Sports Bra : व्यायाम करताना स्तनांना जपणाऱ्या स्पोर्ट्स ब्राचा शोध कसा लागला?

फोटो स्रोत, JOGBRA, INC. RECORDS, ARCHIVES CENTER, NATIONAL MU
- Author, हॉली होंडोरिच
- Role, बीबीसी प्रतिनिधी
'सगळ्या आकाराच्या, प्रकारच्या स्तनांना आरामदायी आणि तरीही चांगला सपोर्ट असलेली (स्पोर्ट्स ब्रा) मिळायला हवी असं आम्हाला वाटतं.'
अदिदास या कंपनीने आपल्या स्पोर्ट्स ब्राची जाहिरात केली तेव्हा हे ट्वीट केलं. या ट्वीटमध्ये एक पोस्टर आहे ज्यात महिलांच अनावृत्त स्तन दिसत आहेत.
नग्नतेचं प्रदर्शन केलं म्हणून सध्या या जाहिरातीवर यूकेमध्ये बंदी घालण्यात आली आहे. पण तरीही अदिदास कंपनी आपल्या भूमिकेवर ठाम आहे.
यामुळे पुन्हा ब्रा, त्याकडे समाजाची बघण्याची नजर आणि ब्रानी महिलांचं आयुष्य कसं बदललं याची चर्चा सुरू झालीये.
बरं, त्याआधी महत्त्वाचं. आजही जगात 10 पैकी 8 बायका चुकीच्या साईजची ब्रा घालतात. त्याचे दुष्परिणाम काय किंवा योग्य साईजची ब्रा कशी ओळखायची हे इथे वाचा.
स्पोर्ट्स ब्राची सुरुवात
अदिदासच्या ज्या जाहिरातीवरून वाद झाला ती स्पोर्ट्स ब्राची आहे. स्पोर्ट्स ब्रा व्यायाम करताना किंवा खेळताना कंफर्टेबल असतात आणि स्तनांना अधिकचा सपोर्ट देतात त्यामुळे स्तनांना इजा होता नाही.
पण या स्पोर्ट्स ब्राचा शोध अपघातानेच लागला.
1977 च्या उन्हाळ्यातली गोष्ट आहे. व्हरमॉन्टमध्ये राहाणाऱ्या लिसा लिंडाल दर आठवड्याला साधारण 60 किलोमीटर पळायच्या.
पळताना त्यांना बाकी कशाचा त्रास नसला तरी अंतर्वस्त्रं मात्र प्रचंड त्रासदायक होती.
त्या म्हणतात, "सगळ्यात त्रासदायक काय होतं तर स्तनांना सपोर्टच मिळत नव्हता, त्यामुळे पळताना ते वरखाली हलायचे आणि त्रास व्हायचा."
लिसा मग स्वतःच्या स्तनांना इलॅस्टिकचं बँडेज बांधायला लागल्या पण त्यानेही उपयोग झाला नाही. मग त्यांनी साधी ब्रा वापरायला सुरुवात केली पण आपल्या साईजपेक्षा एक साईज कमी. म्हणजे पळताना स्तन घट्ट राहतील.
पळण्यासाठी सुयोग्य अशी ब्रा शोधण्याचे त्यांचे प्रयत्न सुरूच होते. अनेकदा लिंडा आणि त्यांची बहीण हसून म्हणायच्या, 'महिलांसाठी पण एखादा लंगोट असायला हवा, फरक इतकाच की त्यांच्या स्तनांना घट्ट बांधणारा हवा.'
आज लिसा आणि त्याच्या दोन सहकारी महिलांना अमेरिकेच्या हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळालं आहे कारण त्यांनी स्पोर्ट्स ब्राचा शोध लावला. याच स्पोर्ट्स ब्रामुळे महिलांच्या क्रीडा क्षेत्रात क्रांती आली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
महिलांच्या स्तनांसाठी लंगोट असावा असा विचार त्यांनी थट्टेत मांडला असला तरी लिसा याबद्दल खूप गंभीरपणे विचार करायला लागल्या. खेळताना, धावताना, पळताना महिलांच्या स्तनांना सपोर्ट मिळेल, ते अजिबात हलणार नाहीत पण तरीही त्यांना त्रास होणार नाही अशा प्रकारच्या अंतर्वस्त्राची गरज होती.
