You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दक्षिण आफ्रिकेतील नोबेल पुरस्कार विजेते आर्चबिशप डेसमंड टूटू यांचं निधन
दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेद नष्ट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे आणि शांततेचा नोबेल पुरस्कार विजेते आर्चबिशप डेसमंड टूटू यांचं निधन झालं आहे. ते 90 वर्षांचे होते.
दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरील रामफोसा यांनी त्यांच्या निधनाबाबत दुःख व्यक्त केलं. ते म्हणाले, "डेसमंड हे दक्षिण आफ्रिकेची शान होते. त्यांच्या निधनामुळे पोकळी निर्माण झाली आहे."
स्वतंत्र दक्षिण आफ्रिका बनवण्यात मुख्य पादरी डेसमंड टूट यांचं मोठं योगदान होतं, असंही रामफोसा म्हणाले.
राष्ट्राध्यक्ष रामफोसा यांनी डेसमंड टूटू यांना एक प्रतिष्ठित अध्यात्मिक नेते, वर्णभेदविरोधी कार्यकर्ते तसंच मानवाधिकाराचे वैश्विक प्रचारक असं संबोधलं.
देशातील लोकप्रिय व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश होता, असंही त्यांनी सांगितलं.
डेसमंड टूटू हे प्रखर देशभक्त, सिद्धांतांनुसार चालणारे तसंच व्यावहारिक नेते होते. त्यांनी बायबलमधील संदेश अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवला. कामाशिवाय धर्माला कोणताच अर्थ राहत नाही, असं ते म्हणत असत, असं रामफोसा यांनी सांगितलं.
डेसमंड टूटू यांचं निधन दक्षिण आफ्रिकेच्या वर्णभेदी सरकारमधील राष्ट्राध्यक्ष राहिलेल्या FWD क्लार्क यांच्या निधनानंतर काही आठवड्यांनी झालं. क्लार्क यांचं निधन याच वर्षी 11 नोव्हेंबरला झालं होतं.
डेसमंड टूटू कोण होते?
डेसमंड टूटू हे संपूर्ण जगभरात वर्णभेदाविरोधातील लढाईचं प्रतिक राहिलेल्या नेल्सन मंडेला यांचे समकालीन होते.
ते वर्णभेद आधारित भेदभाव तसंच फुटीरवादी धोरण नष्ट करण्याच्या आंदोलनात आघाडीने सहभागी होते.
दक्षिण आफ्रिकेचा अंतरात्मा असं संबोधल्या जाणाऱ्या डेसमंड टूटू यांनी आंदोलनाचं नेतृत्वही केलं होतं.
1948 ते 1991 दरम्यान दक्षिण आफ्रिकेत अल्पसंख्याक श्वेतवर्णीय लोकांचं शासन असताना त्यांनी प्रामुख्याने विरोध प्रदर्शनांमध्ये सहभाग नोंदवला.
श्वेतवर्णीयांच्या सत्ताकाळात कृष्णवर्णीय बहुसंख्यक जनतेविरोधात भेदभाव केला जात असे. टूटू यांनी सरकारच्या या धोरणाचा कडवा विरोध केला.
नोबेल पुरस्काराने सन्मानित
वर्णभेद नष्ट करण्यासाठी त्यांनी केलेल्या संघर्षासाठी त्यांना नोबेल शांती पुरस्काराने गौरवण्यात आलं.
1970 च्या दशकात एका युवा पादरीच्या भूमिकेसोबतच ते दक्षिण आफ्रिकेच्या वर्णभेदी सरकारच्या कडव्या विरोधकांपैकी एक होते.
1980 च्या दशकात दक्षिण आफ्रिकेत अल्पसंख्याक श्वेतवर्णीय सरकार सत्तेत होतं. त्यादरम्यान टूटू त्यांच्याविरोधात गावोगावी जाऊन प्रचार करत असत.
पण एके दिवशी जमावाने एका व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तो व्यक्ती गुप्तपणे पोलिसांसाठी काम करत असल्याचा त्याच्यावर आरोप होता.
पण टूटू यांनी त्या व्यक्तीचे प्राण वाचवण्याचं काम त्यावेळी केलं.
1986 मध्ये डेसमंड टूटू यांनी केपटाऊनच्या आर्चबिशप पदाची जबाबदारी स्वीकारली. त्याच्या तब्बल दहा वर्षांनी त्यांनी ट्रूथ अँड रिकन्सिलिएशन कमिशनचं अध्यक्षपदही भूषवलं.
वर्णभेदी सरकारच्या काळात झालेल्या गुन्ह्यांच्या संदर्भात तपास करण्यासाठी ही समिती गठीत करण्यात आली होती.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)