युक्रेन : ते रशियन दिसतात, ऊर्दू बोलतात आणि बॉलिवूड जिव्हाळ्याचा विषय आहे

मोहम्मद ज़हूर

फोटो स्रोत, M ZAHOOR

फोटो कॅप्शन, मोहम्मद ज़हूर
    • Author, समरा फातिमा और मोहम्मद ज़ुबैर खान
    • Role, बीबीसी उर्दू

"मला एक खाट, एक रोटी नि त्यासोबत खायला सालन असलं तरी मी मजेत जगेन. मला जगण्यासाठी ऐषोआरामाची काहीही गरज नाही... पण आम्ही खूपच मजेत आयुष्य घालवलं हे खरं आहे. युक्रेनमध्ये आमच्याकडे होणाऱ्या मैफिली लाजबाव असतात. लोक रस्त्यावर आमच्या सोबत सेल्फी घेतात. अनेक लोक माझ्याकडून स्फूर्ती घेतल्याचं सांगतात. पण मी या सगळ्याची स्वतःला सवय लावून घेतलेली नाही."

मूळचे पाकिस्तानी, पण 'कीव्हचा राजपुत्र' म्हणून ओळखले जाणारे अब्जाधीश मोहम्मद जहूर यांचे हे उद्गार आहेत. जगभरात त्यांची ओळख 'स्टील किंग' आणि युक्रेनियन मनोरंजन उद्योगातील एक बडं प्रस्थ अशी आहे.

त्यांच्या पत्नीने 2008 साली 'मिसेस वर्ल्ड' स्पर्धा जिंकली होती. शिवाय, त्या युक्रेनमधील एक विख्यात गायिका आहेत.

मोहम्मद जहूर यांनी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांसोबत व पंतप्रधानांसोबत असलेल्या घनिष्ठ संबंधांचा उल्लेख वेळोवेळी केला आहे. गेल्या अकरा वर्षांपासून ते युक्रेनमध्ये एका संगीत पुरस्कार समारंभाचं आयोजन करतात. त्यांच्या मते हा पुरस्कार 'ग्रॅमी'च्या तोडीस तोड आहे.

युक्रेनवर रशियाने हल्ला करण्याच्या दोन दिवस आधी ते त्यांच्या आठ वर्षांच्या जुळ्या मुलींसह लंडनला गेले. तिथेच मी त्यांच्याशी संवाद साधला. त्या वेळी जहूर यांची पत्नी युक्रेनच्या सीमेवर होती आणि देशातून बाहेर पडण्याचा तिचा प्रयत्न सुरू होता.

ती युक्रेनमधून यशस्वीरित्या बाहेर पडल्याचं आम्हाला नंतर सांगण्यात आलं.

कराचीतील एक विद्यार्थी युक्रेनमधील सर्वांत श्रीमंत व्यक्ती कसा बनला?

मी पहिल्यांदाच लंडनमध्ये इतक्या आलिशान घरात प्रवेश करत होते. मी मोहम्मद जहूर यांची मुलाखत घेण्यासाठी गेले, तेव्हा त्यांनी स्वतः दरवाजा उघडला आणि 'जंटलमन'सारखं माझा कोट घेऊन हँगरला लावला.

मोहम्मद ज़हूर

फोटो स्रोत, MUHAMMAD ZAHOOR

घरात एक-एक पाऊल टाकत असताना माझ्या मनात नवनवीन प्रश्न उभे राहायला लागले. मी तिथे जाताना तयारी करून गेले होते, त्याहून कितीतरी प्रश्नांची उत्तरं सापडू लागली. लंडनमधलं मोहम्मद जहूर यांचं घर इतकं आलिशान असेल, तर युक्रेनमधलं घर कसं असेल? कितीही मोठी स्वप्नं असली तरी ती पूर्ण करता येतात, हे खरंच आहे का?

'स्टील किंग' झाल्यानंतर त्यांनी स्वतःचे सर्व पोलाद कारखाने विकून का टाकले? त्यांचं सगळं वागणं विनयातून आलेलं होतं की पाश्चात्त्य संस्कृतीचा हा प्रभाव होता? असे सगळेच प्रश्न मी मुलाखतीदरम्यान त्यांना विचारले.

