Giant Comet K2 पृथ्वीवर आदळेल का?

फोटो स्रोत, NASA
- Author, ऋजुता लुकतुके
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
नासाच्या दुर्बिणीतून टिपलेला हा के2 धूमकेतू या फोटोमध्ये जरी लहान गोळ्यासारखा दिसत असला तरी प्रत्यक्षात तो तब्बल 18 किलोमीटर लांब आहे. आणि त्याचा आकार चक्क दोन माऊंट एव्हरेस्ट इतका मोठा आहे.
आतापर्यंत काही प्रकाशवर्षांचा प्रवास करून तो सौरमंडळाच्या आतल्या वर्तुळात पोहोचला आहे.
या प्रवासात तो अलीकडेच मंगळाच्या जवळून गेला आणि आता तो 14 जुलैला पृथ्वीच्या जवळून जाणार आहे.
धूमकेतूचा हा लखलखता गोळा साध्या दुर्बिणीतूनही आपल्याला पाहता येणार आहे. त्या निमित्ताने हे धूमकेतू कुठून आणि का येतात? आणि ते आदळले तर काय होऊ शकतं? सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाहूया सोप्या शब्दांत.
K2 धूमकेतू काय आहे?
C2017/K2 असं या धूमकेतूचं अधिकृत नाव आहे. कारण, 2017मध्ये नासाच्या हबल दुर्बीणीला तो पहिल्यांदा दिसला होता. त्यानंतर या धूमकेतूविषयी बरीचशी माहिती आता आपल्याला कळलीय.
- हा धूमकेतू पहिल्यांदाच सौरमंडळाच्या भेटीला आला आहे
- त्याचं केंद्र 18 किलोमीटर लांब आहे.
- जेव्हा तो पृथ्वीच्या जवळून जाईल तेव्हा प्रत्यक्षात तो 1.8 अॅस्ट्रॉनॉमिकल युनिटस लांब असेल. म्हणजे जवळ जवळ अडीचशे मिलियन किलोमीटर
यापूर्वी यापेक्षा मोठ्या आकाराचा धूमकेतू पृथ्वीवर आदळला होता तेव्हा डायनासोरचाही जीव गेला होता. इतका विनाशकारी हा धुमकेतू ठरू शकतो.
आणि यातला शेवटचा मुद्दाच सध्या खगोल शास्त्रज्ञांसाठी महत्त्वाचा ठरतोय.

फोटो स्रोत, SPL
त्यांना दोन गोष्टींचं आश्चर्य वाटतंय. एक तर इतक्या मोठ्या आकाराचा धूमकेतू इतका काळ सक्रीय कसा राहिला. दुसरं म्हणजे जर आजही अजस्त्र धूमकेतू सक्रीय असेल आणि चुकून पृथ्वीवर आदळला तर किती विनाशकारी ठरू शकेल! पण अशा धूमकेतू पृथ्वीवर आदळण्याच्या घटना आहेत का?
साडेसहा कोटी वर्षांपूर्वी एक धूमकेतू पृथ्वीवर आदळला आणि…
6.5 कोटी वर्षांपूर्वी मेक्सिकोच्या चिक्सुलूब भागात आभाळातून आलेला 15 किलोमीटर लांबीचा दगड आदळला. तो इतक्या प्रचंड वेगाने समुद्र किनाऱ्यावर आदळला होता की, तो पृथ्वीमध्ये 100 किलोमीटरपर्यंत आत शिरला. आज साडे 6 कोटी वर्षांनंतरही तिथे 180 किलो मीटर लांबीचा महाकाय खड्डा शिल्लक आहे. हा दगड लघुग्रह आहे, असं आधी वाटत होतं. पण आता अनेक शास्त्रज्ञांचं मत आहे की, इतक्या वेगाने येणारा हा धूमकेतूच असायला हवा.
उथळ समुद्रात इतका मोठा धूमकेतू आदळल्यामुळे हजारो टन सल्फर बाहेर पडून वातावरणात मिसळला. त्यामुळे पृथ्वीवर जणू आगीचं तांडव सुरू झालं. अनेक मोठाले भूकंप झाले. सर्वत्र त्सुनामी आल्या. आकाश धूळ आणि धुरामुळे काळवंडलं. सूर्यकिरणं जमिनीपर्यंत येऊ शकत नव्हती. म्हणून तापमान कमी होऊ लागलं आणि पृथ्वी बर्फाचा गोळा होऊ लागली.
'द डे डायनासोर्स डाइड' या बीबीसी डॉक्युमेंटरीमध्ये बेन गॅरड सांगतात, "अंधारलेल्या आणि थंड जगात आधी समुद्रातलं अन्न संपलं. काही आठवड्यांत जमिनीवरचंही संपलं. पूर्ण पृथ्वीवर खायला काहीही नसल्यामुळे मग शक्तिशाली डायनासोर्ससाठी जगणं अशक्य होतं."

