होळी-रंगपंचमी: रंगांचा आपल्या मूडवर आणि वागणुकीवर परिणाम होतो का?

    • Author, क्लॉडिया हॅमंड
    • Role, बीबीसी फ्यूचर

लाल रंगाने आपल्या भावना उत्तेजित होतात, तर निळ्या आणि हिरव्या रंगांमुळे आपण शांत राहतो, असं मानलं जातं. पण या रंगांचा खरा प्रभाव आपल्या अपेक्षेहून वेगळा असतो, असं का एका नव्या अभ्यासातून समोर आलं आहे.

घरातल्या एखाद्या खोलीत गेल्यावर विशिष्ट प्रकारचा मूड अनुभवायला मिळावा म्हणून त्या खोलीसाठी योग्य रंग निवडायला आपण तासन्-तास खर्च करतो. रंगांच्या याद्या बघतो, नमुन्यासाठी काही डब्या घेऊन येतो.

डॉक्टरांच्या खोल्या पांढऱ्या रंगात रंगवलेल्या असतात. आपल्या मनात वैद्यकीय स्वच्छतेचा भाव निर्माण व्हावा, हा त्यामागचा उद्देश असतो.

फास्ट फूडची दुकानं लाल किंवा पिवळ्या रंगांमध्ये असतात. काही तुरुंगांमधल्या कोठड्या गुलाबी रंगांमध्ये रंगवल्या जातात. तिथल्या रहिवाशांमधली आक्रमकता कमी व्हावी, अशी आशा त्यामागे असते.

कोणत्या रंगाने काय होतं, हे आपल्याला माहितेय असा आपला समज असू शकतो. लाल रंगाने माणूस उत्तेजित होतो, निळ्या रंगाने शांत होतो, इत्यादी समज पाश्चात्त्य संस्कृतीत खोलवर रुजलेले आहेत. किंबहुना हीच वस्तुस्थिती आहे, असं अनेकांना वाटतं. पण आपण मानतो तशा पद्धतीने रंगांमुळे आपलं वर्तन खरोखरच बदलतं का?

वैज्ञानिक संशोधनाचा विचार केला तर यासंबंधीचे परिणाम संमिश्र स्वरूपाचे आणि काही वेळा विरोधी स्वरूपाचे असल्याचं दिसतं.

बहुतेकदा लाल रंगावर अभ्यास झाल्याचं दिसतं आणि त्याची तुलना निळ्या किंवा हिरव्या रंगाशी केली जाते. निळ्या किंवा हिरव्या रंगांपेक्षा लाल रंग समोर असल्यावर लोक बोधात्मक कामं अधिक चांगल्या रितीने करतात, असं काही अभ्यासांमध्ये आढळलं आहे.

तर, इतर काही अभ्यासांमध्ये याच्या उलटही परिणाम दिसून आले आहेत. यामागे जडणघडणीचा संदर्भ असल्याचं बहुतेकदा नोंदवलं जातं. म्हणजे तुम्हाला एखाद्या विशिष्ट रंगासंदर्भात विशिष्ट प्रकारचा अनुभव वारंवा आलेला असेल, तर अखेरीस तुम्ही तो रंग तुमच्या त्या वेळच्या भावनेशी व वर्तनाशी जोडू लागता.

शाळेत आपल्या चुका दाखवणारे शिक्षकांचे शेरे लाल रंगात देतात, त्यामुळे आयुष्यभर आपण लाल रंग धोकादायक परिस्थितीशी जोडतो. शिवाय, विषारी फळं बहुतेकदा लाल असतात, याचाही इथे हातभार लागत असावा. दरम्यान, निळा रंग मात्र तुलनेने शांत परिस्थितीशी जोडला जातो- समुद्राकडे पाहत राहणं किंवा आकाशाच्या प्रचंड निळ्या विस्ताराकडे अचंबित होऊन पाहत राहणं.

यात अर्थातच कायम अपवाद असतातच- शिक्षकांचा 'उत्तम' असा शेरासुद्धा लाल रंगातच असतो, रास्पबेरीची रुचकर फळंही लाल रंगाचीच असतात, इत्यादी. लोक भिन्न रंगांचे वेगवेगळे संबंध जोडतात, हे खरं असलं तरी विशिष्ट रंगामुळे ते विशिष्ट तऱ्हेने वागतात का किंवा रंगांमुळे त्यांना एखादी कृती यशस्वीरित्या करायला मदत होते का, हा प्रश्न पूर्णतः निराळा आहे.

गतकाळात यासंबंधी अनेक संमिश्र परिणाम दिसून आलेले आहेत. या पार्श्वभूमीवर, 2009 साली ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठातील संशोधकांनी या परिस्थितीबाबत कायमचा उलगडा करायचा प्रयत्न केला. त्यांनी अभ्यासात सहभागी झालेल्या लोकांना निळ्या, लाल किंवा 'तटस्थ' रंग असणाऱ्या कम्प्युटरच्या पडद्यांसमोर बसवलं आणि विविध कामांच्या संदर्भात त्यांची चाचणी केली.

