कोरोना संसर्गाचा स्पर्म काऊंट कमी होण्याशी काही संबंध आहे का?

एका नवीन संशोधनानुसार कोव्हीड-19 ची लागण झालेल्या पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी होते किंवा शुक्राणूंची कार्यक्षमता घटते असं समोर आलं आहे.

या अभ्यासाबाबत डॉक्टर नेमकं काय म्हणाले? स्पर्म काऊंट वाढवण्यासाठी काय करावं? कशाप्रकारचा आहार घ्यावा?

शुक्राणूंवरील संशोधनात काय समोर आलं?

हे संशोधन बेल्जियममधील अँटवर्प विद्यापीठाच्या हॉस्पिटलचे संशोधक गिल्बर्ट किकी टंडर्स यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं.

यामध्ये कोरोनाचा संसर्ग होऊन गेलेल्या 18 ते 70 वयोगटातील पुरुषांच्या शुक्राणुंचे नमुणे घेऊन त्यावर संशोधन करण्यात आलं.

यात समोर आलेल्या निष्कर्षानुसार कोव्हिडचा संसर्गाला एक महिना होऊन गेलेल्या पुरुषांच्या शुक्राणुंची गतीशीलता (वाहून जाण्याची क्षमता) कमी झाल्याचं समोर आलं. म्हणजेच 60 टक्के पुरुषांच्या शुक्राणंची गतीशीलता कमी होती, तर त्याचबरोबर 37% पुरुषांमध्ये स्पर्म काऊंट (शुक्राणूंची संख्या) घटल्याचंही समोर आलं.

पण या संशोधनात असं समोर आलं की, काही इतर पुरुषांमध्ये संसर्गाच्या दोन महिन्यांनंतर शुक्राणुंची गतीशीलता केवळ 28 टक्क्यांमध्ये कमी होती. तर शुक्राणुंची संख्या कमी असणाऱ्यांचं प्रमाण केवळ 6% होतं.

या संशोधनाचे निष्कर्ष 'जर्नल ऑफ फर्टिलिटी अँड स्टरिलिटी'मध्ये प्रकाशित झाले होते.

समस्या कधीपर्यंत राहणार?

संशोधकांनी कोरोना विषाणूमुळं शुक्राणूंची संख्या कमी होण्याचा धोका असल्याचं म्हटलं आहे. मात्र, संशोधकांनी कोरोनाचा विषाणू आणि याचा संबंध अद्याप पूर्णपणे स्पष्ट झाला नसल्याचं म्हटलं आहे.

या विषाणूच्या विरोधात कोणताही खबरदारीचा उपाय हा विचारपूर्वक करायला हवा असंही संशोधकांचं मत आहे, तसंच स्पर्म काऊंट वाढण्यासाठी किमान तीन महिन्यांचा कालावधी लागतो असाही अंदाज आहे.

मात्र, शुक्राणूच्या दर्जामध्ये झालेली घट ही कायमस्वरुपी राहते का? किंवा शुक्राणुंची संख्या पूर्ववत म्हणजे कोव्हिड संसर्गापूर्वीप्रमाणे होण्यासाठी किती वेळ लागतो? याबाबत अधिक अभ्यास होणं गरजेचं आहे.

त्याशिवाय हृदयरोग असलेल्यांमध्ये शुक्राणूंचा दर्जा कमी आढळल्याचं अभ्यासावरून स्पष्ट झालं. मात्र, कोरोनाची लागण होण्यापूर्वी शुक्राणुंचा दर्जा कसा होता आणि संख्या किती होती याची माहिती त्यांच्याकडे नव्हती.

डॉक्टर काय म्हणतात?

आयव्हीएफ क्लिनिकचे संस्थापक आणि डॉक्टर रामाराजू यांच्या मते, शुक्राणूंची संख्या ही कायम बदलत असते.

शुक्राणूंची संख्या आणि त्यांचा दर्जा हा सामान्यपणे वयाबरोबर बदलत असतो. कोव्हिड-19 मुळे यावर नेमका किती परिणाम झाला आहे, हे प्रत्यक्ष संशोधन न करता या अभ्यासावरून ठरवणं कठीण आहे, असंही ते म्हणाले.

दुसरे एक डॉक्टर कोपराजू समरम यांनीही अगदी साधा ताप आला तरी शुक्राणुंची संख्या बदलत असते, असं सांगितलं.

कोव्हिड-19 मुळं संपूर्ण शरीरावर परिणाम होतो. शुक्राणूंच्या संख्येलाही त्याचाच परिणाम समजायला हवं. मात्र, शुक्राणूंची संख्या अचानक घटल्यास डॉक्टर अँटिऑक्सिडंट, व्हिटामीन ए आणि व्हिटामीन डी सारखी पोषकतत्वं मिळण्यासाठी औषधं देऊ शकतात. पण शरीर त्या औषधांना कशी साथ देतं, यावर त्या औषधांचा परिणाम अवलंबून असतो, असं डॉ. समरम म्हणाले.

स्पर्म काउंट वाढवण्यासाठी काय करावं?

डॉ. समरम यांनी शुक्राणुंची संख्या (स्पर्म काऊंट) वाढवण्यासाठी 9 सल्ले दिले आहेत.

- नियमितपणे व्यायाम करावा.

- 8 तास चांगली झोप घ्यावी.

- धुम्रपान टाळावे.

- जास्त मद्यपान करू नये.

- डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधं घेऊ नये.

- भरपूर अँटिऑक्सिडंट मिळेल असा आहार घ्यावा.

- आरोग्याला धोकादायक फॅट्सचं प्रमाण अधिक असलेले पदार्थ टाळा

- फळे आणि भाज्या जास्त खा.

- शक्य तेवढा कमी तणाव घ्या.

शुक्राणू आणि कृत्रिम गर्भाधारणा पद्धती

डॉ. रामाराजू यांच्या मते, अनेक आयव्हीएफ क्लिनिक हे कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळं शुक्राणूंची संख्या घटत असल्याचं सांगत लोकांमध्ये भीती पसरवण्याचं काम करत आहेत.

काही दाम्पत्यांना कोरोनाच्या संसर्गानंतर नैसर्गिक गर्भधारणेचा प्रयत्न करण्याचा सल्ला न देता शुक्राणुंची संख्या कमी झाल्याचं सांगत कृत्रिम गर्भधारणा करण्याचा सल्ला दिला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

अशा डॉक्टरांपासून सावध राहायला हवं, असं डॉ. रामाराजू सांगतात. किमान 12 महिने नैसर्गिक गर्भधारणेसाठी प्रयत्न केल्यानंतरच आयव्हीएफसारख्या पर्यायांचा विचार करावा, असं त्यांनी म्हटलं.

डॉक्टर समरम यांच्या मते, कोरोनाच्या संसर्गानंतर निर्माण झालेल्या कोणत्याही समस्येवर सर्वात चांगला पर्याय म्हणजे आरोग्यात सुधारणा घडवून आणणं.

याशिवाय कोरोनामुळं शुक्राणूंच्या संख्येवर परिणाम झाला असेल, असा विचार करून आयव्हीएफ क्लिनिकमध्ये जाण्याची काहीही गरज नसल्याचंही डॉक्टर म्हणाले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)