Demisexuality म्हणजे काय? ही लैंगिक प्रवृत्ती इतर लैंगिक प्रवृत्तींसारखीच?

    • Author, जेसिका क्लेन
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

काही लोकांना एखाद्या व्यक्तीकडे आकर्षित होण्यासाठी त्या व्यक्तिबरोबर भावनिक नातं खोलवर जुळलेलं असणं गरजेचं असतं. अनेक लोक याला लैंगिक प्रवृत्तीच मानत नाही. मात्र, डेमिसेक्श्युअल असणाऱ्यांच्या मते, असा विचार करणं चुकीचं आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला जेव्हा न्यूयॉर्कचे तत्कालीन गव्हर्नर अँड्र्यू कुमो यांची मुलगी मिशेला केनडी-कुमो या डेमिसेक्श्युअल असल्याचं समोर आलं, त्यावेळी त्यांना लोकांच्या विचित्र प्रतिक्रियांचा सामना करावा लागला. अनेकांनी त्यांची तिची खिल्ली उडवली. डेमिसेक्श्युअल (दृढ भावनिक नात्याशिवाय एखाद्याबद्दल आकर्षण न वाटणे) असल्याने त्यांची खिल्ली उडवण्यात आली. काही मोजक्या लोकांनी डेमिसेक्श्युयालिटी खरंच असल्याचं स्वीकारलं.

या लैंगिक प्रवृत्तीबद्दल अनेकांना फारशी माहिती नसली तरी जगभरातील अनेकांमध्ये असलेली ही लैंगिक प्रवृत्ती तर लैंगिक प्रवृत्तींसारखीच आहे.

डेमिसेक्श्युयालिटीचा असेक्श्युयालिटीच्या (लैंगिक आकर्षण कमी असणे किंवा नसणेच) दृष्टीनं विचार करता, एखाद्याशी शारीरिक संबंध ठेवण्यापूर्वी चांगलं नातं निर्माण होण्यासाठी वाट पाहण्यापेक्षा ते वेगळं आहे. जोपर्यंत अशाप्रकारचं नातं तयार होत नाही, किंवा त्या व्यक्तीबद्दल लैंगिक आकर्षण निर्माण होईल, तोपर्यंत असेक्श्युअल राहणं म्हणजे डेमिसेक्श्युयालिटी आहे. दुसरीकडे लैंगिक आकर्षण असलेल्यांचा विचार करता, भावनिक नातं तयार होईपर्यंत थांबणं ही गरज नसून शारीरिक संबंधांची इच्छा निर्माण होण्यासाठी असलेलं प्राधान्य आहे.

केनेडी कुमो यांच्या वक्तव्याचा सकारात्मक परिणामही झाला, असं डेमिसेक्श्युअल असलेल्या आणि साऊंड्स फेक बट ओके या पॉडकास्टच्या सहनिर्मात्या कायला कास्झिका यांनी म्हटलं. या पॉडकास्टमध्ये त्या त्यांच्या असेक्श्युअल आणि अरोमँटिक सहकारी सारा कोस्टेलो यांच्याबरोबर प्रेम, रिलेशनशिप्स (नाती) आणि लैंगिकता या विषयांवर चर्चा करत असतात. काही प्रकरणांमध्ये कुमो यांच्या वक्तव्यानंतर डेमिसेक्श्युयालिटीबाबत चर्चा वाढली, असं कास्झिका म्हणाल्या.

त्याचवेळी याबाबच अधिक चर्चा झाल्यानं याचे काही विरोधकही समोर आले आणि याबाबत काही चुकीची माहिती पसरली. "मला वाटतं हा शब्द [demisexuality] नक्कीच सर्वाना परिचित आहे. मात्र, त्याची परिभाषा किंवा त्याचा अर्थ अनेक लोकांना स्पष्टपणे माहिती नाही," असं कास्झिका म्हणाल्या.

उदाहरण द्यायचं झाल्यास, अनेक लोक अजूनही डेमिसेक्श्युयालिटीला नाकारतात, मात्र त्यांना एखाद्याबरोबर दृढ नातं तयार होईपर्यंत लैंगिक आकर्षण निर्माण न होणं, हे मात्र अगदीच सामान्य वाटतं. पण मग सगळेच असे नसतात का? असंही म्हणता येऊ शकतं.