यामध्ये लाल पडदा समोर असताना लोकांनी स्मरणशक्ती व प्रुफरिडिंगची कामं अधिक चांगल्या रितीने केली - या कामांमध्ये तपशिलाकडे अधिक लक्ष देणं गरजेचं होतं.

पडद्याचा रंग निळा असताना त्यांनी सर्जनशील कामं चांगल्या तऱ्हेने केली - उदाहरणार्थ, एका वीटेचा किती प्रकारे वापर करता येईल याबद्दल विचार करणं.

यातून संशोधकांनी असं अनुमान बांधलं की, लाल रंगातून 'टाळण्या'चे संकेत मिळत असल्यामुळे लोक अधिक सावध झाले, तर निळ्या रंगामुळे त्यांना 'सहज'पणे समोरच्या कामाला सामोरं जाण्याची, मुक्तपणे विचार करण्याची प्रेरणा मिळाली.

या अनुमानाची चाचणी घेण्यासाठी संशोधकांनी सहभागी लोकांना वेगवेगळ्या शब्दांची बदललेली क्रमवारी सलग करायला सांगितली. या वेळी, लाल पार्श्वभूमीवर आलेले 'टाळण्या'शी संबंधित शब्दांचा विपरित क्रम लोकांनी अधिक चटकन सोडवला, तर निळ्या पार्श्वभूमीवर आलेल्या विपरित क्रमातील शब्दांबाबत मात्र 'सहज'भावी शब्द अधिक चटकन सोडवले गेले. त्यामुळे त्यांच्या मनात रंग आणि वर्तन यांमध्ये सांगड घातली गेली असावी, असे संकेत मिळतात.

आपल्या निष्कर्षांच्या व्यावहारिक वापराबाबतही या संशोधकांनी काही अनुमान बांधलं. उदाहरणार्थ, आपण एखाद्या खोलीत कोणतं काम करतोय यावरून तिथल्या भिंतींचा रंग ठरवता येऊ शकतो. उदाहरणार्थ, कोणी संशोधक एखाद्या नवीन औषधाच्या आनुषंगिक परिणामांचा शोध घेत असतील, तर त्यांची खोली लाल रंगाची असावी.

सर्जनशील सल्लामसलतीसाठी वापरल्या जाणाऱ्या खोलीच्या भिंती निळ्या रंगाच्या असाव्यात. वास्तवात मात्र हे थोडं अवघडलेलं होऊ शकतं. कारण ऑफिसात किंवा वर्गात आपल्याला काही वेळ सर्जनशील विचारात घालवावा लागतो, तर काही वेळा तपशिलाचा विचार करावा लागतो.

धोक्याचा इशारा की इच्छा?

पण आता या शोधाबाबतच काही प्रश्न उपस्थित झाले आहेत. विपरित क्रमातील शब्द सलग करण्याची चाचणी 2014 साली अधिक मोठ्या समूहामध्ये घेण्यात आली, तेव्हा रंगांचे परिणाम दिसून आले नाहीत.

सुरुवातीच्या अभ्यासात केवळ 69 लोकांचा समावेश होता. पण या नवीन, अधिक मोठ्या व्याप्तीच्या अभ्यासात 263 प्रतिसादक सहभागी झाले होते, त्यात पार्श्वभूमीवरच्या रंगाचा काही परिणाम झाला नाही.

स्विझर्लंडमध्ये बेसल विद्यापीठातील ऑलिव्हर गेन्सहाऊ यांनी केलेल्या पथदर्शक संशोधनाविषयीसुद्धा या संशोधकांच्या चमूने काही प्रश्न उपस्थित केले. गेन्सहाऊ यांच्या टीमने त्यांच्या संशोधनात सहभागी झालेल्या प्रतिसादकांना एका ताटलीत भरून खाली बिस्किटं दिली आणि त्यांची चव कळण्याच्या हिशेबाने वाटतील तेवढी बिस्किटं खावीत असं सुचवलं.

या अभ्यासात सरासरी सहापैकी एका व्यक्तीने स्वतःची बिस्किटं दुसऱ्यांना दिल्यामुळे संशोधनाचा उद्देश कोलमडून पडला. पण त्याचा विचार केल्यानंतरही असं दिसून आलं की, लाल रंग धोक्याचा इशारा मानला गेला होता आणि लाल रंगाच्या ताटलीतून खारी बिस्किटं दिलेल्या लोकांनी तुलनेने खूपच कमी बिस्किटं खाल्ली. पण अपलेचिआन स्टेट युनिव्हर्सिटीमधील संशोधकांनी अशाच पद्धतीने केलेल्या प्रयोगात मात्र पूर्णतः उलटा परिणाम दिसून आला- लाल ताटल्यांमधून लोकांनी जास्त बिस्किटं खाल्ली.

गुलाबी तुरुंग

रंगाच्या परिणामांचा अभ्यास करणं हे वाटतं त्याहून अर्थातच जास्त अवघड आहे. किंवा कदाचित रंगांचा आपल्याला अपेक्षित असतो तसा परिणाम होतच नसेल. पण अमेरिका, स्विझर्लंड, जर्मनी, पोलंड, ऑस्ट्रिया व युनायटेड किंग्डम इथे मात्र याबाबतीत काही निष्कर्ष स्वीकारले गेलेले दिसतात.

