ड्रग्ज, टोळ्या आणि लैंगिक शोषणाच्या विळख्यातून मी 'अशी' बाहेर पडले...

- Author, अमान्डा किर्टन
- Role, बीबीसी न्यूज
प्रथमदर्शनी आलिया इतर कोणत्याही 24 वर्षांच्या तरुणीसारखीच दिसते- तिला फॅशन करायला आवडतं, ती इन्स्टाग्रामवर सेल्फी टाकत असते आणि आनंदात आहे असं वाटतं. पण तिच्या चेहऱ्यावरच्या स्मितहास्यामागे अत्याचार आणि शोषणाची कहाणी लपलेली आहे. विस्मृतीत गेलेल्या कुमारवयीन मुलींमध्ये या कहाण्या सर्रास आढळत असल्याचं तज्ज्ञ म्हणतात.
आलियाच्या बालपणीच्या आठवणींमध्ये बाहुली हातात घेऊन घरच्यांसोबत सहलीला जाण्याचे प्रसंग नाहीत.
उलट शाळेतून घरी आल्यावर समोरची खिडकी उघडी दिसली तर तिला सुटल्यासारखं वाटत असे. खिडकी उघडी आहे म्हणजे तिचे वडील मोकळी हवा आत येऊ देतायेत, एवढं तिला समजायचं आणि तिचा जीव भांड्यात पडायचा.
त्या वेळी आलियाला ड्रग्जविषयी फारसं माहीत नव्हतं. पण खिडकी उघडी असल्याचा अर्थ वडिलांची मनस्थिती चांगली आहे, एवढं तिला कळत होतं. "कधी खिडकी बंद असेल पण धूर नसेल, तर डॅडींना हवंय ते त्यांच्याकडे नाहीये, एवढं मला कळायचं," असं ती सांगते.
त्याच वेळी लंडनच्या दक्षिण भागातील त्यांच्या घरात बंद दाराआड काय चाललंय, हे त्यांच्या कुटुंबाबाहेरच्या कोणालाही माहीत नव्हतं. घरात मारहाण व्हायची आणि कधीकधी त्याची झळ आलियालाही बसायची. अशा वेळी रात्री ती आणि तिची बहीण त्यांच्या पलंगावर एकमेकांना कवटाळून बसायच्या आणि तशाच झोपी जायच्या.
काही वेळा पैशाची चणचण भासायची आणि कधीकधी पैसे नसल्यामुळे जेवायलाही पुरेसं नसायचं. काही वेळा घरी खायला काहीच नसल्यामुळे उपाशी पोटीच शाळेत गेल्याची आठवण आलिया सांगते.

अशी अनेक वर्षं गेल्यावर मग सरकारच्या सामाजिक सेवा विभागाने आलियाला व तिच्या भावंडांना स्वतःच्या देखरेखीखाली घेतलं. पण तोवर आपल्याला व आपल्या भावंडांना सुरक्षित ठेवण्याची संधी वाया गेली होती, असं आलियाला वाटतं. सामाजिक सेवा विभागाचे अधिकारी घरी आले तेव्हा आपले आईवडील त्यांना 'हसऱ्या चेहऱ्यां'नी कसे सामोरे गेले, हे तिला आजही आठवतं.
मुलांशी संबंधित गुन्हेगारी कृत्यांबाबत सल्लागार म्हणून काम करणाऱ्या केंड्रा हाउसमन यांच्या मते, आलियासारख्या मुलामुलींचे अनुभव प्रचलित आकृतिबंधाला धरून आहेत. "घरचं वातावरण सुरक्षित नसेल, तर अशी मुलं शोषणाला बळी पडू शकतात." आलियासारख्या अनेक मुलींच्या कहाण्या प्रकाशात आलेला नाहीत, याकडेही त्या लक्ष वेधतात.
पण सर्व अडचणींवर मात करून आलियाने तिचं जगणं स्थिरस्थावर केलं.
आलिया आठ वर्षांची असताना एकदा तिच्या वडिलांनी स्वतःचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मित्रांना घरी बोलावलं. त्यातल्या कोणीतरी आलियाला शॅम्पेन दिली. ती इतकी शॅम्पेन प्याली की शेवटी तिला विषबाधा झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करावं लागलं.
आलियाच्या व्यसनाधीनतेची ही सुरुवात होती. "त्या प्रसंगानंतर मला कायमच दारू प्यावी वाटायची," असं ती सांगते. तेरा वर्षांची होईपर्यंत आलिया पूर्णतः दारूच्या आहारी गेली होती. "दारूची समस्या गंभीर झाली होती- मला निराश वाटायचं म्हणून मी प्यायचे."