कराचीतील एक विद्यार्थी युक्रेनमधील सर्वांत श्रीमंत व्यक्ती होण्यापर्यंतचा प्रवास कसा पूर्ण केला, हेही समजून घ्यायचा मी प्रयत्न केला.

कराचीत वाढलेले मोहम्मद जहूर आज जगभरात पोलाद क्षेत्रातील एक ख्यातनाम व्यक्तिमत्व आहे. 2008 सालापर्यंत ते थेटपणे पोलाद उद्योगाशी संबंधित होते. युक्रेन व ब्रिटन यांसह जगभराती त्यांचे अनेक पोलाद कारखाने होते. त्यानंतरच्या वर्षांमध्ये त्यांनी युक्रेनमधील व जगभरातील त्यांच्या मालकीचे पोलाद कारखाने विकून टाकले.

मोहम्मद ज़हूर

फोटो स्रोत, M ZAHOOR

सध्या ते जगभरात पोलाद उद्योगाविषयी सल्लागार म्हणून व व्याख्याता म्हणून कार्यरत आहेत आणि गुंतवणूक क्षेत्राशी संबंधित आहेत. शिवाय, युक्रेनमध्ये त्यांनी अनेक वर्षं 'कीव्ह पोस्ट' नावाचं वृत्तपत्र चालवलं होतं. निःपक्षपाती धोरण व सरकारवरील टीका यांमुळे हे वृत्तपत्र लोकप्रिय झालं होतं, असा त्यांचा दावा आहे. पण नंतर त्यांनी हे वृत्तपत्रही विकलं.

आम्ही मुलाखतीच्या तयारीत असतानाच घराच्या बागेत खेळणाऱ्या चार मुलींकडे माझं सारखं लक्ष जात होतं. एकाच वयाच्या चार मुली या घरात काय करतायंत, असाही प्रश्न माझ्या मनात आला. मोहम्मद जहूर यांचे जावई तिथेच उपस्थित होते, त्यांनी सांगितलं की, यातील दोन मुली त्यांच्या आहेत तर जहूर यांच्या आहेत.

मोहम्मद जहूर यांच्या पहिल्या पत्नीपासून झालेल्या मुलीचे पती माझ्याशी बोलत होते.

जहूर यांची पहिली पत्नी आता मॉस्कोला राहते. मॉस्कोशीही जहूर यांचं घनिष्ठ नातं राहिलेलं आहे. ते 13 वर्षं मॉस्कोमध्ये होते. तिथेही त्यांचा मित्रपरिवार आहे.

रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या कार्यक्रमांमध्ये जहूर यांची दुसरी पत्नी कमालिया यांनी गाणं म्हटलेलं आहे, असं स्वतः जहूर यांनीच सांगितलं. कमालिया यांचे वडील मॉस्कोचे आहेत, तर आई युक्रेनची आहे. कमालिया मात्र स्वतःला युक्रेनियन मानतात.

हल्ला होण्याची शक्यता निर्माण झाल्यावरही कमालिया यांना स्वतःचा देश सोडून बाहेर पडायचं नव्हतं. जहूर म्हणाले, "22 फेब्रुवारीला जगभरातील वृत्तवाहिन्या हल्ल्याचा अंदाज वर्तवत होते, तेव्हासुद्धा कमालिया म्हणत होती की, रशिया युक्रेनच्या भावासारखा आहे, तो आमच्यावर हल्ला करणार नाही." त्यामुळे त्यांनी जहूर यांच्या सोबत मुलींना आधी लंडनला पाठवलं आणि त्या स्वतः युक्रेनमध्येच थांबल्या होत्या.

मोहम्मद ज़हूर यांचे आई-वडील

फोटो स्रोत, MUHAMMAD ZAHOOR

फोटो कॅप्शन, मोहम्मद ज़हूर यांचे आई-वडील

जहूर म्हणतात, "हल्ला होणार नाही, असं युक्रेनियन सरकारसह शंभर टक्के लोकांना वाटत होतं. माझे त्या सर्वांशी चांगले संबंध आहेत. राष्ट्रपती झेलेन्स्की आणि माझी पत्नी यांच्यात खूप चांगली मैत्री आहे. आता काय करायला हवं, असं मी त्यांना कायम विचारायचो."

