हिंदू आणि बौद्ध धर्म पुनर्जन्माबद्दल काय सांगतात?

    • Author, मार्गारिटा रॉड्रीग्ज
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

बुद्धाने म्हटलंय की, "काही गोष्टी माणसाच्या विचारांच्या पलीकडे आहेत. एखाद्या व्यक्तीने त्याबद्दल अधिक विचार करण्याचा प्रयत्न केला तर त्या गोष्टींचं उत्तर त्याला कधीच मिळणार नाही."

बौद्ध भिख्खू नंदीसेना यांनी बीबीसी मुंडोशी बोलताना म्हटलं की, "यापैकी एक गोष्ट आहे कम्म किंवा कर्माचे नियम समजण्याचा प्रयत्न करणं आणि दुसरं म्हणजे विश्वाच्या उत्पत्तीचा अंदाज बांधणं."

कम्म पाली भाषेतला एक शब्द आहे. या भाषेतले अनेक शब्दांचं संस्कृत भाषेतल्या शब्दांशी साधर्म्य आहे. भगवान बुद्धाने पाली भाषेत उपदेश केलेत. यांना संस्कृतमध्ये कर्म म्हणतात.

मेक्सिकोत हिस्पॅनिक बुद्धीज स्टडीज या संस्थेचे नंदीसेना म्हणतात की जेव्हा बौद्ध धर्म लोकप्रिय झाला तेव्हा अनेक विद्वानांनी संस्कृत भाषा वापरायला सुरुवात केली. अर्थात बुद्धांनी कधी संस्कृत भाषा वापरली नाही.

पुनर्जन्म ही संकल्पना मोक्षाच्या शोधाचा एक भाग आहे. एक असं सत्य जे परंपरागत वास्तवापासून फारच निराळं आहे.

पुनर्जन्म आणि कर्म दोन्ही खूप अवघड संकल्पना आहेत. बौद्ध आणि हिंदू धर्मात याबद्दल खूप साऱ्या मान्यता आहेत, परंपरा आहेत. दोन संशोधकांच्या मदतीने आम्ही हे समजण्याचा प्रयत्न केला.

बौद्ध धर्मात राजकुमार सिद्धार्थ, जे नंतर गौतम बुद्ध म्हणून ओळखले जाऊ लागले, त्यांचा जन्म 2500 वर्षांपूर्वी एका राजघराण्यात झाला होता. जिथे बुद्धांचा जन्म झाला ती जागा आता नेपाळमध्ये आहे.

एका राजघराण्यात जन्म होऊन एका घटनेने उद्विग्न होऊन राजकुमार सिद्धार्थने सत्ता, अधिकार, भोग-विलास सगळ्यांचा त्याग केला आणि अध्यात्मिक ज्ञानाच्या शोधात निघून गेले. अनेक वर्षं तप केल्यानंतर ते 'बुद्ध' झाले.

एका अंदाजानुसार जगात बौद्ध धर्माचं पालन करणाऱ्या लोकांची संख्या 37 कोटींहून जास्त आहे. यात थेरवाडासारख्या अनेक शाखा आहेत.

नंदीसेना म्हणतात की बुद्धाच्या उपदेशानुसार कर्माचे तीन रस्ते आहेत -

पहिला शरीर, दुसरा वाचा किंवा भाषा आणि तिसरा चित्त.

ते म्हणतात, "आपली वाणी आणि शरीराच्या माध्यमातून आपण दुसऱ्यांशी संवाद साधतो. त्याव्दारे आपण चांगले कर्म करू शकतो किंवा वाईट कर्म करू शकतो. दुसऱ्यांचं भलं करू शकतो किंवा दुसऱ्यांना त्रास देऊ शकतो."

आणि चित्त हा आंतरिक रस्ता जो शरीर आणि वाणीचं नेतृत्व करतो.

त्यांच्यामते, "आपली वाणी, आपलं शरीर आणि आपल्या शरीराने आपण कोणतीही क्रिया केली तर ते कर्म आहे."

क्षमता

बुद्ध म्हणतात की पापणी लवताना जितका वेळ लागतो त्या काळात अनंत विचार आपल्या मनात येतात आणि लोप पावतात.

एका तज्ज्ञांच्या मते, "कल्पना करा की एका मौखिक किंवा शारिरीक क्रियेदरम्यान, जी क्रिया एका विशिष्ट काळापुरती चालतेय, त्या काळात आपल्या मनात अनंत विचार येतात जे आपल्याला ती क्रिया करण्यासाठी प्रेरित करतात."

"त्या प्रत्येक क्षणाला आपण एक कर्म म्हणू शकतो."

म्हणजे दरवेळी जेव्हा आपण हे म्हणतो की काहीतरी करा किंवा काहीतरी विचार करा तेव्हा त्यामागे एक भावना असते आणि एक क्षमता आपल्यात निर्माण होते.

जोवर त्या क्रियेचे परिणाम मिळत नाहीत, किंवा परिणाम मिळण्याची परिस्थिती येत नाही तोवर ती क्षमता आपल्यात राहाते.

नंदिसेना म्हणतात, "आजच्या काळात कर्माबद्दल खूपसे लोक बोलतात आणि म्हणतात की हे माझं कर्म आहे किंवा माझ्याबाबतीत असं झालं."

"पण खरं पाहिलं तर कर्म म्हणजे एक क्रिया आहे आणि त्या क्रियेचं आणि त्यांच्या परिणामांचा जो संबंध आहे त्यालाच कर्म किंवा कर्माचे नियम म्हणतात."

पुनर्जन्म

बौद्ध भिक्षू नंदिसेना यांच्यामते आपल्या आसपास काही असे गुण आणि काही भौतिक क्रिया असतात ज्या आपल्या अंतरात्म्याच्या आवाजाचा आधार ठरतात.

