Netflix : 149 रुपयांच्या प्लॅननंतरही भारतीयांची पसंती नाही, कारण...

    • Author, सौतिक बिस्वास
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

इंटरनेटचं पसरलेलं जाळं आणि स्वस्त सेवेच्या पर्यायामुळं पुढचे 10 कोटी सबस्क्रायबर्स हे त्यांना भारतातून मिळतील असा अंदाज नेटफ्लिक्सचे सीईओ रीड हेस्टिंग्ज यांनी फेब्रुवारी 2018 मध्ये दिल्लीत झालेल्या जागतिक व्यापार परिषदेत वर्तवला होता.

यानंतर तीन वर्षांनी मात्र हेस्टींग्ज यांचा उत्साह पूर्वीसारखा नसल्याचं स्पष्ट दिसत आहे. गेल्या आठवड्यात एका गुंतवणूकदारांसोबतच्या बैठकीत त्यांनी भारतात कमी यश मिळाल्याबाबत दुःख व्यक्त केलंय.

"इतर सर्व ठिकाणच्या मार्केटमधून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, भारतात आम्हाला यश का मिळत नाही, ही आमच्यासाठी त्रासदायक ठरणारी बाब आहे. पण आम्ही नक्कीच सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहोत.

भारतात जवळपास 150 अब्ज रुपये ($2bn)एवढं मोठं स्ट्रिमिंग मार्केट आहे. हे मार्केट 10 कोटींवर सबस्क्रिप्शन असलेलं आहे, असं मीडिया पार्टनर्स एशिया या मीडिया कन्सल्टन्सीचं म्हणणं आहे. सहा वर्षांपासून याठिकाणी लाँच झाल्यापासून नेटफ्लिक्स संघर्ष करत आहे.

55 लाख पेड सबस्क्रायबर्सच्या संख्येसह नेटफ्लिक्स हे त्यांचे प्रमुख स्पर्धक डिस्ने + हॉटस्टार (4.6 कोटी सबस्क्रायबर्स) आणि अॅमेझॉन प्राइम व्हीडिओ (1.9 कोटी सबस्क्रायबर्स) यांच्या तुलनेत खूप मागे असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

नेटफ्लिक्सनं 2018 मध्ये सेक्रेड गेम्स या एका गँगस्टरवर आधारित कथेच्या माध्यमातून खळबळ उडवून दिली होती. बॉलिवूडमधील आघाडीचा कलावंत आणि देशातील दोन उत्कृष्ट दिग्दर्शकांनी तयार केलेल्या या उत्तम थ्रिलरनं लोकांची मोठ्या प्रमाणात मनं जिंकली.

हिंदी चित्रपट क्षेत्रातील प्रतिभा, हॉलिवूडमधील मूल्यं आणि सिलिकॉन व्हॅलीतील अब्जावधींचं नियोजन या सर्वाच्या नव्या मिलापामुळं या क्षेत्राला चांगलं भवितव्य असल्याचं नेटफ्लिक्सच्या पहिल्या वहिल्या सिरीजवरून सिद्ध झालं होतं, असं द इकॉनॉमिस्ट या मासिकानं म्हटलं.

पण या सिरीजशिवाय नंतर तसं चित्र समोर आलं नाही. भारतात मनोरंजन क्षेत्रात मोठी बाजारपेठ आहे. 20 कोटीपेक्षा जास्त घरांमध्ये टिव्ही आहे. त्यासाठी येणारा खर्च महिन्याला साधारण 300 रुपये एवढा आहे. चित्रपट, स्पोर्ट्स आणि न्यूज यावर येथील ग्राहक मनोरंजनासाठी सर्वाधिक अवलंबून आहेत.

त्यानंतर ग्राहकांनी सत्य घटनांवर आधारित स्कॅम 1992 सारखे खऱ्या घटनांवर आधारित शो पाहायलादेखील सुरुवात केली. एका स्टॉक ट्रेडरच्या कथेवर आधारित ही सिरीज गेल्या वर्षी सोनी लिव्ह वर प्रदर्शित झाली होती, त्यानंतर अल्पावधीत याला चांगला प्रतिसाद मिळाला आणि याबाबत प्रचंड चर्चाही झाली.

