रशिया-युक्रेन युद्ध कसं संपू शकतं? 'या' 5 शक्यता जाणून घ्या

    • Author, जेम्स लँडेल
    • Role, डिप्लोमॅटिक करस्पाँडंट

रशिया आणि युक्रेनमध्ये जे युद्धजन्य ढग दाटून आलेत त्यातून मार्ग निघणं सध्यातरी कठीण असल्याचे दिसत आहे. सलग आठवडाभर युद्धभूमीतून येणाऱ्या बातम्या, राजनैतिक पातळीवरील घडामोडी, दुःखी आणि विस्थापितांच्या भावना हे सारं काही हृदय पिळवटून टाकणारं आहे.

या साऱ्या घडामोडींवर एकवार नजर फिरवताना थोडं मागे जाऊन पाहिलं तर युक्रेनमधील संघर्ष कोणत्या कोणत्या पध्दतीचा असू शकतो याचा विचार करता येईल.

सध्याच्या घडीला राजकारणी आणि लष्करी नियोजक युद्धात नेमक्या कोणत्या संभाव्य परिस्थिती येऊ शकतात याचं विश्लेषण करत आहेत. पण फार कमी लोकचं आत्मविश्वासाने या युध्दाचं भविष्य सांगू शकतील. त्यातून ही काही संभाव्य परिणाम निघालेच तर बहुतेक परिणाम तरी अंधकारमय असतील.

जर हे युद्ध थोडक्यात आटोपलं तर काय होईल?

तर अशा परिस्थितीत, रशिया आपल्या लष्करी कारवाया वाढवेल. संपूर्ण युक्रेनमध्ये अंदाधुंद तोफगोळ्यांची बरसात आणि रॉकेट हल्ले सुरू करतील. यात महत्वपूर्ण भूमिका बजावेल ते रशियन हवाई दल.

विनाशकारी हवाई हल्ले सुरूच राहतील. युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात सायबर हल्ले होतील. मुख्य अशा राष्ट्रीय पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात येईल. ऊर्जा पुरवठा आणि दळणवळणाची संसाधने उध्वस्त करण्यात येतील.

या युद्धात युक्रेनच्या हजारो नागरिकांचा मृत्यू झाला असेल. युक्रेनियन लोकांनी अतिशय चिवट असा प्रतिकार करूनही, कीव्ह काहीच दिवसांत ढासळलं असेल. युक्रेनच्या तख्तावर मॉस्को समर्थक राजवट आली असेल. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची एकतर हत्या केली जाईल किंवा प्रति सरकार स्थापन करण्यासाठी ते पश्चिम युक्रेनमध्ये किंवा अगदी परदेशात पलायन करतील.

रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन स्वयंघोषित विजयोत्सव साजरा करतील. काही दिवसांत ते सैन्य मागे घेतील आणि युक्रेनवर नियंत्रण राखण्यासाठी पुरेसे सैन्य युक्रेनच्या भूमीत मागे सोडतील. हजारो निर्वासित पश्चिमी देशांमध्ये पळून जातील. रशियन सैन्याने चांगली कामगिरी केली आहे, त्यापैकी अधिक सैन्य तैनात केले जात आहे. मात्र दुसरीकडे युक्रेनची विलक्षण लढाऊ भावना लुप्त होत चालली आहे.

हा युद्धाचा एक परिणाम आहे जो कोणत्याही प्रकारे अशक्य असा वाटत नाही. मात्र युद्धात परिस्थिती सतत बदलत असते. आणि त्याच बदलणाऱ्या अनेक घटकांवर हा परिणाम अवलंबून असेल.

पुतिन कदाचित कीव्ह मध्ये सत्ताबदल करून आणि युक्रेनच्या पश्चिम एकीकरणाने युद्धाचा शेवट साध्य करू शकतात. पण अशा ही परिस्थितीत रशियाच्या समर्थनाने आलेले सरकार बंडखोरांपासून सुरक्षित असेलचं असं ही नाही. जर युक्रेनचे सरकार अस्थिर राहिले तर संघर्ष पुन्हा निर्माण होण्याची शक्यता जास्त असेल.

प्रदीर्घ काळ युद्ध चालल्यास काय होईल?

सध्या सुरू असलेल्या घडामोडी पाहता हे युद्ध प्रदीर्घ युद्धात बदलण्याची शक्यता आहे. कदाचित कमी मनोबल, कमकुवत रसद आणि अयोग्य नेतृत्व यामुळे रशियन सैन्य मध्येच अडकल्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. युक्रेनी सैन्य रस्त्यारस्त्यावर चिवट लढा देत असताना रशियन सैन्याला कीव्ह सारखी शहरं सुरक्षित करण्यासाठी जास्त वेळ लागेल.

1990 च्या दशकात चेचन्याची राजधानी ग्रोझनी ताब्यात घेण्यासाठी रशियाला जो रक्तरंजित संघर्ष करावा लागला त्या क्रूर संघर्षाचे प्रतिध्वनी या लढाईत दिसतील.