त्यांनी आपल्या जवळच्या मैत्रिणीची या कामी मदत घ्यायचं ठरवलं. पॉली पाल्मर स्मिथ व्हरमॉन्टमधल्याच शेक्सपिअर फेस्टिव्हलमध्ये कॉस्च्युम डिझायनर म्हणून काम करत होत्या. काही दिवसात या दोघींना आणखी तिसरी सहकारी मिळाली - हिंडा मिलर. त्याही कॉस्च्युम डिझायनरच होत्या.
लिसाच्या घरात त्यांच्या हॉलमध्ये रोज या महिला काही ना काही प्रयोग करत असायच्या. वेगवेगळ्या प्रकारचं कापड, वेगवेगळे डिझाईन यांचे प्रयोग चालायचे. मिलर एका प्रकारचा प्रोटोटाईप बनवायच्या आणि ती ब्रा घालून लिंडा पळायला जायच्या. स्तन किती हलले याचा अभ्यास व्हायचा.
लिसा म्हणतात, "काहीच काम करत नव्हतं."

फोटो स्रोत, JOGBRA, INC. RECORDS, ARCHIVES CENTER, NATIONAL MU
एकदिवस त्यांचे प्रयोग सुरू असताना लिसाचे पती वरून खाली आले. त्यांच्या खांद्यावर जॉकस्ट्रॅप होता. जॉकस्ट्रॅप म्हणजे लंगोटचा पाश्चात्य अवतार. यात पुरुषांच्या जननेद्रियांना सपोर्ट देण्यासाठी इलॅस्टिक असतात.
त्यांनी तो जॉकस्ट्रॅप छातीवर ओढून दाखवला आणि सांगितलं की तुम्हाला अशा प्रकारच्या 'जॉक ब्रा' ची गरज आहे.
त्या दिवसाची आठवण सांगताना पॉली म्हणतात, "डोळ्यासमोर लख्ख वीज चमकावी तसं झालं आम्हाला."
त्यांनी दोन जॉकस्ट्रॅप एकत्र शिवले आणि जगातली पहिली जॉगब्रा तयार झाली.
एकदा या स्पोर्ट्स ब्राचं बेसिक डिझाईन तयार झाल्यावर त्यांनी पेटंटसाठी अर्ज केला.
या जॉगब्राचं पहिलं डिझाईन तयार झालं त्याच्या पाच वर्षं आधी अमेरिकेच्या संसदेने Title IX हे विधेयक संमत केलं होतं.
महिलांना समान हक्क मिळण्याच्या बाबतीत हे विधेयक मैलाचा दगड ठरलं. शिक्षण आणि इतर कोणत्याही क्षेत्रात महिलांना पुरुषांच्या बरोबरीने सरकारी निधी मिळाला पाहिजे असं हा नवीन कायदा म्हणत होता. त्यामुळे महिलांच्या खेळालाही निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.
आज अमेरिकेत दर पाच मुलींमागे दोन मुली शाळेत आणि कॉलेजमध्ये कोणत्या ना कोणत्या खेळात भाग घेतात. हेच प्रमाण 1970 साली दर 27 मुलींमागे एक मुलगी असं होतं.
Title IX मुळे मुलींचा खेळात येण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी स्पोर्ट्स ब्रामुळे मुलींना खेळताना हालचाली करणं सोपं झालं.
"या नवीन कायद्यामुळे महिलांच्या खेळात पैसा यायला लागला होता, पायभूत सुविधा मिळत होत्या आणि महिलांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. पण तरीही महिलांना मैदानावर जाऊन खेळण्यासाठी आत्मविश्वास नव्हता आणि तसे आरामदायक कपडेही नव्हते," लिसा म्हणतात.