आपल्या शरीरात सहा वेगवेगळ्या प्रकारच्या चेतना असतात. डोळे, कान, नाक, जीभ, स्पर्श आणि मन. जेव्हा या चेतना आणि भौतिक गुण हरवतात तेव्हा व्यक्तीचा मृत्यू होतो.

पण मानसिक चेतना मृत्यूनंतर शरीरात एका क्रियेचं अनुसरण करते आणि या क्रियेनेच जीवनाची भरभराट होते.

बौद्ध धर्मानुसार ज्यावेळी पुरुषाचे शुक्राणु आणि स्त्रीचे अंडाणु मिळतात तेव्हा फक्त माता आणि पिता यांच्या व्यतिरिक्त एका बाह्य तत्त्वाचं आरोपण होतं ज्याला आपण री-कनेक्शन म्हणतो.

हीच वेळ आपल्या चेतनेचा आधार बनते आणि आपल्या सगळ्या संवेदनांचा विकास होतो.

त्यांच्या मते, "आम्ही पुनर्जन्म शब्दाचा वापर करत नाही कारण प्रत्यक्षात असं काही नसतं. एका क्षणाला दुसऱ्या क्षणाशी जोडणारं काही नसतं. एकापाठोपाठ घडणाऱ्या क्षणांची निरंतरता असते ती. मागच्या चेतनेशी जोडणारं असं काही नसतं."

पण ते म्हणतात की बौद्ध धर्मात काही शाखा आहेत ज्या पुनर्जन्मसारख्या शब्दांचा वापर करतात. "पण तांत्रिकदृष्ट्या सांगायचं झालं तर आम्ही रि-कनेक्शन या शब्दाचा वापर करतो. हा एका पाली शब्दाचा अनुवाद आहे. पण पुनर्जन्म शब्द लोकांना जास्त चांगल्या प्रकारे समजतो."

हिंदू धर्मात काय?

भगवद्गीतेत लिहिलं आहे की, 'ज्याचा जन्म झालाय त्याचा मृत्यू अटळ आहे. जे अटळ आहे ते अपरिहार्य आहे. त्याचा शोक तुम्ही करायला नको.'

बनारस हिंदू विद्यापीठात संस्कृत भाषेत संशोधन करणारे ऑस्कर पुजोल यांनी बीबीसी मुंडोला सांगितलं की, 'भारतीय प्राचीन संस्कृतीत, विचारधारेत कर्म आणि पुनर्जन्मच्या संकल्पनेवरून पूर्णपणे सहमती आहे."

ते म्हणतात, "हे विचित्र वाटू शकेल पण प्राचीन भारतीय इतिहासात याबद्दल स्पष्ट लिहिलेलं आहे. यासाठी कोणत्या पुराव्याची गरज नाही."

जगभरात 90 कोटीहून जास्त लोक हिंदू धर्माचं पालन करतात. भारत आणि नेपाळ हिंदुबहूल देश आहेत.

बीबीसी रिलीजियस युनिटच्या मते, "इतर धर्मांप्रमाणे हिंदू धर्माचा कोणी एक संस्थापक नाहीये, एक धर्मग्रंथ नाहीये, आणि एकच परंपरा नाहीये."

जगातला हा सगळ्यात जुना जिवंत धर्म आहे. सध्याच्या पाकिस्तानातल्या सिंधू खोऱ्याच्या आसपास या धर्माचा जन्म झाला, असं म्हणतात.

हिंदू धर्माच्या अनेक परंपरा जैन, बौद्ध आणि शिख धर्मांशी मिळत्या-जुळत्या आहेत.

अनेक तज्ज्ञ लोक हिंदू धर्माला एक धर्म म्हणून न बघता 'जीवनशैली' किंवा 'सगळ्या धर्मांचं कुटुंब' म्हणून पहातात.

साधारण नियम

पुजोल यांच्या मते भौतिक जगात राहाणाऱ्या लोकांसाठी हिंदू धर्मात कर्माचे नियम सांगितले आहेत.

काही लोक म्हणतात हे गुरुत्वाकर्षणाच्या नियमांसारखं आहे.

कर्माची व्याखा समजणं त्या कर्माचा प्रभाव समजण्याइतकंच सोपं आहे. कर्माचा काही ना काही परिणाम होतोच.

सकारात्मक कर्माचा परिणाम सकारात्मक असतो आणि नकारात्मक कर्माचा परिणाम नकारात्मक.

हिंदू धर्मात पुनर्जन्म

तज्ज्ञांच्या मते जेव्हा कोणत्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा तिच्याकडे ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या शक्ती असतात त्या तिच्याकडून परत घेतल्या जातात.

"आधी शरीर मरतं, मग इंद्रियं, मग श्वास आणि मग सरतेशेवटी अतिसुक्ष्म असलेला आत्मा जो पुनर्जन्म घेणार असतो."

"चित्त आपल्या शरीरात हार्ड डिस्क सारखं असतं. त्यात आपल्या सगळ्या कर्मांचा हिशोब असतो."

तज्ज्ञ म्हणतात की आपला जेव्हा पुनर्जन्म होतो तेव्हा आपल्याला मागच्या जन्मातलं काही आठवत नसतं. आपली जुनी ओळख हरवलेली असते.

किती जन्म

हिंदू धर्मात किती जन्म आहेत याबाबत खूपशा समजुती प्रचलित आहेत. पुजोल म्हणतात की माणूस आपल्या पुढच्या जन्मात माणूसच बनेल असं काही नाही. तो कोणत्याही प्राण्याच्या जन्माला येऊ शकतो.

पण नक्की किती जन्म? हे कधी न संपणारं चक्र आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)