त्यामुळं आता मिथकं तोडायला सुरुवात करावी लागेल, असं कास्झिका म्हणाल्या.

कास्झिका आणि त्यांच्यासारखे डेमिसेक्श्युअल अशी ओळख असलेले काही जण त्यांच्या या लैंगिक प्रवृत्तीबद्दल माहिती देण्याचं काम करत आहेत. याचा नेमका अर्थ समजावून सांगण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे. एवढे दिवस लोकांना माहितीच नसलेल्या लैंगिक प्रवृत्तीबाबत चर्चा करणं किंवा त्याची माहिती देणं ही काहीशी क्लिष्ट प्रक्रिया ठरते. विशेषतः अशा प्रकारचा संभ्रम करणारा विषय माहिती देण्यास अधिक त्रासदायक ठरतो.

पण त्यांच्या कामामुळं काही परिणाम नक्कीच होत आहे. गेल्या काही वर्षांपासून डेमिसेक्श्युयालिटीबाबतची चर्चा प्रामुख्याने फेसबूक ग्रुप, इन्स्टाग्राम पोस्ट, डिस्कॉर्ड सर्व्हर आणि जगातील असेक्श्युलबाबत काम करणाऱ्या संघटनांमध्ये वाढली आहे.

'मला अर्थच समजला नाही'

लोक अनेकदा डेमिसेक्श्युअल या शब्दाचा शोध घेताना 2006 मधील असेक्श्युअल व्हिजिबिलिटी अँड एज्युकेशन नेटवर्क (Aven)फोरम च्या पोस्टचा संदर्भ लावतात.

अँथनी बोगार्ट हे मानवी लैंगिकतेसंदर्भातील अभ्यासक आणि कॅनडाच्या आँटारिओ विद्यापीठातील प्राध्यापक असून त्यांनी असेक्श्युलिटीबाबत पुस्तकंही लिहिली आहेत. "हा शब्द अभ्यासातून नव्हे तर, प्रामुख्यानं अॅव्हनच्या साईटवरून आणि असेक्श्युलिटीसाठी काम करणाऱ्यांच्या माध्यमातून उदयास आला आहे," असं ते म्हणाले. असेक्श्युअलमध्येही लैंगिक प्रवृत्ती किती वेगवेगळ्या प्रकारच्या असू शतकतात याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न त्यावेळी लोक अॅव्हनच्या साईटवर करत होते. त्यानंतर याबाबतच्या नव्या परिभाषा समोर येऊ लागल्या. यापूर्वी असेक्श्युअल म्हणून ओळख असणाऱ्यांच्या लैंगिक आकर्षणाच्या अनुभवानुसार काही नवी माहिती त्यातून समोर आली.

"अॅव्हनच्या साईटवर विविध प्रकारची ओळख असलेल्या आणि वैविध्य असलेल्यांना येऊ देण्याची परवानगी देण्याची परंपरा आहे," असं बोगार्ट म्हणाले. या सर्वांनी असेक्श्युलिटीबाबतची चर्चा पुढं नेण्यास मदत केली. असं करताना त्यांनी इंटरनेटवर इतर कुठेही उपलब्ध नसलेली माहिती याठिकाणी उपलब्ध करून दिली.

अजूनही डेमिसेक्श्युयालिटीशी तुलना करता असेक्श्युयालिटीची अधिक चर्चा झालेली आहे आणि सुरुदेखील आहे. पूर्वीची संकल्पना अधिक सोपी असणं हे काही अंशी त्यामागचं कारण आहे. असेक्श्युअल व्यक्ती लैंगिक आकर्षणाचा अनुभव घेत नाहीत, असं कास्झिका म्हणाल्या.

अमेरिकेच्या इंडियाना येथील एली रोझ या 28 वर्षीय महिलेनं काही वर्षांपूर्वी मैत्रिणीला लैंगिकतेबाबत सांगितल्यानंतर त्यांना डेमिसेक्श्युअल म्हणून ओळखलं जाऊ लागलं. तिनं माझ्याकडं पाहिलं आणि तू डेमिसेक्श्युयालिटीचं वर्णन करत आहे, असं मला म्हटल्याचं रोझ यांनी सांगितलं. बराच काळ लोटल्यानंतरही मला याबाबत फारसंही लक्षात आलं नाही. डेमिसेक्श्युअल अशा ओळखीमुळं डेटिंगवर परिणाम होण्याची शक्यता असल्यानं त्या अनेकदा डेमिसेक्श्युअल असल्याचं सांगण्याऐवजी पॅनसेक्श्युअल असल्याचं सांगतात.