कालांतराने तिच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला. तिच्या वडिलांनी घर सोडलं आणि हळूहळू त्यांचं घर (अंमली पदार्थांशी संबंधित वर्तुळांमध्ये वापरल्या जाणाऱ्या भाषेत) 'ट्रॅप हाऊस' झालं. त्यांच्या घरात अंमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रं ठेवली जाऊ लागली आणि अशा व्यवहारांमध्ये गुंतलेले दलाल त्यांच्या घरी ये-जा करू लागले.
एकदा अशा वेळी एकटं असतानाची आठवण आलिया सांगते.
"मी १० वर्षांची असतानाची गोष्ट आहे. आमच्या घरात हे सगळे ड्रग डीलर आलेले असताना मी एकटीच होते," असं ती सांगते. लहान असल्यामुळे आपलीच काहीतरी चूक झाली असेल, असं तिला वाटायला लागलं. "माझं काय चुकलंय ते मात्र मला खरोखरच कळत नव्हतं."

त्यांच्या घरी नियमितपणे येणाऱ्या एका माणसाला तिथे काहीतरी विचित्र होत असल्याचं लक्षात आलं. "त्याने खरोखरच काळजीने विचारणा केली," असं ती सांगते. तो आलियाची काळजी घेऊ लागला, त्यांची मैत्रीही झाली आणि आजही तिचा त्या माणसाशी संपर्क आहे. "आईवडील सोबत नसलेली ही लहान मुलगी असल्याचं त्यांना कळलं असावं. मला आईवडिलांची गरज होती आणि शक्य असेल तेवढा मला आधार द्यायला हवं असं त्यांना वाटलं असावं."
सरकारच्या बालसंरक्षण नोंदपटामध्ये आलियाची नोंद झालेली असली, तरी तिला अजूनही घरच्या परिस्थितीतच जगावं लागत होतं. प्रशासकीय अधिकाऱ्यांचं वागणंही समजून घ्यायला अवघड जात असल्याचं आलिया सांगते. "त्यांना अनेक गोष्टी कळायच्या नाहीत, असं मला वाटतं. आजच्या काळात घरामध्ये अशा गोष्टी घडत असतील तर ते मूल सरळ वायाच जाईल," असं ती सांगते.
अखेरीस आलिया 12 वर्षांची झाली तेव्हा तिला संगोपन सेवा पुरवण्यात येऊ लागली. परंतु, तोवर ती खूपच अस्वस्थ मुलगी झाली होती.
तीन वर्षांच्या कालावधीमध्ये आपल्यला सुमारे 20 संगोपनगृहांमध्ये फिरवण्यात आल्याचं आलिया सांगते. ती सगळीकडून पळून जायची आणि बाहेरच झोपायची. बेशुद्ध होईपर्यंत ती दारू प्यायची. शाळेत तिची वागणूक आणखी बिघडली- ती वस्तू मोडायची आणि इतर मुलांवर गुंडगिरी करायची.
यातून बाहेर पडायची काहीच वाट दिसत नव्हती, असं ती सांगते. ती स्वतःला दुखापतसुद्धा करून घ्यायची आणि अनेक वेळा तिने आत्महत्येचाही प्रयत्न केला.
थोड्या मोठ्या कुमारवयीन मुलांसोबत हिंडताना आलिया गुन्हेगारी, हिंसाचार व अंमली पदार्थांच्या जगामध्ये ओढली गेली. त्यानंतर ती चोऱ्या करू लागली, लोकांना मारू लागली- बालपणातील आघातामुळे ती विध्वंसक मार्गाला लागली, असं ती म्हणते.
तिच्या टोळीतल्या कोणी अपेक्षित नसलेलं कृत्य केलं, तर अशा सदस्यांना शारीरिक शिक्षा देण्याचं काम आलियाकडे देण्यात येऊ लागलं, इतकी तिची याबाबतीत ख्याती झाली ही.
"मी स्वतःलाही इजा पोचवायचे आणि दुसऱ्यांनाही इजा पोचवायचे," असं ती सांगते. "माझ्या पूर्वायुष्यातील अनुभवांमुळे हे घडत होतं- मला ते सहन करावं लागणं योग्य नव्हतं, आणि त्याचा माझ्यावर परिणाम झाला होता.
"माझं बालपणच माझ्याकडून हिरावून घेतलं गेलं. तेव्हा मी अगदीच नकळत्या वयात होते. त्यानंतर परिस्थिती आणखीच बिघडत गेल्यामुळे मला माझं बालपण परत मिळालंच नाही."

