सहा देशांमधून वाहाणाऱ्या 'या' नदीत सापडतात शेकडो किलोंचे मासे

    • Author, ग्रेस त्सोई
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

कंबोडियातल्या मेकॉंग नदीत तब्बल 300 किलोचा, जगातला सर्वांत मोठा गोड्या पाण्यातला मासा सापडल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे.

स्टिंग-रे जातीचा हा मासा असून, आतापर्यंत नोंद झालेल्या गोड्या पाण्यातल्या माशांपैकी हा सर्वांत मोठा मासा आहे.

या आधी जगातला सर्वांत मोठा गोड्या पाण्यातला मासा मेकाँग नदीतच पण थायलंड देशात 2005 साली सापडला होता. त्या माशाचं वजन 293 किलो होतं.

पण गोड्या पाण्यातल्या माशांच्या आकाराविषयी किंवा विविधतेविषयी नोंद ठेवणारा कोणताही अधिकृत डेटाबेस जगात नाहीये.

ज्या नदीत हे प्रचंड मोठे मासे सापडतात, ती मेकाँग नदी जैवविविधतेने नटलेली आहे. पण गेल्या काही वर्षांत अतिमासेमारी, धरणं आणि प्रदुषणामुळे इथल्या जैवविविधतेला धोका पोहचतोय.

मेकॉंग नदी तिबेटच्या पठारावर उगम पाऊन चीन, म्यानमार, थायलंड, लाओस, कंबोडिया आणि व्हिएतनाम या देशांमधून वाहाते.

झेब होगन एक जीवशास्त्रज्ञ आहेत. ते मेकाँग नदी संरक्षण आणि संवर्धन प्रकल्प 'वंडर्स ऑफ मेकाँग' चालवतात.

ते म्हणाले, "मी गेल्या 20 वर्षांपासून नदीत सापडणाऱ्या भल्यामोठ्या माशांवर अभ्यास करतोय, माझा अभ्यास मला सहाही खंडात घेऊन गेलाय आणि आजवर मी एकदाही इतका मोठा मासा पाहिलेला नाहीये. आता सापडलेला मासा हा आजवर नोंद झालेल्या गोड्या पाण्यातल्या माशांपैकी सगळ्यात मोठा मासा आहे."

त्यांच्या मते, मेकाँग नदीत असा मासा सापडणं हे एक सकारात्मक चिन्ह आहे. "हा एक आशेचा किरण आहे. कारण गेल्या काही वर्षांत मेकाँग नदीतल्या जीवनाची खूप हानी झालेली आहे. या नदीसमोर आपली जैवसंस्था टिकवण्यासाठी सध्या खूप आव्हानं आहेत."

या नदीच्या संवर्धनाचा प्रकल्प आता कंबोडियातल्या मच्छिमार असोसिएशनच्या सहाय्याने राबवला जातोय. इथल्या मच्छिमारांचं एक नेटवर्क तयार करून या नदीत जर दुर्मिळ प्रजातीतले, नष्ट होत जाणाऱ्या प्रजातीतले, किंवा महाकाय मासे सापडले तर त्यांची नोंद ठेवली जाते तसंच संशोधकांना याची माहिती दिली जाते.

गेल्या आठवड्यात कोह प्रीहा या बेटावरच्या एका स्थानिक मच्छिमाराला 'महाकाय' स्टिंग-रे मासा सापडला आणि त्याने जीवशास्त्रज्ञांना कळवलं. या माशाची लांबी जवळपास 4 मीटर होती तर रूंदी 2.2 मीटर.

या माशाला टॅग लावून पुन्हा नदीच्या पाण्यात सोडण्यात आलं. काही काळातच हा मासा मेकाँग नदीच्या गढूळ पाण्यात नाहीसा झाला.

इथल्या स्थानिक खेमर भाषेत या माशाला 'बोरामी' म्हणतात ज्याचा अर्थ होतो पोर्णिमेचा चंद्र.

"या स्टिंग-रेच्या शोधावरून सिद्ध होतं की आपल्या नजरेपलीकडे निसर्गात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला अचंबित करू शकतात. दुर्दैवाने महाकाय जलचरांचा, विशेषतः गोड्या पाण्यातल्या महाकाय जलचरांचा आपल्याकडे म्हणावा तितका अभ्यास झालेला नाही," डॉ. होगन म्हणतात.

गोड्या पाण्यातले महाकाय स्टिंग-रे ही पृथ्वीवरून नष्ट होत चाललेली प्रजाती आहे. गेल्या दोन महिन्यात दुसऱ्यांदा या नदीत महाकाय स्टिंग-रे दिसला आहे. आधीचा मासा मे महिन्यात सापडला होता आणि त्याचं वजन 181 किलो होतं.

डॉ. होगन यांच्या मते जेव्हा असे महाकाय, रेकॉर्ड ब्रेकिंग मासे सापडतात, तेव्हा त्याचा अर्थ असतो की पाण्यातली जैवविविधता अजूनही टिकून आहे, आणि जलचरांना अजूनही आपलं जीवन मानवी हस्तक्षेपाशिवाय जगायला वाव आहे.

"याउलट यांगत्से नदीची कहाणी आहे. तिथे असलेल्या चायनीज पेडलफिशची जात लुप्त झाली आहे."

"मेकाँग नदीत खोल डोह आहेत ज्यामुळे या महाकाय माशांना आश्रय मिळतो आणि ते निर्धोकपणे जगू शकतात. पण महाकाय मासे इतकीच मेकाँगची ओळख नाहीये. या नदीत दरवर्षी अब्जावधी मासे जन्मतात. हेच मासे कंबोडिया आणि व्हिएतनाममधल्या लाखो लोकांची भूक भागवतात."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)