कार्लोस-द जॅकल : ज्यानं OPECच्या तेलमंत्र्यांचं अपहरण केलं आणि फिल्म स्टारप्रमाणे ऑटोग्राफ देत सुटला

फोटो स्रोत, BOOK JACKAL BY JOHN FOLLAIN
- Author, रेहान फझल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
30 डिसेंबर 1973... लंडनमध्ये कडाक्याची थंडी पडली होती. तिथल्या अतिशय महागड्या सेंट जॉन्स वूड भागात एका उंचापुरा माणूस हिंडत होता. त्याने फरचं जॅकेट घातलं होतं, लोकरीच्या मफरलनं आपला चेहरा झाकून घेतला होता.
त्याच्या जॅकेटच्या खिशामध्ये इटालियन बनावटीचं 9 एमएम बेरेटा पिस्तूल ठेवली होती. त्या व्यक्तिने सावकाशपणे 48 नंबरच्या घराचं लोखंडी फाटक उघडलं. ते घर प्रसिद्ध रिटेल कंपनी 'मार्क्स अँड स्पेन्सर'चे अध्यक्ष आणि ब्रिटीश झायोनिस्ट फेडरेशनचे उपाध्यक्ष जोसेफ एडवर्ड सीफ यांचं होतं.
घराची बेल वाजल्यावर सीफ यांचा पोर्तुगीज बटलर मॅन्युएल परलोएरानं दार उघडलं. त्या उंच व्यक्तिनं लगेचच खिशातून पिस्तूल काढून त्या बटलरच्या डोक्याला लावलं आणि म्हटलं, "टेक मी टू सीफ."
बटलर त्या माणसासोबत जिना चढत होता, तेव्हाच सीफ यांच्या पत्नी लुइस यांनी हे दृश्य पाहिलं. त्या गडबडीने आपल्या बेडरुमकडे धावल्या, दार लावलं आणि पोलिसांना फोन केला. घड्याळात 7 वाजून 2 मिनिटं झाली होती.
तोपर्यंत बटलर त्या माणसाला सीफच्या खोलीपर्यंत घेऊन गेला होता. त्याने एक मीटर अंतरावरून सीफच्या चेहऱ्यासमोर पिस्तूल धरलं आणि चाप ओढला. सीफ बेशुद्ध होऊन खाली कोसळले. सीफनं पुन्हा पिस्तूल रोखलं, पण नेमकं तेव्हाच ते पिस्तूल जाम झालं.
दोन मिनिटांत पोलिसांची गाडी सीफच्या घरासमोरच थांबली. आपली मोहीम फत्ते झाली की नाही हे जाणून न घेताच त्याला तिथून सटकावं लागलं. नंतर कळलं की गोळी सीफच्या वरच्या ओठाला छेदून दातात अडकली होती. सीफचं ऑपरेशन झालं तेव्हा डॉक्टरांनी त्या गोळीबरोबरच सीफच्या जबड्यात अडकलेले हाडांचे तुकडेही काढले.
अशापद्धतीने गोळी लागल्यानंतरही सीफ ही सगळी गोष्ट सांगण्यासाठी जिवंत राहिले.
ओपेकच्या तेल मंत्र्यांचं अपहरण
कार्लोस 'द जॅकल'चं खरं नाव इलिच रामिरेझ सांचेझ होतं.

