You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
HIV बद्दल 2021 मध्येही पसरत आहे 'ही' चुकीची माहिती
- Author, रेशेल श्राएर
- Role, आरोग्य प्रतिनिधी
काही दशकांपूर्वी पॉल थॉर्न त्यांच्या आईवडिलांना शेवटचे भेटले होते, त्या वेळी त्यांनी जेवायला वापरलेली भांडी त्यांच्या आईवडिलांनी संसर्गाच्या भीतीने फेकून दिली. पॉल यांना 1988 साली एचआयव्हीची लागण झाल्याचं निदान झालं, त्यानंतर त्यांना परिचारकाचं प्रशिक्षण थांबवावं लागलं.
"माझा विशीमधला संपूर्ण काळ भयग्रस्त अवस्थेत गेला," ते म्हणतात.
आता युनायटेड किंग्डममध्ये स्थायिक झालेले थॉर्न दिवसात एक गोळी घेणं आणि वर्षातून दोनदा डॉक्टरांकडे जाणं या कृतींव्यतिरिक्त एचआयव्हीचा विचारही करत नाहीत.
एचआयव्ही झालेल्या लोकांवर योग्य उपचार झाले, तर त्यांना पूर्णतः सर्वसाधारण रीतीने आयुष्य जगता येतं. जेवायला एकच ताट वापरलं तर 'ह्यूमन इम्यूनोडेफिशिअन्सी व्हायरस'ची (एचआयव्ही) लागण होते, ही कालबाह्य व चुकीची मतं आता बहुतांशाने लुप्त झाली आहेत, पण अजूनही काही चुकीची माहिती पसरत असते.
'उपचार आहेत'
केनियातील डोरिन मोरा मोराचा हिला जन्मतःच एचआयव्हीची लागण झालेली होती, पण 2005 साली वयाच्या तेराव्या वर्षी तिच्या संसर्गाचं निदान झालं.
मग टीव्हीवरील जाहिरात बघून ती टान्झानियातील एका माणसाकडे उपचारासाठी केली. आपण मोरा मोराचा आणि तिच्या आईलाही एचआयव्हीपासून बरं करू शकतो, असं त्या माणसाने सांगितलं.
"तो विकत असलेली वनौषधी आम्ही प्यायलो आणि आम्ही एचआयव्हीमुक्त झालो आहोत असा समज करून घेऊन परत आलो," असं डोरीन सांगते.
तिने विषाणूची वाढ रोखणारी नेहमीची औषधं घेणं बंद केलं. शेवटी रोगप्रतिकारक क्षमता खालावल्यामुळे तिला नागीण आणि न्यूमोनिया असे आजार झाले.
शिवाय, तिच्या रक्तामधील एचआयव्हीचं प्रमाण इतकं वाढलं की, तिला दुसरा काही संसर्ग झाला तर तिचा मृत्यू ओढावेल, असं डॉक्टरांनी तिला सांगितलं.
एचआयव्हीवर उपचार केले नाहीत तर त्यातून 'अक्वायर्ड इम्यून-डेफिशिअन्सी सिन्ड्रोम' (एड्स) होऊ शकतो- हा आजार झाल्यावर रुग्णाचं शरीर सौम्य संसर्गांचाही प्रतिकार करू शकत नाही.
आपल्याला वनौषधी देणाऱ्या माणसाने फसवलं, हे डोरीनच्या लक्षात आलं. एचआयव्हीवर कोणतीही लस नाही किंवा रोगमुक्त करणारा उपचारही नाही, पण एचआयव्हीमुक्त होता येतं असा समज सर्रास आढळतो, असं आंतरराष्ट्रीय एड्स संस्थेच्या डॉ. आदीबा कमारुल्झमान म्हणतात.
या विषाणूच्या संसर्गातून बरं होणाऱ्या लोकांच्या अलीकडील दाखल्यांमुळे आशा वाढली आहे.
या महिन्यात अर्जेन्टिनातील एक महिला सकृत्दर्शनी स्वतःच्या रोगप्रतिकारक क्षमतेद्वारे एचआयव्हीमुक्त झाली. अशा प्रकारे कोणी रुग्ण एचआयव्हीमुक्त झाल्याची ही जगातील केवळ दुसरी घटना आहे. पण हे कसं किंवा का घडलं, याबाबत अजून स्पष्टता नाही.
'तुम्ही कायमच संसर्गजन्य राहता'
एचआयव्हीचा कलंक दूर राहावा यासाठी घानाहून जर्मनीला आलेल्या जॉयस मेन्साह सांगतात की, या संसर्गाबद्दलच्या गैरसमजुतींमुळे त्यांचे अनेक नातेसंबंध तुटले आणि त्यांना नोकरीही गमवावी लागली.
एचआयव्ही झालेल्या लोकांमुळे कायमच त्यांच्या जोडीदाराला किंवा पाल्याला या विषाणूची लागण होण्याचा धोका असतो, या चुकीच्या समजुतीमुळे ही कलंकाची भावना निर्माण होते, असं त्या म्हणतात.
"कोणी व्यक्ती स्वतःला एचआयव्हीची लागण झाल्याचं तिच्या कुटुंबसदस्यांना किंवा जोडीदाराला सांगते... तेव्हा हे 100 टक्के सुरक्षित नसतं, एकदा एचआयव्ही पॉझिटिव्ह आलं की कायम पॉझिटिव्हच राहतं, असा लोकांचा गैरसमज असतो," असं मेन्साह म्हणतात.