रशियन सैन्याने युक्रेनची काही शहरे ताब्यात घेतली तरी त्यावर नियंत्रण राखणं रशियाला भविष्यात कठीण जाऊ शकते. हे नियंत्रण राखण्यासाठी रशियाला पुन्हा संघर्ष ही करावा लागू शकतो. एवढ्या विस्तीर्ण देशाला संरक्षण पुरवण्यासाठी रशिया पुरेसे सैन्य देऊ शकत नाही.

युक्रेनच्या सैन्याने स्थानिक लोकांना प्रेरित करून संरक्षणात्मक अशा प्रभावी बंडखोरांमध्ये त्यांचे रूपांतर केले आहेच. त्यात मदत म्हणून पश्चिमी देशांकडून शस्त्रे आणि दारूगोळा पुरविणे सुरूच राहील.

आणि मग, कदाचित बर्‍याच वर्षांनंतर मॉस्कोमध्ये नवीन नेतृत्व सत्तेवर येईल. ज्या पद्धतीने रशियाने इस्लामी बंडखोरांशी एक दशक लढल्यानंतर 1989 मध्ये अफगाणिस्तान सोडले, अगदी त्याच पद्धतीने अखेर रशियन सैन्य युक्रेन सोडेल.

युक्रेनच्या सीमेबाहेर युद्ध पसरण्याची शक्यता आहे का?

नाटोचा भाग नसलेल्या मोल्दोव्हा आणि जॉर्जिया या माजी सोव्हिएत प्रजासत्ताकाचा भाग असलेल्या प्रांतात पुतीन सैन्य पाठवू शकतात. पुतिन रशियाच्या पूर्वीच्या साम्राज्याचा अधिक भाग परत मिळवण्याच्या ही तयारीत असू शकतात.

किंवा पुतिन असं ही घोषित करू शकतात की युक्रेनियन सैन्याला पाश्चात्य शस्त्र पुरवठा करणे ही आक्रमक कृती आहे. ज्याचा बदला घेणे आवश्यक आहे. त्यामुळे पुतिन बाल्टिक राज्यांमध्ये सैन्य पाठवण्याची धमकी देऊ शकतात. यात नाटोचे सदस्य असलेल्या लिथुआनियाचा समावेश असू शकतो. कारण लेनिनग्राडच्या रशियन कोस्टल एक्सक्लेव्हसह लँड कॉरिडॉर स्थापित करण्यासाठी लिथुआनिया फायदेशीर आहे.

पण नाटोबरोबर युद्ध पत्करणे रशियाला अत्यंत धोकादायक असेल.

लष्करी आघाडीच्या सनदेतील कलम 5 अन्वये नाटोच्या एखाद्या सदस्य देशावर हल्ला हा सर्वांवर हल्ला आहे. परंतु पुतिन यांना त्यांचे नेतृत्व अबाधित राखण्यासाठी हा एकमेव मार्ग वाटत असल्यास ते असा ही धोका पत्करू शकतात.

पण जर युक्रेनमध्ये पराभवाचा सामना करावा लागण्याची शक्यता निर्माण झालीच तर पुतिन हे युद्ध पुढं रेटू शकतात. संपूर्ण जगाला माहीत आहे की, पुतिन आंतरराष्ट्रीय नियम मोडण्यास इच्छुक आहेत. आणि हाच तर्क त्यांच्या अण्वस्त्रांच्या वापरासाठी लागू केला जाऊ शकतो.

या आठवड्यात, पुतिन यांनी त्यांच्या अण्वस्त्र दलांना उच्च पातळीवर सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे बहुतेक विश्लेषकांना शंका आहे की याचा अर्थ या युद्धात अण्वस्त्रांचा वापर होण्याची शक्यता आहे.

यावर मुत्सद्दी उपाय काय असू शकतो?

युक्रेन मध्ये गोळीबार सुरू आहे, मात्र संवादाचा मार्ग नेहमीच खुला ठेवला पाहिजे असे संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस म्हणाले. निश्चितपणे संवाद सुरूच आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे.

यावर राजकीय मुत्सद्यांचे म्हणणे आहे की, मॉस्कोने हे संबंध अतिरिक्त ताणले आहेत. तरी पण आश्चर्याची गोष्ट ही आहे की, रशियन आणि युक्रेनियन अधिकारी बेलारूसच्या सीमेवर चर्चेसाठी भेटले आहेत. त्यांच्या चर्चेत फारशी प्रगती दिसून येत नाही. पण, चर्चेला सहमती देऊन, पुतिन यांनी किमान वाटाघाटीद्वारे युद्धविरामाची शक्यता मान्य केलेली दिसते.

मुख्य प्रश्न हा आहे की मुत्सद्दी ज्याला 'ऑफ रॅम्प' म्हणतात त्यासाठी पश्चिमी देश तयार होतील का ? पुतीन यांना किमान हे माहीत आहे की, पाश्चात्य निर्बंध उठवण्यासाठी काय करावे लागेल. मग या परिस्थितीत असा विचार करता येईल की, युद्ध रशियासाठी वाईट आहे. पाश्चात्य निर्बंधांमुळे मॉस्को अस्वस्थ व्हायला सुरवात झाली आहे.

