रशिया आक्रमण : युक्रेनमधून पोलंडमध्ये आलेले भारतीय विद्यार्थी कोणत्या अवस्थेत आहेत ?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, दिव्या आर्य आणि नेहा शर्मा
- Role, बीबीसी प्रतिनिधी, युक्रेन-पोलंड बॉर्डरहून
रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या 13 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धात शेकडो लोक मृत्युमुखी पडले आहेत.
या युद्धामुळे मोठ्या प्रमणावर मानवी शोकांतिका निर्माण झाली आहे. युनायटेड नेशन्स रिफ्युजी ऑर्गनायझेशन (UNHCR) यांच्या एका अहवलानुसार, अवघ्या 10 दिवसांत 15 लाख लोकांना युक्रेन सोडण्याशिवाय गत्यंतर उरलं नाही.
दुसऱ्या महायुद्धानंतरचं सर्वात मोठ मानवी स्थलांतर या रशिया आणि युक्रेन युद्धामुळे झालं आहे. या युद्धातील बहुतांश निर्वासित पोलंडमध्ये पोहोचले आहेत.
पोलंडच्या सीमेवर तैनात असणाऱ्या सैनिकांनुसार 24 फेब्रुवारी पासून ते आज अखेर युक्रेन मधून 9 लाख 22 हजार 400 शरणार्थी पोलंडच्या सीमेवर पोहोचले आहेत.

या लाखो शरणार्थीं मध्ये हजारो भारतीय विद्यार्थी आहेत. भारत सरकार युक्रेनची सीमा तसंच युक्रेनच्या सीमावर्ती भागात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. अशात रशियाने युद्धविरामाची घोषणा केली आहे.
मात्र, युक्रेनच्या वेगवेगळ्या शहरांमधून सीमावर्ती भागात पोहोचण्याचा प्रयत्न करणारे भारतीय विद्यार्थी सांगतात, हा प्रवास अति भयंकर आणि त्रासदायक असा होता.
बीबीसीच्या प्रतिनिधी दिव्या आर्य आणि नेहा शर्मा यांनी युक्रेन-पोलंड सीमेजवळ लावण्यात आलेल्या सर्वात मोठ्या रिलीफ कॅम्पमध्ये एक दिवस व्यतीत केला. त्या भागात असणाऱ्या विद्यार्थी, स्वयंसेवक आणि सरकारी अधिकाऱ्यांकडून या रेस्क्यू मिशनची माहिती करून घेतली.
मानसिक धक्का, वातावरणात असणारी भीती, घरी सुखरूप पोहचू अशी आशा आणि तरी ही चेहऱ्यावर असणारं स्मितहास्य... युद्धाच्या झळा बसलेल्या निर्वासितांच्या अनेक गोष्टी या रिपोर्ट मध्ये कव्हर करण्यात आल्या आहेत.
पहाटे तीनच्या सुमारास
या रिलीफ कॅम्पमध्ये आम्ही एका विद्यार्थ्याला भेटलो जो युक्रेनमधून येनकेन प्रकारेन पोलंडला पळून आला होता. युद्ध ही एक अशी गोष्ट आहे जी तिच्या झळा अगदी वाईटरित्या पोहोचवते. युद्धाचा महाभयंकर असा आवाज तर होतो. त्याचा लोकांना मनसिक असा काही धक्का बसतो, की लोक स्वतःचा आवाजही हरवून बसतात.
या विद्यार्थ्याची अवस्था ही अशीच काहीशी होती. कॅम्पमधले स्वयंसेवक त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते.

