इमरान खान - नरेंद्र मोदींसोबत टीव्हीवर वादविवाद करायला आवडेल #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Reuters
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्सवर आज प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा
1. नरेंद्र मोदींसोबत टीव्हीवर वादविवाद करायला आवडेल - इमरान खान
भारत आणि पाकिस्तानमधले वाद सोडवण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत टीव्हीवरून डिबेट म्हणजे वादविवाद-चर्चा करायला आवडेल, असं पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी म्हटलंय.
रशिया टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केल्याचं NDTV ने दिलेल्या बातमीत म्हटलंय.
चर्चा आणि वादविवादातून जर समजा दोन देशांतल्या समस्या सोडवता आल्या तर त्याचा फायदा भारतीय उपखंडातल्या अब्जावधींपेक्षा जास्त लोकसंख्येला होणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
यावर भारतीय परराष्ट्र खात्याची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न रॉयटर्स वृत्तसंस्थेने केला, पण भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने यावर अजून प्रतिक्रिया दिलेली नाही.
2. राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून नितीशकुमारांचं नाव चर्चेत, नितीश म्हणतात...
भारताचे 14वे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ यावर्षीच्या जुलै महिन्यात संपतोय. राष्ट्रपतीपदासाठी नितीशकुमार यांचं नाव चर्चेत होतं.

फोटो स्रोत, Getty Images
नितीशकुमार यांच्या पक्षाने भाजपसोबतचे संबंध तोडले तर नितीश यांच्या नावाचा विचार राष्ट्रपतीपदासाठी केला जाऊ शकतो, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी देखील म्हटलं होतं.
पण राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून आपलं नाव चर्चेत कसं आलं याची आपल्याला कल्पना नाही, यात तथ्य नसून आपण राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत नसल्याचं नितीशकुमार यांनी म्हटल्याचं महाराष्ट्र टाईम्सच्या बातमीत म्हटलंय.
3. आदित्य ठाकरेंची आज उत्तर प्रदेशात प्रचारसभा
गोवा निवडणुकीसाठी प्रचार केल्यानंतर शिवसेना नेते आणि महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज उत्तर प्रदेशात निवडणुकीसाठीची प्रचारसभा घेणार आहेत.
उत्तर प्रदेशातल्या दोमारियागंज आणि कोरांव इथे आदित्य ठाकरे सभा घेणार असल्याचं टीव्ही9 मराठीने दिलेल्या वृत्तात म्हटलंय.

फोटो स्रोत, Twitter / AUThackeray
उत्तर प्रदेशात एकूण 403 जागा आहेत. यापैकी 51 ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार रिंगणात आहेत.
2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेश आणि दक्षिण गुजरातमध्ये उमेदवार उभे करणार असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं.
4. घरगुती आणि औद्योगिक वापरासाठी पाणी महागणार
महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने पाणीपट्टीचे नवे दर प्रस्तावित केले आहेत. धरणामधून उचलण्यात येणाऱ्या पाण्यासाठी राज्यामध्ये दर तीन वर्षांनी दर ठरवण्यात येतात.
यामध्ये घरगुती वापरासाठीच्या आणि उद्योगांसाठीच्या वापराच्या पाण्याचा समावेश असतो.
जलसंपत्ती प्राधिकरणाने राज्यातल्या महापालिकांच्या पाणी आरक्षणात कपात केली आहे. यानुसार 50 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या महापालिका क्षेत्रात प्रत्येक व्यक्तीला 150 लीटर तर कमी लोकसंख्येच्या क्षेत्रात प्रतिव्यक्ती 135 लीटर पाणी मिळेल.
यापेक्षा अधिक पाणी वापरणाऱ्या पालिकांना दीडपट ते दुप्पट दंड आकारण्याचा प्रस्ताव देण्यात आलाय. जून 2022पासून हे नवे दर लागू होतील असं लोकसत्ताने दिलेल्या बातमीत म्हटलंय.
5. वानखेडेंची याचिका तातडीने कशी आली? उच्च न्यायालयाचा सवाल
एनसीबीचे तत्कालिन प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांनी दाखल केलेली याचिका इतक्या तातडीने सुनावणीला कशी आली? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने केला आहे.

फोटो स्रोत, Twitter
कोणतीही याचिका दाखल केल्यानंतर तीन दिवसांनी त्यावर सुनावणी घेतली जाते. ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी समीर वानखेडे यांचा मद्यालय परवाना कायमस्वरूपी रद्द केल्यानंतर वानखेडेंनी त्याविषयीची याचिका दाखल केली होती.
सोमवारी ही याचिका दाखल केल्यानंतर मंगळवारी 22 फेब्रुवारीला ती सुनावणीसाठी आली.
'सामान्यांना नियमानुसार अनुक्रमाने सुनावणी मिळणार आणि समाजातील कोणी प्रभावी व्यक्ती असेल तर तातडीने सुनावणी मिळणार का? ही न्यायव्यवस्था यासाठी आहे का?' असा सवाल न्या. गौतम पटेल आणि न्या. माधव जामदार यांच्या खंडपीठाने न्यायालयाचे कर्मचारी आणि वानखेडेंच्या वकिलांना केल्याचं लोकमतने दिलेल्या बातमीत म्हटलंय.

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