मग अशा परिस्थितीत पुतिन यांना वाटू शकतं की, आपण जरा जास्तच आगळीक केली. युद्ध संपवण्याच्या अपमानापेक्षा युद्ध चालू ठेवणे हे आपल्या नेतृत्वासाठी मोठा धोका ठरू शकते.

मग चीनला हस्तक्षेप करायला लावून मॉस्कोवर तडजोड करण्यासाठी दबाव आणला जाईल आणि इशारा दिला जाईल की जोपर्यंत युद्ध थांबवत नाही तोपर्यंत ते रशियन तेल आणि वायू खरेदी करणार नाहीत. मग मात्र पुतिन यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधू लागतील.

याच दरम्यान, युक्रेनियन अधिकारी त्यांच्या देशात सतत होणारा विनाश पाहतील आणि असा निष्कर्ष काढतील की अशा विनाशकारी जीवितहानीपेक्षा राजकीय तडजोड चांगली ठरू शकते. त्यामुळे मुत्सद्दी एकत्र येऊन तडजोड होऊ शकते.

युक्रेन म्हणेल क्रिमिया आणि डोनबासच्या काही भागांवर रशियन सार्वभौमत्व आम्ही स्वीकारत आहोत. या बदल्यात, पुतिन युक्रेनचे स्वातंत्र्य मान्य करतील आणि युरोपशी संबंध अधिक दृढ करण्याचा निर्धार करतील. पण ही शक्यता दिसत नाही.

पुतिन यांची सत्ता जाऊ शकते?

तर जेव्हा पुतिन यांनी आपले आक्रमण सुरू केले तेव्हा त्यांनी घोषित केले की, आम्ही कोणत्याही परिणामासाठी तयार आहोत.

पण कोणत्याही परिणामांच्या नादात त्यांची सत्ता गेली तर?

हे कदाचित अकल्पनीय वाटू शकते. पण तरीही अलीकडच्या काळात जग बदलले आहे आणि अशा गोष्टींचा आता विचार केला जातो.

प्रोफेसर सर लॉरेन्स फ्रीडमन, किंग्स कॉलेज लंडन येथील युद्ध अभ्यासाचे प्राध्यापक आहेत. त्यांनी या आठवड्यात लिहिले आहे की, आता कीव्हप्रमाणेच मॉस्कोमध्येही तख्तपालट होण्याची शक्यता आहे.

पण असं का होईल?

तर यासाठी परिस्थिती अशी असावी लागेल की, पुतिन एक विनाशकारी युद्धाचा पाठपुरावा करत आहेत. हजारो रशियन सैनिक या युद्धात मारले जात आहेत. रशियावर आर्थिक निर्बंध लादण्यास सुरुवात झाली आहे. अशा स्थितीत पुतिन यांनी लोकांचा पाठिंबा गमावतील. कदाचित हाच लोकप्रिय असण्याचा हाच मोठा धोका असतो. मग पुतिन अंतर्गत विरोध दाबण्यासाठी रशियाच्या अंतर्गत सुरक्षा दलांचा वापर करतील.

आणि यथावकाश रशियाच्या लष्करी, राजकीय आणि आर्थिक अभिजात वर्गाचे पुरेसे सदस्य पुतिन यांच्या विरोधात वळतील. त्यात पुतिन यांनी जावं यासाठी युरोपियन राष्ट्रांनी तशी परिस्थिती निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. युरोपियन देशांनी स्पष्ट केले आहे की, जर पुतिन गेले आणि त्यांच्या जागी मध्यममार्गी नेता आला तर रशियावरील काही निर्बंध सैल करण्यास आम्ही इच्छुक आहोत. त्याचप्रमाणे रशियासोबतचे राजनैतिक संबंध आम्ही पुनर्स्थापित करू.

सध्या निर्बंध लादल्यामुळे रशियन उद्योजकांना अडचणींना सामोरे जावे लागते आहे. पुतिन यांच्याकडून लाभ घेतलेल्या लोकांना यापुढे तरी पुतीन त्यांच्या हितसंबंधांचे रक्षण करू शकतील यावर विश्वास नाही. त्यामुळे रशियात एक रक्तरंजित सत्तापालट होईल आणि पुतिन बाहेर पडतील. पण, हे आत्ताच होण्याची शक्यता दिसत नाही.

शेवटी, यावर समाधान उपलब्ध होत नाही.

ही परिस्थिती नेहमीच बदलत राहील. परिस्थितीला अनुसरून यातील वेगवेगळे परिणाम तयार होतील. परंतु हा संघर्ष सुरू असला तरी जग बदलतं आहे. ते पूर्वपदावर येण्याची यत्किंचितही शक्यता नाही. रशियाचे बाह्य जगाशी असलेले संबंध आता या युद्धामुळे वेगळे असतील. सुरक्षेबाबत युरोपीय दृष्टिकोन बदललेला असेल. आणि उदारमतवादी आंतरराष्ट्रीय नियमांचा पुन्हा नव्याने शोध घेतला जाईल.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)