हिंसाचार आणि काहीशा असभ्य अशा कंटेंटचा समावेश असलेल्या काही सिरीजनंही लोकांचं लक्ष वेधलं. पण सामान्यपणे भारतीय समाजव्यवस्थेमध्ये घरात कुटुंबातील सदस्यांबरोबर अशा प्रकारचे शो पाहिले जात नाहीत. लोकांना त्यांच्या वेळेचं पूर्णपणे मूल्य हवं आहे, असं अबुंदांतिया एंटरटेनमेंटचे विक्रम मल्होत्रा हे आघाडीचे निर्माते म्हणाले.

नेटफ्लिक्सनं भारतातील ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रचंड प्रयत्न केला. त्यांनी सबस्क्रिप्शन प्लानसाठीचे दर हे जवळपास 60 टक्क्यांनी कमीही केले. सध्या तर केवळ मोबाईलसाठीचा प्लॅन 149 रुपये (2$) मध्ये उपलब्ध आहे. जवळपास 50 पेक्षा अधिक कालकृतींच्या निर्मितीसाठी त्यांनी जवळपास 40 कोटी डॉलरची गुंतवणूक केली आहे. त्यात 30 पेक्षा अधिक हिंदी भाषेतील चित्रपट आणि शो यांचा समावेश आहे.

मात्र, या शोपैकी बहुतांश हे यूझर्सच्या अपेक्षेवर खरे उतरले नाही, असं या क्षेत्रातील तज्ज्ञांचं मत आहे. ऑरमॅक्स या मीडिया कन्सल्टिंग फर्मच्या माहितीनुसार, गेल्या वर्षीच्या 15 सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या हिंदी स्ट्रिमिंग शोच्या यादीमध्ये नेटफ्लिक्सचा केवळ एक शो (कोटा फॅक्टरी हा महाविद्यालयीत तरुणांवरील शो) आहे.

गेल्या काही दिवसांत इंडियन मॅचमेकिंग, रियालिटी डेटिंग सिरीज आणि वैवाहिक जीवनातील व्यंग्य सादर करणारा डिकपल्ड अशा काही शोची चर्चा झाली.

मात्र तरीही प्रामुख्यानं स्क्विड गेम्स, मनी हाइस्ट आणि नार्कोस अशा जागतिक पातळीवर गाजलेल्या शोसाठीच याला ओळखलं जात आहे.

"नेटफ्लिक्स ही अजूनही तुलनेनं महागडी सेवा समजली जात आहे. अजूनही लोक त्याकडे परकीय म्हणून पाहत आहेत," असं इंडियन एक्स्प्रेसच्या समीक्षक आणि स्तंभ लेखिला शुभ्रा गुप्ता म्हणाल्या.

त्यांचे प्रतिस्पर्धी अधिक हुशार आहेत. डिस्ने+ प्रामुख्यानं क्रीडा क्षेत्रातील कार्यक्रमांमुळं आणि प्रसारणामुळं यश मिळवत आहे.

जगातील क्रिकेटच्या मोठ्या मार्केटमध्ये त्यांच्याकडे प्रमुख सोहळ्यांच्या डिजिटल ब्रॉडकास्टींगचे हक्क आहेत. त्यात आयपीएलसारख्या प्रमुख लीगचा समावेश आहे.

अॅमॅझॉन प्राईम व्हीडिओच्या माध्यमातून 10 प्रमुख भारतीय भाषांमधील विविध प्रकारचा कंटेट उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यांचा अॅक्शन ड्रामा असलेला फॅमिली मॅन हा शो गेल्यावर्षी सर्वाधिक पाहिला गेलेला हिंदी स्ट्रिमिंग शो ठरला आहे. तर ग्रामीण पार्श्वभूमी असलेला मिर्झापूर हा शोदेखील प्रचंड हिट ठरला.

चित्रपटांसाठी भुकेल्या प्रेक्षकांसाठीही प्राईमकडे मोठा खजिना आहे. भारतीय भाषांमधील सर्व ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी 40% चित्रपटांचे हक्क त्यांच्याकडे आहेत, असं ऑरमॅक्स मीडियाचे सीईओ शैलेष कपूर यांनी सांगितलं.

