आपण अतिरेकी व्यायाम करत आहोत, हे कसं ओळखायचं?

व्यायाम ही आरोग्यासाठी लाभदायक बाब असली तरी अनेक लोक याचा अतिरेक करत असल्याची आठवण मानसिक आरोग्याशी संबंधित एक संस्था सध्या करून देत आहे.

तणाव आणि चिंता यावर पर्याय म्हणून लोक व्यायाम करत आहेत. काही वेळा शरीर पूर्ण तंदुरुस्त नसलं किंवा दुखापत झालेली असली तरी मन व्यायामासाठी आग्रह करतं. त्यामुळं फिट राहणं हा जणू अनेकांसाठी ध्यास बनला आहे, असं दिसतं.

21 वर्षीय कॅथरीन यांच्यासारखे काही जण तर त्यावर जास्त अवलंबून राहिले आहेत.

'कितीही व्यायाम केला तरी...'

"अनेक लोकांप्रमाणे लॉकडाऊनमध्ये मी रजेवर होते. माझ्या दिवसाच्या नित्यक्रमाचं गणित पूर्णपणे बिघडलं होतं. त्यामुळं मी व्यायामाला सुरुवात केली.

सुरुवातीला हे फायदेशीर ठरलं. कारण सरकारही लोकांना किमान 30 मिनिटे घराबाहेर पडून व्यायाम करण्याचा सल्ला देतं. त्यामुळं मी व्यायाम सुरू केला आणि मी त्यावर अत्यंत बारकाईनं लक्ष केंद्रीत करू लागले."

कॅथरीनला कितीही व्यायाम केला तरीही तो पुरेसा नसल्याची भावना निर्माण होऊ लागली होती.

"कधी कधी मी गुपचूपही व्यायाम करायचे. मला काही कळायच्या आधीच व्यायाम हा माझ्या दैनंदिन आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा भाग बनला होता.

"लॉकडाऊनमुळं माझं फार कमी लोकांबरोबर प्रत्यक्ष बोलणं होत होतं. मला लोकांना मी नेमका किती व्यायाम करत आहे, हे सांगणं योग्य वाटत नव्हतं. कारण जवळच्या लोकांना मी किती जास्त व्यायाम करते हे सांगितलं तर ते कदाचित मला तसं करण्यापासून थांबवतील असं मला वाटलं होतं."

कॅथरीननं अखेर तिच्या आईला विश्वासात घेऊन याबाबत सांगितलं. त्यामुळं त्यांनी तिला ती किती व्यायम करत आहे यावर लक्ष ठेवण्यास मदत झाली.

"व्यायामाचा सराव किंवा चक्र तोडणं अत्यंत कठीण होतं. भावनांना व्यायामाशिवाय इतर ठिकाणी वाट मोकळी करून देण्याचे मार्ग मला सापडले. मी बेकिंगसारख्या काही नव्या अॅक्टिव्हिटींमध्येही स्वतःला गुंतवलं."

यॉर्कशायरमधील 31 वर्षीय एस्टेल (बदललेलं नाव) यांनाही अशीच व्यायामाची सवय जडली होती. नोकरी सुटल्यानं आणि आत्महत्येसारखे विचार मनात येऊ लागल्यानं त्यांनी व्यायाम करायला सुरुवात केली होती.

"एकटेपणा आणि त्यातून येणारे विचार हे माझ्या सहनशक्तीच्या पलिकडे गेले होते. त्यातून मला हानी न होता बाहेर काढण्यासाठी एकच मार्ग होता तो म्हणजे व्यायाम. काही महिन्यांतच मला माझं खूप वजन कमी होऊ लागल्याचं जाणवलं. त्याचं कारण म्हणजे माझे दिवसातील व्यायामाचे तास वाढले होते.

