तालिबानकडून महिलांच्या TV मालिकांमध्ये काम करण्यावर बंदी

तालिबान नियंत्रित अफगाणिस्तानमध्ये महिलांना टीव्हीमालिकांमध्ये काम करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

महिला पत्रकार आणि अँकर यांनाही बातम्या देताना, ऑन कॅमेरा असताना हेडस्कार्फ परिधान करणे अनिवार्य करण्यात आलं आहे. मात्र हेडस्कार्फ कशा प्रकारचा असेल याविषयी नियमावलीत तपशीलात देण्यात आलेलं नाही.

हे नियम सरधोपट असून, आपल्या आकलनाप्रमाणे त्यावर अंमल करावा असं पत्रकारांनी म्हटलं आहे.

ऑगस्टच्या मध्यात तालिबानने अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवत सत्ता स्थापन केली. हळूहळू ते नागरिकांवर कठोर निर्बंध लागू करणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 

इस्लामिक कट्टरतावादी संघटना असलेल्या तालिबानने अमेरिका आणि सहकारी देशांनी अफगाणिस्तानमधून माघार घेतल्यानंतर नियंत्रण मिळवलं. सत्ता स्थापन केल्यानंतर त्यांनी लगेचच मुली आणि तरुण महिलांना शाळेत जाण्यापासून रोखलं. 90च्या दशकात तालिबानची सत्ता असताना महिलांना कामावर जाण्यापासून तसंच शिक्षणापासून रोखण्यात आलं होतं. 

तालिबानने अफगाणिस्तानातील टीव्ही वाहिन्यांकरता नियमावली जारी केली असून, यामध्ये आठ नियमांचा समावेश आहे. 

शरिया कायदा तसंच अफगाणिस्तानचे नागरिक ज्या मूल्यांची जपणूक करतात त्याविरुद्ध मांडणी करणाऱ्या चित्रपटांवर बंदी घालण्यात आली आहे. पुरुषांच्या शरीराचे खाजगी भाग दाखवणाऱ्या चित्रीकरणावर बंदी घालण्यात आली आहे. 

धार्मिक भावना तसंच अफगाणिस्तान नागरिक दुखावले जातील अशा स्वरुपाचा आशय असणाऱ्या विनोदी आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांवरही बंदी असणार आहे. 

विदेशी संस्कृतीला चालना देणाऱ्या विदेशी चित्रपटांचं प्रक्षेपण बंद करण्यात येईल. अफगाणिस्तानमध्ये आतापर्यंत महिला व्यक्तिरेखा मुख्य भूमिकेत असणाऱ्या विदेशी मालिका दाखवण्यात येत असत. 

हज्जातुल्ला मुजाद्दिदी या पत्रकारांसाठी काम करणाऱ्या संघटनेनं ही नियमावली अनपेक्षित असल्याचं म्हटलं आहे. यापैकी काही नियम व्यवहार्य नसून, पण या नियमांची अंमलबजावणी न केल्यास प्रक्षेपणकर्त्या वाहिनीला कामकाज बंद करायला लागू शकतं. 

तालिबानने मुली आणि तरुण मुलींना शिक्षणासाठी बाहेर जाण्यापासून रोखलं होतं. असं करणारा अफगाणिस्तान जगातला पहिलाच देश ठरला होता.

तुमचं काम पुरुष सहकारी करू शकत नसतील तरच कार्यालयात या असं काबूलच्या म्युनिसीपालिटीत काम करणाऱ्या महिलांना महापौरांनी सांगितलं आहे. 

महिलांच्या शिक्षणावर आणि काम करणाऱ्यावरचे निर्बंध तात्पुरत्या स्वरुपाचे असल्याचं तालिबानने म्हटलं आहे. शैक्षणिक संकुलं, शाळा, कचेऱ्या या काम करण्यासाठी सुरक्षित आहेत याची चाचपणी केली जात आहे. 

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)