या वर्षाच्या सुरुवातीला ते न्यूझीलंडमधील क्रिकेट स्पर्धेचं लाईव्ह स्ट्रिमिंगही करत आहे. अॅमेझॉनवर खरेदीबरोबरच्या फायद्यांसह याचं सदस्यत्व मिळतं. प्राईमच्या सदस्यांना इतर आठ लहान स्ट्रीमिंग सेवांचा लाभही मिळतो. त्यात शो, फिल्मस्, रियालिटी टीव्ही, डॉक्युमेंटरीज याचा समावेश असतो. एका पेमेंट ऑप्शनमध्ये हे सर्व पर्याय युझर्सना मिळतात.

या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते नेटफ्लिक्सनं जागतिक स्तरावर मिळालेल्या यशाची भारतात पुनरावृत्ती करण्यासाठी त्यांच्या आंतरराष्ट्रीय प्लेबूकचा स्वीकार करत लाखो डॉलर्सचा खर्च केला. बॉलिवूडमधील आघाडीच्या स्टुडिओ आणि निर्मात्यांबरोबर त्यांनी शो आणि चित्रपटांसाठी पार्टनरशिप केली.

पण त्यामुळं फार तर माध्यमांच्या हेडलाईन तयार झाल्या, असं तज्ज्ञ सांगतात. "यापैकी एकालाही स्ट्रिमिंग शो तयार करण्याच अनुभव नव्हता. त्यापैकी बहुतांश फ्लॉप ठरले," असं या क्षेत्रातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं म्हटलं. मात्र त्यांनी नाव जाहीर करण्यास नकार दिला.

"नेटफ्लिक्सला अधिक स्थानिक पातळीवर तसंच प्रादेशिक स्तरावरील कंटेंटवर लक्ष केंद्रीत करावं लागणार आहे. तसंच नवनवीन कंटेंट देत राहण्याकडेही लक्ष द्यावं लागेल," असं मीडिया पार्टनर्स एशियाचे उपाध्यक्ष मिहीर शाह म्हणाले.

2016 मध्ये लाँच झाल्यापासून आतापर्यंत जो कंटेंट तयार केला त्याचा अभिमान असल्याचं नेटफ्लिक्स इंडियाचं म्हणणं आहे.

"विविध फॉरमॅटच्या आणि विषय असलेला कंटेंट त्यात ड्रामा, कॉमेडी, थ्रिलर, रोमान्स, फिक्शन आणि नॉन फिक्शन अशा स्टोरींच्या माध्यमातून आमच्या सदस्यांचं सातत्यानं मनोरंजन करत राहण्यावर लक्ष केंद्रीत करणार," असल्याचं कंपनीच्या प्रवक्त्यांनी म्हटलं.

नेटफ्लिक्स विविध भाषांतील यूझर्सचं अधिकाधिक मनोरंजन करता यावं म्हणून देशाच्या सर्व भागांतील आणखी काही स्टोरी मांडण्यासाठी गुंतवणूक करत आहे, असंही ते म्हणाले.

गेल्या महिन्यात मल्याळम भाषेतील सुपर हिरो फिल्म 'मिन्नल मुराली' रिलीज केला. एका समीक्षकांच्या मते, मार्व्हलच्या सुरहिरो फिल्मला टक्कर हा चित्रपट देऊ शकतो.

2026 पर्यंत भारतातील हे स्ट्रिमिंग मार्केट दुपटीनं वाढणार असल्याचा अंदाज आहे. पण लाखो नवे यूझर्स जोडताना नेटफ्लिक्सला अधिकाधिक वैविध्य असलेला कंटेंट सादर करावा लागणार आहे, म्हणजेच त्यांना अधिकाधिक स्थानिक पातळीचा कंटेंट द्यावा लागेल.

मात्र, हो सोपं नसणार आहे. भारतात सध्याच जवळपास 75 पेक्षा अधिक स्ट्रिमिंग सर्व्हीसेस आहेत. त्यापैकी मोजक्याच यशस्वी आहेत, तर इतरांना मात्र अद्याप यश मिळालेलं नाही. भारतीय भाषांमध्ये गेल्या वर्षी सादर करण्यात आलेल्या 225 शोपैकी 170 हिंदी आहेत. त्यापैकी केवळ 15-20 हे यशस्वी ठरले आहेत, असं शैलेश कपूर यांनी सांगितलं.

प्रत्येकजण मोठ्या प्रमाणावर निर्मिती करत असून त्यातही प्रयोग करत आहे. मात्र भारतातील मार्केट हे अत्यंत गुंतागुंतीचं आहे, हे लक्षात ठेवायला हवं, असंही ते म्हणाले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)