अँटिबायोटिक AMR : कोरोनानंतर हे मोठं जागतिक आरोग्य संकट ठरू शकतं

फोटो स्रोत, Getty Images
अँटिबायोटिक (प्रतिजैवकं) औषधांच्या परिणामांबाबत आतापर्यंत झालेल्या सर्वांत मोठ्या अभ्यासानुसार 2019 मध्ये जगभरात 12 लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू अशा बॅक्टेरियाच्या (जीवाणू) संसर्गामुळं झाला ज्यांच्यावर औषधांचा परिणामच झाला नाही. हा आकडा मलेरिया किंवा एड्समुळं दरवर्षी मृत्यू होणाऱ्या लोकांच्या आकड्यांपेक्षा अधिक आहे.
'द लॅन्सेट' या मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित या अभ्यासाच्या रिपोर्टनुसार याचा धोका हा सर्वांनाच असला तरी गरीब देशांवर याचा सर्वाधिक परिणाम झाला आहे.
वैद्यकीय भाषेत औषधांचा परिणाम न होण्याच्या या स्थितीला अँटि-मायक्रोबियल रेझिस्टन्स (AMR) म्हटलं जातं. जेव्हा बॅक्टेरिया, व्हायरस, बुरशी आणि परजीवी यात काळानुरुप बदल होतात आणि त्यांच्यावर औषधांचा परिणामच होत नाही तेव्हा असं होतं. त्यामुळं एखाद्या संसर्गावर उपचार करणं कठिण होतं आणि गंभीर आजार पसरण्याचा आणि त्यामुळे मृत्यू होण्याचा धोका वाढतो.
नव्या औषधांमध्ये तात्काळ गुंतवणूक करणं आणि सध्याच्या औषधांचा विचारपूर्वक वापर करणं हे यापासून बचावासाठी गरजेचं असल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये अगदी साधारण संसर्गांसाठीही अँटिबायोटिक औषधांच्या अतिरेकी वापरामुळे गंभीर संसर्गांच्या विरोधात अँटिबायोटिक्सची परिणामकारकता कमी होत आहे.
पूर्वी ज्यांचा उपचार होत होता, अशा सामान्य रोग आणि संसर्गांमुळे आता लोकांचे मृत्यू होत आहेत. त्याचं कारण म्हणजे ज्या बॅक्टेरियाच्या संसर्गामुळं हे आजार होतात ते आता प्रतिरोधकं बनले आहेत, म्हणजे त्यांच्यावर औषधांचा परिणामच होत नाही.
अँटिबायोटिक औषधं निष्प्रभ होण्याबाबत आधीही चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे. नुकताच ब्रिटनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी एक इशारा दिला होता की, एएमआर हा एखाद्या छुप्या साथीसारखा प्रकार आहे. जर जबाबदारीनं वापर केला नाही तर कोरोना साथीमुळं ते पुन्हा एकदा डोकं वर काढू शकतं.

फोटो स्रोत, Getty Images
रिपोर्टनुसार, कोव्हिड-19 मुळं लोक मोठ्या प्रमाणात रुग्णालयात दाखल होऊ लागले आणि अँटिबायोटिक औषधांचा वापर वाढला, त्यामुळं एएमआरचा धोका वाढला आहे.
घातक प्रकार
लँसेटमध्ये प्रकाशित अँटिबायोटिक औषधांचा प्रभाव कमी झाल्यामुळं होणाऱ्या मृत्यूचा अंदाज लावणारा हा रिपोर्ट 204 देशांमध्ये अभ्यास करून तयार करण्यात आला. आंतरराष्ट्रीय अभ्यासकांच्या एका टीमनं केलेल्या या विश्लेषणाचं नेतृत्व अमेरिकेच्या वॉशिंग्टन विद्यापीठानं केलं.
या टीमनं लावलेल्या अंदाजानुसार 2019 मध्ये जगभरात अशा आजारांमुळं जवळपास 50 लाख लोकांचा मृत्यू झाला, ज्यात एएमआरची भूमिका कारणीभूत ठरली होती. हा आकडा एएमआर थेट कारणीभूत असलेल्या 12 लाख मृत्यूपेक्षा वेगळा होता. म्हणजे जवळपास 60 लाखांपेक्षा जास्त लोकांच्या मृत्यूमागे, एएमआरची भूमिका कारणीभूत असू शकते.
याची तुलना इतर आजारांशी केली असता हे लक्षात येतं की, त्यावर्षी एड्समुळं 8,60,000 आणि मलेरियानं 6,40,000 लोकांचा मृत्यू झाला होता.