आज स्पोर्ट्स ब्राकडे एक क्रांतिकारी पाऊल म्हणून पाहिलं जातं. या प्रकारच्या ब्रामुळे महिलांना आत्मविश्वास आणि आराम दोन्ही मिळाले असं म्हणतात. आज फक्त स्पोर्ट्स ब्राच्या व्यवसायात 9 अब्ज डॉलर्सची उलाढाल होते.
पण 1977 साली जेव्हा पहिली जॉगब्रा तयार झाली तेव्हा परिस्थिती थोडी वेगळी होती. अमेरिकेच्या अम्यॅच्युअर अॅथलेटिक युनियनने महिलांच्या मॅरेथॉन धावण्यावरची बंदी उठवून फक्त पाच वर्षं झाले होते. आणि महिलांना ऑलिम्पिकमध्ये 3000 मीटर पेक्षा जास्त धावण्याची परवानगी मिळण्यासाठी अजून 7 वर्षं बाकी होती.
कारण त्यावेळेच्या तज्ज्ञांचं म्हणणं होतं की लांब पल्ल्याच्या धावण्याच्या स्पर्धा महिलांच्या आरोग्यासाठी आणि स्त्रीत्वासाठी हानिकारक होत्या.
लिसा लिंडाल, पॉली स्मिथ आणि हिंडा मिलर या तिघींनी एकत्र येत आपली कंपनी स्थापन केली. पण यानंतर थोड्याच दिवसात पॉली एका कंपनीत कॉस्च्युम डिझायनर म्हणून नोकरीला लागल्या आणि त्यांनी जॉगब्रा कंपनीची जबाबदारी लिसा आणि हिंडा या दोघींकडे सोपवली.
हिंडा मिलर यांच्या वडिलांनी जॉगब्रासाठी 5000 डॉलर्सचं कर्ज दिलं आणि या दोघींनी त्यातून पहिल्या 720 जॉगब्रा तयार केल्या. त्या खेळाचं साहित्य विकणाऱ्या दुकानात आपल्या जॉगब्रा ठेवता येतील यासाठी प्रयत्न करायला लागल्या.

फोटो स्रोत, JOGBRA, INC. RECORDS, ARCHIVES CENTER, NATIONAL MU
"कारण आमच्या जॉगब्रा खेळाशी संबधित होत्या. त्यांना पूर्णपणे महिलांची अंतवस्त्रं म्हणणं चुकीचं होतं," हिंडा मिलर म्हणतात.
पण खेळाच्या दुकानांचे मालक आणि मॅनेजर, जे सहसा पुरुषच असायचे, त्यांच्या जॉगब्रा पाहून हसायचे. "आम्ही ज्या दुकानात जायचो तिथे आम्हाला ते लोक म्हणायचे या दुकानात आम्ही अंतर्वस्त्र विकत नाही," लिसा त्या दिवसांची आठवण सांगतात.
मग त्यांनी दुसरा रस्ता शोधून काढला. त्यांनी ठरवलं की या दुकानांच्या असिस्टंट मॅनेजर्सला भेटायचं आणि त्यांना आपली कल्पना पटवून द्यायची. बहुतांश दुकानांच्या असिस्टंट मॅनेजर्स महिला होत्या.
लिसा आणि हिंडा दोघींनी आपल्या जॉगब्रा एका लहानशा काळ्या खोक्यात पॅक केल्या. त्याच्या साईजही सोप्या ठेवल्या. स्मॉल, मीडियम, लार्ज. कपसाईजचा विषय संपवला. दुकानात ज्या महिला असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करायच्या त्यांना या ब्रा सँपल म्हणून दिल्या.
त्याने काम झालं. 1978 साली पहिली जॉगब्रा दुकानात दाखल झाली. तिची किंमत होती 16 डॉलर्स.