बीएपीएसशी संबंधित स्वयंसेवक अमित पटेल सांगतो, "त्याचं संपूर्ण शरीर थरथर कापत होतं. दोन मिनिटांसाठी आम्हाला काय करावं हेच सुचेना. त्याला पाणी दिलं पण तो पाणी पिण्याच्या ही मनस्थितीत नव्हता. तो खरोखरच खूप घाबरला होता.
"त्याची अवस्था बघून आम्हीही बैचेन झालो. विराज आणि मी मेडिकल टीमला बोलवायला गेलो. त्यांनी काही टेस्ट केल्या. तरी ही तो बोलू शकत नव्हता. शेवटी मी प्रयत्न केला की काहीतरी बोलेल. शेवटी त्याच्या हातात पेन दिला, त्याला सुरक्षित वाटावं म्हणून हातावर टाळी दिली, मग त्याने बोलायला सुरुवात केली. जेव्हा त्याला थोडा आत्मविश्वास आला तेव्हा त्याने सांगितलं की त्याला मानसिक धक्का बसला होता."
अमित आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या खूप साऱ्या प्रयत्नांनंतर या विद्यार्थ्यांने आपल्या घराचा पत्ता आणि फोन नंबर त्या कागदावर लिहिला.
यानंतर त्याचं त्याच्या भावाशी बोलण करून देण्यात आलं. या सगळ्या प्रयत्नांमुळे हा विद्यार्थी मानसिक धक्क्यातून सावरला.
अमित सांगतो, "आम्ही इथून गेल्यावरचं आम्हाला समाधान मिळेल... काय आणि कसं घडलं हे सांगणं आता कल्पनेच्या पलीकडे आहे."
पहाटे पाचच्या सुमारास..
उजाडायला सुरुवात झाली आहे. रात्रीपासूनच भारतीय विद्यार्थ्यांची रांग लागली आहे. स्वयंसेवक या विद्यार्थ्यांना कोणत्या ना कोणत्या प्रकारे मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत.

पोलंडच्या जेशुफ शहरात असलेल्या एका हॉटेलच्या कॉन्फरन्स हॉलचं रातोरात रिलीफ कॅम्पमध्ये रूपांतर करण्यात आलं. वाढत्या थंडीत झोपण्यासाठी उबदार खोली, ताजे अन्न आणि स्वच्छ शौचालय इथं उपलब्ध करून दिली जात आहेत.
युद्धाच्या सावटातून पळून आलेल्या हजारो विद्यार्थ्यांसाठी हे सुरक्षित ठिकाण होत.
सकाळी दहा वाजता कॅम्पमध्ये काय परिस्थिती होती?
पहाट उजाडताच या कॅम्पमध्ये कामाचा वेग वाढलेला दिसतो. रिलीफ कॅम्पमध्ये रूपांतरित झालेल्या या हॉटेलच्या लांबलचक टेबलांवर अनेक लोक लॅपटॉप घेऊन बसले आहेत.
या कॅम्पमध्ये मदत करण्यासाठी युरोपातील 11 देशांतून स्वयंसेवक आले आहेत. इथे राहण्याची व्यवस्था भारत सरकार आणि जेवणाचा खर्च स्वयंसेवी संस्थांकडून केला जात आहे.

इथं असे अनेक चेहरे दिसले, ज्यांच्या चेहऱ्यावर घरी जाण्याच्या आशेने हसू उमटलं होतं. पण या हसऱ्या चेहऱ्यांमागे ही युद्धाने उद्ध्वस्त झालेल्या भीषण गोष्टी दडल्या आहेत
इथं कॅम्पमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांशी बोलताना आम्हाला त्यांच्या बोलण्यात तक्रारीचा सूर जाणवला.
रिलीफ कॅम्पमध्ये आलेली अश्विनी सांगते, "आम्ही सर्व मुलं स्वतः इथं आलो आहोत. आम्हाला कोणीही मदत केली नाही. आम्ही लिविवमध्ये कसं यायचं? सीमेवर काय होईल? असं दूतावासाला विचारलं.
तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितले की मी पत्ता पाठवत आहे, तिथे सीमा पार करून या. सीमेकडे नेण्यासाठी कोणी आलं तर ठीक आहे, नाहीतर तुम्हाला स्वतः यावं लागेल. त्यांनी आम्हाला फक्त पत्ता दिला, दूतावास इथं आहे म्हणून.
इथे आम्हाला फ्लाइट मिळाली, आमचं खाण रहाणं ही केलं, इथं त्यांनी आम्हाला सर्वकाही उपलब्ध केल. पण सीमेपर्यंत पोहचेपर्यंत काहीही नव्हतं. सीमेपर्यंत कुठेही दूतावास नव्हतं. खरी गरज तर सीमेपर्यंतच पोहोचवण्याची होती."
बंकर मध्ये लपलेल्या विद्यार्थ्यांची अवस्था कशी होती?
असे अनेक विद्यार्थी या कॅम्पमध्ये पोहोचले होते, ज्यांनी बॉम्ब हल्ल्यांपासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी बंकरमध्ये आश्रय घेतला होता. केरळमधील काही विद्यार्थी खारकीव्ह मधील बॉम्बस्फोटापासून वाचण्यासाठी बंकरमध्ये लपून बसले होते.