या सगळ्यामुळे आलिया सोयीस्कर नातेसंबंधांना बळी पडण्याची शक्यता वाढली. ती विशीमध्ये असताना तिला एक मोठ्या वयाचा एक माणूस भेटला आणि त्याने तिच्याशी संबंध जोडले. "मी त्याच्या प्रेमात आहे असं मला वाटलं," असं ती सांगते.
पण वास्तव खूप वेगळं होतं. "तो त्याच्यासाठी मला ड्रग्स विकायला लावायचा," असं ती म्हणते. "माझं शोषण होतंय हेही मला सांगता आलं नाही." लवकरच त्यांच्या नात्यात फारकत आली.
लंडनमधील एक सामाजिक कार्यकर्त्या रिटा जेकब्स म्हणतात, शोषणाचं हे "बॉयफ्रेंड मॉडेल" सातत्याने दिसून येतं.
"काही मुलांना त्यांचं शोषण होतं आहे याची जाणीवच होत नाही. आपण खरोखरच जोडीदाराच्या प्रेमात आहोत असं त्यांना वाटतं आणि हा जोडीदार आपल्यावर अत्याचार करतो आहे असं त्यांच्या लक्षात येत नाही," असं जेकब्स सांगतात.
आलियाचे हे संबंध ऑफलाइन जगात जुळले होते. पण आता त्या घटनेला दशक उलटलं आहे, तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे आणि असुरक्षित मुलींचं शोषण करणंही त्यामुळे सोपं झालं आहे, असं एनएसपीसीसीसोबत ऑनलाइन बालसुरक्षा धोरणाच्या अधिकारी हॅना रश्चेन म्हणतात.
एनएसपीसीसी या संस्थेकडील आकडेवारीनुसार, इंग्लंड व वेल्स इथे 2020-21 मध्ये बालकांशी लैंगिक संदेशन केल्याचे 5,441 गुन्हे नोंदवण्यात आले. आधीच्या वर्षापेक्षा या घटना 9 टक्क्यांनी वाढल्या, तर 2017-18 च्या तुलनेत ही संख्या 69 टक्क्यांनी वाढली. 2017-18 साली या गुन्ह्यांचं पहिल्यांदा वर्गीकरण करण्यात आलं.
ऑनलाइन नातेसंबंध जुळवून शोषण होणाऱ्या बालकांमध्ये 80 टक्क्यांहून अधिक मुली असतात आणि बहुतांश मुलं 12 ते 15 वर्षांमधील असतात, असं एनएसपीसीसीने म्हटलं आहे.
"इंटरनेटमुळे मुलांपर्यंत सतत पोचणं शक्य झालं आहे, त्यामुळे या गोष्टी खूप चटकन घडू शकतात. एखादी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून लगेचच छायाचित्रं ऑनलाइन शेअर करण्यापर्यंत मजल जाणं शक्य असतं," असं रश्चेन म्हणतात.
आलिया 14 वर्षांची असताना संगोपनगृहांमधून पळून जात होती. ती विविध मित्रमैत्रिणींच्या घरी राहिली. आपण हरवल्याची नोंद संबंदित संगोपनगृहांमध्ये झाल्याचं तिला माहीत होतं, त्यामुळे ती बाहेर पडायची नाही.
अखेरीस, हा तुटलेपणा तिच्या अंगावर आला आणि तिने स्वतःला पोलिसांच्या हवाली केलं. तिला पहिल्यांदाच बालसुधार गृहात पाठवण्यात आलं.
तिचं जगणं चांगल्या अर्थी बदलण्याची ही सुरुवात होती. तिला अजाणता हा बदल घडत होता.

ती लंडनच्या दक्षिण भागातील क्रॉयडन इथल्या ब्रिजेस लेन या इमारतीमध्ये आली तेव्हा आलिया 15 वर्षांची होती. आपण घाबरलेलो नाही, असं दाखवायचा तिने प्रयत्न केला, पण मनातून ती धास्तावलेली होती- हा अनुभव तिच्यासाठी पूर्णतः नवीन होता.
बालसुधारगृहातील पहिल्या दिवशी तिथल्या कर्मचारीवर्गातील प्रौढ व्यक्तीने तिला नियम सांगितले: बाहेर संचारबंदी आहे, त्यामुळे वेळेत संस्थेत परतायला हवं. रोज रात्री संस्थेतील रहिवाशांनी बालसुधारगृहातील कर्मचाऱ्यांसोबत जेवायचं.