'आता ओळख मिळायला सुरुवात झाली आहे'

शुद्धतेची कल्पना असलेली संस्कृती हे या नकारात्मक वृत्तीमागचं कारण असू शकतं, असं मत रोझ व्यक्त करतात. त्यानुसार एक अशी वेळ असते जेव्हा महिला लैंगिक ओळखीचा विचार करतात, त्याचवेळी त्यांना स्वतःसाठी (लग्नासाठी किंवा धार्मिक दृष्टीनं) योग्य व्यक्तीही हवी असते. एका अर्थानं हा प्रकार दृढ नातं निर्माण होईपर्यंत शारीरिक संबंध टाळणं असाच असतो. पण अजूनही ज्या डेमिसेक्श्युअलची ओळख जाहीर नाही त्यांच्याबाबत प्राधान्यानं हा प्रकार असतो.

या सर्वातून अनेकदा एकटेपणा निर्माण होण्याची शक्यता असते. जेव्हा तुम्हाला तुमच्यासारख्या इतराप्रमाणे लैंगिक भावनांचा अनुभव येत नाही, तेव्हा तुम्हाला वाईट वाटतं, असं कॅनडाच्या सास्कश्वेनमधील कैरो केनडी या 33 वर्षीय महिला म्हणाल्या. ते एक मोठं गूढ आणि काहीशी लज्जास्पद बाब वाटू लागते, असंही त्या म्हणाल्या.

आपल्या या लैंगिक ओळखीला एक नाव आहे हे जेव्हा त्यांना समजलं तेव्हा त्यांना बरं वाटलं. पण त्याबाबत काहीही माहिती उपलब्ध नव्हती, असं त्या म्हणाल्या. किमान कोणीही डेमिसेक्श्युयालिटीबद्दल एखाद्याच्या अनुभवातून बोललंही नाही. याबाबत वाचण्यासाठी विचार करण्यासाठी अनेक अॅव्हन पोस्ट होत्या. "मी अशीच आहे आणि माझ्यासारखे इथे असे अनेक आहेत," याची त्यांना जाणीव झाली.

केनेडी यांनी ब्लॉक सुरू करून डेमिसेक्श्युअल बद्दलच्या माहितीची पोकळी भरुन काढायचं ठरवलं. याद्वारे इतरही अनेक डेमिसेक्श्युअल्सनं त्यांच्याशी संपर्क साधला. त्यात किशोयवयीन ते पन्नीशी पर्यंतच्या अनेकांचा समावेश होता. त्यापैकी बहुतांश अमेरिका आणि युरोपात राहणारे होते. "आपल्यासारखे किती लोक आहे, हे पाहून मला आश्चर्य वाटलं," असं त्या म्हणाल्या.

"माझ्या मते सोशल मीडियामुळं हा शब्द अधिक प्रसिद्ध झाला आहे," असं हवाई येथील थेरपिस्ट आणि मानवी लैंगिकतेच्या अभ्यासक जॅनेट ब्रिटो म्हणाल्या. त्यांनी अमेरिकेच्या मिनसोटा विद्यापीठात पोस्ट डॉक्टरेच्या अभ्यासादरम्यान 2014 मध्ये सर्वप्रथम यासंदर्भात ऐकलं होतं. "हा शब्द वर्णन करणारा (लैंगिक ओळखीचं) असला तरी तो बराच जुना आहे." ब्रिटो यांच्यामते त्यांना सर्वच वयोगटात डेमिसेक्श्युयालिटी असलेले लोक आढळतात. त्यांचे काही क्लाइंट तर विशीतील आहेत. "त्यांचा सोशल मीडियाशी अधिक संबंध आहे. त्याठिकाणी याबाबतची चर्चा अधिक होते आणि ती स्वीकारली जाते," असं त्या म्हआल्या.

सोशल मीडियामुळं त्यांना ओळख मिळण्यास सुरुवात होते. "भूतकाळातही ज्यांचा आवाज दबला गेला अशा अनेकांसाठी सोशल मीडियामुळं दारं खुली होतात. त्यामुळं लोकांना आता ओळख मिळू लागल्याचं वाटत आहे, असं त्या म्हणाल्या.

