अमेरिकेच्या F35-C फायटर जेटचा अपघात, अवशेष मिळवण्यासाठी चीन जीवाचं रान का करतंय?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, क्लेर हिल्स
- Role, बीबीसी न्यूज, वॉशिंग्टन
दक्षिण चीन सागरात कोसळलेल्या अमेरिकेच्या लढाऊ विमानाचे अवशेष मिळवण्यासाठी अमेरिका आणि चीनच्या नौदलामध्ये सध्या स्पर्धा सुरू आहे. चीनचं लष्कर पोहोचण्याआधी तिथं पोहोचण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे.
अमेरिकेचं 10 कोटी डॉलर किंमतीचं F35-C हे विमान दक्षिण चीन सागरामध्ये कोसळलं आहे. यूएसएस कार्ल विल्सनमधून उड्डाण घेतल्यानंतर त्याचा अपघात झाल्याचं अमेरिकेन सांगितलं आहे.
हे जेट अमेरिकन नौदलाचं सर्वात नवं आणि अत्यंत विशेष उपकरणांनी सज्ज असलेलं विमान आहे. सध्या आंतरराष्ट्रीय सागरी सीमेत असल्यामुळं याठिकाणी त्याचे अवशेष मिळवण्यासाठी स्पर्धा सुरू आहे.
या ठिकाणी जो कोणी प्रथम पोहोचेल, त्याचाच विजय होईल.
या शर्यतीत चीनला मिळणारं बक्षीस म्हणजे अत्यंत महागड्या, अत्याधुनिक लढाऊ विमानाबाबत आणि तंत्रज्ञानाबाबत सर्व गोपनीय माहिती हेच आहे.

फोटो स्रोत, TED ALJIBE
लष्करी सरावादरम्यान हे लढाऊ विमान सोमवारी खाली आलं. त्यामुळं विन्सन डेकला धडकल्यामुळं झालेल्या अपघातात 7 खलाशीदेखील जखमी झाले.
विमानाचे अवशेष आता समुद्रामध्ये आहेत, मात्र पुढं काय होणार याबाबत उत्सुकता आहे. ते नेमकं कोणत्या भागात खाली आलं, आणि ते मिळवण्यासाठी नेमका किती काळ लागेल, हे मात्र नौदलानं अद्याप स्पष्ट केलेलं नाही.
चीन जवळपास संपूर्ण दक्षिण चीन सागरावर दावा करतं. हा दावा अधिक ठामपणे मांडण्यासाठी गेल्या काही वर्षांमध्ये त्यांनी अनेक पावलंही उचलली आहेत. 2016 मधील आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय नियमाला धरून नसल्याचं सांगत, तो फेटाळण्याचा प्रकारही त्याचाच एक भाग होता.
राष्ट्रीय सुरक्षा तज्ज्ञांच्या मते चीनचं लष्करं या जेटचे अवशेष मिळवण्यासाठी अत्यंत उत्सुक असेल. तर, अमेरिकेचं मदतीसाठी जाणारं जहाज हे घटनास्थळापासून अंदाजे 10 दिवस लांब आहे.
तोपर्यंत ब्लॅक बॉक्सची बॅटरी डाऊन होईल, तसं झाल्यास विमानाचा शोध घेणं अत्यंत कठिण होईल, त्यामळं खूप उशीर झाला आहे असं संरक्षण सल्लागार अॅबी ऑस्टन यानी म्हटलं.

फोटो स्रोत, Getty Images
"अमेरिकेला याचे अवशेष मिळणं अत्यंत गरजेचं आहे. F-35 हे हवेत उडणाऱ्या एखाद्या कॉप्युटरसारखं आहे. एअर फोर्सच्या शूटर्सच्या लिंकिंग सेंसर्ससारख्या इतर उपकरणांशी जोडण्यासाठी त्यात खास डिझाईन करण्यात आलं आहे," असं त्या म्हणाल्या.
चीनकडे सध्या हे तंत्रज्ञान नाही, त्यामुळं हे अवशेष मिळवणं त्यांच्यासाठी फायद्याचं ठरू शकतं, असं त्या म्हणाल्या.
"जर त्यांना F-35 च्या नेटवर्किंगमध्ये प्रवेश करता आला, तर त्यांना एकूणच तंत्रज्ञानाबाबत मोठी माहिती मिळेल."
हा प्रकार शीतयुद्धासारखा आहे का? असं विचारलं असता त्या म्हणाल्या की, आता या खेळात किंवा या परिसरात कोणाचं वर्चस्व आहे, यावर सर्वकाही अवलंबून आहे.
F-35C ची वैशिष्ट्ये काय आहेत?
- या विमानात नेटवर्कची उपलब्धता असलेली मिशन सिस्टम आहे. त्यामुळं विमान उड्डाण करत असतानाच मिळवलेली माहिती शेअरही करू शकतं.
- हे अमेरिकन नौदलाचं इतरांना कमी माहिती असलेलं पहिलंच विमान आहे. त्यामुळं शत्रूच्या हद्दीत त्यांच्या नजरेस न पडता ते मोहीम पूर्ण करू शकतं.
- मोठे पंख आणि अधिक मजबूत लँडिंग गीअर यामुळं ते समुद्रातील वाहकांद्वारे कॅटापल्ट लाँचसाठी (कमी जागेतून उड्डाण घेणं) अधिक योग्य ठरतं.
- हे जगातील सर्वात शक्तीशाली फायटर इंजिन असलेलं जेट असून त्याचा वेग 1200 mph किंवा Mach 1.6 पर्यंत पोहोचू शकतो.
- हे जेट पंखांवर दोन आणि आत चार क्षेपणास्त्र वाहून नेऊ शकतं.
चीननं या विमानाच्या अवशेषांवर दावा करण्याचा प्रयत्न केल्यास हा प्रकार अमेरिकेसाठी तणाव निर्माण करणारा भाग ठरेल असं मत, अमेरिकेच्या संयुक्त प्रमुखांच्या अध्यक्षांच्या माजी सल्लागार आणि नाटो आणि युरोपीयन संघातील माजी वरिष्ठ राजदूत ऑस्टिन यांनी व्यक्त केलं.
अमेरिकेने घाईगडबडीने अफगाणिस्तातून माघार घेतल्यानंतर अफगाणिस्तानात झालेल्या घडामोडींवरून अमेरिकेवर टीका करण्यात येतेय. अशा नाजूक आणि धोकादायक वेळीच ही घटना घडल्याचंही त्या सांगतात.
चीनला यापूर्वीच सायबर हेरगिरी किंवा इतर माध्यमातून या विमानाचे इंटेरिअर, लेआऊट, कामाची बद्धत याबाबत माहिती मिळाली आहे. तरीही त्यांना हे विमान हवं आहे, यात शंका नाही, असं ट्रुमन प्रोजेक्टमधील चीनशी संबंधित विश्लेषक आणि सुरक्षा प्रतिनिधी ब्रेस बारोस यांनी म्हटलं.