"आम्हीसुद्धा गुप्त माहिती गोळा करत असतो, त्यामुळे युद्धाची शक्यता दिसत नाही, तुम्ही चिंता करू नका, रशिया हल्ला करेल असं आम्हाला वाटत नाही, फक्त बातम्यांसाठी ते असं करत आहे, असंच युक्रेनमध्ये सर्व जण म्हणत होते."

कराची ते युक्रेनपर्यंतचा प्रवास

मोहम्मद जहूर यांचा जन्म पाकिस्तानातील सर्वांत मोठं शहर असलेल्या कराचीत झाला. त्यांचे वडील खुशहाल खान खैबर-पख्तुनख्वा प्रांतातील मानसेहरा जिल्ह्यातील हसनैना गावातून आलेले होते. पाकिस्तानची निर्मिती होण्यापूर्वीच खुशहाल खान कराचीला गेले.

"वडिलांचे संस्कार, आईचे आशीर्वाद आणि अल्लाहची इच्छा, या गोष्टींचा माझ्या यशामध्ये मोठा वाटा आहे," असं मुलाखतीदरम्यान मोहम्मद जहूर यांनी वेळोवेळी सांगितलं.

ते म्हणाले, "आम्ही कराचीत राहत होतो, तेव्हा माझे वडील सरकारी नोकरीत असूनसुद्धा आमचं आयुष्य इतर लोकांसारखं सन्मानजनक आणि आलिशान नाही याबद्दल आम्हाला वाईट वाटायचं. माझे वडील सिंध प्रांताचे उप-महालेखापाल होते. हे पद खूप मोठं होतं. पण त्यांचे सहकारी कारमधून यायचे, तर माझे वडील मात्र 15 वर्षं जुन्या सायकलवरून ये-जा करायचे. आम्हालाही याचीच सवय होती. पुढे याच गोष्टीने माझ्या आयुष्यात मोलाची भूमिका निभावली."

कमालिया यांनी 2008 मध्ये मिसेस वर्ल्डचा किताब जिंकला होता

फोटो स्रोत, M ZAHOOR

फोटो कॅप्शन, कमालिया यांनी 2008 मध्ये मिसेस वर्ल्डचा किताब जिंकला होता

1974 साली मोहम्मद जहूर यांची सोव्हिएत संघातील इंजीनियरिंगच्या अभ्यासक्रमासाठी निवड झाली. त्या वेळी ते कराचीत एनआयडी विद्यापीठात इंजीनियरिंगच्या पहिल्या वर्षाला होते.

या शिष्यवृत्तीसाठी निवडण्यात आलेल्या 42 विद्यार्थ्यांपैकी काहींना सेंट पीटर्सबर्गला, काहींना मॉस्कोला, तर काहींना डोनेट्स्क इथे पाठवण्यात आलं, त्यात जहूरसुद्धा होते.

डोनेट्स्कमधील विद्यार्थीदशेची आठवण सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं. ते म्हणाले, "माझ्या सोबतच्या सर्व मुलांपैकी मी सर्वांत आधी रशियन भाषा शिकलो, त्याचा मला पुढे खूप उपयोग झाला. दरम्यान, काही यशस्वी, तर काही अयशस्वी प्रेमप्रकरणं झाली. शिक्षणासोबतच मी मित्रही जोडत होतो आणि जगण्यातले अनेक महत्त्वाचे अनुभवही गाठीला जमा होत होते."

विद्यार्थीदशेतच त्यांनी त्यांच्या सोबत शिकणाऱ्या एका मुलीशी लग्न केलं. कालांतराने ही मुलगी त्यांच्या सोबत पाकिस्तानातही राहिली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर परत पाकिस्तानात जाऊन तिथल्या पोलात उद्योगात काम करायचं, ही या शिष्यवृत्तीमधील एक अट होती.

जहूर म्हणतात त्याप्रमाणे, ते शिक्षण पूर्ण करून पाकिस्तानात परतले, तेव्हा तिथे अडचणींचा डोंगर उभा राहिलेला होता.