30 वर्षीय क्लॉस रॉबर्ट्स हे हेलसिंकीच्या जवळ राहतात. पाच वर्षांपूर्वी इंटरनेटमुळं लैंगिक ओळख मिळण्यास मदत झाल्याचं ते म्हणतात. "तुलनेने लहान देश असल्यामुळं फिनलँड याबाबतही काही अंशी मागं आहे," असं ते म्हणाले. त्यांची लैंगिक ओळख पूर्वी असेक्श्युअल अशी होती. पण विविध देशांतील LGBTQ+ समुदायाला ऑनलाईन माध्यामातून भेटल्यानंतर त्यांना डेमिसेक्श्युअल ही संकल्पना अधिक चांगली समजून घेता आली. ज्या लोकांना याबाबत माहिती आहे, त्यांना मी याचा वापर का करतो हे समजू शकतं, असं ते म्हणाले.

'लैंगिकतेचं स्वरुप चांगल्या प्रकारे समजून घ्या'

जेव्हा मुख्य प्रवाहातून लैंगिक प्रवृत्तींबाबत पुरेशी माहिती मिळत नाही, त्यावेळी अशा प्रकारची ऑनलाईन माध्यमे ही शिक्षणाची महत्त्वाची साधने ठरतात.

अमेरिकेच्या मिशिगन विद्यापीठात शिकत असताना कास्झिका आणि त्यांची को-होस्ट सारा कॉस्टेलो यांनी त्यांचं पॉडकास्ट सुरू केलं होतं. पण त्यावेळी केवळ मदत म्हणून त्यांचे काही मित्र ते ऐकत होते. आज इंग्रजी बोलणारे देश आणि युरोपमध्ये त्यांचा आवाज पोहोचला आहे. कास्झिका यांच्यामते साऊंड्स फेक बट ओकेचे आठवड्याचे जवळपास 7 हजार श्रोते आहेत. केवळ असेक्श्युअल असलेले लोकच नव्हे तर त्यांचे कुटुंबीय, पार्टनर, मित्रही अधिक माहिती मिळावी म्हणून हा कार्यक्रम ऐकतात, असं त्या म्हणाल्या.

आमचा सर्वाधिक पसंती मिळालेला भाग असेक्श्युयालिटी 101 हा होता, असं कास्झिका सांगतात. "लोकांनी त्यांच्या मित्रांना आणि कुटुंबातील सदस्यांना अधिक माहिती मिळावी म्हणून तो शेअर केला, असं लोक सांगतात."

अशा प्रकारची माहिती पसरल्यामुळं समाजातील इतर भागांत डेमिसेक्श्युअल्ससाठी वावर आणखी सोपा होतो. उदाहरण द्यायचं झाल्यास, डेटिंग अॅपनं आता प्रोफाईलमध्ये तुमची लैंगिक ओळख टाकण्याची सोय केली आहे. त्यामुळं अनेक अनावश्यक प्रश्न आणि अपेक्षांना पूर्णविराम मिळतो. पहिली डेट ही अगदी कॅज्युअल असायला हवी. त्यानंतर तुम्ही एकमेकांच्या संदर्भात अधिक जाणून घेता, माहिती मिळवता. त्यानंतर कदाचित डेमिसेक्श्युयालिटीबाबत जाणून घेण्यासाठी ती व्यक्ती चर्चा करेल. त्याला खूप काही समजवावं लागेल, कारण डेमिसेक्श्युयालिटीबद्दल अगदी तोकडी माहिती उपलब्ध आहे, असंही त्या म्हाल्या.

लैंगिक अल्पसंख्याकांना समाजातून वेगळं पडण्यापासून वाचवण्यासाठी असेक्श्युअल कम्युनिटीमधील विविध प्रकारांबाबत चर्चा आणि जनजागृती होणं गरजेचं असल्याचं मत, अभ्यासक बोगार्ट यांनी मांडलं. मात्र त्याचबरोबर अशी लैंगिक ओळख असणाऱ्यांनी स्वतःबाबत आणि स्वतःच्या लैंगिक प्रवृत्तीबाबत अधिक चांगल्याप्रकारे जाणून घेण्यासाठीही हे गरजेचं असल्याचं ते म्हणाले.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)