फोटो स्रोत, Getty Images
हत्येचा प्रयत्न करणाऱ्या या माणसाच्या करिअरची ही सुरुवात खूपच निराशाजनक होती. पण पुढे हाच माणूस कार्लोस 'द जॅकल' या नावानं कुख्यात झाला.
70च्या दशकांत जेवढ्या कट्टरतावादी हिंसक घटना झाल्या, मग ती म्युनिकमध्ये इस्रायली खेळाडूंची हत्या असेल किंवा पॅरिसमधील उजव्या विचारांच्या वर्तमानपत्र आणि रेडिओ स्टेशनवर झालेला हल्ला किंवा मग फ्रेंच दूतावासावर कब्जा करण्याची घटना, या सर्वांमध्ये कार्लोसचा हात असल्याचं सांगितलं गेलं.
मात्र जेव्हा कार्लोसनं व्हिएन्नामध्ये तेल उत्पादन करणाऱ्या देशांच्या मंत्र्यांचंच अपहरण केलं, तेव्हा जगभरातील लोक त्याला ओळखू लागले.
कार्लोसनं सभागृहात घुसल्यानंतर आधी तिथल्या छतावर गोळीबार केला. चेहरा झाकलेल्या एका व्यक्तिनं सगळ्या मंत्र्यांना कार्पेटवर झोपायला सांगितलं.
सौदी अरेबीचे तेल मंत्री शेख यमानी यांनी नंतर एका मुलाखतीत सांगितलं होतं, "मला वाटलं की, ओपेकनं वाढवलेल्या तेलांच्या किमतीचा विरोध करण्यासाठी काही युरोपियन लोकांवर हल्ला केला असेल."
घाबरलेल्या यमानी यांनी लगेचच कुराणांमधल्या आयत म्हणायला सुरूवात केली.
यमानी सांगतात, "कार्लोस परदेशी लहेजातल्या अरबी भाषेत ओरडला-युसूफ, तुझी स्फोटकं जमिनीवर ठेव. तुला यमानी सापडला का? मी त्यांना ओरडून म्हटलं की, मी इथे आहे. त्या बंदूकधारी व्यक्तीनं आमचे सगळ्यांचे चेहरे पाहिले. जसे त्याचे डोळे माझ्याकडे वळले, त्यानं त्याच्या साथीदारांना ओरडून मीच यमानी असल्याचं सांगितलं. त्यानंतर कार्लोस व्हेनेझुएलाच्या तेल मंत्र्यासोबत अतिशय आदराने बोलायला लागला."
कार्लोसचा साथीदार क्लाइनला लागली गोळी
या दरम्यान ऑस्ट्रियाच्या सुरक्षा दलाची एक तुकडी हातात मशीनगन घेऊन आणि बुलेटप्रूफ जाकिट घालून इमारतीच्या आतमध्ये घुसली. ते जसे आतमध्ये घुसले कार्लोस आणि त्याच्या साथीदारांनी त्यांचं स्वागत गोळ्यांच्या वर्षावानंच केलं.
या सगळ्या धुमश्चक्रीत त्या कमांडोंची एक गोळी भिंतीवर आपटून क्लाइनच्या पोटात घुसली. क्लाइन कॉरिडॉरमधल्या एका स्वयंपाकघरात घुसला. तिथे त्यानं सिगारेट शिलगावली. मग आपला स्वेटर काढून जखम पाहिली. स्वतःची जखम पाहिल्यावर त्याला खूप आश्चर्य वाटलं कारण त्याच्या पोटात छिद्र पडलेलं दिसत होतं, पण त्यातून रक्त अजिबात येत नव्हतं.

फोटो स्रोत, Getty Images
काही वर्षांनी 'लिबरेशन' नावाच्या मासिकात कार्लोसचा इंटरव्ह्यू प्रसिद्ध झाला होता. त्यात त्यानं म्हटलं होतं, "जेव्हा मी कार्लोसला माझी दुखापत दाखवण्यासाठी गेलो, तेव्हा त्यानं माझ्या डोक्यावर थोपटलं. मी बसून ओलीस ठेवलेल्यांवर नजर ठेवू शकतो असंही त्यानं सांगितलं. तेवढ्यात क्रोशेर टाइडमान दोन लोकांना ठार करण्यात आलंय हे सांगण्यासाठी आत घुसले. कार्लोसनं हसून म्हटलं- छान, मी पण एकाला ठार केलंय."
पडदे लावलेल्या मोठ्या बसची मागणी
कार्लोसने तितक्यात विचित्र अशा अरबी लहेजामध्ये घोषणा केली की, आम्ही पॅलेस्टिनी कमांडो आहोत. सौदी अरेबिया आणि इराण हे आमचं लक्ष्य आहेत.
त्याने तिथे उपस्थित असलेल्या ब्रिटीश मंत्री ग्रिसेल्डा कॅरी यांच्या माध्यमातून ऑस्ट्रियन सरकारला एक हस्तलिखित निरोप पाठवला. त्यामध्ये म्हटलं होतं की, ऑस्ट्रियन रेडिओ आणि टेलिव्हिजनवर पुढच्या चोवीस तासांत दर दोन तासांनी त्यांचा एक संदेश वाचून दाखवला जावा.
त्यांची मागणी होती- आम्हाला खिडक्यांना पडदे लावलेली एक मोठी बस दिली जावी. ही बस आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता व्हिएन्ना एअरपोर्टवर घेऊन जाईल. तिथे आमच्यासाठी एक डीसी 9 विमान तयार ठेवण्यात यावं आणि आम्हाला तसंच आम्ही ज्यांना ओलिस धरलंय त्यांना इच्छित ठिकाणी पोहोचवण्यात यावं.
आपला जखमी साथीदार क्लाइनला उपचारासाठी तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केलं जावं, अशीही कार्लोसची मागणी होती. ऑस्ट्रियाचं सरकार यासाठी तयार झालं. क्लाइनला जेव्हा स्ट्रेचरवरून आणलं जात होतं, तेव्हा त्यानं एका हातानं आपली जखम दाबून धरली होती आणि दुसऱ्या हातानं आपला चेहरा लपवला होता.
अँब्युलन्समधून नेताना क्लाइनची शुद्ध हरपली. त्याचं ऑपरेशन झालं तेव्हा कळलं की, गोळी त्याच्या शरीरात घुसून दोन भागात विभागली गेली होती. त्याचं मोठं आतडं आणि जठराला इजा झाली होती.
क्लाइनला सोबत घेऊन जाण्याचा निर्णय
कार्लोसच्या गँगमध्ये एका महिलेचाही सहभाग होता. या फोटोत ती महिला बंदूक घेऊन ऑस्ट्रियाच्या विमानात चढताना दिसली.

