Mothers day: 'मी माझ्या आईला 58 वर्षं शोधत होतो, अखेर ती सापडलीच'

केल्विन बॅरेट आणि मॉली पायेन

फोटो स्रोत, MARTIN GILES/BBC

फोटो कॅप्शन, केल्विन बॅरेट आणि मॉली पायेन
    • Author, शॉन पील व सारा जेनकिन्स,
    • Role, बीबीसी न्यूज, ईस्ट.

केल्विन बॅरेट यांचं आईविनाच लहानाचे मोठे झाले, पण कधीतरी आपण आपल्या आईला शोधू, असं स्वप्न मात्र त्यांनी मनाशी जपलं होतं. तब्बल 58 वर्षांनी त्यांनी आपल्या आईचा शोध कसा घेतला आणि इतक्या प्रदीर्घ काळानंतर आईला भेटल्यावर त्यांना कसं वाटलं?

"माझ्या मनात एक अशी पोकळी राहिलेली होती, ती इतक्या वर्षांनी भरून निघाल्यासारखं वाटतंय," असं केल्विन म्हणतात. सुमारे 60 वर्षांपूर्वी ते त्यांच्या आईपासून दुरावले होते.

अमेरिकेतील मिशिगनमध्ये राहणारे 64 वर्षीय केल्विन गेली 40 वर्षं त्यांच्या 'मा'चा शोध घेत होते. अखेरीस, त्यांची 'मा', म्हणजे 85 वर्षीय मॉली पायेन केम्ब्रिजशायरमध्ये राहत असल्याचं त्यांना कळलं.

बॅरेट यांची मुलगी मॅकेन्झी बॅरेट यांनी कौटुंबिक वांशिकता पडताळण्यासाठी डीएनए चाचणी केली, तेव्हा पायेन यांचा भाचा स्टीफन पायेन यांच्याशी या चाचणीचा निकाल जुळला. त्यानंतर मॉली आणि केल्विन यांचं आई-मुलाचं नातंही सिद्ध झालं.

बॉब बॅरेट 1950च्या दशकात युनायटेड किंगडममध्ये तैनात अमेरिकी सैन्यदलांत असताना पायेन यांची त्यांच्याशी भेट झाली.

या दोघांनी जानेवारी 1995मध्ये फाउलमीअर, केम्ब्रिजशायर इथल्या सेंट मेरीज् चर्चमध्ये लग्न केलं आणि मार्च महिन्यात ते अमेरिकेला गेले.

केल्विन यांना जन्म देण्याआधी मॉली पायेन या पती बॉब बॅरेट यांच्यासोबत कँब्रिजशायरमधून मिशिगनला स्थलांतरित झाल्या होत्या.

फोटो स्रोत, STEPHEN PAYNE

फोटो कॅप्शन, केल्विन यांना जन्म देण्याआधी मॉली पायेन या पती बॉब बॅरेट यांच्यासोबत कँब्रिजशायरमधून मिशिगनला स्थलांतरित झाल्या होत्या.

त्यांचा पहिला मुलगा, केल्विन याचा जन्म 1957 साली झाला आणि त्यांचं दुसरं अपत्य मायकल याचा जन्म झाल्यानंतर पायेन युनायटेड किंगडमला परतल्या.

"अमेरिकेत माझी मानसिक अवस्था अगदीच दयनीय झाली होती." असं त्या सांगतात.

"त्या टप्प्यावर मला स्वतःचीच काळजी घेणं शक्य झालं नव्हतं, त्यामुळे मुलांची काळजी घेण्याची जबाबदारी तर घेताच येणार नव्हती."

"मग माझ्या भावाने मला युनायटेड किंगडमला जाण्यासाठी तिकीट काढून दिलं. मुलांसाठी अमेरिकेत परतायच्या उद्देशानेच मी तिकडे गेले, पण तसं झालं नाही."

पायेन यांनी त्यांच्या मुलांना हाताने लिहिलेली पत्रं पाठवली, ख्रिसमसच्या वेळेला भेटवस्तू आणि 'मेमरी-बॉक्स'ही पाठवले, पण त्यांच्या मुलांना या वस्तू कधीच मिळाल्या नाहीत.

"मी परत जायचा प्रयत्नही केला होता," असं त्या म्हणतात.

मॉली आणि बॉब यांच्या विवाहाचं छायाचित्र

फोटो स्रोत, STEPHEN PAYNE

फोटो कॅप्शन, मॉली आणि बॉब यांच्या विवाहाचं छायाचित्र

"मी या मुलांना सोडलं नव्हतं. त्यांना माझ्यापासून दूर नेण्यात आलं."

केल्विन यांनी त्यांच्या आईला शेवटचं पाहिलं तेव्हा ते सहा वर्षांचे होते.

केल्विन आणि मायकल या दोघांची देखभाल त्यांच्या वडिलांनी व आजीने केली, पण त्यांच्या आईचा उल्लेखही बोलण्यात केला जात नसे.