पाकिस्तान पोलाद कारखान्यात पहिली नोकरी

सोव्हिएत संघातून शिक्षण घेऊन पाकिस्तानात परतल्यावर त्यांना एका पोलाद कारखान्यात सुरक्षा विभागात नेमण्यात आलं, तिथून मग त्यांची उत्पादन विभागात बदली झाली. या दोन्ही विभागांचं काम त्यांच्या पदवी शिक्षणाशी संबंधित नव्हतं.

मोहम्मद ज़हूर आणि त्यांची पत्नी

फोटो स्रोत, M ZAHOOR

फोटो कॅप्शन, मोहम्मद ज़हूर आणि त्यांची पत्नी

त्यांनी धातूशास्त्रात इंजीनियरिंगची पदवी मिळवली होती. पण त्यांना त्यांच्या शिक्षणानुसार व कौशल्यानुसार काम मिळालं नाही. विपरित परिस्थिती असतानाही त्यांनी उत्तम कामगिरी केली, असं ते म्हणतात. त्यामुळे त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतल्यावर त्या पोलाद कारखान्याच्या अध्यक्षाने सात वेळा त्यांचा राजीनामा नाकारला.

जहूर म्हणतात, "निव्वळ सही करून बक्कळ पैसा कमावता येईल अशा अनेक संधी माझ्या समोर होत्या. पण वडिलांच्या संस्कारामुळे मी त्या वाटेला गेलो नाही."

सोव्हिएत संघात परत

दरम्यान, मॉस्कोतील एका कंपनीला पाकिस्तानसोबत व्यापार करण्यासाठी सहाय्य करेल अशा व्यक्तीची गरज होती. रशियन भाषेत प्रवीण असलेले आणि इतर क्षमताही सिद्ध केलेले जहूर यांची या नोकरीसाठी निवड झाली. अशा रितीने ते परत मॉस्कोला आले.

मोहम्मद जहूर सांगतात, "1980च्या दशकाअखेरीला मी मॉस्कोला आलो आणि स्पेअर पार्टचं उत्पादन सुरू केलं. शिवाय, इथून पोलाद घेऊन जाणं फायदेशीर ठरू शकतं, असं मी माझ्या कंपनीला सांगितलं. पोलाद कारखान्यांमधील जवळपास सर्वच लोकांशी माझी ओळख होती."

त्यांच्या कंपनीने पाकिस्तानात पोलाद निर्यात करायला सुरुवात केली, आणि याचा मोबदला म्हणून पाकिस्तानात रोख रकमेऐवजी कपडे पाठवत असे. या व्यवहारात बाजारातील प्रचलित दराहून दुप्पटीने नफा कमावता येत होता, असं जहूर सांगतात.

मोहम्मद

फोटो स्रोत, MUHAMMAD ZAHOOR

"तीन वर्षांमध्ये माझा पगार एक हजारांवरून वाढत बोनससह 50 हजार डॉलरांवर गेला. ऑफिसात येण्याजाण्याचा खर्च, घरभाडं आणि इतर खर्चं धरून मला दीड लाख डॉलरांचा भत्ता मिळत असे."

कालांतराने त्यांनी स्वतःचा उद्योग सुरू करण्याचं ठरवलं.

"त्या वेळी थायलंडमधल्या एका उद्योजकासोबत मी एक कंपनी सुरू केली, त्यात 51 टक्के समभाग त्याचे होते, तर 49 टक्के समभाग माझे होते."

अशा रितीने पोलाद उद्योगविश्वावर राज्य करण्यासाठीचा त्यांचा प्रवास सुरू झाला. हळूहळू युरोपात आणि मग जगभर त्यांच्या कंपनीची ऑफिसं उघडू लागली.

'स्टील किंग'

विद्यार्थी असताना त्यांनी डोनेट्स्कमधील ज्या कारखान्यात शेवटचं प्रॅक्टिकल पूर्ण करून पदवी मिळवली होती, तोच कारखाना त्यांनी 1996 साली विकत घेतला.

जहूर या पोलाद कारखान्याचे मालक झाले असले, तरी कारखान्याची अवस्था दुबळी झालेली होती. ते म्हणतात, "अशा परिस्थितीतून आम्ही अत्याधुनिक व अद्ययावत कारखाना उभा केला."