फोटो स्रोत, SPL
केवळ एका धूमकेतूमुळे पृथ्वीवरच्या 70 टक्के प्रजाती एका झटक्यात नामशेष झाल्या. असं करण्याची क्षमता आता येत असलेल्या K2 धूमकेतूमध्ये आहे का? क्षमता आहे. पण तो पृथ्वीवर आदळण्याची शक्यता नाही आहे!
पण धूमकेतू पृथ्वीवर आदळण्याच्या घटना किती सामान्य आहेत? दरवर्षी पृथ्वीच्या कक्षेच्या अती जवळून साधारण दहा तरी धूमकेतू जातात. आणि गणिताच्या रूपाने संभाव्यता काढली तर शास्त्रज्ञांच्या मते पृथ्वीवर 45 लाख वर्षांमध्ये एखादा धूमकेतू आदळू शकतो.
धूमकेतू म्हणजे काय?
नासाने दिलेली धूमकेतूची सोपी व्याख्या अशी आहे. 'धूळ आणि बर्फाचा बनलेला एक मोठा आकार जो सूर्याभोवती फिरतो. लांब आणि प्रकाशमान शेपटामुळे धूमकेतू आकर्षक दिसतात. साडेचार अब्ज वर्षांपूर्वी सौरमंडळाच्या निर्मितीच्या वेळी जे तुकडे उरले त्यातून धूमकेतूंची निर्मिती झाली.'

फोटो स्रोत, SPL
धूमकेतू अनेकदा सौर मंडळाच्या बाहेर असतात. यातले काही नेपच्युन ग्रहाभोवती असलेल्या क्युपर बेल्ट कड्याजवळ ते असतात. पण, असे धूमकेतू अल्पायुषी असतात. तर इतर धूमकेतू सौर मंडळाच्या कितीतरी दूर असलेल्या द ऑर्ट क्लाऊडमध्ये असतात. ऑर्ट क्लाऊडमधले धूमकेतू हे वातावरणातल्या बर्फाच्या तुकड्यांचे बनलेले असतात आणि आकाराने हिमपर्वताच्या आकाराएवढे असतात. आताचा केटू धूमकेतूही तिथलाच आहे. म्हणूनच तो मोठा आणि दीर्घायुषी आहे.
एरवी धूमकेतू सूर्याभोवती फिरत असतात. पण, कधी कधी एखादा ग्रह किंवा ताऱ्याच्या गुरुत्वाकर्षणाच्या जोरामुळे ते सौरमालिकेत ओढले जातात. अशावेळी हे धूमकेतू सूर्य ते सौरमालिका असा लंबगोलाकार प्रवास करत राहतात. आणि काही वेळा सूर्य किंवा मार्गात येणाऱ्या एखाद्या ग्रह,ताऱ्यावर आदळतात. सूर्यावर आदळलेला धुमकेतू लुप्त होतो.
जुन्या काळात धुमकेतूला नावं देण्याची पद्धत नव्हती. द ग्रेट कॉमेट ऑफ 1680, 1744, 1843 अशी नावं देण्याची पद्धत होती. पण, अलीकडे धुमकेतूला इसॉन, कॉमेट वेस्ट अशी नावंही देण्यात येतात.
धूमकेतूने आणलं पृथ्वीवर पाणी?
रात्रीच्या आकाशात केरसुणी सारखा दिसणारा तेज:पुंज धूमकेतू दिसायला तर सुरेख दिसतोच. पण, खगोल शास्त्रज्ञांसाठी धूमकेतू जवळून दिसणं ही वेगळीच पर्वणी आहे. कारण, पृथ्वी ज्याचा एक भाग आहे अशा सौरमंडळाची निर्मिती होताना उर्वरित धूलीकण, वायू आणि बर्फ यांच्या कणांनी ते बनलेत. आणि त्यांच्या अभ्यासातून विश्वाच्या निर्मितीचं रहस्य उलगडेल असा त्यांना विश्वास आहे.
याशिवाय पृथ्वीवर धूमकेतूचा आघात झाला तर त्याचे सखोल परिणाम होत असतात. शास्त्रज्ञांच्या मते,
- अशा घर्षणातूनच पृथ्वीच्या पृष्ठभागावर राहणाऱ्या सजीव वस्तीला ऊर्जा मिळालीय
- आणि धूमकेतू बर्फाचे गोळे असल्यामुळे पृथ्वीला पाणी मिळालंय. आणि त्यातून जल साखळी सुरू आहे.
पण, धूमकेतू पृथ्वीवर आदळण्याच्या घटना किती सामान्य आहेत? दरवर्षी पृथ्वीच्या कक्षेच्या अती जवळून साधारण दहा तरी धूमकेतू जातात. आणि गणिताच्या रुपाने संभाव्यता काढली तर शास्त्रज्ञांच्या मते धूमकेतू पृथ्वीवर आदळण्यासाठी 45 लाख वर्षं मध्ये जावी लागतील. पण, पुरातन काळात मात्र असे प्रसंग अनेकदा घडल्याचं त्यांचं म्हणणं आहे. धूमकेतू पृथ्वीवर आदळणे ही संकल्पना रंजक आहे तितकीच विनाशकारक आणि म्हणून घाबरवणारी.
पृथ्वीच्या पलीकडे अवकाशात घडणाऱ्या गोष्टींचं कुतुहल सगळ्यांनाच असतं. आणि त्यातून आपल्याला आपल्या अस्तित्वाबद्दलही पूर्वी माहिती नसलेली गूढ माहिती मिळत असते. धूमकेतूचा अभ्यासही असाच आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