"तिने सगळे नियम जवळपास मझ्या घश्याखाली उतरवले आणि मला त्याचीच गरज होती," असं आलिया सांगते. यापूर्वी तिने कधी शिस्त अनुभवलीच नव्हती. "मला ते आवडलं. मी तसं दाखवलं नाही, कारण माझा कोणावरही विश्वास नव्हता."
ब्रिजेस लेनमधील आलियाची सुरुवातही अडखळत झाली. ती तिथेही गैरवर्तन करायची, किती ताणता येतंय ते पाहायची. "मी त्यांची परीक्षा घेत होते, असं मला वाटतं. पण वास्तविक मी मदतीसाठी टाहोसुद्धा फोडत होते. मला कुटुंबाची गरज होती. मला कोणाला तरी मिठी मारून रडायचं होतं आणि हे मला तिथे करता आलं. आणि मग मला रोवेना भेटली," असं आलिया सांगते.
रोवेना मिलरकडे आलियाची काळजी घेण्याची जबाबदारी होती. रोवेनाची ही पहिलीच नोकरी होती. रोवेना आपल्याला आधार देईल हे आलियाला त्या क्षणीच कळलं. कोणीतरी आपल्यावर विश्वास दाखवतंय, असा अनुभव आलियाला या वेळी पहिल्यांदा आला.
"मला आयुष्यातील अनुभवांचा ताण सहन करावा लागत होताच. आणि अजूनही तो आघात काही अंशी माझ्या मनात आहे," असं ती सांगते.
"पण आधीपेक्षा हा ताण कसा हाताळायचा हे मला अधिक चांगल्या रितीने कळलं आहे. आधी मला मी तणावाखाली असल्याचं कळत नव्हतं."
शोषणाचे परिणाम अनेक वर्षं टिकून राहू शकतात आणि आलियासारख्या अनेक मुलींना त्यातून बाहेरही पडता येत नाही. पण आलिया त्यातून बाहेर पडली.
"त्या बालसुधारगृहामुळे मी माणसात आले," असं ती म्हणते.
ब्रिजेस लेनमधून बाहेर पडताना तिचा स्वभाव बदललेला होता. सोळाव्या वर्षी ती गरोदर राहिली, तेव्हा तिच्या मनात धोक्याच्या घंटा वाजू लागल्या. "मला जे काही अनुभवावं लागलं त्यातलं काहीच माझ्या बाळाला सहन करावं लागणार नाही, असं मी पक्कं केलं," असं ती म्हणते..
अजूनही आपण सामाजिक सेवा विभागाच्या देखरेखीखाली आहोत आणि आपण नियमांचा भंग केला तर आपण मूल आपल्याकडून घेतलं जाईल हे आलियाला माहीत होतं. त्यामुळे तिला संबंधित अधिकाऱ्यांकडून बैठकीसाठी बोलावलं जात असे तेव्हा ती प्रत्येक वेळी तिथे जाऊ लागली, तिने सिगरेट आणि दारू पिणं सोडून दिलं.
सात वर्षांपूर्वी तिने एका मुलीला जन्म दिला. गरोदरपणाचा काळही अवघड होता, पण या अनुभवाने आपलं आयुष्य बदलल्याचं आलिया सांगते. "ती नसती, तर मी आज इथे नसते. तिने मला वाचवलं," असं आलिया म्हणते. "आज ती सात वर्षांची आहे, आणि मी सात वर्षांची असताना जे सहन करत होते तसं काहीच तिला सहन करावं लागत नाहीये. त्यासाठी मी दर दिवशी ईश्वराचे आभार मानते."
आज आलिया तिच्या मुलीसोबत खऱ्या अर्थाने एका 'घरा'त राहते.

त्या सर्वसामान्य जीवन जगतात- आलिया काम करते, तिला कविता लिहायला आवडतं आणि सामाजिक कार्यकर्ता होण्यासाठीचा अभ्यासक्रम ती आता करणार आहे, जेणेकरून रोवेनाने तिला मदत केली तशी ती इतर मुलांची मदत करू शकेल.
"अजून माझा प्रवास सुरू आहे. मी मुलीची काळजी घेते. आता मी आई आहे, माझं घर आहे, नुसत्या चार भिंती नव्हेत, तर हे आमचं खरंखुरं घर आहे. मी कामाला जाते. या भागातले लोक रोज माझ्याकडे बघून स्मितहास्य करतात. एवढं मी नक्कीच कमावलं, आणि मी माझं जगणंही सुधारलं."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