फोटो स्रोत, Getty Images
एएमआरमुळं होणारे बहुतांश मृत्यू ज्यात न्युमोनियासारखे लोअर रेस्पिरेटरी इनफेक्शन म्हणजे फुफ्फुसांशी संबंधित संसर्ग किंवा ब्लडस्ट्रिम इन्फेक्शनमुळं झाले, ज्यामुळं सेप्सिस होऊ शकतं.
एमआरएसए (मेथिसिलिन प्रतिरोधक स्टॅफिलोकोकस ऑरियस) हे अधिक घातक होतं. तर ई.कोलाई आणि इतर अनेक बॅक्टेरियांमुळं होणाऱ्या आजारांसाठीही औषधांची परिणामकारकता हेच कारण मानलं गेलं.
या अभ्यासासाठी रुग्णालयांतील रुग्णांचे रेकॉर्ड्स, अभ्यास आणि इतर माहितीचा वापर करण्यात आला. त्या आधारे असं सांगण्यात आलं की, लहान मुलांना सर्वाधिक धोका होता. एएमआरशी संबंधित मृत्यूमध्ये पाचपैकी एक प्रकरण पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांचं होतं.
दक्षिण आशियावरील परिणाम
या रिपोर्टनुसार दक्षिण आशियाच्या देशांमध्ये 2019 मध्ये एएमआरमुळं 3,89,000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला.
या रिपोर्टच्या निष्कर्षांच्या आधारे प्रतिक्रिया देताना भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद म्हणजे आयसीएमआरमध्ये वरिष्ठ वैज्ञानिक डॉक्टर कामिनी वालिया यांनी एएमआर ही जागतिक साथीसारखी परिस्थिती आहे, असं म्हटलं.

फोटो स्रोत, Getty Images
"बॅक्टेरिया प्रतिरोधक बननं ही एक अशी जागतिक आरोग्य समस्या किंवा आणीबाणी बनली आहे, ज्याकडं जगातील कोणतंही सरकार दुर्लक्ष करू शकणार नाही. आपल्या अँटिबायोटिकच्या वापरावर लक्ष ठेवायला हवं. कारण तसं केलं तरच ती औषधं भविष्यात परिणामकारक ठरू शकतील," असं त्यांनी म्हटलं.
वॉशिंग्टन विद्यापीठात इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मॅट्रिक्स अँड इव्हॅल्यूएशनचे प्राध्यापक क्रिस मरे यांनी म्हटलं की, नवीन माहितीमुळं जगभरातील प्रतिजैविकाच्या प्रतिकारक्षमतेचं वास्तविक प्रमाण समोर आणलं आहे.
प्रोफेसर मरे यांच्या मते ही माहिती म्हणजे, आपल्याला प्रतिजैविकांच्या प्रतिकारक्षमतेच्या स्पर्धेत पुढं राहायचं असेल, तर तत्काळ कारवाई करावी लागेल, याचे स्पष्ट संकेत देणारी आहे.
तर वॉशिंग्टन डीसीच्या सेंटर फॉर डिजीज डायनामिक्स, इकॉनॉमिक्स अँड पॉलिसीचे डॉक्टर रामानन लक्ष्मीनारायण यांच्या मते, एएमआर नियंत्रित करण्यासाठी औषधांचा विचारपूर्वक वापर करण्याची गरज आहे.
"सर्वांत आधी तर संसर्ग होऊ नये यावर लक्ष केंद्रीय करायला हवं. तसंच सध्या उपलब्ध असलेल्या अँटिबायोटिक औषधांचा योग्य आणि विचारपूर्वक वापर व्हावा तसंच नवीन अँटिबायोटिक्सही आणली जावी," असंही डॉक्टर लक्ष्मीनारायण यांनी म्हटलं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