वास्तविक दीर्घ काळ विषाणूविरोधी औषधं घेतल्यानंतर संबंधित लोकांकडून इतरांना विषाणूची लागण होत नाही, कारण संसर्गासाठी त्यांच्याकडे पुरेसे विषाणू नसतात (पण त्यांच्या शरीरातील एचआयव्हीचा संसर्ग मात्र कायम असतो आणि त्यांना आयुष्यभर उपचार घेत राहावे लागतात).
मेन्साह यांनी उपचार घेत असतानाच्या काळात चार मुलांना जन्म दिला आणि त्यांच्यातील कोणालाही या विषाणूचा संसर्ग झालेला नाही.
जगभरात, २०१० सालापासून मातेकडून बालकाला एचआयव्ही संसर्ग होण्याचं प्रमाण अर्धं झालं आहे, कारण त्यावरील उपचारांचा अधिकाधिक प्रसार होतो आहे.
पण घानामध्ये मेन्साह यांच्या मुलीलाही एचआयव्हीची लागण झालेली असेल आणि त्यातून इतरांना संसर्ग होईल अशा चुकीच्या धारणेपोटी मुलीला शाळेतून घरी पाठवण्यात आलं.
युनायटेड किंगडममधील टेरेन्स हिगिन्स ट्रस्ट या धर्मादाय संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी इयान ग्रीन एचायव्हीग्रस्त आहेत. ते म्हणतात, "एचआयव्हीसोबत राहणाऱ्या लोकांना, आणि अर्थातच मलाही अनेकदा आपण आजाराचे वाहक आहोत असं वाटत असतं. ही सर्वांत मोठी अडचण आहे."
"माझ्यामुळे कोणाला तरी या विषाणूची लागण होईल, अशी भीती मला अनेक वर्षं वाटत होती.
"त्यामुळे माझ्याकडून या विषाणूचा प्रसार होण्याची शक्यताच नाही, हे कळल्यामुळे मला प्रचंड मुक्त झाल्यासारखं वाटलं."
'एचआयव्ही संपुष्टात आला आहे'
एचआयव्ही म्हणजे काही देहदंडाची शिक्षा नव्हे आणि या विषाणूची लागण झालेले लोक पूर्णतः सर्वसामान्य व सुदृढ आयुष्य जगू शकतात, पण या संदर्भातील दृष्टिकोन दुसऱ्या बाजूने खूपच कलला आहे, असं एचआयव्ही जागरूकतेसाठी अभियान चालवणारे कार्यकर्ते म्हणतात.
"एचआयव्हीवरील उपचार व प्रतिबंधात्मक उपाय यांबाबतीत प्रचंड प्रगती झाली आहे, पण आता एड्स संपुष्टात आला आहे, असा दृष्टिकोन पसरणं प्रतिबंधात्मक उपायांच्या दृष्टीने अजिबातच उपयोगी नाही आणि एचआयव्हीवरील उपचाराच्या शोधामधील गुंतवणुकीच्या संदर्भात तर हे अगदीच विपरित ठरणारं आहे," असं डॉ. कामरुल्झमान म्हणतात.
संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार, 2020 साली जगभरातील सुमारे तीन कोटी 80 लाख लोक एचआयव्हीग्रस्त होते आणि एड्ससंबंधित आजारांमुळे सात लाख लोकांचा मृत्यू झाला. विषाणूवर उपचार न झाल्यामुळे हे घडलं असण्याची शक्यता आहे.
तरुण लोकांना हा जुन्या लोकांच्या काळातील आजार वाटतो, असं थॉर्न म्हणाले. या संदर्भात तरुणांमध्ये 'सर्वसाधारणतः कमी जागरूकता आहे,' असं ग्रीनसुद्धा म्हणतात.
"एचआयव्ही ही भूतकाळातील गोष्ट असल्याचा त्यांचा समज आहे," असं ते सांगतात.
'मी काही एचआयव्हीग्रस्त होणाऱ्यांतला नाही'
तरुणांना हा आजार जुन्या काळातील लोकांचा वाटतो, तसंच अनेकांना असंही वाटतं की, एचआयव्हीची लागण केवळ समलिंगी पुरुषांनाच होते.
जगभरात, एचआयव्हीग्रस्तांपैकी अर्ध्याहून थोड्या अधिक संख्येने महिला आहेत- आणि प्रजननक्षम वयातील महिलांमधील हा सर्वाधिक प्राणघातक आजार आहे, असं फ्रंटलाइन एड्स या सेवादायी संस्थेच्या ख्रिस्चन स्टेगलिंग म्हणतात.
आपण क्वचितच काही महिलांना यातील धोक्याची जाणीव असते, असंही त्या नमूद करतात.
"संवाद वाढवण्यासाठी ही माहिती खूप महत्त्वाची आहे, कारण या वयोगटातील महिला आणि गरोदर राहू इच्छिणाऱ्या महिला यांच्याशी असुरक्षित सेक्सविषयी संभाषण करणं अवघड असतं," असं स्टेगलिंग म्हणतात.
या संदर्भात बरीच प्रगती करण्यात आली असली, तरी एचआयव्हीसंबंधी अजूनही पसरत असलेल्या चुकीच्या माहितीमुळे लोकांना त्यांच्या नोकऱ्या, नातेसंबंध आणि योग्य उपचार गमवावे लागत आहेत, इतकंच नव्हे तर मुळात कित्येकांच्या संसर्गाचं निदानही यामुळेच होऊ शकत नाही.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)