You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
वजन कमी करणारी लस तयार, 10 टक्के वजन कमी होण्याचा दावा
तुम्हाला शरीरातली अतिरिक्त चरबी कमी करून वजन घटवायचं असेल तर त्यासाठी लवकरच दर आठवड्याला घेण्याची एक लस त्यासाठी उपलब्ध होऊ शकेल. प्रौढांसाठी या लशीची शिफारस करण्यात आली आहे.
नियमित उपचार, सिमॅग्ल्युटाईड हे डायबिटिसवरील औषध आणि वजन कमी करण्यासाठी असलेली विगोवी ही लस घेतल्यामुळे तुम्हाला पोट भरल्यासारखं वाटतं. आणि तुम्ही कमी खाऊनही तुम्हाला भूकेची भावना राहत नाही.
या लशीच्या चाचण्या पार पडल्या आहेत. आणि निष्कर्ष असं सांगतात की, लस आणि बरोबरीने योग्य आहार आणि व्यायाम असेल तर स्थूल लोकांचं सरासरी 10% वजन कमी होऊ शकतं.
युकेमधील नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ अँड केअर एक्सेलन्स या संस्थेनं ही लस राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमातही समाविष्ट करण्याची शिफारस केली आहे.
राष्ट्रीय संस्थेनं या लशीसाठी जी मार्गदर्शक तत्त्वं आखून दिली आहेत त्यानुसार, या लशीला संपूर्ण मान्यता नसली तरी खालील कारणांसाठी तिचा उपयोग केला जाऊ शकतो.
तज्ज्ञाने शिफारस (प्रिस्क्राईब) केली असेल तरच
प्रौढ स्थूल व्यक्तीला स्थूलतेमुळे उच्च रक्तदाब किंवा ह्रदयविकार यासारखे किमान एक लक्षण तीव्रपणे दिसत असेल तर कमाल दोन वर्षांसाठी लस दिली जावी.
इन्शुलिनच्या लशींसाठी वापरतात तशी प्रि-फिल्ड पेन वापरून लोक स्वत:च ही लस टोचून घेऊ शकतील. तसंच स्थूल लोकांनी आपल्या जवळच्या डॉक्टरचा सल्लाही वेळोवेळी घ्यावा असंही यूकेच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेनं म्हटलं आहे.
नियमित आहार आणि व्यायामातूनही अनेकदा स्थूलता कमी करता येते. आणि अशा लोकांनी लस घेण्याऐवजी आहार आणि व्यायामाच महत्त्व द्यावं असंही तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
वजन कमी करण्यासाठी असलेले इतर उपचारही बघूया..
ऑर्लीस्टॅट - या गोळीमुळे अन्नातील काही प्रकारची चरबी शरीर शोषूनच घेत नाही. परिणामी, चरबी वाढत नाही.
लायरेग्लुटाईड, सॅक्सेंडा - ही दररोज घ्यायची लस आहे. ज्यामुळे लोकांना पोट भरल्यासारखं वाटतं. आणि कमी जेवल्यामुळे वजन कमी होतं.
गॅस्ट्रिक बँड - तुमच्या पोटाभोवती हा बँड बांधलात की पोट आवळलं जाऊन कमी जागा शिल्लक राहते. आणि तुम्ही कमी जेवता.
गॅसट्रिक बायपार शस्त्रक्रिया किंवा बॅरियाट्रिक शस्त्रक्रिया - आपल्या पचन संस्थेतील काही भाग काढून टाकणे किंवा पचनाचा मार्ग बदलणे.
युकेमध्ये चार पैकी एका प्रौढ इसमाला स्थूलतेचा त्रास होतो. आणि त्यातून गंभीर आजार होण्याचं प्रमाणही जास्त आहे. 2018-19मध्ये रुग्णालयात दाखल झालेले 11,117 रुग्ण हे थेट स्थूलतेशी संबंधित आजारामुळे दाखल झालेले होते.
NICE च्या हेलन नाईट यांनी वाढणारं वजन आणि स्थूलता ही माणसासमोरची मोठी आव्हानं असल्याचं म्हटलं आहे.
"वाढत्या वयाबरोबर आयुष्यभर याचा आपल्याला त्रास होऊ शकतो आणि यात वैद्यकीय तसंच मानसिक उपचारांची गरज भासते. स्थूलतेमुळे होणाऱ्या शारीरिक परिणामांमुळे आपल्या आयुष्याचा स्तरही घसरतो," नाईट यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)