
सुरुवातीला जेव्हा रुग्णांची संख्या आणि मृत्यूंचं प्रमाण कमी होतं, तेव्हा प्रत्येक केसची योग्य ती दखल घेऊन त्यांची माहिती हॉस्पिटलकडून भरली जायची आणि प्रशासनाकडे पाठवली जायची. नंतर ही जिल्हानिहाय माहिती राज्य सरकारकडे पाठवली जाते आणि तिथून ती पुढे केंद्रीय तालिकेत वाढवली जाते.
महाराष्ट्रात नेमकं काय झालं?
पण जसजसे रुग्ण वाढू लागले, दिवसाला हजारांपेक्षा जास्त केसेस येऊ लागल्या आणि शंभरपेक्षा जास्त मृत्यू दररोज होऊ लागले, तसतसा यंत्रणेवरचा ताण वाढू लागला. मग या माहितीची तितक्याच चोखपणे नोंद ठेवणं अवघड होऊ लागलं, असं मुंबईतील काही हॉस्पिटल्सच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.
अनेकदा एखाद्या कोरोना रुग्णाचा मृत्यू जर हृदयविकाराच्या झटक्याने झाला तर त्या केसचा अखेरचा अहवाल बनवणाऱ्याकडून मृत्यूच्या कॉलममध्ये हृदयविकारच लिहिण्यात आलं असावं. एवढे मृत्यू होत असताना, अशी गफलत होण्याची शक्यता असतेच.
त्यानंतर मुंबईची किंवा राज्याची डेथ ऑडिट कमिटी प्रत्येक मृत्यू झालेल्या केसची माहिती पुन्हा एकदा चेक करतात. "आम्ही प्रत्येक रुग्णाचा वैद्यकीय अहवाल तपासतो, त्याला इतर कोणते रोग आहेत, याविषयी माहिती घेतो आणि खरंच त्याचा मृत्यू कोव्हिड-19मुळे झाला का, हा निष्कर्ष काढतो," असं या समितीच्या एका सदस्याने इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
इथे काही गडबड आढळल्यास ती दुरुस्त करून तालिका अपडेट केली जाते. यालाच reconciliation किंवा समायोजन म्हणतात. अर्थात हा डेटाबेस हाताळताना प्रत्येक ठिकाणी मानवी चुकांना वाव आहे, आणि रुग्णांची वाढती संख्या आणि त्यामुळे वाढणारा ताण पाहता तो कायम असणार आहे.
फक्त महाराष्ट्रात असं झालं नाहीये
असा गोंधळ पहिल्यांदा झालाय आणि फक्त महाराष्ट्रात झालाय, असं नाही.
राजधानी दिल्लीतही सरकारने सांगितलेला आकडा आणि प्रत्यक्ष हॉस्पिटल्समध्ये झालेल्या मृत्यूंचा आकडा जुळत नव्हता, हे लक्षात आल्यावर तिथेही reconciliation किंवा समायोजन करण्यात आलं. त्यानंतर मे महिन्याच्या मध्यात 20 मृत्यूंची नोंद अशीच वाढवण्यात आली होती.
"हे मृत्यू दिल्लीत एप्रिल आणि मे महिन्यात झाले होते आणि हॉस्पिटल्सकडून आलेली माहिती डेथ ऑडिट कमिटीने पडताळून पाहिल्यानंतर हे वाढवण्यात आले आहेत," असं सरकारच्या दैनंदिन मेडिकल बुलेटिनमध्ये तेव्हा सांगण्यात आलं.