खारकीव्हमधील बंकरमध्ये लपलेला असाच एक विद्यार्थी गोपी कृष्णन सांगतो, "आम्ही सलग सात दिवस बंकरमध्ये होतो. अनेक वर्षांपूर्वी बांधलेल हे बंकर धुळीने भरलेलं होतं. बाहेर बर्फ पडत होता, तापमान उणे दोन होतं. आणि शरीर गरम ठेवण्यासाठी काहीच पर्याय उपलब्ध नव्हता.
बॉम्बस्फोट थांबल्यावर हे विद्यार्थी त्या बंकरमधून बाहेर तर आले, मात्र त्यानंतर शहराबाहेर पडायचं आव्हान त्यांच्यासमोर उभं राहिलं.
खारकीव्हमधून बाहेर पडलेला गोपीकृष्णन सांगतो, "आमच्या समोरून पाच रेल्वे गाड्या गेल्या पण आम्ही आत जाऊ शकलो नाही. युक्रेनियन लोकांनी आम्हाला आत चढूच दिलं नाही."
तिथंच उपस्थित असणाऱ्या शाहीन शरीफ सांगतात, "रेल्वे गार्ड आम्हाला मारत होते. जर कोणी ट्रेनमध्ये चढलं तर त्याला ते लाथ मारून बाहेर काढायचे. आम्ही जेव्हा रेल्वे स्टेशनवर होतो तेव्हा बाहेर मिसाईल डागली जात होती. वातावरण खूप भीतीदायक होतं."

गोपी कृष्णन सांगतो, "मला पीटीएसडी आहे. जेव्हा मी असा आवाज ऐकतो तेव्हा हृदयाचे ठोके वाढतात आणि श्वास घ्यायला त्रास होतो."
शरीफ सांगतात, "बूमसारखा आवाज ऐकून आम्ही घाबरलो होतो."
19 वर्षांच्या बाला कुमारने मोठा पल्ला गाठला
युक्रेनच्या लिविव शहरातून बाहेर पडलेला 19 वर्षांचा पशुवैद्यकीय विज्ञानाचा विद्यार्थी बाला कुमार लिविव सोडल्यानंतर चालतचं राहिला.
त्याने पायी पायी तीन वेगवेगळ्या बॉर्डरद्वारे बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. शेवटी युक्रेन मधील अधिकाऱ्यांच्या मदतीने त्याला बाहेर पडता आलं.

तो सांगतो, "काही मीडिया आणि सोशल मीडियावर त्याला वर्णद्वेषी म्हंटल गेलं. पण हे संपूर्ण सत्य नाही. युक्रेनचे लोक आपलं घर, आपला देश सोडून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आमच्याकडे आशा आहे, आपला देश भारत सुरक्षित घर आहे, जिथं लोक आमची वाट पाहत आहेत. त्यांच्यातला आणि आमच्यातला फरक जगाने समजून घेतला पाहिजे."
भारताचा म्हणणं आहे त्यांचं युक्रेन आणि रशिया या दोन्ही सरकारांशी बोलणं झालं आहे. जेणेकरून ते स्वतः तिथे पोहोचले नसले तरी विद्यार्थ्यांना युक्रेन आणि रशियन अधिकाऱ्यांकडून मदत मिळू शकेल.

संध्याकाळी चार वाजता इथल्या वातावरणात अचानक बदल झाला. सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. लोकांमध्ये नवी उमेद दिसते आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या नावे हाक मारली जात आहे जेणेकरून ते त्यांच्या वस्तू पॅक करून त्यांच्यासाठी वाट बघत असलेल्या बसच्या ठिकाणी जातील.
रांगेत उभे असलेले विद्यार्थी पुढे जाण्यासाठी उत्सुक आहेत. पण मागे काहीतरी सुटत असल्याची ही भावना त्यांच्या मनात आहे. काहींची पुस्तकं, काहींच्या गाड्या, असं बरचं काही.... आणि सर्वांचाच अभ्यास. त्यांच्या करियरचा रस्ता आता कुठल वळण घेईल?

परत येण शक्य आहे का नाही ? अशा खूप साऱ्या प्रश्नांच्या कोलाहलात विद्यार्थी मार्गस्थ झालेत. ही वेळ त्यांची नाही, आज फक्त त्यांना घरी परतायचं!

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