मोहम्मद

फोटो स्रोत, M ZAHOOR

त्यानंतर त्यांच्या कंपनीने अमेरिकेत व जगभरातील इतर अनेक देशांमध्ये पोलाद कारखाने काढले होते, या सर्व कारखान्यांचा कारभार यशस्वीरित्या सुरू होता, असं मोहम्मद जहूर सांगतात. या दरम्यान युक्रेनशी त्यांचा संबंध वाढू लागला.

आर्थिक परिस्थिती खालावल्यामुळे बंद पडायच्या बेतात असलेलं 'कीव्ह पोस्ट' हे वृत्तपत्र मोहम्मद जहूर यांनी विकत घेतलं आणि माध्यम उद्योगात प्रवेश केला.

कीव्ह पोस्टची लोकप्रियता आणि विक्री

मोहम्मद जहूर सांगतात त्यानुसार, "युक्रेनमधील त्या काळच्या परिस्थितीत किव्ह पोस्ट चालवणं खूपच अवघड होतं. पण मी गुंतवणूक केल्यानंतर तिथल्या संपादकीय यंत्रणेला स्वातंत्र्य दिलं होतं." निःपक्षपाती राहून उत्तमरित्या पेपर चालवावा, असं त्यांनी संपादकीय टीमला सांगितलं. या वृत्तपत्राचं साप्ताहिक वितरण 30 हजार इतकं होतं आणि त्या वेळी युक्रेनची लोकसंख्या चार कोटी होती.

अनेक वर्षं यशस्वी वाटचाल केल्यानंतर त्यांना हे वृत्तपत्र विकावं लागलं.

मोहम्मद जहूर सांगतात, "त्या वेळी आम्ही तत्कालीन सरकारवर कठोर टीका केली." त्यामुळे हे वृत्तपत्र बंद केलं जाणार नाही आणि त्याचं स्वतंत्र धोरण कायम राहील, या अटीवर त्यांनी किव्ह पोस्ट विकलं. परंतु, काही काळाने हे वृत्तपत्र बंद झालं. आता ते बहुधा परत सुरू होणार असल्याचं आपल्या कानावर आल्याचं जहूर म्हणतात.

यशाच्या शिखरावर असताना पोलाद कारखाने विकले

चीनने 2008 सालच्या ऑलम्पिक स्पर्धांचं यजमानपद सांभाळताना बांधकामासाठी जगभरातून पोलाद विकत घेतलं. तेव्हा आपणही चीनला प्रचंड पोलाद विकल्याचं जहूर म्हणतात. पण त्याच वेळी चीनमध्येसुद्धा वेगाने पोलाद कारखाने सुरू होऊ लागले.

कमालिया

फोटो स्रोत, M ZAHOOR

फोटो कॅप्शन, कमालिया

जहूर म्हणतात, "ही परिस्थिती पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की, चिनी पोलाद कारखाने सुरू झाल्यावर हे क्षेत्र लाभदायक उरणार नाही."

हा अंदाज बांधून जहूर यांनी 2008 साली पोलाद क्षेत्रातील त्यांचे सर्व कारखाने विकून टाकले. 2004 साली त्यांनी भागीदाराकडून सर्व समभाग विकत घेतलेले असल्यामुळे ते कंपनीचे एकमेव मालक होते.

त्यांचा निर्णय योग्य असल्याचं पुढील काळात सिद्ध झालं. आता ते जगभरात गुंतवणूक करतात. "मी जवळपास 10 कोटी डॉलरांची गुंतवणूक केलेली आहे," असं त्यांनी सांगितलं.

पत्नी व मुलींना पाकिस्तानबद्दल आस्था

जहूर यांच्या घरात सर्व जण रशियन भाषेत बोलतात. पण त्यांच्या मोठ्या मुलीशी मी बोलले, तेव्हा तिने मला ऊर्दूत विचारलं, "तुम्ही कॉफी प्याल ना?" हे कुटुंब रशियन दिसत असलं, तरी त्यांचं पाकिस्तानशी घनिष्ठ नातं आहे, हे माझ्या लक्षात आलं. कोरोनाच्या आधी दर वर्षी ते पाकिस्तानात जात असत आणि त्यांना बॉलिवूडचे चित्रपट खूप आवडतात, असं या मुलीने सांगितलं.