1984 साली वडिलांचं निधन झाल्यावर, 27 वर्षीय केल्विन यांनी स्वतःच्या आईचा शोध घ्यायला सुरुवात केली.

लहानग्या केल्विनसोबत मॉली पायेन

फोटो स्रोत, STEPHEN PAYNE

फोटो कॅप्शन, लहानग्या केल्विनसोबत मॉली पायेन

"मला तिची आठवण यायची, त्यामुळे तिला सोडून काढायाचा निर्धारच मी केला होता," असं ते सांगतात.

"तिच्याशिवाय जगणं मुश्कील होतं. ती हयात आहे की मरण पावलेय, हेसुद्धा मला माहीत नव्हतं."

केल्विन गेल्या 40 वर्षांपासून आतुरतेने वाट बघत असलेली आनंदाची बातमी अखेरीस एप्रिलमध्ये मिळाली. त्यांच्या आईचा शोध लागल्याचं त्यांच्या मुलीने त्यांना सांगितलं.

"खूपच भारी वाटलं," ते सांगतात.

"मला अत्यानंद झाला होता. आजही तो क्षण आठवून माझ्या डोळ्यांत पाणी येतं."

केल्विन बॅरेट

फोटो स्रोत, STEPHEN PAYNE

फोटो कॅप्शन, केल्विन बॅरेट

मे महिन्यात या आई-मुलाच्या जोडीने फेसबुकवरून एकमेकांना पहिल्यांदा संदेश पाठवले आणि मग ते रोज फोनवरून बोलत होते. अलीकडे हिथ्रो विमानतळावर त्यांची भेट झाली.

"मी धावतच तिच्यापाशी गेलो," असं केल्विन सांगतात.

"मी तिचा हात हातात घेतला आणि तिला घट्ट मिठी मारली."

"मी मोठमोठ्यांदा रडायला लागलो. आमच्यातलं नातं अजूनही टिकून होतं."

"माझ्या मनात एक अशी पोकळी राहिलेली होती, ती इतक्या वर्षांनी भरून निघाल्यासारखं वाटलं."

केल्विन बॅरेट आणि मॉली पायेन

फोटो स्रोत, MARTIN GILES/BBC

फोटो कॅप्शन, केल्विन बॅरेट आणि मॉली पायेन

"माझ्या नातीने अमेरिकेहून आम्हाला संपर्क साधलाय, असं भाच्याने सांगितल्यावर माझ्या त्यावर विश्वासच बसत नव्हता", असं पायेन सांगतात.

"मला इतका आनंद झाला की ते समजून घेणं अवघड झालं होतं," असं त्या म्हणतात.

मुलाशी पुन्हा भेट झाल्यावर आपल्याला 'अत्यानंद' झाल्याचं त्या सांगतात.

"माझं हृदय जोरजोराने धडधडत होतं."

केल्विन बॅरेट पुन्हा मिशिगनला जाण्यापूर्वी आई नि मुलगा शक्य तेवढा सर्व वेळ एकमेकांसोबत घआलवत आहेत.

"आम्ही एकमेकांना भेटून जाणून घेतोय," असं निवृत्त फायरफायटर केल्विनी सांगतात.

मॉली यांचं कुटुंब

फोटो स्रोत, MARTIN GILES/BBC

फोटो कॅप्शन, मॉली यांचं कुटुंब

"आमच्या जुन्या आठवणी एकमेकांना सांगतोय."

"सगळंच अद्भुत वाटतं. हे प्रत्यक्षात घडतंय यावर माझा आत्ताही पटकन विश्वास बसत नाही."

एकमेकांचा निरोप घेणं खूपच अवघड असेल, असं ते म्हणतात; पण 58 वर्षांनी पहिल्यांदाच या वेळचा ख्रिसमस सोबत साजरा करायचं त्यांनी ठरवलंय.

"इतक्या वर्षांनी आमचा पहिला एकत्र ख्रिसमस साजरा करायला माझा मुलगा डिसेंबरमध्ये परत येईल, याची मला खात्री आहे," असं पायेन म्हणतात.

"ख्रिसमसच्या तयारीत तो मला मदत करेल आणि आम्ही एकत्र झाडाची सजावट करू."

केल्विन बॅरेट आणि मॉली पायेन

फोटो स्रोत, MARTIN GILES/BBC

फोटो कॅप्शन, केल्विन बॅरेट आणि मॉली पायेन

पुन्हा मुलगा भेटल्यामुळे कसं वाटतंय, हे शब्दांत सांगणं अवघड आहे, असं पायेन सांगतात.

"स्वतःच्या मुलावर माझ्याइतकं जीवापाड प्रेम करणारी दुसरी आई असेल असं मला तरी वाटत नाही, असं मी त्याला म्हणाले."

"हे सगळं मला आतून किती सुखावणारं आहे, हे मी स्पष्टपणे सांगूही शकत नाही."

"मी त्याच्यावर जीवापाड प्रेम करते."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)