फोटो स्रोत, CENTRAL PRESS/GETTY IMAGES
जॉन फॉलेन यांनी आपल्या पुस्तकात लिहिलं आहे, "कार्लोसने पुन्हा एकदा एक निरोप पाठवला की, विमान कर्मचाऱ्यांसोबत एक विमानही उपलब्ध करून देण्यात यावं. जखमी क्लाइनला त्याच्याकडे पोहोचवलं जावं आणि एक रेडिओ, 25 मीटर लांब दोरी आणि पाच कात्र्या दिल्या जाव्यात.
'दुसरीकडे ऑलजेमिंस क्रँकेनहोस हॉस्पिटलमध्ये क्लाइनवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचं म्हणणं होतं की, क्लाइनला बरं व्हायला किमान एखादा महिना लागेल. त्याला लाइफ सपोर्ट मशीनवर जिवंत ठेवलं जात आहे.'
'कार्लोसनं त्याच्या साथीदारांसोबत सल्ला-मसलत केल्यानंतर क्लाइनला सोबत घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. दरम्यान त्याचा मृत्यू जरी झाला तरी त्याला सोबत घेऊनच जाऊ. आम्ही सोबत आलो होतो आणि सोबतच जाऊ.'
याच दरम्यान कार्लोसने सौदी अरेबियाचे तेलमंत्री यमानी यांना दुसऱ्या खोलीत येण्याची खूण केली.
यमानी यांनी तो प्रसंग सांगताना म्हटलं होतं, "त्या खोलीत आम्ही दोघेच होतो. मला ठार मारणार असल्याचं कार्लोसनं स्पष्टपणे सांगितलं. हे तुमच्याविरुद्ध नाही, तर तुमच्या देशाविरूद्ध आहे. तुम्ही चांगली व्यक्ती आहात."
"मी त्याला म्हटलं की, तुम्हाला मी आवडतोय तरीही तुम्हाला मला मारायचंय. बहुतेक तुम्हाला माझ्याकडून काहीतरी हवंय. कार्लोसनं म्हटलं की, मी तुमच्यावर का दबाव टाकू? मी ऑस्ट्रियाच्या सरकारवर दबाव टाकतोय, जेणेकरून मला तिथून निघता येईल. तुमच्याबद्दल बोलायचं झालं तर मी तुम्हाला केवळ वस्तुस्थिती सांगतोय," असं यमानी यांनी म्हटलं.
यमानी यांचं मृत्यूपत्र
यमानी पुढे सांगतात, "मी माझं मृत्यूपत्र लिहायला सुरूवात केली. आम्ही साडे चार वाजता तुम्हाला मारून टाकू, असं कार्लोसनं मला सांगितलं. मी अजून वेगानं लिहायला लागलो. चार वाजून वीस मिनिटांनी तो पुन्हा खोलीत आला. मी घड्याळ पाहिलं. माझ्याकडे अजून दहाच मिनिटं आहेत, असं मी त्याला म्हटलं. ते ऐकून तो हसायला लागला आणि म्हणाला की, तुम्हाला अजून बरंच जगायचं आहे."