फोटो स्रोत, Getty Images
"मला वाटतं त्यांना विमानाचे पार्ट्स प्रत्यक्षात पाहायचे असतील. त्यामुळं त्यांना यापासून किती धोका आहे हे अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेता येईल."
दरम्यान, अमेरिकेच्या नौदलानं एका निवेदनाद्वारे यूएसएस कार्ल विन्सनवर अपघातानंतर मदतकार्याला सुरुवात झाल्याची माहिती दिली आहे.
विमान किंवा अवशेष पुन्हा मिळवण्याचं काम प्रत्यक्षात कसं असेल?
यूएस नेव्हीच्या साल्व्हेज आणि डायव्हींग सुपरवायजरचं एक पथक विमानाच्या इंजिनाला काही बॅग जोडेल आणि नंतर हळू हळू त्याचा आकार वाढवला जाईल.
विमानाचे अवशेष म्हणजे केवळ एक तुकडा नसल्यानं ही मोहीम अधिक कठिण आहे.
या विमानाच्या अवशेषांमध्ये पंखावर वाहून नेलेली किमान दोन क्षेपणास्त्रे किंवा आतील इतर शस्त्र असण्याची शक्यता असल्यानं, हे काम अधिक गुंतागुंतीचं आहे.
मांजर आणि उंदराच्या या लष्करी खेळामध्ये जिंकणाऱ्याला सर्वकाही मिळणार आहे.
1974 मध्ये शीतयुद्ध शिगेला पोहोचलेलं असताना सीआयएनं गुप्तपणे एक विशालकाय यांत्रिक पंजाचा वापर करत हवाई येथील समुद्र किनाऱ्यावरून रशियाची पाणबुडी खेचून आणली होती. तर दोन वर्षांपूर्वी चीनच्या लष्करानं गुप्तपणे चीनच्या पूर्व किनाऱ्यावर बुडालेल्या अमेरिकेच्या 'एचएमएस पोसिडॉन' नावाच्या पाणबुडीचे अवशेष मिळवले होते.
तसंच 2011 मध्ये ओसामा बिन लादेन असलेल्या परिसरात केलेल्या हल्ल्यात क्रॅशलँड झालेलं अमेरिकेचं हेलिकॉप्टर 'स्टिल्थ'चे अवशेष मिळवण्यातही चीनला यश आलं होतं, असं म्हटलं जातं.
चीनच्या लष्करानं त्यावेळी विमानावरील उपकरणं आणि सॉफ्टवेअरचा अभ्यास केला याची खात्री आहे, असं बारोस यांनी म्हटलं.
मे 2019 मध्ये फिलिपाईनच्या समुद्रतळातून अमेरिकन नौदलाच्या मालवाहू विमानाचे अवशेष यशस्वीरित्या बाहेर काढण्याची मोहीम ही सर्वात खोल समुद्रातील मोहीम म्हणून गिनीज बूकमध्ये नोंद झालेली आहे.
पृष्ठभागापासून सुमारे 5,638 मीटर (18,500 फूट) खोल ते अवशेष होते.
आणखी एक पर्याय म्हणजे चीनच्या हाती लागू नये म्हणून हे विमान नष्ट करणे हा आहे.
"सर्वात सोपी गोष्ट म्हणजे यावर टॉर्पिडो हल्ला करणे हा असल्याचं एका लष्करी अधिकाऱ्यांनी म्हटलं.
पण अद्याप तसं काही विचाराधीन असण्याची शक्यता दिसत नाही.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