"साहजिकच माझ्या शरीराची खूपच झीज झाल्यामुळं माझ्या सॉफ्ट टिश्यूच्या दुखापतींना सुरुवात झाली. मी दुखापत असतानाही व्यायाम केला. कारण दुसरा पर्याय नाही असं मला वाटत होतं पण त्यामुळं अधिक दुखापती आणि वेदना मिळाल्या. त्यामुळं अखेर मला हलताही येत नव्हतं एवढी वाईट परिस्थिती निर्माण झाली."

कोरोना साथीच्या लॉकडाऊनमुळं त्यांची परिस्थिती अत्यंत वाईट झाली. पण कॅथरीनप्रमाणे त्यांनाही मदत मिळाली.

"मला अजूनही व्यायाम आवडतो. जगासाठी मी कधीही व्यायाम बंद करणार नाही. मात्र, नकारात्मक भावनांचा सामना करणं आणि सतत अॅक्टिव्ह राहण्यासाठीची ऊर्जा कुठून मिळते हे जाणून घेतल्यानं व्यायामाबरोबरचं माझं नातं आता बदललं आहे. आरोग्य आणि तंदुरुस्ती यांचं संतुलन महत्त्वाचं आहे. काही वेळा याचा अर्थ मॅराथॉन धावण्यासारखा तर काहीवेळा सोफ्यावर पडून राहण्यासारखा आहे."

अतिव्यायामाची मनाला जाणवणारी काही लक्षणं

  • जोपर्यंत वेदना होत नाही तोपर्यंत व्यायाम न थांबवणं
  • जेव्हा व्यायामाचा परिणाम तुमचा जॉब आणि नात्यांवर होऊ लागतो
  • कंटाळा आल्यानंतर, आजारी असताना किंवा दुखापत झालेली असतानाही व्यायामत न थांबवणं
  • दररोज किंवा दिवसातून काहीवेळा प्रचंड कठोर व्यायाम करणं
  • जेव्हा तुम्ही अॅक्टिव्ह राहण्यासाठी कारणं शोधत असता
  • जीवनात शारीरिक हालचाल सर्वाधिक महत्त्वाची वाटू लागणं

साथीच्या काळात आमच्या लक्षात आले की, आपले कुटुंब किंवा मित्र असे कायम बरोबर असणाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळं आणि त्यातही घरून काम करावं लागत असल्यामुळं हा काळ अत्यंत कठीण होता, असं फिजिकल अॅक्टिव्हीटी फॉर माइंडचे प्रमुख हायले जार्विस म्हणाले.

"या काळात अशा बातम्यांची संख्या वाढली होती की, या सर्वावर पर्याय म्हणून अनेक जण मानसिक आरोग्य राखता यावं म्हणून व्यायामावर अधिक विसंबून राहू लागले. यामुळं काही जणांना अतिव्यायाम किंवा व्यायामाचं व्यसन जडण्याचा धोका निर्माण झाला."

इतर काही महत्त्वाच्या सूचना

व्यायामांचं मिश्रण करा : तुमच्या स्नायूंवर फार ताण येणार नाही अशा क्रिया म्हणजे चालणे, योगा, स्ट्रेचिंग असे काही साधे व्यायाम करून पाहा.

आवडींची मदत घ्या : नेहमीच्या दिनचर्येतून आराम मिळून तुम्हाला आवडणाऱ्या काही गोष्टी म्हणजे तुमच्या छंदाशी संबंधित ज्यातून तुम्हाला आनंद मिळेल अशा अॅक्टिव्हीटींची निवड करा.

शक्य होईल असे ध्येय ठेवा : अशा काही गोष्टी करायचं ठरवा ज्याचा तुमचं वजन किंवा आकार याच्याशी संबंध नसेल. स्वतःबद्दल सहानुभुती बाळगा. रोज सर्वकाही उत्तमच होईल असं नाही आणि त्यात काही गैरही नाही.

संतुलन राखा : तुम्ही करत असलेल्या व्यायामाबाबत माहिती ठेवा. तुम्ही योग्य प्रकारे आणि योग्य प्रमाणात करत आहात याची खात्री होण्यासाठी गरज असल्यास अॅक्टिव्हीटी डायरी ठेवा.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)