जहूर यांच्या घरी बहुतांशाने युक्रेनियन जेवण केलं जातं, पण पाकिस्तान खाद्यपदार्थांनाही त्यांची तितकीच पसंती आहे.

मोहम्मद जहूर म्हणाले की, त्यांची पत्नी कमालिया पाकिस्तानात बरंच दानकार्य करते. पाकिस्तानात 2005 साली आलेल्या भूकंपावेळी त्यांनी युक्रेनहून उपकरणं नेऊन पाकिस्तानात फिल्ड हॉस्पिटलं सुरू करायला मदत केली होती.

"या घटनेनंतर दोन वर्षांपर्यंत कमालिया तिकडे जात होती. तिने काश्मीरमधील एका गावाच्या सबलीकरणासाठीही काम केलं. तिथे एका युक्रेनियन फिल्ड हॉस्पिटलची तजवीज केली. शिवाय, इस्लामाबादमधील एका कार्डियालॉजी सेंटरला बालकांमधील हृदयरोगावरील संशोधनासाठी निधी उपलब्ध करून दिला."

कमालिया अशा अनेक सरकारी व बिगरसरकारी संस्थांच्या संपर्कात राहून दानकार्य करत असते, असं जहूर म्हणतात. कमालिया स्वतःच्या प्रशंसकांशी अतिशय विनयाने बोलते, हे सुद्धा जहूर यांनी आवडतं.

कमालिया यांना पाकिस्तानी गायिका नाझिया हसनची गाणी खूप आवडतात आणि ही गाणी पाठ करून कमालिया यांनी अनेक कार्यक्रमांमध्ये गायलीही आहेत. पाकिस्तान दिनाच्या निमित्ताने त्यांनी पाकिस्तानी दूतावासामध्ये 'दिल दिल पाकिस्तान' हे गाणं गाऊन उपस्थित पाहुण्यांची मनं जिंकली होती.

घर युक्रेनमध्ये की पाकिस्तानात?

जगभरात विविध ठिकाणी घरं असलेला माणूस एकाच ठिकाणाला स्वतःचं घर मानत असेल का?

प्रश्न तसा अवघड होता. यावर जहूर ठामपणे म्हणाले, "माझं जन्मस्थान पाकिस्तान आहे, माझं पासपोर्ट ब्रिटनचं आहे, पण मी जन्मस्थानानंतर युक्रेनलाच माझं घर मानतो, कारण या देशात मी शिक्षण घेतलं, या देशात मी दोनदा लग्न केलं आणि सगळा पैसाही तिथेच कमावला. मी तिथल्या लोकांना रोजगार दिला, सामाजिक कार्य केलं आणि माझे मित्रही तिथेच आहेत- त्यातले काही जिवंत आहेत, तर काही आता मरण पावलेत. मला पाकिस्तानी राजकारणाविषयी फारशी माहिती नाही, पण मी युक्रेनमध्ये मी पूर्ण मिळून मिसळून राहिलो."

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यामुळे कोणतं संभाव्य नुकसान होईल, या प्रश्नावर ते म्हणाले की, त्यांनी त्यांची मालमत्ता एकाच ठिकाणी ठेवलेली नाही, त्यामुळे त्यांना फारशी चिंता नाही.

परंतु, कधी अपेक्षाही केली नव्हती एवढं अल्लाहने आपल्याला दिलं, त्यामुळे आपण नशीबवान आहोत, असंही ते म्हणाले.

मग एक खोल श्वास घेऊन स्मित करत ते म्हणाले, "मी 48 वर्षांपूर्वी युक्रेनला आलो, तेव्हा माझ्या वडिलांनी मला 120 डॉलर दिले होते. त्यांना त्या वेळी तेवढंच परवडत होतं. ते 120 डॉलर मी 48 वर्षांपासून खर्च करतो आहे आणि अजूनही माझ्याकडे थोडी रक्कम बाकी आहे."

ISWOTY

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)