हळूहळू लिसा आणि हिंडाने आपला व्यवसाय वाढवत नेला. त्यांनी धावण्याच्या मॅगझिन्समध्ये जाहिराती द्यायला सुरुवात केली. आपण तयार केलेल्या जॉगब्रा घालून लिसा लिंडाल आणि हिंडा मिलर दोघी मॉडेलिंग करायच्या. कारण त्यांना दुसऱ्या मॉडेल्स परवडणाऱ्या नव्हत्या.
त्यांची स्लोगन होती, "पुरुषाने बनवलेली कोणतीही स्पोर्ट्स ब्रा यांना स्पर्शही करू शकत नाही."
त्यांनी तयार केलेल्या पहिल्या ब्रा हातोहात विकल्या गेल्या. त्यांच्या व्यवसायातलं पहिलं वर्षं संपता संपता लिसा आणि हिंडा दोघींनी 5 लाख डॉलर्सची उलढाल केली.
पुढच्या 10 वर्षांत त्यांच्या कंपनीची भरभराट होत राहिली. दर वर्षी त्यांच्या कंपनीची 25 टक्के वाढ होत होती. पण याकाळात त्यांना अनेक गोष्टी नव्याने शिकाव्या लागल्या.
लिसा मार्केटिंग आणि सेल्स पाहायच्या तर हिंडा प्रॉडक्शन आणि इन्व्हेंटरी. त्यांच्या कंपनीत 200 माणसं काम करायला लागली. त्यांनी जॉगब्राबरोबरच मोठे स्तन असलेल्या महिलांसाठी स्पोर्ट्सशेप ही ब्रा तर पोट झाकण्यासाठी ब्रा टॉप अशी दोन नवी उत्पादनं बाजारात आणली.
जसंजसं जॉगब्रा कंपनी प्रगती करत होती, या लिसा आणि हिंडामध्ये वाद व्हायला लागले.
या दोघींचं पटेनासं झालं.

फोटो स्रोत, NATIONAL INVENTORS HALL OF FAME
1980 चं दशक संपता संपता जॉगब्राचा व्यवसाय कमी व्हायला लागला. नाईके आणि रिबॉकसारख्या कंपन्यांनी मोठी टक्कर द्यायला सुरुवात केली. त्यांच्याबरोबरच्या स्पर्धेत टिकून राहायचं तर जॉगब्राला मोठं कर्ज घ्यावं लागणार होतं.
मग 1990 साली या दोघींनी जॉगब्रा कंपनी विकून टाकली.
आज जुने वाद निवळलेत.
"आम्ही आता सत्तरीत आहोत आणि जिवंत आहोत. जुन्या घटना आठवल्या की आता आम्ही हसतो. आमची इच्छा होती की शक्य तितक्या महिलांपर्यंत जॉगब्रा पोहचवावी आणि आम्ही ते केलं."
लिंडाल, स्मिथ आणि मिलर या तिघींचा समावेश अमेरिकेतल्या नॅशनल इन्व्हेंटर्स हॉल ऑफ फेममध्ये केला आहे. शोधकर्ते ज्यांनी लोकांचं आयुष्य बदललं त्यांना हा सन्मान मिळतो.
यात तिघींबरोबर लेसर डर्मटॉलॉजिचा शोध लावला ते, आयब्युप्रुफेन या पेनकिलरचा शोध लावला ते आणि व्हॉईस ओव्हर इंटरनेटचा शोध लावला ते अशा शोधकर्त्यांना हा सन्मान मिळाला आहे.
पण आपल्याला हा सन्मान मिळाला आहे यावर या तिघींचाही विश्वास बसत नव्हता.
आजही या तिघींना स्पोर्ट्स ब्रा वापरणाऱ्या महिला दिसल्या की आनंद होतो. आजच्या स्पोर्ट्स ब्राही या तिघींनी दोन जॉकस्ट्रॅप शिवून तयार केलेल्या ब्राशी मिळत्या जुळत्या आहेत.
"महिलांच्या पाठीवरचे ते दोन स्ट्रॅप दिसले की अजूनही अभिमान वाटतो. वाटतं की, हो, मी बनवलंय ते."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