फोटो स्रोत, Getty Images
फौलेन लिहितात, "सकाळपासून कार्लोस आणि त्याच्या साथीदारांनी काही खाल्लं नव्हतं. ज्यांना ओलीस ठेवलं होतं, त्यांनाही काही खायला दिलं नव्हतं. कार्लोसनं विनंती केली की, आतमध्ये 100 सँडविचेस आणि काही फळ पाठवली जावीत, अशी विनंती केली. ऑस्ट्रियन सरकारने तातडीने त्यांची मागणी मान्य केली. मात्र त्यांनी डुकराच्या मांसापासून बनलेली सँडविचेस पाठवली. कार्लोसला हे कळल्यानंतर त्यांनी ती परत पाठवली, कारण ओलिस ठेवलेल्यांमध्ये अनेक लोक मुसलमान होते. ते डुक्कराचं मांस खात नाहीत."
"कार्लोसनं पुन्हा चिकन आणि चिप्स पाठवण्याची मागणी केली. हिल्टन हॉटेलनं ही समस्या सोडवली. तिथे संध्याकाळी ओपेकच्या तेलमंत्र्यांच्या भोजनाचं आयोजन केलं होतं. जेव्हा जेवण आत आणलं गेलं, तेव्हा त्या खोलीतले सगळे दिवे बंद केले होते. कारण सकाळीच कार्लोसनं गोळीबार करून बल्ब तोडले होते. मेणबत्तीच्या प्रकाशातच सगळं जेवण आतमध्ये पाठवलं गेलं."
एका डॉक्टरने केली सोबत घेऊन जाण्याची विनंती
या सगळ्या घटनेवर एक पुस्तक लिहिणाऱ्या डेव्हिड यालप यांनी लिहिलं की, 'ओलिसांसाठी ती रात्र खूप वाईट होती. ते खुर्च्यांवर बसले होते. काहीजण फरशीवर आडवे झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी बरोबर सात वाजता एक पडदे लावलेली बस ओपेक मुख्यालयाच्या मागे येऊन उभी राहिली. कार्लोस ओलिस ठेवलेल्या सगळ्यांना घेऊन त्या बसमधून एअरपोर्टवर पोहोचला. त्यांच्या आधीच जखमी झालेल्या क्लाइनला घेऊन एक अँब्युलन्स एअरपोर्टवर पोहोचली होती. एका डॉक्टरने स्वेच्छेने त्या विमानातून जखमी क्लाइनसोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली.'
22 डिसेंबरला सकाळी 9 वाजता जेव्हा विमानानं टेक ऑफ केलं, तेव्हा कार्लोसचा तणाव थोडा कमी व्हायला सुरूवात झाली. पण त्यावेळीही त्याने सोबत भरलेली पिस्तूल ठेवली होती.

फोटो स्रोत, Getty Images
शेख यमानींनी त्या घटनेबद्दल म्हटलं होतं, "त्या उड्डाणामध्ये माझी आणि कार्लोसची प्रत्येक विषयावर चर्चा झाली. सामाजिक, राजकीय आणि अगदी सेक्ससारख्या विषयांवरही आम्ही बोललो. त्याला सुंदर मुलींसोबत राहणं आणि दारू पिणं आवडायचं असं मला वाटलं. त्याला कोणत्याही आयडिऑलॉजीशी काही देणंघेणं असेल असं नाही वाटलं."
"प्रवास करताना तो चेष्टामस्करी पण करत होता. तरीही काही वेळापूर्वी यानेच मला मारण्याची धमकी दिली होती, हे मला विसरता आलं नव्हतं. तो बेसावध असताना अखेरीस मी विचारलंच की, तुम्ही माझ्यासोबत काय करणार आहात? आधी आपण अल्जियर्सला जाऊ. तिथे दोन तास थांबल्यानंतर ट्रिपोलीच्या दिशेने जाऊ, असं कार्लोसनं सांगितलं.
लिबियामध्ये काही समस्या निर्माण झालीये का, असं मी विचारलं. कार्लोसनं त्याचं उत्तर नकारार्थी दिलं. लिबियाचे पंतप्रधान एअरपोर्टवर येऊन आपलं स्वागत करतील आणि तिथून बगदादसा जायला आपल्यासाठी बोइंग विमान तयार असेल, असं कार्लोसनं म्हटलं," यमानींनी त्यांची आठवण सांगितली होती.
नंतर व्हेनेझुएलाचे मंत्री हर्नान्डेज अकोस्टा यांनीही अशीच आठवण सांगताना म्हटलं, "विमानात कार्लोस एखाद्या फिल्म स्टारप्रमाणे ऑटोग्राफ देत होता."
फ्लाइट दरम्यान क्रोशेर टाइडमान विमानाच्या मागच्या बाजूला जखमी क्लाइनजवळ बसून त्याच्या कपाळावरचा घाम पुसत होती. त्याचे ओठ कोरडे पडल्यावर त्याला पाणी पाजत होती.
अडीच तासांच्या उड्डाणानंतर कार्लोसचं विमान अल्जिअर्सच्या बाहेर अल् बैदा विमानतळावर उतरलं. कार्लोस जसा विमानातून उतरला, तसं अल्जीरियाचे परराष्ट्रमंत्री अब्दुल अजीज बोतेफिल्का यांनी हसून त्याची गळाभेट घेतली.
एक अँब्युलन्स क्लाइनला घेऊन हॉस्पिटलला गेली. कार्लोसनं विमानतळावर तीस बिगर अरब मंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांची मुक्तता केली. यमनी आणि इराणचे गृहमंत्री अमूझेगर यांच्यासह पंधरा लोकांना विमानातच बसून राहण्यासाठी सांगितलं.
सुरुवातीच्या या आगतस्वागतानंतर अल्जीरियन सरकारसोबत कार्लोसची चर्चा यशस्वी झाली नाही. त्यानं केलेली एक मागणी अल्जीरियानं मान्य केली नाही.