त्यामुळे इथल्या तुरुंगांच्या कोठड्यांना विशिष्ट गुलाबी छटेतील रंग दिलेला असतो. स्विझर्लंडमध्ये 20 टक्के तुरुंगांमध्ये व पोलीस स्थानकांमध्ये किमान एक कोठडी गुलाबी रंगाची असते. किंवा अगदी अचूकपणे सांगायचं तर, बेकर-मिलर पिंक या नावाने ओळखला जाणारी ती रंगछटा असते. कैद्यांवर गुलाबी भिंतींचा कोणता रंग होतो, याचा पहिल्यांदा अभ्यास करणाऱ्या दोन अमेरिकी नाविकी अधिकाऱ्यांवरून या रंगछटेला हे नाव मिळालं.

1979 साली कैद्यांना एक निळं व एक गुलाबी कार्ड दाखवण्यात आलं आणि ते कार्ड कैद्यांच्या हातावर दाबलं जात असताना त्या दबावाला प्रतिकार करण्याचा प्रयत्न कैद्यांनी करावा, अशी सूचना करण्यात आली. तर, निळं कार्ड दाबलं जाणाऱ्या कैद्यांनी अधिक जोर लावून प्रतिकार केला. पण गुलाबी कार्ड दाबलं जात असलेल्या कैद्यांनी कमी आक्रमकतेने प्रतिकार केला का? बहुधा नाही.

आपण कोणतं कार्ड दाबतो आहोत हे प्रयोग करणाऱ्यांनी पाहिलं होतं, त्यामुळे गुलाबी कार्ड दाबताना कदाचित त्यांनीच जोर कमी लावला असेल. शिवाय, त्यांनी आधी गुलाबी कार्डचा वापर केला आणि मग निळं कार्ड वापरलं, त्यामुळे कदाचित निळ्या कार्डाचा प्रयोग होईपर्यंत लोकांना अधिक सवय झाली असावी. अशा पद्धतीचे निष्कर्ष काढण्यासाठी करण्यात आलेले अनेक सुनियोजीत अभ्यास अपयशी ठरले आहेत. पण यानंतर खऱ्या तुरुंगांमधील भिंती पांढऱ्या किंवा गुलाबी रंगांमध्ये रंगवून प्रयोग केले गेले. इथेही गुलाबी छटेपेक्षा आधीपेक्षा भिन्न रंग भिंतींवर चढल्याचा परिणाम झाला असावा.

2014 साली गेन्सहाऊ यांच्या चमूने स्विझर्लंडमधील अतिसुरक्षा तुरुंगात आपलं प्रमेय पडताळण्यासाठी प्रयोग केला. तीस वर्षांपूर्वीपेक्षा आता त्यांचा अभ्यास अधिक काटेकोर होता.

तुरुंगातील नियमांचा भंग केल्यामुळे एकट्यात ठेवण्यात आलेल्या कैद्यांना या पद्धतीने गुलाबी किंवा राखाडी किंवा पांढऱ्या भिंती असणाऱ्या कोठड्यांमध्ये ठेवण्यात आलं. कैद्यांच्या वर्तनातील आक्रमकतेची पातळी मोजण्यासाठी तुरुंगाधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं.

या प्रयोगाचे निष्कर्ष संशोधकांसाठी निराशाजनक होते. तीन दिवसांनी तपासणी केली असता, प्रत्येक कोठडीतील कैदी आधीपेक्षा कमी आक्रमक झालेले होते. म्हणजे रंग कोणता आहे, याने काहीच फरक पडला नव्हता.

कदाचित अधिक व्यापक स्तरावर अभ्यास केल्यावर वेगळे परिणाम दिसले असते, असं या संशोधकांनी कबूल केलं. पण रंगांचा केवळ मोजक्या लोकांवरच परिणाम होत असेल, तर तेवढ्यासाठी भिंतींचे रंग बदलायचे की नाहीत याबाबत अधिकाऱ्यांनी निर्णय घेणं गरजेचं आहे. शिवाय, पारंपरिकरित्या स्त्रैण्य मानला जाणारा गुलाबी रंग भिंतींवर लावलेला पाहून आपलं खच्चीकरण होतंय, अशी पुरुष कैद्यांची नकारात्मक धारणा होण्याचीही शक्यता असते, असं संशोधक म्हणतात.

तर, रंगांचा आपल्यावर परिणाम होत असेलही, परंतु या परिणामांचा उलगडा सुसंगतीने करून दाखवता आलेला नाही, आणि काही वेळा असा परिणाम होतच नाही असंही स्पष्ट झालेलं आहे. अधिक नियंत्रित वातावरणातील अभ्यास अलीकडे होत आहेत, पण रंगांचा आपल्यावरील परिणाम समजून घेण्यासाठी आणखी काही काळ जावा लागेल असं दिसतं. तोवर आपल्या घरातील अंतर्गत सजावट करताना वैयक्तिक आवड आणि कलात्मक अभिरूची यांना धरून योग्य वाटेल ते निर्णय घेणंच रास्त.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)