तामिळनाडूमध्ये सुद्धा मृतांच्या आकडेवारीवरून घोळ कायम आहे. राजधानी चेन्नईमध्ये झालेल्या सुमारे 200 मृत्यूंची नोंद राज्य सरकारांकडे झालेली नाही, असं निदर्शनास आल्यानंतर आरोग्य विभागाने कोव्हिड-19 मृत्यू समायोजन कमिटीची स्थापना केली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
हे समायोजन विविध सरकारं वेळोवेळी करत असतात. या व्हायरसचं उगमस्थान चीनवरही आधी मृतांचा आकडा कमी जाहीर केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर एप्रिलच्या मध्यात चीनने अधिकृत मृतांचा आकडा 1,290ने वाढवला. पूर्वीच्या अधिकृत आकडेवारीपेक्षा 50 टक्क्यांनी वाढलेला हा आकडा काही रुग्णांचे अहवाल उशीरा आल्यामुळे आता जोडला जात आहे, असं चीनने त्यावेळी सांगितलं होतं.
मेक्सिकोनेही मृतांचा आकडा जूनच्या पहिल्या आठवड्यात तब्बल एक हजारांनी वाढवल्याची बातमी वॉशिंगटन पोस्टने दिली होती, तर चिली राष्ट्राने एकूण मृत्यूंच्या आकडेवारीत संशयित कोव्हिड-19 रुग्णांची आकडेवारी अपडेट केली.
रशियामध्ये कोरोनाचा उद्रेक उशिरा झाला, मात्र त्यानंतर तिथल्या मृतांचा आकडा झपाट्याने वाढला. मात्र तिथेही अधिकृत आकडेवारीवरून तज्ज्ञांनी संशय व्यक्त केला होता.
कोरोना व्हायरसचं अस्तित्वच सुरुवातीला नाकारणारे ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष झाएर बोलसोनारो यांनी देशात कोरोनामुळे होणारे मृत्यू भयंकररित्या वाढल्यानंतर एकूण आकडेवारीच सरकारी वेबसाईटवरून काढून टाकली होती. नंतर तिथल्या कोर्टाने यावर आक्षेप घेतल्यानंतर ही आकडेवारी पुन्हा एकदा जाहीर करण्यात आली. कोरोनाची खरी स्थिती लपवण्याचा हा प्रयत्न होता, असं बोलसोनारोंच्या टीकाकारांना वाटतं.
पण प्रत्यक्ष मृत्यूंचा आकडा जास्त?
कोरोना विषाणूच्या साथीमुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण आला आहे. त्यामुळे इतर वेळेस नियमितपणे आरोग्य केंद्रांमध्ये होणारी कामं आता प्रलंबित आहेत किंवा होत नाहीयेत. अशा वेळेत इतर रोगांनी बाधित रुग्णांचाही उपचाराअभावी मृत्यू होण्याची शक्यता बळावते आणि या मृत्यूंची दखल मग कशी घेतली जावी, हा सर्वांत मोठा प्रश्न आहे.

फोटो स्रोत, Getty Images
अनेकदा संशयित कोरोनाग्रस्ताला उशीरा रुग्णालयात बेड मिळतो, त्यामुळे त्याचा अहवाल येईपर्यंत त्याचा मृत्यू झालेला असतो. शिवाय, असे अनेक रुग्ण आहेत, ज्यांचा आधीच ताणलेल्या आरोग्य केंद्रात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू होतो. मग त्यांचा तपास न होताच त्यांच्यावर अंत्यविधी केला जातो. मग त्यांचीही नोंद कोव्हिडमुळे होत नाही.
अशा अनेक संशयित रुग्णांची नोंदही बेल्जियमसारख्या राष्ट्राने एकूण तालिकेत घेण्याचं ठरवलं. म्हणूनच तिथला मृतांचा आकडा दरवर्षी होणाऱ्या सरासरी मृत्यूंपेक्षा तब्बल 37 टक्क्यांनी जास्त आहे, असं बीबीसीच्या एका विश्लेषणात लक्षात आलं.
जगभरात कमीजास्त प्रमाणात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे मृत्यू नेमके किती झालेत, हे सांगता येणं कठीण आहेच. पण त्यामुळे दरवर्षी होणाऱ्या सरासरी मृत्यूंच्या आकडेवारीची तुलना यावर्षी होत असलेल्या एकूण मृत्यूंशी केली, तर चित्र जरा अधिक स्पष्टपणे दिसेल, असं या अभ्यासकांना वाटतं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