फोटो स्रोत, Getty Images
शेवटी ऑस्ट्रियाकडून मिळालेल्या विमानातच पेट्रोल भरण्यात आलं आणि ते विमान ट्रिपोलीच्या दिशेनं निघालं. मात्र कार्लोसला अपेक्षित असलेलं स्वागत तिथेही झालं नाही. दरम्यान, कार्लोसचा एक साथीदार आजारी पडला आणि विमानाच्या एका कोपऱ्यात जाऊन उलटी करायला लागला.
ट्यूनीशियानं विमान उतरू दिलं नाही
रात्री एक वाजता विमानानं ट्रिपोलीहून उड्डाण केलं. विमान जेव्हा ट्युनिसच्या वरून चाललं होतं, तेव्हा एअर ट्रॅफिक कंट्रोलनं त्याला तिथं उतरण्याची परवानगी दिली नाही. कार्लोसकडे अल्जीअर्सकडे परत जाण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय राहिला नाही.
तिथे कार्लोसनं चर्चेनंतर सर्व ओलीसांना सोडण्याचा निर्णय घेतला. यमनी त्याबद्दल सांगतात, "कार्लोसनं विमानातून बाहेर पडत असल्याची घोषणा केली. पाच मिनिटांनंतर तुम्हीही खाली उतरा असं त्यानं आम्हाला सांगितलं."

फोटो स्रोत, Getty Images
"कार्लोस जसा खाली उतरला, तशी त्याची टीमही खाली उतरली. ते उतरल्यानंतर विमानात लगेचच स्फोट वगैरे होईल का अशी भीती मला वाटली. पाच मिनिटं वाट पाहिल्यानंतर मी पण खाली उतरण्याचा निर्णय घेतला. पण माझ्या एका सहकाऱ्याने माझ्या आधी विमानातून उतरण्याचा निर्णय घेतला. कारण कार्लोस विमानाच्या पायऱ्यांजवळच मला लक्ष्य करेल की काय अशी भीती त्याला होती."
कार्लोसला मिळाली पाच कोटी डॉलरची खंडणी
2013 साली कोर्टातल्या सुनावणीदरम्यान कार्लोसचा हा फोटो घेतला गेला.

फोटो स्रोत, BERTRAND GUAY/GETTY IMAGES
क्लाइननं एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं, "कार्लोसनं मला सांगितलं की अल्जीरियाई सरकारनं त्याला पैसे आणि सुरक्षितता पुरविण्याचं वचन दिल्यामुळे त्यानं सौदी मंत्री शेख यमानी यांना नाही मारलं."
अल्जीरियानं कार्लोसला सगळ्या लोकांचे प्राण वाचविण्यासाठी 5 कोटी डॉलर दिले होते आणि हा पैसा सौदी अरेबिया आणि इराणनं दिला होता.
असं सांगितलं जातं की, कार्लोसनं हा पैसा त्याच्या प्रमुखांकडे न देता स्वतःसाठीच वापरला. पण ही एक वेगळी गोष्ट आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








